• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

उद्धव ठाकरे होणे नाही सोपे!

योगेंद्र ठाकूर विशेष लेख

Marmik Team by Marmik Team
July 27, 2026
in विशेष लेख
0
उद्धव ठाकरे होणे नाही सोपे!

२७ जुलै हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचा वाढदिवस. २७ जुलै १९६० रोजी जन्मलेले उद्धवजी वयाची ६६ वर्षे पूर्ण करून ६७व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. तेव्हा उद्धवजींना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!

शिवसेनेचा जन्म होऊन गेल्याच महिन्यात ६० वर्षे पूर्ण झाली आहेत. २००३ साली शिवसेनेत प्रथमच कार्यकारी प्रमुख पद निर्माण करण्यात आले आणि तेव्हापासून खर्‍या अर्थाने शिवसेनेची धुरा ते अनेक अडचणींना, संकटांना आणि वादळांना तोंड देत सांभाळत आहेत. कारण ते ‘ठाकरे’ आहेत. गेल्या ३०-३५ वर्षात शिवसेनेवर जेव्हा जेव्हा संकट कोसळले तेव्हा तेव्हा संकटाशी मुकाबला करून शिवसैनिकांना उभारी देण्याचे काम पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे, आजही करीत आहेत. विरोधक आणि गद्दारांनी शिवसेना व पक्षप्रमुख यांना संपवण्यासाठी वेळोवेळी जंग-जंग पछाडले. पण उद्धवजी डगमगले नाही. शिवसेनेची नौका बुडू दिली नाही. एका धीरोदात्त कप्तानाप्रमाणे शिवसेनेची नौका वादळ-लाटांपासून किनारी लावली. एक संयमी, निश्चयी आणि धीरोदात्त नेत्याचे नेतृत्वगुण वेळोवेळी त्यांनी दाखवून दिलेष्ठ हे असे उद्धव ठाकरे होणे सोपे नाही.

उद्धव ठाकरे यांना प्रथम २००५ आणि २००६ साली संघटनांतर्गत धुसफुशीला, फाटाफुटीला सामोरे जावे लागले. आधी नारायण राणेंची हकालपट्टी, मग राज ठाकरे यांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ केला, त्यावेळी त्यांच्यावर नाना आरोप झाले. मात्र, त्यानंतरच उद्धवजींना नेतृत्वाचा कस लागणार होता. त्यांना कर्तृत्व सिद्ध करून दाखवण्याची संधी मिळाली. श्रीवर्धन आणि रामटेक लोकसभा पोटनिवडणुका जिंकून त्यांनी कर्तृत्व सिद्ध केले. त्यानंतर २००७, २०१२ आणि २०१७च्या मुंबईसह अनेक महानगरपालिकांच्या निवडणुकांत त्यांनी शिवसेनेला घवघवीत यश मिळवून दिले. त्यावेळेसही त्यांनी जे ठरवलं ते करून दाखवलं. टीकाकारांचे तोंड बंद केले. हे उद्धव ठाकरेंनाच जमू शकते.

१७ नोव्हेंबर २०१२ रोजी वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाले. त्यानंतर, उद्धव हे शिवसेनेचे नेतृत्व सांभाळू शकणार नाहीत, बाळासाहेबांच्या पश्चात त्यांना जबाबदारी पेलवणार नाही, उद्धव म्हणजे बाळासाहेब नाहीत, उद्धवजींचा आदेश शिवसैनिक मानणार नाहीत, अशा एक ना अनेक शंका-कुशंकांचे काहूर राजकीय विश्लेषकांकडून व विरोधकांकडून माजवले गेले. त्यावर मात करीत ते आपल्या स्वभावाप्रमाणे शांत व संयमी राहून कार्यरत राहिले. भाजपाने २०१४चा विधानसभा निवडणुकीच्या काही दिवसांआधी शिवसेनेबरोबरची २५ वर्षांची युती तोडली आणि शिवसेनेला एकटे पाडले. त्यामुळे शिवसेना स्वबळावर लढण्यास सज्ज झाली. पक्षप्रमुखांनी या संकटाचे संधीत रूपांतर केले. एकीकडे भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी, तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, डझनभर केंद्रीय नेते, अनेत राज्यांतील मुख्यमंत्री निवडणूक प्रचारात उतरवले तर दुसरीकडे उद्धव ठाकरे हे शिवसेना नेते, पदाधिकारी आणि सामान्य शिवसैनिक यांच्या बळावर निवडणूक जिंकण्याच्या निश्चयाने मैदानात उतरले. त्यांनी एकहाती शिवसेनेचे ६३ आमदार निवडून आणले आणि पुन्हा चमत्कार करून दाखवला. हे उद्धव ठाकरेंनाच जमू शकते.

