दिल्लीत जंतरमंतरला तरुणाईचं सरकारविरोधी झालेलं न भूतो न भविष्यति असं अभूतपूर्व आंदोलन, पोलिसांनी सरकारचा निषेध करणार्या आंदोलकांवर केलेला अमानुष लाठीमार, गुरासारखे त्यांना झोडपण्याचे प्रकार, अश्रुधूर, पाण्याच्या फवार्यांचा मारा, तरुण-तरुणी आणि शालेय विद्यार्थ्यांची लाथाबुक्क्यांनी केलेली तुडवातुडवी, रस्त्यावर पडलेला रक्तांचा सडा, हजारोंच्या संख्येने आंदोलकांनी संसदेवर केलेली चाल, हे सारं मोदी-शहांना अनपेक्षित होतं. मुंग्या चिरडतात तसे आंदोलनं सहज चिरडून टाकू अशी घमेंड होती. ती या तरुणाईने पार मातीमोल करून टाकली. शिक्षणपद्धतीचे बारा वाजवणार्या या सरकारविरोधी तरुणाईच्या ज्वालामुखीचा उद्रेक इतका भयानक होता की सरकारचे बुड त्यात भाजून निघालं. माझा मानलेला परमप्रिय मित्र पोक्या हे सारं टीव्हीवर पाहून संतापून उठला. दिल्ली पोलिसांना आणि सरकारला तो रात्रभर शिव्या घालत होता. त्या रात्री त्याला तीन वाजेपर्यंत झोप लागली नाही. त्यानंतर तो झोपला आणि सकाळी सहा वाजता त्याने मला उठवलं. पहाटे पडलेलं स्वप्न तो मला सांगू लागला. काही महनीय दिवंगतांनी स्वप्नात या पोलिसी अत्याचारावर त्याला प्रतिक्रिया दिल्या. त्याच या प्रतिक्रिया.
डॉ. अब्दुल कलाम : व्हेरी सॅड. ती दृश्य पाहून माझ्या डोळ्यातून वाहणार्या अश्रुधारा अजून थांबत नाहीत. ती तरुण मुलं-मुली त्यांच्यावर `नीट’ परीक्षेने केलेल्या अन्यायाविरुद्ध न्याय मागत होती. ती गुंड नव्हती. चांगल्या घरातली शैक्षणिक क्षेत्रात उत्तम भवितव्य करण्याच्या उद्देशाने झपाटलेली मुलं होती ती. त्याच्यावर बेभानपणे लाठीचार्ज करून त्यांना रक्तबंबाळ करण्याची गरज नव्हती. ज्यावेळी `नीट’ घोटाळा उजेडात आला त्याचवेळी विद्यार्थ्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी चर्चा केली असती तर ही पाळी आली नसती. असे अत्याचार कुणाच्याही हातून होऊ नयेत असं मला वाटतं. देशाची वैज्ञानिक क्षेत्रात उन्नती व्हावी म्हणून मी प्रयत्न केले. आज `इस्रो’च्या शंभर शास्त्रज्ञांनी नोकरीचे राजीनामे दिलेत. हेच माझ्या श्रमाचे फलित काय? कठीण आहे!
जॉर्ज फर्नांडिस : ही दुसरी आणीबाणीच आहे. तेव्हाही एवढा क्रूरपणा मी पाहिला नव्हता. पोलिसांनी त्या मुलामुलींना निर्दयपणे गुरांसारखं झोडपून काढलं, त्यांचे कपडे फाडले, मुलींच्या अंगावरही हात टाकला तरी ती मुलं धैर्याने त्यांचा प्रतिकार करत होती. हे पाहून माझेही हात त्या पोलिसांना झोडपून काढण्यासाठी शिवशिवत होते. पण आत्म्याला ते शक्य होत नाही. या तरुण मुलामुलींना मारझोड करणार्या सरकारच्या मंत्र्यांना मुलेबाळे नाहीत काय? मुलांना निष्कारण असं कोणी लाथाबुक्क्याने तुडवलं असतं तर त्यांना चाललं असतं काय? एक तर सडाफटिंगच आहे. पण बाकीच्यांचं काय? थुत अशा या सरकारच्या आणि मंत्र्यांच्या जिंदगानीवर.
