लातों के भूत बातों से नहीं मानते असं म्हणतात… बेशरम भारतीय जनता पक्ष आणि मस्तवाल मोदी सरकार यांनाही हे लागू पडतं… गेल्या जवळपास २५ वर्षांत जनतेच्या कोणत्याही दबावाला, आंदोलनाला नरेंद्र मोदी यांनी भीक घातली नव्हती…ती वेळ त्यांच्यावर नियतीने २५ जुलै २०२६ रोजी आणली आणि ‘बेपर्वा बेबंदशाहीचा रौप्यमहोत्सव’ साजरा करण्याची संधी जेन झी या तरुण पिढीने हिरावून घेतली. सत्तेच्या ऊबेला बसण्यात धन्यता मानणार्या न्यायदेवतेने ज्यांना झुरळे म्हणून हिणवले त्या पोराटोरांनी, लहानपणी मगरी पकडण्याचा पराक्रम करणार्या वीरपुरुषाला घाम फोडला आणि त्याच्या नवरत्नांच्या दरबारातलं एक अनमोल रत्न निखळून काढलं… शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यायला लावला… एकीकडे युवाशक्तीने घडवून आणलेल्या क्रांतीचा जयजयकार सुरू असताना सत्ताधार्यांना पुरेपूर ओळखून असणार्यांना याची कल्पना होती की हे खुनशी लोक उमदेपणाने पराभव स्वीकारणारे नाहीत. यांची किरटी बुद्धी उफाळून येणार आणि हे या अपमानाचा सूड घेणार… दोनच दिवसांत एकीकडे बंगाल, आसाम आणि बिहारमध्ये सुरू असलेल्या निदर्शनांवर पोलिसांची क्रूर कारवाई सुरू झाली, एका पोलिसाने एके ४७ रायफलीतून गोळीबार केला आंदोलकांवर, दिल्लीतल्या आंदोलनात सहभागी झालेल्यांना शोधून त्यांच्यावर गुन्हे दाखल करणं सुरू झालं… दुसरीकडे संसदेच्या अधिवेशनात सहभागी व्हायला आलेल्या धर्मेंद्र प्रधान यांचं एखाद्या विजयी वीराच्या थाटात जंगी स्वागत करण्याचा बेशरमपणा या पक्षाने करून दाखवला… ज्यावेळी पोक्तपणा दाखवून विषय समजून घेऊन आपल्या कार्यपद्धतीत बदल घडवणं अपेक्षित होतं, त्यावेळी हे सरकार पोराटोरांच्या पातळीवर उतरून त्यांना खिजवताना दिसले… नुसतेच वयाने वाढलेले लोक सत्तेत बसले की काय होते, त्याचे दर्शन घडवण्याचा चंगच सरकारने बांधला आहे काय?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात काहीतरी दैवी शक्ती आहे, ते अवतारपुरुष आहेत, ते कशापुढेही झुकत नाहीत, ते प्रत्येक कृती फार विचारपूर्वक करतात, त्यांनी देशासाठी कुटुंबाचा त्याग केला आहे, ते कुठेही सतत मास्टरस्ट्रोकच मारत असतात, अशा कल्पनांमध्ये त्यांचे अंध आणि मंद भक्त रममाण असतात. त्यात कोणाला काही अडचण असण्याचं कारण नाही. कोणी कुठे बुद्धी गहाण ठेवावी, याचे देशात सगळ्यांनाच स्वातंत्र्य आहे. मात्र, मोदीभक्ती हीच देशभक्ती आणि मोदींना विरोध म्हणजे देशद्रोह अशा थिल्लर आणि घातक पातळीवर ही उन्मादी भक्ती पोहोचलेली असताना तिचा फुगा फोडून टाकण्याचं काम जेन झी आंदोलनाने करून दाखवलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप यांनी कोट्यवधी रुपये खर्च करून उभी केलेली खोटी आणि पोकळ प्रतिमा भंगली, तिचा चक्काचूर झाला, १२ वर्षांनंतर का होईना, समाजातला एक वर्ग खडबडून भानावर आला.
भाजप आणि संघ परिवार यांनी एका विशिष्ट अजेंड्याने सत्ता काबीज केली होती २०१४ साली. त्याच्या पूर्ततेसाठी २०२४च्या निवडणुकीत दामटून संशयास्पद विजय मिळवल्यानंतर या पक्षाने कमरेचं सोडून डोक्यालाच गुंडाळलं. महाराष्ट्रात तथाकथित ऑपरेशन टायगर, बंगालमध्ये मतदानाचा हक्क हिरावून घेऊन मिळवलेला बनावट विजय, तृणमूल काँग्रेस फोडणे अशा दांडगट उद्योगांनी काहीही करून संसदेत बहुमत मिळवून परिसीमन विधेयक पास करवून घेण्याचा डाव रचण्यात आला होता. त्यानंतर कायमस्वरूपी सत्तेत राहता येईल, असा भ्रम भाजपला झालेला आहे. पण, ‘झुरळां’नी हे सगळे मनसुबे धुळीला मिळवून टाकले.
कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू झालं होतं ते नीट परीक्षेतले गैरव्यवहार, पेपरफुटी, शिक्षणव्यवस्थेतल्या त्रुटी, परीक्षा पद्धतीतल्या सुधारणा अशा शैक्षणिक मागण्यांसाठी. पण, या आंदोलनाच्या माध्यमातून जेन झीने अनेक वर्षांपासून साचत आलेला असंतोष व्यक्त करायला सुरुवात केली. बेरोजगारी, शिक्षणाचा बोजवारा, भविष्याविषयीची अनिश्चितता, देशाची सर्व आघाड्यांवरची घसरण, धर्मांध राजकारणाचा अतिरेक या सगळ्यावरचा राग उफाळून बाहेर पडायला लागला. २०१४नंतर मोदी सरकारच्या विरोधातलं हे सर्वात व्यापक, सर्वात प्रखर आणि अंदाजच येत नसल्याने आवरायला कठीण असं आंदोलन ठरलं. पोरांनी कमालीच्या कल्पकतेने मोदी सरकारच्या अकार्यक्षमतेच्या, अडाणीपणाच्या आणि अहंमन्यतेच्या ठिकर्या ठिकर्या उडवल्या. रोजची बेइज्जती सहन न झाल्याने मुलांशी मुलांच्या माध्यमातून संवाद साधायला इन्स्टाग्रामवर आलेल्या मोदींनी सर्वाधिक प्रेक्षकसंख्येचा विक्रम केला म्हणून भाजपवाल्यांना कोण कौतुक! त्या व्हिडिओखालच्या कमेंटींमधून त्यांनी शिव्या खाण्याचाही विश्वविक्रम नोंदवला आहे, हे या भोटांच्या लक्षातही आलं नाही.
नियतीची लीला अगाध खरी! २०१४ साली देशात नव्याने आलेल्या मोबाइल क्रांतीवर स्वार होऊन, डेटाच्या स्वस्ताईच्या बळावर, सोशल मीडियामध्ये वाटेल तशा थापा मारून, कंड्या पिकवून सत्तेत आलेल्या भाजपला १२ वर्षांनी त्याच माध्यमांनी त्याच पद्धतीने दणका दिला आहे… २०१४ ला बुद्धिभ्रष्ट पिढीने भाजपला हात दिला, पण जेन झी या सगळ्या तमाशाला विटली…फेसबुक आणि
व्हॉट्सअॅपवरच्या थापेबाजीत आणि आयटी सेलच्या शिवराळ झुंडशाहीत अडकलेल्या तथाकथित संस्कारी अंकल आंटींच्या लक्षातही आलं नाही की नवी पिढी कधीच इन्स्टाग्रामवर निसटली आणि तिथे भलतंच काही शिजतंय…
कॉक्रोच जनता पार्टी, अभिजीत दिपके, सोनम वांगचुक, इतर विद्यार्थी नेते यांचं यापुढे काय होईल, शेपटावर पाय पडल्याने बिथरलेले मोदी सरकार क्रूर, निष्ठुर दमनयंत्र चालवण्यात किती तळ गाठेल, यातलं काहीही आत्ता सांगणं कठीण आहे… मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे शब्द वापरून एक गोष्ट निश्चितपणे सांगता येईल की देशभक्त आणि अंधभक्त यांच्यातल्या लढाईत अंधभक्तांची सरशी होण्याचा काळ आता संपलेला आहे. मोदीनामाचा महिमा संपुष्टात आलेला आहे, हे नाणं आता चलनातून बाद करावंच लागणार आहे भाजपला; सतत हिंदू-मुस्लिम करत राहिलं की सत्तेचा अमरपट्टा आपलाच ही समजूतही आता सोडावी लागणार आहे. ज्यांनी प्रधानांना घालवलं ते मनात आणतील तर पंतप्रधानांनाही झोला उठा के निघून जायला भाग पाडू शकतात…तेव्हा, शहाणे असाल तर वेळेत सुधारा अन्यथा कार्य सिद्धीस नेण्यास जेन झी समर्थ आहे!

