• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

जेन झी : एकाच वयाची शंभर वेगवेगळी जगं!

रवींद्र मराठे सातासमुद्रापलीकडून

Marmik Team by Marmik Team
August 28, 2026
in बिट्वीन द लाइन्स
0
जेन झी : एकाच वयाची शंभर वेगवेगळी जगं!

ढाक्यातल्या रस्त्यावर एक तरुण मुलगी हातात फोन घेऊन उभी आहे, स्क्रीनवर लाइव्ह स्ट्रीम चालू आहे आणि मागे हजारो तरुण घोषणा देत आहेत. काही हजार किलोमीटर दूर, सोलमधल्या एका लहानशा खोलीत एक विद्यार्थी रात्रीचे दोन वाजता अभ्यासाच्या टेबलावर डोकं टेकून झोपी गेलाय, उद्याच्या परीक्षेच्या दडपणाखाली. आणि याच क्षणी, कॅलिफोर्नियातल्या एका कॉफी शॉपमध्ये एक तरुण आपल्या
लॅपटॉपवर स्वतःचा ‘साइड हसल’ स्टार्टअप चालवतोय, तर नैरोबीतला एक तरुण मोबाईल फोनवरून थेट आंतरराष्ट्रीय ग्राहकांना डिझाईन विकतोय. या चौघांचं वय जवळपास सारखंच- विशी-पंचविशीच्या घरातलं. पण त्यांची जगं? पूर्णपणे वेगळी आणि तरीही एका अदृश्य धाग्याने जोडलेली.

ही आहे आजची जेन झी
जगाच्या इतिहासातली अशी पहिली पिढी जी एकाच वेळी स्थानिक आणि जागतिक आहे. आणि तिच्या मागोमाग येणारी जनरेशन अल्फा तर याहूनही अधिक वेगळी, कारण तिने जन्मापासूनच स्मार्टफोन आणि आता कृत्रिम बुद्धिमत्ता बघितलीये.जनरेशन झीची व्याख्या करायची झाली तर ढोबळमानाने १९९७ ते २०१२ या काळात जन्मलेली मुलं. पण या व्याख्येपलीकडे जाऊन बघितलं, तर या पिढीचे अनुभव देशानुसार, संस्कृतीनुसार आणि आर्थिक परिस्थितीनुसार आश्चर्यकारकरीत्या वेगळे आहेत.

दक्षिण कोरियामध्ये जेन झी ही जगातल्या सर्वात स्पर्धात्मक शिक्षण व्यवस्थेत वाढलेली पिढी आहे. ‘सुनुंग’ या राष्ट्रीय परीक्षेच्या दिवशी संपूर्ण देश थांबतो. विमानं उशिरा उडतात, कार्यालयं उशिरा उघडतात, कारण या एका परीक्षेवर मुलांचं भविष्य ठरतं असं मानलं जातं. या दडपणाखाली मोठी झालेली मुलं आज विवाह न करण्याचा, मूल न होऊ देण्याचा निर्णय घेत आहेत. इतका की दक्षिण कोरियाचा जन्मदर जगात सर्वात कमी नोंदवला गेलाय.

