• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

लिंबू फिरवले, रहस्य उलगडले…

इन्स्पेक्टर प्रधान पंचनामा

Marmik Team by Marmik Team
July 30, 2026
in पंचनामा
0
लिंबू फिरवले, रहस्य उलगडले…

चित्र-नचिकेत

दुपारपर्यंत पूर्ण पतपेढी शोधूनही काही न सापडल्याने साळवे हताश झाले होते. उकाड्यामुळे आणि त्रासामुळे ते पुन्हा
मॅनेजरच्या एसी केबिनमध्ये जाऊन बसले. मॅनेजरने आग्रहाने साळवे यांना जेवायला सांगितले. साळवे यांनी आपल्या गाडीतील डबा मागवून घेतला. जेवताना साळवे यांच्या लक्षात आले की, मॅनेजरने जेवणात लिंबू घेतलेच नाही. पण त्यांनी त्याकडे तात्पुरते दुर्लक्ष केले.

 

दु पारचे साडेबारा वाजत आले होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मदन साळवे पोलीस ठाण्यातील आपल्या केबिनमध्ये काही फाईल्स तपासत होते. तेवढ्यात टेबलवरील फोनची घंटी घनघाणली. साळवे यांनी फोन उचलला,
‘हॅलो, साळवे स्पीकिंग.’
‘साहेब, कंट्रोल रूमवरून कॉल आहे! पुणे-सातारा हायवेवरील खेड फाट्याजवळ एका पतपेढीच्या कॅश व्हॅनवर सशस्त्र दरोडा पडला आहे. सुमारे ५० लाखांची रोकड लुटली आहे. व्हॅनमधील चालक, क्लार्क आणि सिक्युरिटी गार्ड यांना मारहाण करून बांधून फेकून दिले होते. तात्काळ घटनास्थळी पोहोचा!’
साळवे क्षणाचाही विलंब न करता उठले. ‘मोरे, शिंदे, गाडी काढा! लगेच खेड फाट्याकडे निघायचे आहे!’ त्यांनी आपल्या पथकाला आदेश दिला.
घटनास्थळी पोहोचल्यावर रस्त्याच्या कडेला उसाच्या शेतात तीन जण प्रचंड घाबरलेल्या अवस्थेत बसलेले दिसले. पतपेढीचा चालक, कॅशियर मनोज काळे आणि एक वयोवृद्ध सिक्युरिटी गार्ड त्यांच्या अंगावर मारहाणीचे वळ होते.
‘काय झाले नक्की? शांत व्हा आणि सविस्तर सांगा,’ साळवे यांनी ड्रायव्हरच्या खांद्यावर हात ठेवत धीर दिला.
ड्रायव्हर थरथरत्या आवाजात म्हणाला, ‘साहेब, आम्ही पतपेढीतून ५० लाख रुपये घेऊन मेन ब्रांचकडे निघालो होतो. हायवेवर अचानक मागून एका काळ्या रंगाच्या पल्सरवरून दोघेजण आले. त्यांनी अचानक गाडी आडवी घातली. दोघांच्या हातात
रिव्हॉल्व्हर होते. त्यांनी आम्हाला गोळी घालण्याची धमकी दिली, खाली उतरवले आणि आमचे हातपाय व डोळे बांधून आम्हाला या उसाच्या शेतात फेकून दिले. आमची पैशांची बॅग घेऊन ते पसार झाले.’
‘काही वेळाने आम्ही एकमेकांच्या मदतीने कसंबसं एकमेकांचे दोरखंड सोडवले आणि माझ्या खिशातल्या मोबाईलवरून कंट्रोल रूमला फोन केला साहेब,’ कॅशियर मनोज काळेने रडकुंडीला येऊन सांगितले.
साळवे यांनी आजूबाजूचा परिसर पारखून घेतला. ‘तुमच्यासोबत सिक्युरिटी नव्हता का?’
