
मुनि मुक्त जाले भेणे गर्भवासा।
आम्हा विष्णुदासा सुलभ तो।।१।।
अवघाचि संसार केला ब्रह्मरूप।
विठ्ठलस्वरुप म्हणोनिया ।।२।।
पुराणी उपदेश साधन उद्भट।
आम्हा सोपी वाट वैकुंठीची।।३।।
तुका म्हणे जना सकळांसहित।
घेऊ अखंडित प्रेमसुख।।४।।
प्रस्तुत अभंगात तुकोबाराय मुनी आणि वारकरी यांची तुलना करतात. इथे मुनी म्हणजे वैदिक मुनी आहेत हे उघड आहे. ‘वेदमार्गे मुनी गेले।’ असं त्यामुळेच ज्ञानोबाराय म्हणतात. वेदमार्गे जाणारे मुनी आणि संतमार्गे जाणारे वैष्णव यातला फरक विविध उदाहरणांच्या आधारे तुकोबारायांनी मांडला आहे. तुकोबाराय पहिला फरक सांगतात तो गर्भवासाबाबत असलेल्या भूमिकेचा. मुनींना गर्भवासाची भीती वाटते. त्यामुळे ते मुक्त होतात. याउलट विष्णुदास असलेल्या संतांना मात्र गर्भवासाची भीती वाटत नाही. त्यामुळेच तुकोबारायांनी ‘तुका म्हणे गर्भवासी। सुखे घालावे आम्हासी।’ असं म्हटलेलं आहे. वैदिक मुनींच्या तत्त्वज्ञानानुसार मानवी जीवन आणि त्यासाठी सोसावा लागणारा गर्भवास हे दुःखकारक आहे. विशेषत्वाने गर्भवासाचं दुःख तर भयंकर मानलं गेलेलं आहे. साहजिकच या गर्भवासातून मुक्ततेसाठी मुनी मोक्ष मिळावा म्हणून धडपडत असतात. संत मात्र मानवी जीवनाकडे वेगळ्या दृष्टीने पाहतात. मानवी जीवनात भक्तीचा आनंद घेता येतो. त्यामुळे ते जीवन प्राप्त करण्यासाठी गर्भवास सहन करण्याची संतांची तयारी असते.
गर्भवासानंतर प्राप्त होणारा संसार गर्भवासापेक्षा दुःखकारक मानला जातो. एकवेळ गर्भवास परवडला पण संसार नको अशी पारंपरिक वैदिक धारणा आहे. त्यामुळे वैदिक मुनी जसे गर्भवासाला घाबरतात त्याचप्रमाणे संसारालाही घाबरतात. काही मुनी गर्भवासाला घाबरत नाहीत, पण संसाराला घाबरतात. याबाबतीत पुराणात शुकमुनींचं उदाहरण आहे. शुक मुनी संसाराच्या भीतीने तब्बल बारा वर्षे गर्भातच राहिले अशी कथा आहे. त्यांचा उपहास करताना नामदेवराय खेळियाच्या अभंगात म्हणतात,
ब्राह्मणाचे पोर एक खेळासि भ्याले।
ते बारा वर्षे लपाले रे।
कांपत कांपत बाहेर आले।
ते नागवेचि पळून गेले रे।।
ऐक खेळिया तुज सांगितले।
ऐसे जाणुनि खेळ खेळे रे।।धृ।।
वैदिक मुनी जरी संसाराला घाबरत असले तरी संत मात्र संसाराला घाबरत नाहीत. त्यांनी संपूर्ण संसार ब्रह्मरूप केलेला आहे. संसाराकडे ते विठ्ठलभक्तीचा अविष्कार म्हणून बघतात. संत संसाराला सोहळा म्हणतात. ‘संसार सोहळे भोगिता सकळ। भक्ता त्याचे बळ विठोबाचे।’ असं तुकोबाराय म्हणतात. संसाराचा हा सोहळा विठ्ठलाच्या भक्तीच्या बळाने वारकरी भोगत असतात. त्यामुळे ‘अवघाची संसार केला ब्रह्मरूप। विठ्ठल स्वरूप म्हणोनिया।’ अशी तुकोबारायांची उक्ती आहे.
वैदिक मुनी गर्भवासाच्या आणि संसाराच्या भीतीने मोक्षाच्या मागे लागतात. त्या मोक्षासाठी- वैकुंठप्राप्तीसाठी अत्यंत कठीण साधना करत बसतात. वैकुंठात जाण्यासाठी ज्या साधना पुराणात सांगितलेल्या आहेत त्या कठीण आहेत. ‘पुराणी उपदेश साधन उद्भट।’ असं तुकोबाराय म्हणतात.उद्भट याचा अर्थ कठीण. ‘वैकुंठा जावया तपाचे सायास। करणे जीवा नास लागे बहु।’ अशी मुनींची स्थिती आहे. याउलट संतांनी मात्र वैकुंठाची वाट सोपी केलेली आहे. वैकुंठाची ती सोपी वाट म्हणजे भूवैकुंठ पंढरपूर. ‘तुका म्हणे सोपी केली पायवाट। पंढरी वकुंठ भूमीवरी।’ असं तुकोबाराय म्हणतात. पंढरपूर हे भूवैकुंठ आहे. संसारात आलेल्या व्यक्तीला या भूवैकुंठात जाता येतं. याउलट संसाराच्या भीतीने मुक्त होण्यासाठी धडपडणार्या मुनींना मात्र तपाचरणाच्या कठीण साधना करत बसाव्या लागतात.
