आम्ही मुली पैशाकडे पाहून लग्न करतो, असा दोष आम्हाला दिला जातो. पुरुषही बाईचं सौंदर्य पाहूनच लग्न करतात ना? – नीता बोडके, पाली
अशा प्रश्नांची उत्तरं देऊन, आमच्यासारखे पुरुष झालेली चूक उगाळत बसत नाहीत.. दिसतं तसं नसतं हे माहीत असूनही आमच्यासारख येडं सौंदर्याला फसतं आणि ती चूक निस्तारत बसतं. कारण ती चूक सुधारू शकत नाही आणि अशी चूक ‘परत परत परत’ करायला आपण काय ‘आमीर’जादा नाही. तेव्हा जाऊदे ताई, त्या एका चुकीची माफी मागतो. पण प्लीज पुन्हा अशा जखमेवरच्या खपल्या काढू नका…
संतोषराव, केल्याने देशाटन मनुजा चातुर्य येतसे फार असे म्हटले गेले आहे. मात्र एक सद्गृहस्थ जात्याच महाभयंकर चतुर आहेत, तरीदेखील ते दहा लाखांचे कपडे घालून २२-२५ हजार कोटींचे विमान उडवत का बरे देशोदेशी हिंडत आहेत? -संजय क्षीरसागर, पिंपळे गुरव पुणे
उत्तर-नवीन कपडे घातले की जगाला दाखवायला नको का? तुम्ही आम्ही नवीन कपडे घालून घरात बसतो का? मानव कितीही चतुर असला तरी माणूसच असतो. तो मूर्खपणा करतोच… महामानव असला तरी माणसाच्या जातीवर जातोच…
पेपरफुटी हा शिक्षणक्षेत्रातील संसर्गजन्य रोग आहे का?- खासदार, आमदार फुटतात तसेच पेपरही फुटतात, देशात हे काय चाललंय? -अशोक परब, ठाणे
सर्व फुटकळ चाललंय… त्यापेक्षा महत्त्वाचे प्रश्न विचारा… उदाहरणार्थ कटप्पाने बाहुबली को क्यू मारा? मेलडी इतनी चॉकलेटी कैसे बनी? किंवा मग स्वतःला समजवा की ‘माझी गाडी तर डिझेलची आहे, पेट्रोलच्या गाडीचं मला काय करायचंय? किंवा ‘माझ्या पक्षाचा कोणी
फुटला नाही ना?’ किंवा ‘माझ्या मुलाचा पेपर तर फुटला नाही ना?’ बघा… असा विचार करा… म्हणजे काही त्रास होणार नाही.
आता कसं वाटतंय, गार गार वाटतंय… असं एकदम गार वाटलं हो आम्हाला गेल्या आठवड्यात तरुण मुलांचं आंदोलन बघून! तुम्हाला कसं वाटतंय?-श्रीपाद पोंक्षे, पनवेल
पोंक्षे काका, आम्हाला खूप झोंबतंय…पण सांगता येत नाहीये… आणि बरनॉल पण लावता येत नाहीये…मार्वेâटमध्ये मिळतच नाहीये…सगळं संपलं म्हणे… तुम्ही काय केलं म्हणून तुम्हाला गार गार वाटतंय पोंक्षे काका?
आपलं नाव, फोटो वगैरे सगळं लपवून सोशल मीडियावर कोणालाही गलिच्छ शिवीगाळ करणार्यांना आता जेन झींच्या असंस्कारी भाषेने यातना होतायत? हे लोक कधी आरसा बघतात की नाही?-अनन्या बोराडे, इचलकरंजी
काही लोक काही लोकांना सदैव पाण्यात बघत असतात… मग स्वतःचा चेहरा आरशात बघायला त्यांना वेळ कुठून मिळणार? किंवा आरसा कधी खोटं बोलत नाही हे त्यांना माहित असावं. आपण किती खरे आहोत हे त्यांच्या मनाला तरी माहीत असावं. मग समजा बघितलं त्यांनी आरशात आणि आरसा खरच खरं बोलला तर… जनाची नाही, मनाची नाही, पण आरशाची तरी त्यांना असेल कदाचित.
देशाच्या सरन्यायाधीशांना तरुण, बेरोजगार मुलं कॉक्रोच वाटतात…जंतर मंतरवर मुलांना झालेल्या मारहाणीचे व्हिडिओ पाहण्यात वाया घालवण्याइतका वेळ नाही यांच्याकडे… हे देशाचे आणि लोकांचे नोकर आहेत की सरकारचे? -निलेश मांजरेकर, चुनाभट्टी
असं बोलू नका उगाच, समजून घ्या…ते व्हिडिओ बघत बसले मग बाहेरच्या कार्यक्रमात भाषणं कधी देणार? जे नोकरीतल्या खुर्चीवर बसून बोलता येत नाही, ते अशा कार्यक्रमातूनच बोलता येतं…आणि हेच बोलण्यासाठी त्यांना नोकरी दिली असेल… कदाचित… आणि पोटासाठी नोकरी करावी लागत असली तरी नोकरी टिकवण्यासाठी जसं बोलायला सांगितलं जातं तसं बोलावं लागतं. मोठ्या लोकांच्या मोठ्या गोष्टी आपल्यासारख्या छोट्यांना कशा कळणार?
नेहरू-गांधी-आंबेडकरांची इतकी बदनामी केली १२ वर्षांत, तरी नवतरुणांच्या हातातल्या फलकांवर गांधी आणि आंबेडकरच झळकले- आता त्या महापुरुषांना संपवण्यासाठी वेगळं काय करायचं संतोषराव? -कमलाकर शिर्के,सासवड
बापाला जमलं नाही ते मुलांना जमणार आहे का? बघा अजून चड्डीतला जोर लावून…(नवतरुणांबद्दल विचारलंत म्हणून त्यांच्या भाषेत.. सॉरी लिंगोमध्ये सांगितलं…)
विचारून टाका प्रश्न
तुम्हालाही अभिनेते संतोष पवार यांना प्रश्न विचारायचाय…? मग वाट कसली बघताय…? उचला पेन आणि टाका विचारून प्रश्न… हा प्रश्न थेट ‘मार्मिक’च्या[email protected] या ईमेल आयडीवर पाठवून द्या… किंवा आमच्या पत्त्यावर पाठवा. मार्मिक प्रश्नाला संतोष पवार उत्तर देतील…