‘नाही साहेब, नेहमीचे सिक्युरिटी गार्ड आज रजेवर होते. त्यांच्याऐवजी हे बदली कामगार म्हणून वयस्कर काका आले होते. यांच्याकडे बंदूकही नव्हती,’ कॅशियरने उत्तर दिले. त्यावेळी इन्स्पेक्टर साळवे यांनी मुठी आवळल्या. त्यांचा चेहरा रागाने लाल झाला किती हा बेजबाबदारपणा, एवढी मोठी रक्कम आणि साधा सिक्युरिटी पण धड घेतला नाही, यांचे उद्योग पोलिसांना निस्तरावे लागत आहेत, असे बोलून ते शांत झाले, त्यांनी आपल्या रागावर कंट्रोल केला.
त्यानंतर इन्स्पेक्टर साळवे यांनी तात्काळ ठाणे अंमलदार यांना जागेचा पंचनामा करून कॅशिअरला फिर्याद नोंदवण्यासाठी पोलीस ठाण्यात पाठवून दिले. कंट्रोल रूमला कॉल करून फॉरेन्सिक लॅब व्हॅन बोलावून घेऊन बोटाचे ठसे तसेच इतर काही पुरावा मिळतो आहे का, याची तपासणी केली. त्यात काही मिळाले नाही. तिथे क्राइमचा डॉग बोलावला, परंतु त्याचाही काही उपयोग झाला नाही. त्यामुळे हा तपास सोपा नसून हे एक आव्हानच आहे याची त्यांना कल्पना आली. त्यांनीही हे आव्हान समजून स्वीकारले आणि तपासाची चक्रे फिरवायला सुरुवात केली.
पतपेढीच्या बाहेरील आणि मुख्य रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू झाले. ते पाहताना साळवे यांच्या लक्षात आले की, कॅश व्हॅन बाहेर पडताच एक काळ्या रंगाची पल्सर मोटरसायकल (ज्यावर हेल्मेट घातलेले दोन जण होते) त्या व्हॅनच्या मागे निघाली होती. हवालदार मोरे फुटेज दाखवत म्हणाले. ‘साहेब, याच मोटरसायकलने व्हॅनचा पाठलाग केला आहे.’ पोलिसांनी त्या पल्सरचा मार्ग ट्रॅक करण्यास सुरुवात केली. चर्च रोड ते रामनगर कॉर्नर या भागापर्यंत गाडी दिसली, पण त्यापुढचा भाग कॅमेर्‍याच्या टप्प्यात नव्हता. त्या भागात कॅमेरेच नव्हते. पुढे काही अंतरावर जेव्हा ती पल्सर पुन्हा एका कॅमेर्‍यात दिसली, तेव्हा चोरांच्या पाठीवर ती पैशांची बॅग नव्हती!
‘म्हणजे चर्च रोड ते रामनगर कॉर्नर या कॅमेरा नसलेल्या भागातच त्यांनी बॅग कुठेतरी लपवली किंवा दुसर्‍या साथीदाराकडे सोपवली,’ साळवे स्वगत पुटपुटले. ‘मोरे, आपली संपूर्ण यंत्रणा या चर्च रोड ते रामनगर कॉर्नरच्या भागात लावा! कोपरा अन् कोपरा चाळून घ्या.’
तपास पथकाने तातडीने शोधमोहीम राबवली. पल्सरस्वार पुढे वेगवेगळ्या गल्लीबोळातून फिरत अखेर काशी पेठ झोपडपट्टीत जाताना दिसले. पोलिसांच्या एका टीमने झोपडपट्टीत छापा टाकून परिसर पिंजून काढला, पण तिथे काहीच हाती लागले नाही.