तुकोबाराय अखेरच्या चरणात म्हणतात की मुनी फक्त मोक्षापुरता विचार करतात. आम्ही मात्र मोक्षसुखाला वरचढ ठरणार्या भक्तिप्रेमसुखाचा विचार करतो. विशेष म्हणजे हे भक्तिप्रेमसुख आम्ही समूहाने भोगतो. वारकरी परंपरा ही सामूहिक भक्तीचा पुरस्कार करणारी परंपरा आहे. इथे व्यक्तिगत भक्तीला आणि आत्मोद्धाराला जागा नाही. सामूहिकता हाच वारकरी संप्रदायाचा पाया आहे. वैदिक मुनी आणि वारकरी संत यांच्यातला फरक तुकोबारायांनी या अभंगातून अगदी स्पष्टपणे मांडला आहे. वारकरी संप्रदायात आजरेकर फड विख्यात आहे. या फडावर पूर्वपंक्तीचे संत आणि उत्तरपंक्तीचे संत अशा संकल्पना आहेत. पूर्वपंक्तीचे संत म्हणजे तेराव्या शतकाच्या अगोदर झालेले ऋषीमुनी आणि उत्तरपंक्तीचे संत म्हणजे तेराव्या शतकापासून वारकरी संप्रदायात झालेले संत. पूर्वपंक्तीच्या आणि उत्तरपंक्तीच्या संतांत आजरेकर फडाने कालदृष्ट्या विभागणी करुन त्यांच्यातलं वेगळेपण दर्शवण्याचा प्रयत्न केला आहे. तुकोबारायांनी प्रस्तुत अभंगातून पूर्वपंक्तीचे संत आणि उत्तरपंक्तीचे संत यातील वेगळेपण वैचारिक अंगाने मांडलेलं आहे. पूर्वपंक्तीचे संत असं ढोबळपणे म्हटलं जात असलं तरी त्यांच्यासाठी मुनी हीच संज्ञा योग्य आहे.
तुकोबारायांनी मुनी आणि संत यांच्यात सांगितलेला फरक मुख्यत्वे तत्त्वज्ञानाचा आहे. मुनींच्या लेखी मानवी जीवनाचं अंतिम ध्येय मोक्ष आहे. याउलट संतांच ध्येय मानवी जीवन भक्तीच्या बळावर आनंदाने जगणं आहे. मुनी आत्मोद्धारावर भर देतात तर संत समाजोद्धारावर भर देतात. संत आणि मुनी यांच्यातला आणखी एक महत्त्वाचा फरक म्हणजे बहुतांश मुनींना कामक्रोधााfद विकारांवर मात करता येत नाही. संत मात्र कामक्रोधावर नियंत्रण ठेवतात. ‘कामक्रोध बंदिखानी। तुका म्हणे दिले दोन्ही। इंद्रियांचे धनी। आम्ही जाहलो गोसावी।’ असं तुकोबाराय म्हणतात. याचा अर्थ संतांनी कामक्रोधावर विजय मिळवला होता असं दिसतं. याउलट अनेक ऋषिमुनींना मात्र कामवासनेवर विजय मिळवता आला नाही. त्याचं वर्णन एकनाथ महाराजांनी त्यांच्या भारुडातून केलेलं आहे. विश्वामित्र, पराशर आणि नारद यांना कामवासना नियंत्रित करता आली नाही अशा कथा पुराणात सापडतात. एकदा यमुना नदीतून होडीने पराशर जात होते. त्यावेळी सत्यवती नावाची मत्स्यगंधा पाहून त्यांना वासना अनावर झाली. त्याचं वर्णन अत्यंत उघड्या भाषेत एकनाथ महाराज करतात. पराशरकी नुनि उठी ढिवरन लगी मीठी। जमनाये संग भयो जब व्यास कर उठी।
पराशराने जेव्हा एक ‘ढिवरीन’ पाहिली तेव्हा त्याला वासना अनावर झाली. ढिवर म्हणजे मासेमारी करणारी जमात आणि त्यामुळे ढिवरीन म्हणजे ढिवर जातीतील स्त्री. या स्त्रीसोबत यमुना नदीतच पराशराने संग केला आणि त्यातूनच व्यासांचा जन्म झाला अशी कथा आहे. या कथेचा संदर्भ पकडून मुनीही कामवासना ताब्यात ठेऊ शकत नाहीत हे नाथराय दाखवून देतात. यासंदर्भात नाथराय नारदाचंही उदाहरण देतात.
