• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

मोबाइलची स्क्रीन शेअर करताय?

सुधीर साबळे (सायबर जाल)

Marmik Team by Marmik Team
July 24, 2026
in सायबर जाल
0
मोबाइलची स्क्रीन शेअर करताय?

चित्र-नचिकेत

सर, तुमच्या बँक खात्यात एक तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे. ती लगेच सोडवायची असेल तर फक्त एक छोटंसं काम करा…’ फोनच्या दुसर्‍या टोकाला असणारा आवाज इतका विश्वासार्ह होता की समोरची व्यक्ती क्षणात जाळ्यात अडकली आणि अवघ्या काही मिनिटांत तिच्या खात्यातून तब्बल दोन लाख रुपये गायब झाले… सायबर चोरटे लोकांची फसवणूक करण्यासाठी रोज नवनवीन शक्कल लढवत असतात. सोशल मीडियावर किंवा मोबाइल अ‍ॅपमध्ये येणारे नवीन फिचर्स लोकांची कामे सोपी व्हावीत, वेळ वाचावा, संवाद अधिक जलद व्हावा यासाठी तयार केली जातात. पण जिथे तंत्रज्ञान असते, तिथे सायबर गुन्हेगारांची नजर आधीपासूनच असते. चलाख बुद्धी वापरून ते याच सुविधांचा गैरवापर करत असतात. अनेकदा लोकांना नवीन फीचर्सची संपूर्ण माहिती नसते. त्यामुळे समोरची व्यक्ती सांगते ते खरं असेल, असा विश्वास अनेकजण सहजपणे ठेवतात, तोच त्यांच्यासाठी मोठा धोका ठरतो.

आजच्या काळात व्हॉट्सअ‍ॅप वापरत नाही, अशी व्यक्ती शोधावी लागेल. घरातील गप्पा, ऑफिसची कामे, फोटो, व्हिडिओ, महत्त्वाची कागदपत्रे… सगळं काही व्हॉट्सअ‍ॅपवर चालतं. लोकांच्या सोयीसाठी काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअ‍ॅपने ‘स्क्रीन शेअर’ हे नवीन फीचर सुरू केले. ऑनलाइन मीटिंगमध्ये किंवा एखादी गोष्ट समजावून सांगताना हे फीचर खूप उपयुक्त ठरतं. पण सायबर ठगांनी यातही फसवणुकीचा मार्ग शोधून काढला.

स्नेहा देशमुख यांचीच कथा पाहा. त्या एका नामांकित बँकेत लेखनिक म्हणून काम करत होत्या. रोज लाखो रुपयांचे व्यवहार, ग्राहकांची खाती, ऑनलाइन ट्रान्सफर, ओटीपी, कार्ड पेमेंट, या सगळ्या गोष्टी त्यांच्या दैनंदिन आयुष्याचा भाग बनलेल्या होत्या. बँकेत काम करत असल्यामुळे सायबर फसवणुकीचे अनेक प्रकार त्यांनी ऐकले होते. ग्राहकांना सावध राहण्याचा सल्लाही त्या कायम देत असत. कधी कधी नियती अशी खेळी करते की दुसर्‍यांना सावध करणारी व्यक्तीच स्वतः जाळ्यात अडकते, तेही काही सेकंदांत.

शनिवारचा दिवस. बँकेला सुट्टी असल्यामुळे स्नेहा घरातील कामांमध्ये व्यग्र होत्या. स्वयंपाकघरात गॅसवर चहा उकळत होता. टीव्हीवर हळुवार आवाजात एक मालिका सुरू होती. त्यांचा मुलगा तुषार आपल्या खोलीत लॅपटॉपवर काहीतरी काम करत बसला होता. इतक्यात स्नेहा यांचा मोबाइल वाजला. स्क्रीनवर व्हॉट्सअ‍ॅप कॉल आल्याचे दिसले. त्यावरचा नंबर अनोळखी होता. ते पाहून स्नेहा विचारात पडल्या. कोण असेल बरं, असे म्हणत त्यांनी फोन उचलला.