त्याचवेळी इकडे इन्स्पेक्टर साळवे पतपेढीतील रजिस्टर चेक करत होते. ‘मोरे, मला एक गोष्ट सांगा…’ साळवे विचारमग्न होऊन म्हणाले, ‘त्याच दिवशी पतपेढीतून ५० लाखांची मोठी रक्कम जाणार होती… त्याच दिवशी सिक्युरिटी बदलला होता आणि तोही बिनहत्यारी होता… हे सर्व चोरांना कसे माहीत पडले? इतर वेळी इतकी मोठी रक्कम नसते. म्हणजे हे पतपेढीतील कोण्या ‘घरभेदी’ कर्मचार्‍याचेच षडयंत्र आहे!’
साळवे यांनी मग पतपेढीच्या कर्मचार्‍यांची कुंडली काढायला सुरुवात केली. पतपेढीत मॅनेजर, कॅशियर मनोज काळे, पाच क्लार्क आणि एक शिपाई असा स्टाफ होता. चौकशीत एक नाव सतत समोर येत होते— कॅशियर मनोज काळे. मनोजला डान्स बार आणि दारूचे भयंकर व्यसन होते. त्याच्यावर प्रचंड कर्ज झाले होते. त्याने याच पतपेढीत नवीन कर्जासाठी अर्ज केला होता, परंतु जुने कर्ज थकीत असल्याने मॅनेजरने ते नाकारले होते. त्यामुळे पहिला संशयित तोच होता. साळवे यांनी मनोजची कसून चौकशी केली. तो ज्या बारमध्ये जातो तिथे आणि जिथे राहतो तिथे डीबी (डिटेक्शन ब्रँच, गुन्हे प्रकटीकरण शाखा) स्टाफ पाठवून माहिती काढली. परंतु त्यातून हेच निष्पन्न होत होते की मनोज फारच भित्र्या स्वभावाचा होता. तो दरोडा घालण्याएवढी डेअरिंग करेल असे वाटत नव्हते. साळवे यांनी त्याच्या टेबलची आणि ड्रॉवरची तपासणी केली. तिथे तंबाखूच्या पुड्या, माव्याचे कागद आणि उधारीचे हिशोब सापडले.
‘काळे, तुझा मोबाईल आम्हाला हवा आहे,’ साळवे म्हणाले. त्यांना सीडीआर (मनोजच्या फोनवर आलेल्या आणि केल्या गेलेल्या कॉलचा तपशील, कॉल डिटेल रिपोर्ट) काढायचा होता.
‘साहेब, मी कर्जबाजारी नक्कीच आहे, पण मी दरोडा नाही टाकला साहेब! तुम्ही खात्री करून घ्या,’ काळे हात जोडून म्हणाला. त्यानंतर सर्वांचे मोबाईल तपासले गेले आणि सीडीआर काढायला सांगितले गेले. परंतु, गेल्या महिन्याभराचे सर्व कर्मचार्‍यांचे मोबाईल सीडीआर तपासूनही पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही.
‘म्हणजे, मोबाईलचा वापर पूर्णपणे टाळला गेलाय…’ साळवे स्वतःशीच म्हणाले, ‘याचा अर्थ चोर अत्यंत चाणाक्ष आहेत. त्यांनी दिलेलं आव्हान मोठं आहे.’
आता इन्स्पेक्टर साळवे यांनी मॅनेजरच्या केबिनचा एकेक कोपरा तपासायला सुरुवात केली. टेबलवर पसरलेल्या फाईल्स, कागदपत्रे बाजूला सारत त्यांनी मॅनेजरच्या मुख्य लाकडी ड्रॉवरची चावी फिरवली आणि ड्रॉवर बाहेर ओढला.
तो उघडताच साळवे यांची नजर तिथे ठेवलेल्या एका छोट्या स्टीलच्या सुरीवर आणि तिच्या शेजारीच ठेवलेल्या दोन-तीन पिवळ्याधमक लिंबांवर पडली.
साळवे यांनी मान वर केली. समोरच घाम पुसत उभा असलेला मॅनेजर जरा अस्वस्थ दिसला.
