पावसाने महाराष्ट्राला निर्दयपणे झोडपून काढले याची कारणे काय असावीत याचा शोध घेण्यासाठी माझा मानलेला परमप्रिय मित्र पोक्या छत्री न घेता घराबाहेर पडला तेव्हा मी त्याला अडविण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्याने माझं ऐकलं नाही. दुसर्या दिवशी तो मुलाखत घेऊन भिजत भिजत घरी आला आणि त्याने मुलाखतींचे कागद माझ्यापढे फेकले, तेव्हा कुठे माझी काळजी मिटली. त्याच या मुलाखती-
-फडणवीस साहेब, निसर्गाचा इतका कोप यापूर्वी कधी झाला नव्हता. आता तो का झाला असावा?
फडणवीस : याला निसर्गाचा कोप म्हणता येणार नाही. उलट उन्हामुळे तापलेल्या आणि दुष्काळाकडे चाललेल्या महाराष्ट्राला मिळालेला पावसाचा हा वरदहस्त आहे.
-अहो, माणसे मेली, घरे कोसळली, दरडी पडल्या, शेकडो झाडे पडली; त्याखाली चिरडून माणसांनी प्राण गमावले, महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे उघड्या गटारावरील मॅनहोलमध्ये माणसे पडून मृत्यूमुखी पडली. मुंबईच्या महापौरांसमोर त्यांच्याच पालिकेचा कर्मचारी उघड्या टाकीत पडला. याला काय म्हणावं?
-त्याला निसर्गाचा आणि पावसाचा निष्काळजीपणा जबाबदार आहे. पावसाने विचार करून पडायला हवे होते. निसर्गाने उन्हाने होरपळून काढलं तरी आम्हीच जबाबदार आणि तो अमानुषपणे कोसळला तरी आम्हीच जबाबदार, हे योग्य नाही.
-लोक म्हणतात की दहा-बारा वर्षांत दिल्लीपासून गल्लीपर्यंतचे सरकार लोकांना महागाईने पिळून काढत आपला गल्ला भरतेय, लोकशाहीला धाब्यावर बसवून हवी तशी मनमानी करतेय, जनतेला गुलाम समजून त्यांची न्याय्य आंदोलने चिरडून टाकतेय! राममंदिरात लूट करणार्या मंदिरातीलच सेवेकर्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतेय, देशात विरोधकांचा आवाज दाबला जातोय, आमदार-खासदार खरेदीला जोर आलाय, न्यायालयापासून मंत्रालयापर्यंत सर्व क्षेत्रे भ्रष्टाचाराने लडबडलीत. हे सर्व पाहिल्यावर सूर्यदेवाच्या अंगाची लाही लाही झाली आणि वरुणदेवाला नको इतका घाम फुटला. म्हणूनच महाराष्ट्राला सूर्यदेवाने भाजून काढले आणि वरुणराजाने पुरात डुबवले, तर त्यांना दोष कसा देणार? वृक्षतोड, जंगलतोड, समुद्राला मागे हटवण्याचे प्रयत्न यामुळे निसर्ग कोपणारच.
-मला हे मान्य नाही. अमेरिका-इराण युद्धाचेही हे परिणाम असू शकतील. जगबुडी असू शकेल.
-पळवाटा काढू नका. युद्धाला एक वर्षही झाले नाही, पण जनतेला पिडण्याचा सरकारी तमाशा दहा-बारा वर्षे सुरू आहे. त्याचं काय? मग निसर्ग कोपणारच.
-तुम्ही फुटा, मला दुर्घटनाग्रस्तांची पाहणी करायला जायचंय.
-नमस्कार शिंदेसाहेब.
एकनाथ शिंदे : मी आजारी आहे. मला काही विचारू नका. पाऊस पडला, पूर आले त्याला मी जबाबदार नाही. मला दुसरी कामे आहेत. अजून बरेच आमदार, खासदार, नेते फोडायचेत. त्यांच्यासाठी तरतूद करायचीय. तब्येत आणखी सुधारली की जुंपून घेतो त्या कामाला.