याउलट, चीनमध्ये जेन झीने एक वेगळाच सामाजिक प्रतिकार शोधून काढलाय,’तांग फिंग’ म्हणजे ‘सपाट पडून राहणे’. अति स्पर्धा, अति काम आणि त्या मानाने कमी संधी यामुळे कंटाळलेली चिनी तरुण पिढी जाणीवपूर्वक कमी महत्त्वाकांक्षी जगणं निवडतेय. मोठं घर नको, मोठी गाडी नको, फक्त शांत आयुष्य हवं. हा एक शांत पण जोरदार सामाजिक संदेश आहे, जो चीनच्या सरकारलाही अस्वस्थ करतोय.
अमेरिकेत गोष्ट वेगळी आहे. तिथली जनरेशन झी ‘साईड हसल कल्चर’ मध्ये वाढलीये. म्हणजे एका नोकरीवर अवलंबून न राहता, टिकटॉकवरून, युट्यूबवरून, प्रâीलान्सिंगमधून अतिरिक्त उत्पन्न कमावण्याची सवय. एका सर्वेक्षणानुसार, अमेरिकेतल्या निम्म्याहून अधिक जेन झी तरुणांना पारंपरिक ‘नऊ ते पाच’ नोकरीपेक्षा स्वतःचा व्यवसाय किंवा कंटेंट क्रिएटर बनण्याची इच्छा आहे. पण त्याचबरोबर, हवामान बदलाची चिंता, विद्यार्थी कर्जाचा डोंगर आणि मानसिक आरोग्याच्या समस्या यांनी ग्रासलेली ही पिढी आहे.
भारतात चित्र आणखी वेगळं आहे. इथली जेन झी एका बाजूला परंपरा आणि कुटुंबव्यवस्थेशी जोडलेली आहे, तर दुसर्‍या बाजूला जागतिक संधींकडे डोळे लावून बसलीये. पुण्या-मुंबईतल्या इंजिनिअरिंग कॉलेजांमध्ये गेलं, तर लक्षात येतं की बहुतेक विद्यार्थ्यांचं एकच स्वप्न आहे. परदेशी जाणं, किंवा भारतातच राहून जागतिक कंपनीत काम करणं. ‘आऊटबाउंड जनरेशन’ असं म्हणता येईल अशी ही पिढी आहे, जिला स्थानिक मर्यादा अपुर्‍या वाटतात, पण त्याचवेळी घरच्यांच्या अपेक्षा आणि सामाजिक दडपणही तितकंच जड आहे.
आप्रिâकेत, विशेषतः नायजेरिया आणि केनियासारख्या देशांमध्ये, जेन झी ही मोबाईल-फर्स्ट अर्थव्यवस्थेची पिढी आहे. बँक खातं नसलं तरी मोबाईल पेमेंट आहे, संगणक नसला तरी स्मार्टफोनवरून जागतिक बाजारपेठेत काम मिळतंय. लागोसमधल्या एका तरुण डिझायनरने अमेरिकी कंपनीसाठी फ्रीलान्स काम करत स्वतःचं घर बांधलं, असं उदाहरण आता असामान्य राहिलेलं नाही.
दृश्यमानता, तंत्रज्ञान, जागतिक बाजारपेठ या सगळ्या वेगवेगळ्या वास्तवांना जोडणारा एक समान धागा आहे, तंत्रज्ञान, जागतिक बाजारपेठ आणि प्रचंड दृश्यमानता. आधीच्या कुठल्याही पिढीला आपल्या समवयस्कांचं आयुष्य इतक्या तपशीलात, इतक्या तात्काळ बघायला मिळालं नव्हतं. आज मुंबईतल्या एका मुलीला टोकियोतल्या मुलीचं दैनंदिन आयुष्य इन्स्टाग्रामवर तासाभरात कळतं. लागोसमधल्या मुलाला न्यूयॉर्कमधल्या मुलाचा स्टार्टअप प्रवास यूट्यूबवर दिसतो. या दृश्यमानतेचा परिणाम दुहेरी आहे. एका बाजूला यातून प्रेरणा मिळते, जागतिक संधींची जाणीव होते. पण दुसर्‍या बाजूला यातून एक सततची तुलना, एक अपुरेपणाची भावनाही जन्माला येते. मानसशास्त्रज्ञ याला ‘तुलनात्मक चिंता’ म्हणतात.सतत दुसर्‍याचं ‘हायलाइट रील’ बघून स्वतःच्या साध्या आयुष्याबद्दल असमाधान वाटणं.