‘मॅनेजर साहेब,’ साळवे यांनी एक लिंबू हातात घेत ते वर-खाली उडवले आणि मिश्कील हसत विचारले, ‘हे काय आहे? पतपेढीच्या कामात या सुरी आणि लिंबाचा काय संबंध? की इथे काही जादूटोणा किंवा लिंबू कापायचा कार्यक्रम चालतो?’
मॅनेजरने चेहर्‍यावर बळजबरीने हसू आणले आणि हात जोडत म्हणाला, ‘अहो नाही, नाही साहेब! जादूटोणा वगैरे काही नाही. मला जेवताना लिंबू पिळून खायची खूप जुनी सवय आहे. लिंबू जेवणात असले की जेवणाची चवच बदलते.’
‘अच्छा! मग सुरी टेबलच्या ड्रॉवरमध्येच ठेवून दिलीत?’ साळवे यांनी सुरी हातात घेऊन ती निरखून पाहिली.
‘हो साहेब, उन्हाळ्याचे दिवस आहेत ना!’ मॅनेजरने थोडं मोकळेपणाने सांगायला सुरुवात केली, ‘आणि साहेब, शास्त्रीयदृष्ट्या पाहायला गेलं तर लिंबू शरीरासाठी फार गुणकारी असतं. लिंबाच्या रसात मुबलक प्रमाणात सायट्रिक अ‍ॅसिड आणि व्हिटॅमिन सी असतं. हे घटक आपल्या शरीरातील इम्युनिटी (प्रतिकारशक्ती) तर वाढवतातच, पण त्याचबरोबर अन्नाचे ऑक्सिडेशन रोखून पचनक्रिया एकदम सुरळीत ठेवतात. त्याचे हे रासायनिक फायदे माहित असल्यापासून मी रोज जेवणात लिंबू आवर्जून वापरतो.’
मॅनेजरने अगदी सहजतेने सायट्रिक
अ‍ॅसिड आणि ऑक्सिडेशनच्या गप्पा मारल्या होत्या. साळवे यांनी त्याच्याकडे तीक्ष्ण नजरेने पाहिले. एका पतपेढीच्या मॅनेजरच्या तोंडून अशा प्रकारची शुद्ध रासायनिक भाषेतील माहिती ऐकून साळवे थोडे चक्रावले.
‘वा! मॅनेजर साहेब…’ साळवे यांनी लिंबू परत ड्रॉवरमध्ये ठेवले आणि टेबलावर दोन्ही हात टेकवत पुढे झुकले, ‘तुम्हाला तर लिंबाच्या केमिस्ट्रीची (रसायनशास्त्राची) खूपच सखोल माहिती आहे की! बँकेत काम करणार्‍या माणसाला सायट्रिक अ‍ॅसिड आणि ऑक्सिडेशनचे एवढे बारकावे कसे ठाऊक?’
मॅनेजरच्या चेहर्‍यावर क्षणभर एक हलकीशी भीतीची लाट उमटली, पण त्याने लगेच सावरून घेतले.
‘ते… ते काय आहे ना साहेब,’
मॅनेजर आदरयुक्त आवाजात म्हणाला, ‘या पतपेढीत नोकरीला लागायच्या आधी, सुरुवातीच्या काळात मी एका केमिकल
मॅन्युफॅक्चरिंग कंपनीत (रासायनिक कंपनीत) लॅब असिस्टंट म्हणून काम करायचो. तिथे वेगवेगळ्या केमिकल्स आणि अ‍ॅसिड्सवर काम करताना या सर्व गोष्टींचा चांगलाच अभ्यास झाला होता. तिथूनच ही माहिती आणि सवय सोबत राहिली.’
‘ओहो! केमिकल कंपनीचा अनुभव आहे तर! खूपच छान…’ साळवे उद्गारले.
त्यांनी मॅनेजरचा ड्रॉवर हळूच बंद केला. मॅनेजरने रिलॅक्स होऊन सुटकेचा श्वास सोडला. त्याला वाटले की साहेबांच्या शंकेचं निरसन झालं आहे. पण, साळवे यांच्या तीक्ष्ण मेंदूत मात्र संशयाची एक मोठी ठिणगी पडली होती—’केमिकल कंपनीचा अनुभव असलेला माणूस… आणि ड्रॉवरमध्ये लपवून ठेवलेले लिंबू… या दोन गोष्टींचा काहीतरी विचित्र संबंध नक्कीच असणार!’