हॅलो, समोरून आवाज आला, नमस्ते मॅडम, मैं करण कुमार बोल रहा हूँ, आप जिस ़कंपनी का पाइपलाइन गैस इस्तेमाल करती हो, उसी ़कंपनी से बोल रहा हूँ. त्यावर स्नेहा सावध झाल्या. हाँ.. बोलिए.., ‘मॅडम, आपका गैस बिल पेंडिंग है. अगर अभी पेमेंट नहीं किया तो आपका गैस कनेक्शन कट हो जाएगा. ते ऐकताच स्नेहा यांच्या कपाळावर आठ्या पडल्या. अरे? पण मी तर बिल भरत असते नेहमी ते देखील वेळेवर,’ मॅडम, शायद इस बार मिस हो गया होगा. सिस्टम बारासौ रुपये पेंडिंग दिखा रहा है. स्नेहा यांना थोडी शंका आली. त्यांनी लगेच मोबाइलवर त्या गॅस कंपनीची वेबसाइट उघडली. बिल तपासलं. त्यात खरंच त्यांचे पैसे थकीत असल्याचे दिसत होते. त्यांना वाटलं, खरंच आपले बिल भरायचे राहिलेले आहे. करण कुमार पुन्हा बोलू लागला. ‘मॅडम, आप अभी पेमेंट कर दो. पूरा नहीं तो कमसे कम दो सौ रुपये भर दो, ताकी आपका कनेक्शन बंद ना हो. त्याचा आवाज खूपच दिलासादायक आणि विश्वासार्ह होता, त्यामुळे स्नेहा यांना त्याच्यावर बारीकसा देखील संशय आला नाही. शिवाय प्रश्न फारच कमी रकमेचा होता.

ठीक आहे. मी आत्ताच पैसे भरते, असे स्नेहा म्हणाल्या. ‘मॅडम, मैं हेल्प कर देता हूँ. आप स्क्रीन शेयर कर दीजिए. आपको आसान रहेगा. स्क्रीन शेअर?, हाँ मॅडम, ताकि मैं आपको स्टेप बाय स्टेप बता सकूँगा.

स्नेहा यांना ते फारसं विचित्र वाटलं नाही. व्हॉट्सअ‍ॅपवर आलेल्या स्क्रीन शेअरच्या पर्यायावर त्यांनी क्लिक केलं. इथेच सर्वात मोठी चूक झाली. त्यांचा संपूर्ण मोबाइल स्क्रीन समोरच्या व्यक्तीला दिसू लागला. स्नेहा गॅस कंपनीच्या वेबसाइटवर गेल्या. त्यांनी डेबिट कार्ड काढलं. कार्ड नंबर, एक्सपायरी डेट, सीव्हीव्ही नंबर, अशा सगळ्या गोष्टी त्या भरत होत्या. त्यांच्या समोर बसलेला करण कुमार शांतपणे प्रत्येक माहिती टिपत होता. ‘हाँ मॅडम… अब ओटीपी आएगा…’

इतक्यात स्नेहा यांच्या मोबाइलवर ओटीपी आला. स्क्रीन शेअर सुरू असल्यामुळे तो ओटीपीही त्या व्यक्तीला दिसला. पुढच्या काही सेकंदांत, टण्ण.. टण्ण… टण्ण असा आवाज सुरू झाला आणि मोबाइलवर मेसेज यायला सुरुवात झाली होती. ५० हजार रुपये डेबिट, ५० हजार रुपये, ५० हजार रुपये डेबिट… ते पाहून स्नेहा हादरल्या. अरे, हे काय होतंय? त्यांच्या हातापायाला अक्षरशः घाम फुटला. हॅलो, काय चाललंय हे? त्या घाबरून ओरडल्या. पण समोरचा आवाज शांत होता. ‘मॅडम, घबराइए मत सिस्टम अपडेट हो रहा है.
इतक्यात तुषार बाहेर आला. ‘आई, काय झालं?’

स्नेहा यांचा चेहरा पूर्ण पांढरा पडला होता. तुषार, माझ्या खात्यातून पैसे जातायत, तुषारने पटकन मोबाइल हातात घेतला. त्याने स्क्रीनकडे पाहिलं आणि क्षणात त्याला सुरू असणारा प्रकार लक्षात आला. तो म्हणाला, आई, तू स्क्रीन शेअर केलायस का? हो. तो मदत करत होता. अगं आई, हा फ्रॉड आहे.

तुषारने एका सेकंदात कॉल कट केला. स्क्रीन शेअर बंद केला. आई, लगेच नेट बंद कर, असे म्हणत त्याने लगेचच ते बंद केले. या सगळ्या प्रकाराने स्नेहा पूर्णपणे गोंधळल्या होत्या. तुषारने लगेच बँकेच्या हेल्पलाईनवर फोन लावला. कार्ड ब्लॉक केलं. दरम्यान पुन्हा एक मेसेज व्हॉट्सअ‍ॅपवर आला. त्यात करण कुमारने एक लिंक पाठवली होती. मॅडम, यह लिंक ओपन करो, आपका पैसा वापस आ जाएगा, स्नेहा ती लिंक उघडणार इतक्यात तुषारने मध्ये हात घालत तिला थांबवले. आई तू अजिबात उघडू नकोस, हा आणखी मोठा सापळा आहे तुषारने तो मेसेज लगेच डिलीट केला. घरात काही क्षण शांतता पसरली.