एका सर्वेक्षणात असं आढळलं की जगभरातल्या जेन झी तरुणांमध्ये चिंता आणि नैराश्याचं प्रमाण मागच्या कुठल्याही पिढीपेक्षा जास्त नोंदवलं गेलंय आणि हे प्रमाण जितकं श्रीमंत, तंत्रज्ञानाने संपृक्त देशांमध्ये आहे, तितकंच विकसनशील देशांमध्येही आहे.पण याच तंत्रज्ञानाने एक अभूतपूर्व शक्तीही या पिढीला दिलीये, सीमा ओलांडून एकत्र येण्याची शक्ती. २०२४-२०२५ या काळात बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ, केनिया आणि सर्बियामध्ये झालेली तरुणांची आंदोलनं याचं उत्तम उदाहरण आहेत. या सगळ्या आंदोलनांमध्ये एक समान धागा होता, सोशल मीडियावरून काही तासांत हजारो तरुण एकत्र येणं, कुठल्याही मोठ्या राजकीय पक्षाच्या नेतृत्वाशिवाय स्वयंस्फूर्तपणे संघटित होणं. जुन्या पिढीच्या राजकीय समजुतीला हे कोडंच वाटलं- ‘नेताच नाही, तरी आंदोलन इतकं मोठं कसं?’
स्वप्नं वेगळी, महत्त्वाकांक्षा वेगळी आधीच्या पिढ्यांची स्वप्नं साधारणपणे एका रेषेत होती.चांगलं शिक्षण, स्थिर नोकरी, घर, कुटुंब, निवृत्तीनंतरची सुरक्षितता. जेन झीची स्वप्नं या रेषीय मार्गाला छेद देणारी आहेत. नोकरीत स्थैर्यापेक्षा लवचिकता हवी आहे. एकाच कंपनीत आयुष्यभर काम करण्याऐवजी दर दोन-तीन वर्षांनी नवीन अनुभव हवाय. काहींना पारंपरिक अर्थाने ‘करिअर’ नको आहे- त्यांना अर्थपूर्ण काम हवंय, मग ते कुठल्याही स्वरूपात असो.
एक गंमतीशीर पण अर्थपूर्ण उदाहरण : जपानमध्ये एका सर्वेक्षणात जेन झीच्या तरुणांना विचारलं गेलं की त्यांचं सर्वात मोठं स्वप्न काय आहे? अनेकांनी उत्तर दिलं,’कंपनी प्रेसिडेंट व्हायचं नाहीये, फक्त शांतपणे, ताणाशिवाय काम करायचंय.’ हे उत्तर जपानच्या पारंपरिक ‘सालारीमन’ संस्कृतीला जिथे कंपनीशी निष्ठा हेच सर्वस्व मानलं जायचं, थेट आव्हान देणारं आहे.

भारतातही असंच घडतंय. एका आयटी कंपनीतल्या एचआर मॅनेजरने गमतीत सांगितलेला किस्सा आहे, नव्यानं रुजू झालेल्या एका तरुण कर्मचार्‍याला विचारलं, ‘पाच वर्षांनी तू कुठे असशील असं वाटतं?’ तरुणाने निर्विकारपणे उत्तर दिलं, ‘सर, मला माहीत नाही अजून पाच महिन्यांनी मी इथे असेन की नाही!’ एचआर मॅनेजर आधी चक्रावले, पण नंतर हसले, कारण हेच आजच्या पिढीचं प्रामाणिक वास्तव आहे. निष्ठा कंपनीशी नाही, तर स्वतःच्या वाढीशी आहे.

जेन अल्फा, आणखी एक पाऊल पुढे
जेन झी ही डिजिटल जगात मोठी झालेली पिढी असेल, तर जेन अल्फा ही डिजिटल जगातच जन्मलेली पिढी आहे. या मुलांनी चालायला शिकण्याआधी टॅबलेट हाताळायला शिकलंय. यांच्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता ही काही नवलाईची गोष्ट नाही, तर रोजच्या आयुष्याचा भाग आहे. जसं मोठ्यांसाठी वीज किंवा नळाचं पाणी सामान्य आहे.