दुपारपर्यंत पूर्ण पतपेढी शोधूनही काही न सापडल्याने साळवे हताश झाले होते. उकाड्यामुळे आणि त्रासामुळे ते पुन्हा
मॅनेजरच्या एसी केबिनमध्ये जाऊन बसले. मॅनेजरने आग्रहाने साळवे यांना जेवायला सांगितले. साळवे यांनी आपल्या गाडीतील डबा मागवून घेतला. जेवताना साळवे यांच्या लक्षात आले की, मॅनेजरने जेवणात लिंबू घेतलेच नाही. पण त्यांनी त्याकडे तात्पुरते दुर्लक्ष केले.
दुपारी साळवे यांनी पतपेढीतील मागील आठ दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज आणि खातेदारांचे व्यवहार तपासण्याचे ठरवले. रोज ५०-६० ग्राहक येत असत.
‘साहेब, हे खूप मोठे काम आहे,’ क्लार्क म्हणाला.
‘कामाला लागा! तपासात सहकार्य केले नाही तर पोलिसांचा खाक्या दाखवेन आणि सर्वांवर गुन्ह्यात सहभागाचा गुन्हा दाखल करेन!’ साळवे यांनी कडक इशारा दिला.
संध्याकाळी सात वाजायच्या सुमारास फुटेज पाहताना साळवे यांची नजर एका व्यक्तीवर खिळली. सोमवारी ही अनोळखी व्यक्ती पतपेढीत आली होती. ती मॅनेजरच्या केबिनमध्ये गेली, मॅनेजरने त्याला एक कागद दिला आणि तो निघून गेला. आश्चर्य म्हणजे, तीच व्यक्ती गुरुवारी सकाळी १० वाजता (दरोड्याच्या तीन तास आधी) पुन्हा आली होती! मॅनेजरने त्याला पुन्हा एक कागद दिला होता. साळवे यांनी तात्काळ मॅनेजरला केबिनमध्ये बोलावले. मॅनेजर केबिनमध्ये येताच साळवे यांना पुन्हा लिंबाचा तीव्र वास आला.
‘मॅनेजर साहेब, ही फुटेज पाहा. हा माणूस गुरुवारी सकाळी १० वाजता आला होता. तुम्ही त्याला कागद दिला. हा कोण आहे?’
मॅनेजरने ठामपणे सांगितले, ‘साहेब, हा लोनचा फॉर्म मागायला आला होता. मी त्याला फॉर्म दिला.
‘त्याचे नाव काय आहे आणि त्याचे कोणते खाते आहे हे विचारल्यावर मॅनेजरने सांगितले की त्याचे पतपेढीत खातेच नाही.
‘याचे आपल्या पतपेढीत खातेच नसताना तुम्ही त्याला डायरेक्ट लोन
फॉर्म कसा दिला?’ साळवे यांनी थेट सवाल केला.
मॅनेजर गडबडला, ‘ते… साहेब, गर्दी होती खूप. मी घाईघाईत खात्याची खात्री करायला विसरलो आणि फॉर्म देऊन टाकला.’
साळवे मनातल्या मनात हसले. त्यांना कसला तरी उलगडा झाला होता.

(क्रमश:- इन्स्पेक्टर साळवेंना काय उलगडा झाला आणि दरोड्याचं रहस्य कसं उलगडलं ते वाचू या १५ ऑगस्टच्या अंकात.)

Previous Post

राशीभविष्य १ ते ७ ऑगस्ट २०२६

Next Post

अनिल पानवाला

Next Post
अनिल पानवाला

अनिल पानवाला

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.