• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

…खड्ड्यांच्या देशा!

टोक्या टोचणकर टोचन

Marmik Team by Marmik Team
August 21, 2026
in टोचन
0
…खड्ड्यांच्या देशा!

माझा मानलेला परमप्रिय मित्र पोक्याची स्वप्नात राजकीय नेत्यांच्या मुलाखती घेण्याची सवय अजून गेलेली नाही. त्यातीलच महाराष्ट्रातील विक्रमी खड्ड्यांविषयीची ही मुलाखत-
देवेंद्र फडणवीस : पोक्याजी, तुमच्या प्रश्नांचा मी आदर करतो. मी एवढंच सांगेन की महाराष्ट्रातील रेकॉर्डब्रेक खड्ड्यांमुळे महाराष्ट्राचं नाव आज गिनीज बुकात गेलंय याचा मला अभिमान वाटतो.
-त्यात कसला अभिमान! गेल्या चार वर्षात या खड्ड्यांमुळे चारशे चाळीस जणांचे जीव गेलेत. तीनशे एकोणीस जणांच्या बरगड्या मोडल्यात, पाचशे वीस जणांची हाडं तुटलीत. सातशे सव्वीस अपघातात कुटुंबातील कर्ता माणूस देवाघरी गेलाय आणि तुम्हाला याचा अभिमान वाटतो?
-हे पहा पोक्याजी, दिवंगतांच्या कुटुंबीयांना आम्ही ताबडतोब पाच लाख रुपये दिलेत. आमचे एकनाथ शिंदेजी याबाबत अतिशय तत्पर असतात. कसलाही अपघात झाला तरी अपघात होतो कधी आणि पाच लाख देतो कधी अशी त्यांची अवस्था होते. शेवटी शासन म्हणून ती आमची जबाबदारीच असते.
-पण यावर कायम उपाययोजना का करत नाही तुम्ही? जगात कुठल्याही देशातील रस्त्यांवर असे खड्डे नसतील, मग महाराष्ट्रातच असं का? का नाही तुमचं सरकार गुळगुळीत, तुळतुळीत, सुळसुळीत रस्ते बनवत? महाराष्ट्र हे देशातील उत्तम राज्य बनवायचे असेल तर तिथले रस्ते खड्डेमुक्त हवेत, ही साधी गोष्ट का समजत नाही तुमच्या बांधकाम खात्याला. गेल्या बारा-तेरा वर्षात तर खड्डे पडून रस्त्याची झालेली दुर्दशा का दिसत नाही तुम्हाला? नको त्या ठिकाणी शंभर कोटींपासून हजार कोटी खर्च करत असतं तुमचं केंद्र सरकार. मग महाराष्ट्रात चांगले रस्ते व्हावेत यासाठी का देत नाही निधी? खड्डे चुकवताना केवढी कसरत करावी लागते वाहनचालकांना. तुम्ही तुमच्या एकनाथरावांना सांगा अशा खड्डेमय रस्त्यातून रिक्षा चालवायला. तुम्हीही कार चालवून बघा किंवा नितीन गडकरींना एखादा ट्रक चालवायला सांगा.
-या समस्येचा आम्ही सर्व बाजूंनी विचार करीतच आहोत. खड्डे चुकवत वाहन कसं चालवावं याचं प्रशिक्षण देण्यासाठी लवकरच भागाभागात प्रशिक्षणवर्ग सुरू करणार आहोत आम्ही. आता पावसाळ्यात ते शक्य नाही. नव्या कोर्‍या रस्त्यावरही महिनाभरात खड्डे पडत असती तर त्याला कोण जबाबदार, याची कल्पना सर्वांना असतेच. मी ते नव्याने सांगण्याची गरज नाही. भेसळयुक्त सिमेंट वापरणारे कंत्राटदार कोणत्या खात्याच्या मंत्र्याच्या अधिकारात आहेत, हे सर्वांना माहीत आहे. कंत्राटदाराबरोबरची टक्केवारी आणि त्यामुळे होणारे निकृष्ट काम शेवटी वाहनचालकाचा, प्रवाशांचा जीव घेतं…