एका आईने सांगितलेला किस्सा गमतीशीर आणि विचार करायला लावणारा आहे, तिच्या सहा वर्षांच्या मुलाने एआय चॅटबॉटला ‘मित्र’ म्हणून संबोधलं आणि विचारलं, ‘याला सुट्टी कधी असते?’ या साध्या प्रश्नातून एक मोठा सामाजिक बदल दिसतो. पुढच्या पिढीसाठी माणूस आणि यंत्र यातली सीमारेषा आधीच्या पिढ्यांपेक्षा खूपच धूसर असणार आहे.
भारत : आकांक्षा नव्हे, भूक
पहाटे पाच वाजता कोटा, दिल्ली किंवा पुण्यातल्या कोचिंग क्लासबाहेर रांग लागलेली असते. हातात स्पर्धा परीक्षेचं प्रवेशपत्र, डोळ्यांखाली रात्रीच्या जागरणाच्या काळ्या रेषा, आणि मनात एकच प्रश्न— यंदा तरी नोकरी लागेल का? हे भारतीय जेन झी खरं चित्र आहे. अझीम प्रेमजी विद्यापीठाच्या  ‘State of Working India 2026’ अहवालानुसार, भारतात १५ ते २९ वयोगटातील सुमारे ३६.७ कोटी तरुण आहेत. कार्यक्षम लोकसंख्येचा एक तृतीयांश. पदव्या वाढल्या, पण रोजगार मागे राहिला. १५ ते २५ वयोगटातील पदवीधरांमध्ये बेरोजगारीचा दर जवळपास ४० टक्के आहे. ILO आणि nstitute for Human  अन्  lopmen अन त्दज्सह यांच्या ‘India Employment Report 2024’ नुसार, भारतातील एकूण बेरोजगारांपैकी तब्बल ८३ टक्के तरुण आहेत. परिणाम? एक अभियांत्रिकी पदवीधर डिलिव्हरी अ‍ॅपवर बाईक चालवतो. एक एमबीए झालेला तरुण कॉल सेंटरमध्ये रात्रपाळी करतो.

पाश्चिमात्य जेन झी ‘अजून चांगलं जगायचंय’ असं वाटतं. भारतीय जेन झीला ‘आधी नीट जगायचंय’ असं वाटतं. अमेरिकेचं सरासरी वय ४०, जपानचं ४८. भारताचं सरासरी वय आज केवळ २९.२ वर्षं. पाश्चिमात्य देशांमध्ये कल्याणकारी सुरक्षा जाळं भक्कम आहे; इथे एक नोकरी गमावणं म्हणजे अख्ख्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहावर थेट घाला. पाश्चिमात्य जेन झी ची भूक लाईफ स्टाईल बदलाची आहे. भारतीय जेन झीची भूक अस्तित्वाची आहे. आणि अस्तित्वाची भूक कधीच शांत आवाजात बोलत नाही.म्हणूनच भारतीय जेन झी च्या हाती जर उद्या सत्ता आली, तर ती नेपाळसारखी शांत, संथ संक्रमणाची कहाणी असणार नाही. ती अधिक स्फोटक, अधिक तातडीची असेल, कारण इथला असंतोष निव्वळ वैचारिक नाही, तो पोटापाण्याचा आहे.

