माझा मानलेला परमप्रिय मित्र पोक्याला हल्ली वरच्यावर राजकीय स्वप्नं पडण्याची व्याधी जडली आहे. त्या स्वप्नातली अराजकता त्याला अस्वस्थ करते आणि ती स्वप्न ऐकवून मला तो अस्वस्थ करतो. परवाच्या स्वप्नात त्याने काही राजकीय मुलाखती घेतल्या आणि मला ऐकवल्या. त्याचेच हे साग्रसंगीत दर्शन.
-नमो नम: मोदीजी. आता रात्रीचे बारा वाजून गेले आहेत आणि आपण मोबाईलवर काय करीत आहात?
-मी त्या झुरळांच्या आंदोलनकर्त्यांना नमवण्यासाठी आणि विनवण्यासाठी रील बना रहा हूँ। आतापर्यंत पाच-सहा रील बनवले आणि सोशल मीडियावर टाकले. एकेका रीलला देश-विदेशातून पन्नास करोड लाइक्स मिळाले. तेव्हापासून माझा हा मध्यरात्रीचा कारखाना जोरात चालू आहे. एकेका रीलने मी त्यांच्या हृदयाला हात घालतोय, त्यांना प्रेमाने साद घालतोय. किती निंदनीय, देशविघातक कृत्यं केली त्यांनी. तरी मी त्यांना माफ केलंय माझ्या पहिल्या की दुसर्या रीलमधून. मित्रों म्हणून साद घालतो मी त्यांना. त्याचा मार्ग चुकलाय हे त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न करतोय तो परमपूज्य गांधीजींच्या मार्गाने.
-असं कसं म्हणता तुम्ही मोदीसाहेब. ती पोरं महिनाभर आंदोलन करत होती तेव्हा त्यांच्याकडे लक्ष नाही दिलं तुम्ही आणि जेव्हा झुरळं तुमच्या सत्तेलाच चावा घेऊन तुम्हाला सळो की पळो करू लागली तेव्हा त्यांना सर्वशक्तीनिशी झोडपून काढून पळवून लावण्याचे आदेश पोलिसांना कोणी दिले? तुमच्या सल्ल्याने त्या गृहमंत्री अमित शहांनीच ना! पण ती तरुण कोवळी पोरं तुमच्या सैतानी पोलिसांना पुरुन उरली तेव्हा तुमच्या पायाखालची वाळू सरकली आणि शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासह सर्व मागण्या मान्य करून आपली सुटका करून घेतली तुम्ही. तरी आजही त्यांना दिलेली आश्वासनं पूर्ण केली नाहीत तुम्ही. ना खटले मागे घेतलेत ना त्यापैकी हजारोंना तुरुंगातून सोडलेत. त्यामुळे वैतागून ती मुलं मागच्याप्रमाणेच पुन्हा आंदोलनाला उभी राहिली. पुन्हा धमक्यांनी, लाठीमारांनी, अटकसत्र राबवून अत्याचाराची सीमा गाठलीत. त्यांना दहशतवादी, देशद्रोही ठरवतंय तुमचं सरकार आणि तुमच्या पक्षाचे बोलघेवडे नेते. हे सगळं कधी थांबणार आहे?
-लवकरच थांबेल. १५ ऑगस्टला माझ्या भाषणात ऐकालच तुम्ही मी त्याना देत असलेला नवा संदेश. मुलांनो, चांगलं वागा, मोठ्यांचा, सत्ताधारी नेत्यांचा आदर करा, लाठ्या खाण्याची क्षमता वाढवा! आमच्यावरची टीका थांबवा, नाहीतर त्याचा गैरफायदा पाकिस्तान आणि अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प नक्की घेतील आणि देशात अराजक माजवतील असा इशारा देणार आहे मी या मुलांना. किती निष्पाप वाटतात ही मुलं. त्यांच्या वयात मीसुद्धा असाच निष्पाप वाटत होतो. पण मी नक्की कसा होतो हे फक्त मला आणि आमचे प्रिय शहा यांनाच माहीत आहे. आम्ही दोघांनी मिळून त्या वयात ज्या उचापती केल्या त्याची सर तुमच्या या निरर्थक आंदोलनांना येणार नाही, हे त्यांना मी नम्रपणे सांगू इच्छितो. भाजपामध्ये प्रवेश करून स्वत:ला पावन करून घ्या असंही आवाहन करणार आहे मी त्यांना. पाहूया किती ऐकताहेत ते. बरं, निघा आता तुम्ही. मलाही आता १५ ऑगस्टला सोशल मीडियावर टाकण्याच्या रीलची रिहर्सल करायचीय. गुड नाइट.
