
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात विष पेरले आणि आणि आता ते अपेक्षा करत आहेत अमृत उगवण्याची? हे कसे होऊ शकते. आपल्या पूर्वजांनी सांगून ठेवले आहे, ‘पेराल तेच उगवेल.’ खरं तर यावर पूर्वगौरवबाज मोदींचाही ठाम विश्वास असायला हवा. परंतु त्यांना नेहमी चमत्कार होण्याची अपेक्षा असते. तेही स्वाभाविक आहे- मोदी जे जे बोलतात, जसे वागतात ते सगळे त्यांना स्वतःला आणि वरचा मजला रिकामा असलेल्या त्यांच्या तमाम भक्तांना चमत्कारासारखेच वाटते. मोदींनी उच्चारलेले असंसदीय शब्दही त्यांना पवित्र नॉन- बायॉलॉजिकल देववाणीच वाटते. परंतु मोदींच्या दुर्दैवाने त्यांच्या भक्तांच्या पलीकडेही दीडशे कोटींचा देश आहे हा! गेल्या बारा वर्षांत देशाने या भक्तांमध्ये आणि भक्तांच्या देवामध्ये सभ्यता, सुसंस्कृतपणा यावा यासाठी वारंवार संधी दिली. पण, यांच्यातला असंस्कृतपणा वाढतच गेला. त्यावर जेन झी तरुणाईने त्याच भाषेत उत्तर दिल्यामुळे आज मोदींवर मगरीसारखी आसवं गाळत बसण्याची वेळ आली आहे. जंतर मंतरवरील आंदोलनातील काही जेन-झींनी पंतप्रधानांना अर्वाच्य शब्दांत शिवीगाळ करण्याचे कोणीही सुसंस्कृत माणूस समर्थन करणार नाही. परंतु असे का झाले? निमित्त आंदोलनाचे असले तरी ही सत्तेच्या आणि सत्तासमर्थकांच्या असभ्यतेचीच परतफेड झाली आहे, हे अमान्य करता येणार नाही.
देशातील तरुण पिढीच्या विवेकबुद्धीवर कब्जा करण्याचा मोदींचा काळ संपुष्टात आल्याचे जेन-झीच्या आंदोलनाने दाखवून दिले आहे. परंतु म्हणतात ना, ‘गिरे तो भी टांग उपर,’ असे काहीसे मोदींचे झाले आहे. आंदोलनाच्या निमित्ताने २३ ते ३१ जुलैपर्यंत त्यांनी रात्रीच्या वेळी पाच सेल्फी-स्टाइल इन्स्टा व्हिडिओ जारी केले. ३१ जुलै रोजी पाचवा व्हिडिओ आला. तो जंतर मंतरवरील आंदोलनात काही तरुणांनी त्यांच्यावर आणि त्यांच्या दिवंगत आईवर केलेल्या अपशब्दांबद्दल होता. आतापर्यंत इंग्लिश भाषेतली किंवा इंग्रजांच्या राजवटीचे अवशेष असलेली रस्त्यांची, वास्तूची नावं बदलत सुटलेल्या मोदींनी तरुणाईशी नाते साधण्यासाठी ‘मित्रों’च्या जागी ‘ फ्रेंड्स’ असे संबोधून आपण किती कूल आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न केला. मोदींनी या व्हिडिओत काही मस्तीखोर मुलांनी लाजिरवाण्या शिव्या दिल्याचे सांगितले. आमच्या मुली अशी भाषा कशी बोलू शकतात, याने सांस्कृतिक धक्का बसल्याचेही सांगितले. पण त्यांनी ‘या मुलांना मिठी मारून त्यांना योग्य मार्ग दाखवायचा’ निर्धार केला. त्यांचा छळ करण्याऐवजी आपण त्यांना माफ करतो आहोत, असे सांगून त्यांनी आपण एकत्र देशाला पुढे नेऊया, असे आवाहन या मुलांना केले. पण वास्तवात तसे घडले का? आंदोलनातल्या मुलांना हुडकून हुडकून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जात आहेत. गोदी मीडिया त्यांचे व्हिडिओ जारी करून त्यांचे संस्कार काढत आहेत आणि पहिल्यापासून असभ्यच असलेली अंधभक्तांची टोळी गलिच्छ भाषेत मुलींचा उद्धार करून आपल्यावर कधीच न झालेले संस्कार दाखवत आहेत. ‘मोदींनी ठरवले असते तर दंडे मारून जंतरमतरवरून या पोरांना हाकलून लावले असते. तसे न करता शिक्षण मंत्री धर्मेद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला’, असे सुभाषित जनतेच्या करातून कोट्यवधी रुपयांचा पगार घेणारा सरकारी टीव्हीवरचा भाट सांगतो आहे.