नारद बडा जगदभारी औरत मागे दान। साठ संवत्सर के लडके किये हो गये दानादान।
नारदालाही काम जिंकता आला नाही. त्यामुळेच नारदांनी एका लग्नात सुंदर स्त्री पाहिल्यानंतर स्वतःसाठी एक स्त्री मागितल्याची कथा आहे. तोच धागा पकडून नाथरायांनी लिहिलं आहे. त्याचबरोबर त्यांनी आणखी एका अभंगात येडका हे रूपक वापरून याविषयीची उदाहरणं दिलेली आहेत. त्यात विश्वामित्र आणि नारद हे दोन मुनी आहेत. एकनाथ महाराजांच्या या भारुडातला येडका हा कामरूप येडका आहे. हा भल्याभल्यांना धडका मारतो असं नाथराय म्हणतात. त्यात नारद आणि विश्वामित्र आहेत.
येडका मदन। तो केवळ पंचानन।धृ।
या अभंगातील तिसर्या चरणात नाथराय विश्वामित्राचा उल्लेख करतात.
भस्मासुर मुकला प्राणासी। तीच गति झाली वालिसी। तिसरा विश्वमित्र ऋषि। नाडिला जेणे।।
विश्वामित्राच्या तपभंगाची अशीच कथा पुराणात आलेली आहे. विश्वामित्र तप करत असताना तिथे मेनका आली. त्या मेनकेच्या सौंदर्याचा आणि नाचगाण्याचा विश्वामित्रावर परिणाम झाला. त्याचा तपोभंग झाला. विश्वामित्र आणि मेनका यांचं परस्परांवर प्रेम जडून ते एकमेकांसोबत राहिले. त्यानंतर त्यांना शकुंतला नावाची मुलगी झाली.
विश्वामित्र, नारद आणि पराशर अशा मुनींना कामावर नियंत्रण मिळवता आलं नाही. एका मुनीने मात्र कामावर नियंत्रण मिळवलं होतं. त्यांचं नाव शुकमुनी आहे. ‘शुक देवाने तप करुनी। येडका आणिला आकळोनी। एका जनार्दनाचे चरणी। बांधिला जेणे।’ असं एकनाथ महाराज म्हणतात. कामावर नियंत्रण मिळविण्याच्या बाबतीत शुकमुनी हे अपवादात्मक आहेत. त्या अपवादानेच नियम सिद्ध होतो.
ज्याप्रमाणे मुनी त्यांची कामवासना नियंत्रित करु शकले नाहीत त्याचप्रमाणे त्यांना क्रोधही नियंत्रित करता आला नाही. दुर्वास आणि विश्वामित्र अशा मुनींची याबाबतीत उदाहरणं देता येतील. दुर्वास हे तर कोपिष्ट मुनी म्हणूनच ओळखले जातात. बहुतांश मुनी क्रोधावर नियंत्रण मिळवू शकत नसत. त्यामुळेच ते चिडून शाप देत. वारकरी संत मात्र क्रोधावर नियंत्रण असणारे होते. साहजिकच संतांचा सनातन्यांकडून अनन्वित छळ होऊनही त्यांनी कोणालाही कधी शाप दिल्याचा उल्लेख नाही. उलट त्यांनी छळ करणार्या व्यक्तीचं मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला.
मुनी कामक्रोधावर नियंत्रण मिळवू शकत नाहीत याचं कारण त्यांच्या साधनेत दडलेलं आहे. तुकोबाराय प्रस्तुत अभंगाच्या तिसर्या चरणात तेच सांगतात. मुनी पुराणातल्या उपदेशानुसार कठीण साधना करतात. या कठीण साधनाच मुनींच्या अधःपतनाला कारणीभूत ठरतात. या कठीण साधना म्हणजे तपाचरण. या तपामुळे वासनेचं शमन होण्याऐवजी दमन होतं आणि कामक्रोध उफाळून वर येतात. याउलट संत मात्र
करोत तपादी साधने।
कोणी साधोत गोरांजन।
आम्ही न वजो तया वाटा।
नाचू पंढरी चोहटा।
असं म्हणतात. तपाच्या साधना कामक्रोध वाढवतात. ‘करिता तपे कामक्रोध खवळती।’ असा सिद्धांतच निळोबारायांनी मांडला आहे. तपाचरणाच्या कठोर साधनांनी वासनाविकार बळावतात. याउलट संतांचा मार्ग संसाराला ब्रह्मरूप करण्याचा आहे. संसारात वासनाविकार शमतात त्यामुळे कामक्रोध बळावत नाहीत तर नियंत्रणात राहतात. त्यामुळेच संतांचा मार्ग हा मुनींच्या मार्गापेक्षा अधिक जीवनाभिमुख आहे.