एकच जग, वेगळी नजर
२०२३मध्ये हार्वर्डच्या एका अभ्यासाने सांगितलं की जगभरातील जेन झी मध्ये एक गोष्ट समान आहे- इको-अँक्झायटी. . ७० टक्क्यांपेक्षा जास्त जेन झी तरुणांना ‘भविष्याची भीती’ वाटते. पण ही भीती व्यक्त करण्याचे मार्ग वेगळे आहेत. स्वीडनची ग्रेट थेनबर्ग शालेय वयात संसदेसमोर बसून ‘फ्रीडम फॉर फ्युचर’ सुरू करते. भारतीय रिद्धिमा पांडे- उत्तराखंडची अकरा वर्षांची मुलगी, राष्ट्रीय हरित लवादामध्ये( National Green Tribunal) याचिका दाखल करते. या दोन मुली दोन वेगवेगळ्या जगांतून आल्या, पण दोघींच्या मागे एकच इंधन होतं- माहिती आणि संताप.
भारतीय जेन झीचा जागतिक दृष्टिकोन एक विशिष्ट रंग घेतो. तो आहे ‘ग्लोबल आणि देशी रूट्स.’ मुंबईचा अर्जुन नेटफ्लिक्सवर स्क्विड गेम पाहतो, कोरियन बार्बीक्यू खातो, पण दिवाळीला घरी येतो. तो के पॉप फॅन आहे आणि लता मंगेशकर यांना ‘क्वीन’ म्हणतो-दोन्ही एव्ाâाच श्वासात. हे कल्चरल कन्फ्यूजन नाही, ही कल्चरल फ्लूएंसि आहे.
पण इथे एक प्रश्न विचारायलाच हवा.सीजेपीच्या निकालांवर एक्सवर मत व्यक्त करणारे, मणिपूर हिंसाचाराबद्दल इंस्टाग्राम स्टोरीज टाकणारे हे जेन झी तरुण मतदानाला जातात का? Lokniti-CSDS च्या अभ्यासानुसार, २०२४च्या लोकसभा निवडणुकीत १८-२५ वयोगटातील मतदानाचं प्रमाण इतर वयोगटांपेक्षा लक्षणीयरित्या कमी होतं. जागतिक नागरिक बनण्याची आकांक्षा असलेल्या या पिढीला आपल्याच देशात मतदान करण्याची ‘अर्जन्सी किंवा गरज’ कमी वाटते, हा विरोधाभास आहे. पण जंतरमंतर आंदोलनानंतर तो नक्कीच कमी होईल असे वाटते.

एआयच्या खांद्यावर…
कोल्हापूरच्या एका शाळेत नुकतीच एक घटना घडली. आठवीच्या वर्गात शिक्षकाने विचारलं, ‘महाभारतात किती पर्वे आहेत?’ एका मुलाने चॅट जीपीटी उघडलं आणि पाच सेकंदात उत्तर दिलं. शिक्षक संतापले. पण एक प्रश्न उरतो- या मुलाला माहीत होतं की कुठलं साधन वापरायचं आणि कसं विचारायचं. हे कौशल्य आहे की लबाडी?