शिवसेनेने भाजपाची अडचण समजून घेऊन २०१९ची लोकसभा निवडणूक भाजपाबरोबर लढवली. केंद्रात भाजपाला घवघवीत यश मिळाले. महाराष्ट्रात महायुतीचे ४२ खासदार निवडून आले. त्यात शिवसेनेचे १८ होते. पण भाजपने शिवसेनेची केवळ एका मंत्रिपदावर बोळवण केली. २०१९च्या विधानसभा निवडणुक निकालानंतर भाजप दिलेल्या वचनाला जागला नाही. तेव्हा सरकार बनवण्यासाठी पर्यायी राजकीय हालचाली सुरू झाल्या. सर्व राजकीय गणितं जुळली, किमान समान कार्यक्रम आखला गेला आणि महाविकास आघाडीचे प्रथम मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षप्रमुखांनी २८ नोव्हेंबर २०१९ रोजी शिवतीर्थावर लाखोंच्या उपस्थितीत शपथ घेतली. त्यांच्या अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात दोन वर्ष कोरोना महामारीचा मुकाबला करण्यात गेली. पाहिजे तेव्हा निर्बंध घट्ट करून अंमलबजावणी केल्यामुळे महाराष्ट्र सरकारला कोरोना महामारी नियंत्रणात ठेवण्यात यश आले. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ हे अभियान राबविले. कोरोनाच्या संकटातही राज्याने चौफेर विकास केला. उद्धव ठाकरे यांनी कोरोना काळातही राज्याचे अर्थचक्र थांबू दिले नाही. त्यांनी मुख्यमंत्रीपदी अतुलनीय कामगिरी करून दाखवली. कोरोना काळातील त्यांच्या कामगिरीचे कौतुक पंतप्रधान, सर्वोच्च न्यायालय आणि जागतिक आरोग्य संघटनांनी केले. हे उद्धव ठाकरेंनाच जमू शकते.

परंतु त्याचवेळी उद्धव यांचे कौतुक विरोधकांच्या डोळ्यात खुपत होते. तसेच स्वपक्षातील नेत्यांच्या, खासदारांच्या आणि आमदारांच्या राक्षसी महत्त्वाकांक्षा उफाळून आल्या. त्यामुळे उद्धव यांच्याशी दगाफटका करून त्यांनी जून २०२२मध्ये महाविकास आघाडी सरकार अस्थिर केले. उद्धव यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागले. पण ते नामोहरम झाले नाहीत. हा आघातही पचवला. ते उद्धव ठाकरे होते म्हणूनच हे करू शकले.

२९ जून २०२२ रोजी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर ‘वर्षा’ बंगला सहकुटुंब तात्काळ सोडला. कुठल्याही मोहाने त्यांना विचलित केले नाही. एका विशिष्ट राजकीय परिस्थितीमुळे त्यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारले होते. त्या पदाची लालसा, महत्वाकांक्षा वा मोह त्यांना कधीच नव्हता. यानंतर कोण गेले, किती गेले याचा विचार न करता उद्धवजींनी शिवसेना खासदार, आमदार, जिल्हासंपर्कप्रमुख, जिल्हाप्रमुख, नगरसेवक, प्रमुख पदाधिकारी यांच्या बैठका घेऊन शिवसैनिकांना धीर दिला. लोकांचे काम करण्यासाठी नवीन ऊर्जा दिली. आमदार गेलेत, परंतु जिल्हाप्रमुख, पदाधिकारी, सामान्य शिवसैनिक आणि मराठी माणूस शिवसेनेसोबत आहे असा विश्वास उद्धवजींनी निर्माण केला.

गद्दारांनी पक्षाचे नाव व चिन्ह चोरले. निवडणूक आयोगाने उफरटा न्याय दिला. तरीही उद्धव ठाकरे डगमगले नाहीत. एप्रिल-मे २०२४च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी कुशल आणि कणखर नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे तब्बल ३१ खासदार निवडून आणले. त्यात शिवसेनेचे ९ खासदार निवडून आले. त्यापैकी मुंबईतून तीन खासदार निवडून आले. अमोल कीर्तीकर यांचा केवळ ४८ मतांनी पराभव झाला, नव्हे पराभव केला गेला. नोव्हेंबर २०२४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला महायुती आणि निवडणूक आयोगाच्या अभद्र युतीमुळे फारसे यश मिळाले नाही. तरी शिवसेनेचे २० आमदार निवडून आले. त्यापैकी १० आमदार एकट्या मुंबईतून निवडून आले. मुंबईवर ठाकरे यांचेच राज्य चालते हे पुन्हा अधोरेखित झाले.