-नमस्कार अमित शहाजी, आंदोलक विद्यार्थ्यांना मारझोड करण्यासाठी आणखी कुठले कुठले प्रकार शोधणार आहात तुम्ही?
-सध्या त्याचाच अभ्यास चाललाय. पोलिसांच्या काठ्यांना नुसते धारदार खिळे ठोकून चालत नाही तर आणखी काही धारदार शस्त्रासारखे त्यात असलं पाहिजे. अश्रुधुरातही विषारी वायू मिसळण्याचे प्रयोग
मोठ्या उत्साहात सुरू आहेत. पॅलेटगनपेक्षा अधिक प्रभावी मारा करणारी गन बनवण्याची तयारी सुरू आहे. हे नालायक आंदोलक कसे वठणीवर येत नाहीत हे पाहूच आम्ही. माझ्या वाटेला जो जाईल तो मार खाईल एवढंच सांगतोय आता. तिकडे संसदेत त्या खासदार बाया कशा तुटून पडतात माझ्यावर हे पाहतोस ना तू. तडीपार म्हणून संभावना करतात माझी. आणि चायवाला म्हणून हिणवतात माझ्या मित्राला. पण आम्ही किती महान आहोत ते कुठे माहीत आहे या आंदोलक पोरांना! परदेशात अशी आंदोलनं चिरडण्यासाठी रणगाडे घालतात त्यांच्या अंगावर. आम्ही तसं केलं नाही, इतके दयाळू आहोत आम्ही. त्यांची काळजी आहे आम्हाला. ती चुकीच्या मार्गाने चाललीत हे त्यांना समजावून सागण्याचा प्रयत्न करताहेत पंतप्रधान. तरीही ही पोरं ऐकत नाहीत. काय करावं याचं हेच कळेनासं झालंय मला. दुसरीकडे तो राहुल आणि प्रियांका दरदिवशी तोंड फाटेपर्यंत वाभाडं काढत असतात माझं. एकवेळ मी माझा अपमान सहन करीन पण माझ्या जिवलग मित्राचा नाही करणार. राम करो आणि या पोराटोरांना सुबुद्धी देवो.
-नमस्कार फडणवीसजी,
-नमो नम:
-दिल्लीतील आंदोलनाबद्दल काय म्हणाल तुम्ही.
-त्या आंदोलनात बाहेरच्या देशविघातक शक्ती शिरल्या आहेत. त्यामुळे आंदोलन निपटून काढणं हे काम दिल्ली पोलिसांनी राष्ट्रीय कर्तव्य म्हणून केलं. त्यामुळे मला त्यांचा अभिमान वाटतो. जंतरमंतरवर हे आंदोलक ज्या पद्धतीने आमचं दैवत परमपूज्य मोदीजी आणि शहाजींचा ज्या शब्दात उद्धार करीत होते ते कधीही मला मान्य असणार नाही. किती खालची पातळी गाठली त्यांनी. नशीब आमच्या हिंदुत्वाच्या अभिमान असलेल्या नेत्य्ाा, धर्मरक्षक कंगनाबाई यांनी त्यांना जागा दाखवून दिली. त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. आज अशाच कंगनांची भाजपाला आणि देशाला गरज आहे.
-नमस्कार एकनाथजी.
-जय मोदीजी, जय शहाजी. ते दिल्लीत जे काही करताहेत त्याला माझा पूर्ण पाठिंबा आहे. त्याना माझी मदत हवी असेल तर मी माझ्या मारकुट्या म्हटल्या जाणार्या आमदार आणि नगरसेवकांना नक्कीच मदतीसाठी पाठवीन.