हिटलर : देशभक्तीच्या नावाखाली मी माझ्या जर्मनीतील ज्यू जनतेचा विश्वासघात केला. ज्यावेळी जनतेला माझं खरं रूप समजलं तेव्हा ती चवताळून उठली. ती माझ्यावर चाल करून येण्याआधीच मी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. विश्वासघातकी राजकारण्यांवर शेवटी हीच पाळी येते. जनतेला अंधारात ठेवणं महाग पडतं. विरोधाला कमजोर समजणं घात करतं. हुकूमशाहीच्या जोरावर जनतेला चिरडता येत नाही याचा प्रत्यय मला आला होता. तो तुम्हालाही येण्याची सुरुवात झालीय. वेळीच सावध व्हा.
महात्मा गांधी : हे राम! शांततेनं सत्याग्रह करून गार्हाणं मांडू पाहणार्या तरुण मुलामुलींवर निर्घृणपणे लाठीचार्ज करून या सरकारला काय मिळालं? त्या मुलामुलींचं रक्त सांडलं. ब्रिटिश राजवटीत असे अत्याचार होत असत. मला वाटलं, देश स्वतंत्र झाल्यावर इथले नागरिक खर्या अर्थानं स्वतंत्र होतील. पण तसं झालेलं दिसत नाही. ब्रिटिशांसारखीच दडपशाही आताही सुरु आहे हे पाहून जिवाला यातना होतात. प्रार्थनासभेत मला गोळ्या घालून ठार मारणार्यांचा निष्ठूरपणा मी समजू शकतो, पण शिक्षणासारख्या क्षेत्रातील बजबजपुरी आणि गैरप्रकारांमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर वाईट परिणाम होत असेल तर त्यांनी दाद मागायची कुणाकडे! राज्यकर्त्यांची मनमानी चाललीय. भ्रष्टाचारी नेते राजकारणात आणि सत्तेत घुसतायत. हे लोक गुजरातेत सत्तेवर आल्यापासून त्यांची मनमानी सुरू आहे. दिल्लीत सत्तेत गेल्यावरही त्यांचे लोकशाहीला काळिमा फासणारे तेच चाळे सुरू आहेत. हे जनतेला सामोरे जात नाहीत की पत्रकारांना. विकासाच्या नावाखाली स्वत:ची पोटे भरणारे, दुसर्या पक्षातून विकत घेतलेले भाडोत्री नेते आणि मंत्री पाहिले की यांच्या सामर्थ्याची कीव येते. मी इतका कठोर कधीही बोलत नाही. पण जंतरमंतरवरचा तो निर्दयी प्रकार पाहिला आणि मला राहवलं नाही. राम करो आणि त्यांना सुबुद्धी होवो.
अटलबिहारी वाजपेयी : बहुत बुरा हुआ. गुजरातेत दादागिरी करून या दोघांनी हिंदुत्वाच्या नावावर जी हुकुमशाही केली तोच कित्ता त्यांनी केंद्रात गिरवला. यांच्या डोळ्यापुढे फक्त हिटलरचा आदर्श आहे. बाकी सब नकली माल है। आपण स्वत: म्हणजेच देश असं ते समजतात. त्यांच्या पापाची शिक्षा त्यांना भोगावीच लागेल. ये कभी भी सुधरेंगे नही।
बाळासाहेब ठाकरे : षंढासारखे गप्प राहू नका. या सरकारला कायमचा धडा शिकवा. यांची घटका भरत आलीय म्हणूनच यांना युवकांचं आंदोलन चिरडून टाकण्याची अवदसा आठवतेय. अरे, या तरुण मुलामुलींवर पोलीस इतक्या निर्दयपणे लाठ्या चालवतातयत, त्यांना रक्तबंबाळ होईपर्यंत मारतायत. तुमचे भाडखाऊ नेते त्यांना दहशतवादी ठरवतायत! अरे नालायकांनो, तुमचा सत्तेचा माज उतरवायला या तरुण तरुणींच्या फौजेला अजिबात वेळ लागणार नाही. किती दिवस तोंड लपवत फिरणार आहात? कुठल्या बिळात लपलाय तो दाढीवाला गद्दार अलिबाबा आणि त्याचे चाळीस चोर?