केंद्रात २०२४ साली भाजपाप्रणीत एनडीए सरकार तर महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आले. मुंबई महानगरपालिकेची शिवसेनेची सत्ता खालसा करण्यासाठी भाजपाने गद्दार शिंदेसेनेच्या सहाय्याने जोरदार प्रयत्न केले. सत्तेचा धाक आणि पैशाचा माज दाखवून शिवसेनेला संपविण्याचे षडयंत्र रचले. मतदारांना अनेक प्रलोभने दाखवली. पैशाचा पाऊस पाडला. मराठी-अमराठी वाद निर्माण केला. जातीय-धार्मिक भावना भडकावल्या गेल्या, पण त्यांना मुंबईतून शिवसेनेला संपवता आले नाही. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनाप्रमुख राज ठाकरे यांच्याशी युती करून मराठी माणसाची एकजूट भक्कम केली. शिवसेना आणि उद्धव ठाकरेंना मुंबईच्या राजकीय पटलावरून उखडून टाकण्याचे भाजपाचे स्वप्न पूर्ण झाले नाही. सत्ता, पैसा आणि निवडणूक यंत्रणेच्या जोरावर भाजपला निसटता विजय मिळाला, पण पूर्ण यश मिळाले नाही. उद्धव यांनी भाजपा-शिंदेसेनेच्या कुटीलपणाला तीव्र विरोध करत/टक्कर देत मुंबईतील मराठी माणसाच्या एकजुटीच्या जोरावर शिवसेनेचे ६५ तर मनसेचे सात नगरसेवक निवडून आणले. सत्ता, पैसा आणि निवडणूक यंत्रणेच्या गैरवापराविरुद्ध हे लक्षणीय यश उद्धव ठाकरेंनी मिळवले. मुंबईवर ठाकरे ब्रँडचेच वर्चस्व असेल हे सिद्ध करून दाखवले. हे उद्धव ठाकरे होते म्हणून शक्य झाले. ते सर्वांना जमणे नाही.

जून २०२६मध्ये शिवसेनेच्या नऊ खासदारांपैकी सहा खासदारांनी गद्दारी करून शिंदेसेनेत प्रवेश केला. हा उद्धव ठाकरेंना धक्का होता, अशा बातम्या आल्या. राजकीय विश्लेषणे झाली. पण उद्धव ठाकरे डगमगले नाहीत. त्यांच्या आयुष्यात शिवसेनेला बसलेले अनेक धक्के त्यांनी पाहिले, पचवले आणि पुढे वाटचाल केली. त्याचप्रमाणे सहा खासदारांनी गद्दारी केल्यानंतर उद्धवजी विचलित झाले नाहीत. खचून तर मुळीच गेले नाहीत. शिवसैनिकांनाही त्यांनी खचू दिले नाही. गद्दार खासदारांच्या सहाही लोकसभा क्षेत्रात बैठका/सभा घेऊन शिवसैनिक पदाधिकारी आणि मतदारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळाला. हे येड्यागबाळ्याचे काम नाही. त्यावेळी या एका निश्चयी, संयमी व धीरोदात्त सेनानीचे दर्शन त्यांनी महाराष्ट्राला दाखवून दिले. हे उद्धव ठाकरे होते म्हणून जमले, सर्वांना ते जमणे नाही.

वंदनीय शिवसेनाप्रमुख नेहमी म्हणायचे. ‘जेव्हा बाहेर वादळ असतं तेव्हा आपण शांत राहायचे आणि जेव्हा बाहेर शांतता असेल तेव्हा आपण वादळ निर्माण करायचं.’ महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय वादळाशी उद्धवजी हे शांत, संयमी आणि धीरोदात्तपणे मुकाबला करीत आहेत आणि यापुढेही करणार आहेत. कारण संकटाशी मुकाबला करणे व संघर्ष करणे हा ठाकरे कुटुंबाचा स्थायीभाव आहे. उद्धवजी हे ‘ठाकरे’ आहेत, ते सर्वांना जमणे नाही!

Previous Post

निश्चयाचा महामेरू : उद्धव ठाकरे!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.