स्नेहां यांच्या डोळ्यात पाणी आलं होते. ‘मी… मी इतकी मोठी चूक कशी केली? त्यावर तुषार शांतपणे म्हणाला, ‘आई, हे लोक खूप हुशार असतात. ते माणसाला घाबरवतात आणि मग घाईत निर्णय घ्यायला भाग पाडतात. बँकेत काम करणार्‍या लोकांना फसवणुकीपासून सावध करणार्‍या त्या स्वतःच सायबर चोरांच्या जाळ्यात अडकल्या होत्या. थोड्या वेळाने स्नेहा आणि तुषार थेट सायबर पोलिस स्टेशनमध्ये गेले. पोलिस अधिकारी म्हणाले, मॅडम, तुम्ही स्क्रीन शेअर केला की समोरच्या व्यक्तीला तुमच्या मोबाइलवरचं सगळं दिसतं. म्हणजे ओटीपीसुद्धा? तुम्ही जे कार्ड डिटेल्स भरत होतात, तेही त्याने पाहिलं होते. ते ऐकून स्नेहा यांच्या अंगावर काटा आला. अवघ्या दोन सेकंदांत त्यांनी चार व्यवहार केले होते. हे लोक आधीच तयार असतात. ओटीपी मिळताच पैसे दुसर्‍या खात्यात ट्रान्सफर होतात.
पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. काही वेळातच पैसे कोणत्या खात्यात गेले, याचा माग काढण्यात आला. ते खाते हैदराबादजवळच्या एका गावातील बँकेत होतं. स्नेहांच्या खात्यातून दोन लाख रुपये गेले होते. त्यापैकी एक लाख रुपये आधीच काढले गेले होते. पण उरलेले एक लाख अजून खात्यात होते. पोलिसांनी लगेच संबंधित बँकेशी संपर्क साधला आणि ती रक्कम गोठवली. त्यामुळे स्नेहांचे अर्धे पैसे वाचले. स्नेहा म्हणाल्या, आपल्याला सगळं माहिती आहे, असं वाटणं किती धोकादायक असतं ना? त्यावर पोलीस म्हणाले, सायबर चोरटे हे लोकांच्या भीतीवर आणि घाईवर जगत असतात. सायबर फ्रॉडमध्ये कोणताही माणूस अडकू शकतो. त्यामुळे कायम सजग राहणे गरजेचे आहे.

अशी घ्या काळजी

  • कोणाशीही मोबाइलची स्क्रीन शेअर करू नका.
  • बँक कधीही फोनवर ओटीपी किंवा स्क्रीन शेअर मागत नाही.
  • अनोळखी व्यक्तीच्या सांगण्यावरून कोणतेही अ‍ॅप डाउनलोड करू नका.
  • घाबरून निर्णय घेऊ नका.
  • संशय आला तर लगेच अधिकृत बँक शाखेशी संपर्क साधा.
  • आपल्या व्हॉट्सअपवर आलेले अनोळखी फोन उचलू नका. बोलण्याआधी आपला स्क्रीन शेअर झालेला नाही ना याची खात्री करा, चुकून झाला असेल तर तो बंद करून नंतरच पुढचा संवाद करा.
  • अनोळखी फोनवर बोलणार्‍या व्यक्तीला कोणतीही माहिती देऊ नका.
  • सोशल मीडियावरील माध्यमे वापरताना नवीन फिचर, नवे बदल हे पूर्णपणे समजून घ्या आणि त्यानंतरच त्याचा वापर करा.
  • अर्धवट ज्ञानाच्या आधारे त्याचा वापर करण्याचा प्रयत्न धोकादायक ठरू शकतो.
  • अनोळखी व्यक्तीसमोर तुमची कोणतीही माहिती उघड करू नका.
Previous Post

राशीभविष्य २५ ते ३१ जुलै

Next Post

‘अजब’ लग्नाची ‘गजब’ गोष्ट!

Next Post
‘अजब’ लग्नाची ‘गजब’ गोष्ट!

‘अजब’ लग्नाची ‘गजब’ गोष्ट!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.