मुळात मोदी आणि भाजपमधल्या नेत्यांचा आणि संस्कारांचा संबंध काय आहे? ‘बालकां’ना सुधारायला संधी आहे हे सांगताना ट्रोलरूपी स्वघोषित ‘पालकां’नी कायम बिघडलेले राहण्याचे पेटंट मिळवले आहे का? मोदींनी जर्सी गाय, काँग्रेस की विधवा असे शब्द काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्यासाठी वापरले होते. काँग्रेसच्या खासदार रेणुका चौधरी यांना त्यांनी राज्यसभेत शूर्पणखा म्हटले, शशी थरूर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांना उद्देशून ‘पचास करोड की गर्लफ्रेंड’ अशी घाणेरड्या शब्दांची उधळण केली. ममता बॅनर्जी यांना ‘दीदी ओ दीदी…’ एवढे गरळ देशाच्या इतिहासात एकाही पंतप्रधानाने ओकले नाही. या सगळ्याबद्दल त्यांनी कितीदा माफी मागितली? दक्षिण दिल्लीचा माजी खासदार रमेश बिधुडी याने सप्टेंबर २०२३मध्ये लोकसभेत बहुजन समाज पार्टीचे खासदार कुंवर दानिश अली यांना उद्देशून ‘भडवा’, ‘कटवा’, ‘मुल्ला उग्रवादी’, ‘आतंकवादी’ असे गलिच्छ अपशब्द उच्चारून शिवीगाळ केली होती, तेव्हा मोदींनी साधा खेदही व्यक्त केला नाही. उत्तर प्रदेशातील भाजपचा उपाध्यक्ष दयाशंकर सिंह याने २०१६मध्ये बहुजन समाज पार्टीच्या नेत्या मायावती पैसे घेऊन निवडणुकीचे तिकीट विकतात आणि त्यांचे वर्तन वेश्येपेक्षाही हीन दर्जाचे आहे, अशी टिप्पणी केली होती, त्याने मोदी व्यथित झाल्याचे ऐकिवात नाही. २०२३मध्ये मणिपुरात तीन कुकी महिलांना विवस्त्र करीत त्यांच्या शरीराचे लचके तोडत धिंड काढण्यात आली. ही घटना तब्बल पाऊणशे दिवस दडवली गेली. प्रकरण उघडकीला आल्याच्या दिवशी अन्य ठिकाणी २१ आणि २४ वर्षांच्या आणखी दोन मुलींवर बलात्कार करून त्यांची हत्या केली गेली. ‘सरकार यात हस्तक्षेप करणार नसेल तर आम्हाला करावा लागेल’ अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयाने मोदी सरकारला बजावले. त्यावर मोदी जवळपास ८० दिवस मौनीबाबा बनून बसले होते आणि त्यांचे सुसंस्कारी ट्रोल ‘तिकडच्या या बायका तसल्याच असतात, त्यांनीच मुद्दाम बलात्काराचे कुभांड रचले’ अशा आशयाच्या गलिच्छ पोस्टी फिरवत होते, त्याची लाज मोदींच्या परिवाराला वाटल्याचे कधी दिसले नाही.

डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरुमीत राम रहीम सिंह याने हिंदू महिलांवर, साध्वींवर बलात्कार केले आहेत. २०१७पासून तो तुरुंगात आहे. त्याला आतापर्यंत १६ वेळा पॅरोलवर बाहेर सोडण्यात आले आहे. आतापर्यंत तो एकूण ४३५ दिवस तुरुंगाच्या बाहेर आला आहे. एकगठ्ठा मते त्यांच्या पाठीशी असल्याने या बलात्कार्याला बाहेर काढले जाते, तेव्हा कुठे जातो मोदींचा धर्म? देशाला ऑलिम्पिक पदके जिंकून देणार्या महिला पहेलवानांचे लैंगिक शोषण करणारा भाजपचा तत्कालीन खासदार ब्रिजभूषण शरण सिंह याला जामीन मंजूर होतो. त्या महिलांच्या आंदोलनाच्या वेळीही मोदी मौनीबाबा होते. बिल्कीस बानोंच्या बलात्कार्यांची शिक्षा पूर्ण न होताच सोडण्यात आले तेव्हा त्या आरोपींचे स्वागत कोणत्या सुसंस्कारी परिवाराने केले हे देशाने पाहिले आहे. मार्च २०१८ मध्ये कठुआ बलात्कार प्रकरणात जम्मूमध्ये आरोपींच्या समर्थनार्थ तिरंगा रॅलीसमोर भाषणे करणारे भाजपचे दोन मंत्री होते. आपल्या परिवाराच्या या नीच वर्तनाने मोदींना सांस्कृतिक धक्का बसला नाही, तो फक्त शिव्यांनी बसला?