-पण पावसाचं काय?
-ते फडणवीस साहेब सांगतील. ते मुख्यमंत्री आहेत ना! सगळे अधिकार त्यांच्याकडे एकवटले आहेत, त्यामुळे राज्यातील कोणत्याही विषयावर तेच अधिकृत प्रतिक्रिया देतात. तिथे आम्हाला किंमत झिरो. तेच खरे हिरो. तेव्हा तुम्ही त्यांनाच विचारा पाऊसपाण्याबद्दल.
-अहो, तिकडे माणसे मरताहेत, झाडे पडताहेत. गावेच्या गावे पाण्याखाली गेलीत, आणि तुम्ही फोडाफोडीच्या गोष्टी करता! हे बरं नाही.
-काय बरं आणि काय वाईट हे मला कळतं. म्हणूनच आज इथपर्यंत पोचलोय. जनतेला काय वाटतं हे महत्त्वाचं नाही, आमच्या मोदीसाहेब, शहासाहेबांना काय वाटतं, हे महत्त्वाचं आहे. त्यांनी पाऊसपाण्याबद्दल काही प्रतिक्रिया दिली असेल तर तिला माझा शंभर टक्के पाठिंबा आहे.
-राज्यातील कायदा–सुव्यवस्थेबद्दल तुम्हाला काय वाटतं? पार खड्ड्यात गेलीय ती.
-मी गृहमंत्री नाही. त्यामुळे माझ्या कक्षेत तो विषय येत नाही.
-मग पावसावर बोला.
-माझी औषध घेण्याची वेळ झाली. निघा.
-नमस्कार राहुल नार्वेकर साहेब.पावसाच्या नैसर्गिक आपत्तीबद्दल तुमचं मत काय?
-माझ्यावरच आपत्ती कोसळलीय. इज्जतचा फालुदा झालाय. पावसाचं काय घेऊन बसलात! उद्या नवीन कॉम्पुटर ऑपरेटर आल्यावर वाचायची प्रॅक्टिस करून परवा तुला प्रतिक्रिया देतो. पुन्हा कागद पावसात भिजणार नाही याचीही काळजी घ्यायला पाहिजे. नाहीतर अक्षरं पुसट होतील आणि भलतंच काहीतरी तोंडातून बाहेर पडेल.चला, पळा आता.
-नमस्कार नीलमताई. बदाबद कोसळणार्या पावसाबद्दल तुम्हाला काय वाटतं?
– मला किनई बालवर्गात असल्यापासून पाऊस खूप आवडतो. पावसाची सगळी गाणी पाठ आहेत मला. पाऊस पडत असल्यावर खिडकीत एकटीच बसल्यावर मनसोक्त गाते मी ती गाणी.
-पण सध्याच्या पावसाबद्दल…!
-मला हवाई पाहणी करायला जायचं होतं हेलिकॉप्टरमधून, पण नाही जाता आलं. पावसाने थोडं अतिच केलं असं मला वाटतं. यासाठी मी महिला आयोगाकडे रीतसर तक्रार करणाराय. उपसभापती सचिन अहिर यांनाही विधानपरिषदेत या प्रश्नावर राजकारण करू पाहणार्या विरोधकांना बोलू देऊ नका असं नम्र आवाहन करणाराय. तुम्हीही त्यांच्याशी बोला.
-नमस्कार सचिनभाऊ.
-नमस्कार. मी राष्ट्रीय मिल मजदूर संघाचा मुख्य पक्षाधिकारी असल्यापासून ठाकरे-सेनेचा आमदार असेपर्यंत इतका पाऊस आणि इतकी हानी कधीच पाहिली नाही. जशी मला शिंदेसेनेत जायची ओढ लागली हाेती तशी पावसालाही कुणावर तरी सूड घ्यायची ओढ लागली असावी, असा माझा अंदाज आहे. शेवटी, तो पावसाचा निर्णय आहे. योग्य काय अयोग्य काय हे त्याला कळतं. त्याने योग्य तो न्याय करावा असं मला वाटतं.