-एवढं सगळं कळतं तर या प्रकारांना आळा का नाही घालत तुम्ही? नको त्या कामाचा अभ्यास करण्यासाठी अभ्यासदौरे आखता मंत्र्यांचे आणि आमदारांचे- मग उत्तम रस्ते पाहण्यासाठी, त्यामागची कारणे जाणून घेण्यासाठी का नाही पाठवत अभ्यासगटांना परदेशात? जगातील कोणत्याही शहरातील रस्ते पाहा. लाज वाटली पाहिजे तुमच्या शासनाला आणि केंद्र सरकारला. विकासकामांच्या मोठमोठ्या गप्पा मारता मग तुम्हाला महाराष्ट्रातले हे खड्डे का दिसत नाहीत? की वाहनचालक आणि प्रवासी मारण्याचं कंत्राटच घेतलं आहे तुमच्या सरकारने?
-या समस्येवर सर्वांगीण विचार करण्यासाठी लवकरच आम्ही लवकरच नवी दिल्लीत एक बैठक घेणार आहोत. तिथे यावर नक्कीच तोडगा काढला जाईल.
-नाशिकला कुंभमेळा भरणार आहे. पण तिथल्या रस्त्यांची दुर्दशा तर भयानकच आहे. प्रमुख अठ्ठावीस रस्ते गेल्या अनेक महिन्यांपासून खोदून ठेवल्याने अख्ख्या शहरात वाहतूक कोंडी असते. मुख्य आणि गल्लीबोळातील रस्त्यांची सुद्धा चाळण झालीय. हजारो कोटी रुपये खर्च करूनही रस्त्यांची दुर्दशा थांबलेली नाही. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन तर वाट्टेल तशा थापा मारत सुटलेत. कुंभमेळ्यापूर्वी इतकी उत्कृष्ट कामं करू की पुढल्या २५-३० वर्षात रस्त्यांची कामं करावी लागणार नाहीत अशी दर्पोक्ती त्यांनी केलीय. नाशिकमध्ये भ्रष्ट अधिकारी आणि ठेकेदारांच्या मनमानीवर सुरू असलेली रस्ताकामं आणि कोणालाही विश्वासात न घेता चाललेल्या महाजनांच्या संधीसाधूंचा मेळा अशी स्थिती असताना महाजनांना तुम्ही डोक्यावर का बसवत आहात?
-गिरीश चांगलं काम करतोय. कुंभमेळ्याची सगळी जबाबदारी त्याने अंगावर घेतलीय ही साधी गोष्ट नव्हे! त्याचं कर्तृत्व तुम्हाला कुंभमेळ्यात दिसेलच. या तुम्ही आता!
-नमस्कार एकनाथजी शिंदेसाहेब.
-जयजय मोदी, जयजय शहाजी.
-राज्यातील खड्ड्यांविषयी काय वाटतं?
-खड्डे गेले खड्ड्यात. जिथे माझंच भवितव्य टांगणीला लागलंय तिथे खड्ड्यात टाकणारे प्रश्न मला का विचारता? खड्डे मी पाडलेत का? राजकारणात, सत्ताकारणात, राजकीय उलथापालथीत सगळीकडेच खड्डे असतात. पण या सगळ्या खड्ड्यांना पुरुन उरण्याची ताकद फक्त मोदीजी आणि शहाजी यांच्यातच आहे, हे लक्षात ठेव. ते कधी कुणाला खड्ड्यात घालतील हे समजणारही नाही. मला चांगला अनुभव येतोय. माझ्या आणि माझ्या डॉक्टर लेकाच्या ठाणे-कल्याण मतदारसघातील खड्डे सत्तावीस सालापर्यंत नक्की बुजवण्याचं आश्वासन मी प्रामाणिकपणे देतो. आता ये तू. सांभाळून जा.
-नमस्कार गडकरीसाहेब.
-नमस्कार. काय घेणार, पेट्रोल, डिझेल, इथेनॉल. शॉर्टेज असतं हल्ली पेट्रोल, डिझेलचं. त्यापेक्षा इथेनॉल बरं आहे स्टॉक माझ्याकडे. घेऊनच जा भेट म्हणून.
-नको साहेब, खड्ड्यांविषयी बोला.
-अहो पोक्याराव, पाऊसच इतका पडलाय की रस्ते, पूल वाहून गेलेत तिथे खड्ड्यांचं काय घेऊन बसलात! हे सगळं त्या अल निनोमुळे झालंय. त्याचा बंदोबस्त केला पाहिजे. मी पंतप्रधान असतो तर रस्त्यातील खड्डे बुजवायला प्राधान्य दिलं असतं. पण तुमच्या नशिबात नाही ते. आता बसा बोंबलत! सेवकांना नक्कीच मदतीसाठी पाठवीन.

Previous Post

नाय नो नेव्हर

Next Post

राशी भविष्य २२ ते २८ ऑगस्ट

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.