‘दैनिक भास्कर’ने जारी केलेल्या अहवालानुसार मोदींच्या काळात म्हणजे २०१४ ते जुलै २०२६पर्यंत किमान ११६ परीक्षांचे पेपर लीक झाले आहेत. त्यांचा फटका ७.५ कोटी परीक्षार्थींना बसला. या पेपर माफियांचे जाळे १९ राज्यांमध्ये पसरले आहे. त्याने संतापलेल्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केल्यानंतर राजीनामा द्यावा लागलेले शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान संसद परिसरात आले तेव्हा भाजपच्या खासदारांनी त्यांचे जंगी स्वागत केले, जणू काही त्यांनी शिक्षण क्षेत्रात खूप मोठे क्रांती केली आहे. आपल्या खासदारांना राजीनामा द्यायला लागलेल्या मंत्र्याच्या गच्छंतीचीही लाज वाटत नाही, याबद्दल माफी कोण मागणार आहे?
सत्यपाल मलिक ते राहुल गांधी!
लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले की शिक्षण व्यवस्था भयंकर आहे, क्रूर आहे… सर्व गोष्टींचं खासगीकरण केलं जातंय… ही खंडणी बसवण्याची व्यवस्था आहे, या व्यवस्थेचा आत्मा आरएसएसने ताब्यात घेतला आहे. शिक्षणसंस्थांवर विशेषतः विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या पदांवर सरकारने आरएसएसशी संबंधित लोकांना बसविल्याचा घणाघाती आरोप त्यांनी केला. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा केवळ वरवरचा आहे, त्यांनी शिक्षण मंत्रालय कधीच चालवले नाही. शिक्षण मंत्रालय चालवणारी संस्था आरएसएस आहे आणि ते चालवणारा माणूस मंत्र्याच्या कार्यालयात बसलेला एक ओएसडी आहे, असा आरोपही त्यांनी केला. राहुल पुढे म्हणाले की विद्यार्थी खरे तर चिडलेले आहेत कारण भारतात त्यांना विद्यार्थी होण्याची मुभा नाही, त्यांच्या आवडीनुसार शिकण्याची, जे म्हणायचे ते म्हणण्याची किंवा प्रश्न विचारण्याची मुभा नाही. रा.स्व. संघाने नेमलेले लोक त्यांना विद्यार्थी होण्यापासून रोखत आहेत. ते मुलांना ‘अंधभक्त’ बनवू इच्छितात. राहुल काय खोटे बोलले? मोदींनीच राज्यपाल केलेले सत्यपाल मलिक यांनी एप्रिल २०२३ मध्ये ‘द वायर’च्या करण थापर यांना दिलेल्या मुलाखतीत स्पष्टपणे सांगितले होते की, केंद्रीय विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या नियुत्तäयांमध्ये संघाचा प्रभाव आहे. प्राध्यापक होण्याची लायकी नसलेल्यांना कुलगुरू करा, म्हणून संघाकडून दबाव आणला जातो. अशा दबावामुळे भारतात शैक्षणिक दर्जाचा र्हास होत असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली होती.
असंसदीय शब्दांचे राजकारण
राहुल गांधी यांनी लोकसभेत अँटी-पेपर लीक विधेयकावरील चर्चेत बोलताना विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईबाबत थेट गृहमंत्री अमित शाह यांच्यावर ठपका ठेवला. विद्यार्थ्यांवर पॅलेट गन वापरली गेली, त्यासाठी त्यांनी शहांना जबाबदार ठरवले. राहुल यांनी वापरलेले ‘इडियट’ आणि ‘अंधभक्त’ हे शब्द असंसदीय असल्याचा भाजपच्या नेत्यांचा दावा आहे. मग मोदींनी, शहांनी आणि भाजपच्या नेत्यांनी आतापर्यंत सदनात वापरलेले सगळे शब्द संसदीय होते का? भर सभेत गोली मारो सालोंको ही भाषा वापरणारे माजी मंत्री अनुराग ठाकुर यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांना हक्कभंग आणि अवमानाची नोटीस दिली आहे, हीच किती विरोधाभासी गोष्ट आहे. राहुल यांनी माफी मागावी ही भाजपची मागणी आहे, ती पूर्ण होण्याची शक्यता नाही. मोदी-शहांना जड जाणार्या राहुल यांना पुन्हा कसे संसदेबाहेर काढता येईल यासाठी आता पुन्हा एकदा रणनीती आखली जाईल. परंतु आता देशातील वातावरण बदलले आहे. तरुणाई राहुल गांधींसोबत आहेत. तिने एक दणका दिला आहे. आणखी एखादा दणका ओढवून घेण्याची चूक मोदी सरकारने न करणेच त्यांच्या हिताचे ठरेल.

