संतोषराव, भारताला स्वातंत्र्य २०१४ साली मिळालेलं आहे, असं आमच्या सोसायटीतले एक काका सतत ओरडून सांगत असतात, तरी लोक १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिन का साजरा करतात? आणि त्या दिवशी आपले पंतप्रधानही लाल किल्ल्यावरून कंटाळवाणी मन की बात करायला विसरत नाहीत ते का? – प्रथमेश पाटील, कोपरखैरणे
२०१४ साली स्वातंत्र्य मिळाले असे म्हणणारे त्यांचा स्वातंत्र्य दिन कुठे सांगतात? समजा त्यांनी ३१ डिसेंबर हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करायचा असं ठरवलं, तर तुम्ही त्यांच्यात सामील व्हाल? ते बिचारे मूठभर किती आणि काय साजरे करणार? म्हणून ते १५ ऑगस्ट हाच दिवस सध्या तरी स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतात आणि तुमच्यात सामील होतात… ते तुम्ही बघत नाही, त्यांची मन की बात कधी ऐकत नाही, १५ ऑगस्टला तरी ऐका, नाही तर ते रात्रीचे उठून सोशल मीडियावर उठसूट मन की बात करायला लागले तर.. आम्हाला बोलू नका आधी का नाही सांगितलं म्हणून…
आपल्या पंतप्रधानांनी नेहरूंचा कसला तरी विक्रम मोडला म्हणे! त्याबद्दल त्यांचं इतकं अभिनंदन केलं गेलं. पण, १२ वर्षांत एकही पत्रकार परिषद न घेण्याचा विक्रम सध्याच्या पंतप्रधानांच्या नावावर आहे, तरी त्याबद्दल मात्र कधी त्यांचं कोणी कौतुक करत नाही. इतके जळतात का लोक त्यांच्यावर? – वैभव परचुरे, अकोला
हे जळणारे लोक शोधतायत की नेहरूंनी आपल्याला चाचा म्हणणार्या मुलांना कधी फ्रेंड्स म्हटलंय का? त्याचे उत्तर ‘नाही’ असंच मिळतंय.. त्यामुळे ते जळत असणार….
नाशिकमध्ये संस्कारी सत्ताधारी पक्षाचे लोकप्रतिनिधी एकमेकांच्या आईबहिणींचा उद्धार करताना दिसले एका अधिकृत शासकीय बैठकीमध्ये. यांच्यावर त्यांच्या पक्षाने, मातृसंघटनेने काही संस्कार केलेले आहेत की नाही? का सुसंस्कारांचा सगळा लोड फक्त जेन झींवरच द्यायचा? – रेणुका मोरे, सातारा
मग संस्कारी लोकांच्या आई-बहीणींचा उद्धार काय फक्त जेन झीनेच करायचा? संस्कार संस्कार करणार्यांच्या आईवडिलांनी त्यांच्या मुलांवर संस्कार केलेयत.. आता त्यांची मुलं त्या संस्कारांची परतफेड करतायेत, पांग फेडतायत… तर आपण कशाला मध्ये पडायचं?
महुआ मोईत्रा यांच्यावर अंडीफेक झाली तर कोणाएका न्यायमूर्ती महोदयांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात स्वातंत्र्यसैनिकांनी गोळ्या खाल्ल्या होत्या, याची आठवण करून दिली… उद्या याच न्यायमूर्तींवर कुणी अंडी फेकून मारली तर त्यांना हाच युक्तिवाद आठवेल ना? – पंकज पाठारे, ठाणे
काहीही आठवण्यासाठी एक तर स्वतःची बुद्धी लागते. समजा ती असलीच तर आपण कधी काय बोललो होतो ते आठवाव लागतं, ते आठवलंच, तर लाज वाटण्यासाठी मुळात शरम असावी लागते… हे सामान्य माणसाच झालं… न्यायमूर्तींना यातलं काही असतं का, हे आपल्याला माहित नाही. कारण आपण सामान्य माणूस आहोत… आम्हाला बाबा सामान्य माणसाच्याच गोष्टी माहित आहेत फक्त.
आपल्या पक्षाशी गद्दारी करून बाहेर पडलेल्या बेईमान लोकप्रतिनिधींना भेटून आपण तुमच्या पाठिशी आहोत, असं देशाच्या पंतप्रधानाने सांगावं, इतकी काय मजबुरी असेल? असे वागल्याने त्यांच्या थोर पदाचा अवमान होत नाही का? – राजेश कुलकर्णी, पुणे
यात अवमान कसला? गद्दारांच्या जिवावर आपण खुर्चीत बसलोय याचं त्यांना भान आहे, असं का समजत नाही तुम्ही? आता ज्यांच्या जिवावर सत्तेत आहेत, त्यांनाच मी तुमच्या पाठीशी आहे असं सांगणं, हा ज्यांच्या जिवावर सत्तेत आहेत त्यांचा अवमान आहे, असं तुम्हाला वाटलं तरी बोलू नका, कारण अवमान नेहमी मुळात मान असणार्याचा होतो. आणि असं कसं होऊ शकतं, असा फालतू विचार करू नका. कारण माफी न मागताच माफ करण्याचा चमत्कार आपण पाहिलेला आहे.
माझ्या जन्मतारखेनुसार मी जेन झी पिढीत येतो, हे कळल्यापासून आमच्या शेजारचे पांढरी मिशीवाले काका माझ्याशी फार प्रेमाने बोलू लागले आहेत, त्याला समजून घ्या, असं माझ्याच आईवडिलांना सांगायला लागले आहेत. एकदम अचानक असं काय झालं असेल त्यांना? – वेदांत पोकळे, श्रीगोंदा
काकांची मिशी उन्हात पांढरी झालेली नाहीये… काकांनी नेपाळ, बांगलादेश आणि श्रीलंकेचं ऊन सुद्धा पाहिलेलं असणार. त्याची धग आपल्यापर्यंत येऊ नये म्हणून काका तुमच्यावर प्रेमाची सावली धरत असणार… पण म्हणून तुम्ही फार प्रेमात येऊ नका… भविष्याची काळजी असेल तर काकांचा इतिहास तपासा…
विचारून टाका प्रश्न
तुम्हालाही अभिनेते संतोष पवार यांना प्रश्न विचारायचाय…? मग वाट कसली बघताय…? उचला पेन आणि टाका विचारून प्रश्न… हा प्रश्न थेट ‘मार्मिक’च्या[email protected] या ईमेल आयडीवर पाठवून द्या… किंवा आमच्या पत्त्यावर पाठवा. मार्मिक प्रश्नाला संतोष पवार उत्तर देतील…