जगभरातील जेन झीची सर्वात मोठी शक्ती
आहे- एआय लिटरसी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या ‘फ्युचर ऑफ जॉब्स २०२५’ अहवालानुसार, जी कौशल्ये पुढच्या दशकात सर्वात महत्त्वाच्या ठरणार आहेत, त्यात एआय कोलॅबोरेशन पहिल्या क्रमांकावर आहे आणि जेन झी हे नैसर्गिकरित्या करतो.
बंगळुरूचा विवेक , वय २२, एकट्याने एआय टूल्स वापरून एक SaaS (Software as a Service) म्हणजे ‘सेवा म्हणून सॉफ्टवेअर’ बनवतो-कोडिंग, डिझाईन, मार्केटिंग, सपोर्ट सगळं एकट्याने. दहा वर्षांपूर्वी यासाठी पाच जणांची टीम लागली असती. हे ‘सोलो इकॉनॉमी’चं युग आहे, आणि जेन झी त्याची अग्रदूत आहे. तुलनेने, युरोपीय जेन झी मध्ये एक वेगळी प्रवृत्ती दिसते. जर्मनीत ‘क्वाऐट क्वीटिंग (Quiet Quitting) म्हणजे नोकरी न सोडता फक्त करारापुरतेच काम करण्याची लाट आलेली आहे. कमीत कमी काम, जास्तीत जास्त कौटुंबिक आणि वैयक्तिक समतोल हे सर्वात महत्त्वाचे. तिथे तरुण  hustle culture म्हणजे सतत काम करत राहण्याची आणि यशासाठी वैयक्तिक आयुष्याचा त्याग करण्याची मानसिकतेला नकार देत आहेत. Scandinavia तर जेन झी कर्मचारी ‘संध्याकाळी ५ नंतर कामापासून संपर्क तोडण्याचा अधिकार'(Right to Disconnect after 5 PM)” साठी कायदेशीर लढत आहेत. हे चुकीचे नाही.हे प्राधान्यक्रमांचे एक वेगळेच कॅलिब्रेशन (नियोजन) आहे. पण भारतीय जेन झी साठी ही चैन अजून तरी उपलब्ध नाही. इथे ‘वर्क-लाइफ बॅलन्स’ मागण्याआधी ‘वर्क’ (काम/नोकरी) शोधावा लागतो.’
एक महत्त्वाचा फरक— रेझिलियन्स
कोविड-१९ने जगभरातील जेन झीला झटका दिला. पण प्रतिक्रिया वेगळ्या होत्या. भारतीय जेन झीने त्या लॉकडाऊनमध्ये यूट्यूब चॅनेल्स, ऑनलाईन बिझनेसेस, फ्रीलान्सिंग सुरू केले.’ अमेरिकन जेन झीच्या मानसिक आरोग्य संकटामुळे (Mental Health Crisis) एक नवा उच्चांक गाठला— थेरपी अ‍ॅप्स आणि नैराश्यविरोधी औषधांची मागणी ७० टक्क्यांनी वाढली. हा विरोधाभास भारतीय सांस्कृतिक जडणघडण(Cultural Programming) दाखवतो.संकटात बसून न राहता, त्यातून मार्ग काढणं, हे एक सामर्थ्य आहे, जरी त्यामागे आपल्या भावना दाबण्याची सवय असेल तरी.’
उंबरठ्यावरची पिढी
भारतासाठी ही दुहेरी जबाबदारी इतर अनेक देशांपेक्षा अधिक जड आहे. एका बाजूला देशांतर्गत रोजगार, शिक्षण आणि विषमतेचे प्रश्न सोडवायचे आहेत आणि दुसर्‍या बाजूला जागतिक पटलावर वाढती आर्थिक व राजनैतिक ताकद म्हणून स्थान बळकट करायचं आहे. आणि हे दोन्ही पेलण्याची क्षमता ज्या पिढीत आहे, ती पिढी आज राजकीयदृष्ट्या जवळपास शक्तिहीन आहे. निर्णयाच्या टेबलावर तिचं प्रतिनिधित्व नगण्य आहे.
जगाने बांगलादेशात पाहिलं- भूक आणि अपमान एकत्र आले की पंधरा वर्षांची सत्ताही काही आठवड्यांत कोसळते. नाहिद इस्लामच्या हातातला फलक आणि मंत्रीपदाची शपथ यांच्यामधलं अंतर अवघे काही आठवडे होतं. प्रश्न फक्त इतकाच आहे— भारतीय जेन झी जेव्हा त्या उंबरठ्यावर पोहोचेल, तेव्हा तिच्या हाती फक्त रस्त्यावरचा जोश असेल, की देश चालवण्याची तयारीही असेल?

(लेखक अमेरिकेतील रिचमंड, व्हर्जिनिया येथे राहणारे राजकीय विश्लेषक असून ते २५ वर्षांहून अधिक काळ परदेशात वास्तव्य करीत आहेत. )
ईमेल पत्ता : [email protected]

Previous Post

आंब्राई

Next Post

बाळासाहेबांचे फटकारे

Next Post
बाळासाहेबांचे फटकारे

बाळासाहेबांचे फटकारे

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.