• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

क्रोएशियाच्या दुसर्‍या सुवर्णपिढीचा शेवट!

प्रशांत केणी खेळियाड

marmik by marmik
July 11, 2026
in खेळियाड
0
क्रोएशियाच्या दुसर्‍या सुवर्णपिढीचा शेवट!

डाव्हर शुकर, लुका मॉड्रिच यांच्यासारखे तारांकित फुटबॉलपटू क्रोएशियाची फुटबॉल परंपरा किती समृद्ध आहे, हे दर्शवतात. साडेतीन दशकांच्या प्रवासात फुटबॉलच्या नकाशावर एक सामर्थ्यशाली संघ म्हणून नावारूपास आलेल्या क्रोएशियाचं विश्वचषकातील आव्हान नुकतंच संपुष्टात आलं. मॉड्रिच निवृत्तीच्या उंबरठ्यावर असल्यानं हा क्रोएशियाच्या दुसर्‍या सुवर्णपिढीचा शेवट मानला जातोय.

क्रोएशियाची लोकसंख्या जवळपास ३९ लाख म्हणजे आपल्या पुण्याइतकी आणि भौगोलिक आकारमान ५६,५९४ चौरस किलोमीटर म्हणजे भारतामधील हिमाचल प्रदेशाइतकं. २५ जून १९९१ या दिवशी क्रोएशियाला युगोस्लाव्हियापासून स्वातंत्र्य मिळालं. पण ३५ वर्षांच्या कालखंडातील क्रोएशियाची भरारी ही अचंबित करणारी. १९९४मध्ये ‘फिफा’ क्रमवारीत पदार्पण केलं, तेव्हा हा देश १२५व्या क्रमांकावर होता. पण १९९८च्या फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील ऐतिहासिक कामगिरीमुळे त्यांनी तिसर्‍या क्रमांकापर्यंत आश्चर्यकारक मजल मारली. २०१८च्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात फ्रान्सकडून पराभवामुळे त्यांचं जगज्जेतेपद हुकलं. मग २०२२मध्ये उपांत्य फेरीत लिओनेल मेसीच्या अर्जेंटिनानं त्यांची वाटचाल रोखली. पण मोरोक्कोला नामोहरम करीत त्यांनी तिसरा क्रमांक पटकावला. यंदा पोर्तुगालच्या संघानं बाद फेरीत (अव्वल ३२ संघ) त्यांना हरवलं. खरं तर भरपाई वेळेत बरोबरीचा गोल क्रोएशियाकडून मारियो पासालीचनं नोंदवला; पण सामनाधिकार्‍यानं ‘व्हार’द्वारे (व्हिडिओ असिस्टंट रेफ्री) पडताळणी करून तो प्रयत्न ऑफ साइड ठरवत गोल रद्द केला. हातातोंडाशी आलेला घास निसटल्याचं शल्य हे निराशाजनक असतं. हे त्यांनी सलग तिसर्‍या विश्वचषकात अनुभवलं. ह्या तिन्ही विश्वचषकांत त्यांच्या कामगिरीचा आलेख खालावत जाणारा. आता ‘फिफा’ क्रमवारीतही त्यांचं स्थान १३वं आहे. पाचव्या विश्वचषकात खेळलेल्या चाळीशीच्या लुका मॉड्रिचची कारकीर्द अस्ताकडे वाटचाल करतेय. क्रोएशियाला हे वर्तमानातलं अपयश पचवणं कठीण असलं तरी भविष्यकाळ आव्हानात्मक असल्याची ग्वाही देतं.

१९८०मध्ये जोसिप टिटो यांचं निधन झाल्यानंतर आर्थिक संकट, राजकीय मतभेद आणि विविध जाती-धर्मांतील तणावामुळे युगोस्लाव्हिया विघटित होऊ लागला. नव्वदीच्या दशकाच्या प्रारंभी स्वातंत्र्ययुद्धानंतर क्रोएशियात स्वातंत्र्याची पहाट झाली. त्यानंतर पुनर्बांधणी, निर्वासितांचं स्थैर्य, लोकशाहीचा राज्यकारभार, मानवी हक्कांचं रक्षण तसंच सामाजिक आणि आर्थिक विकास ही प्रमुख आव्हानं त्यांच्यापुढे होती. यात क्रीडा हा प्राथमिक विषय नव्हता. पण तरीही काही क्रीडाप्रकारांमध्ये क्रोएशियानं आपली वैशिष्ट्यपूर्ण छाप पाडली, हे कौतुकास्पद. यात फुटबॉल आणि टेनिसचा प्रामुख्यानं समावेश होता. मोठ्या आणि सामर्थ्यशाली राष्ट्रांनाही जे जमलं नाही, ते या एवढ्याशा राष्ट्रानं करून दाखवलं. गोरान इव्हानसेव्हिच, मरिन चिलिच, इव्हा मायोली, इव्हान डॉडिग, मेट पॅव्हिच आणि निकोला मेकटिच यांनी

ग्रँडस्लॅम आणि ऑलिम्पिक टेनिसमध्ये क्रोएशियाची यशोपताका फडकवत ठेवली, तर फुटबॉलमध्येही क्रोएशियानं बलाढ्य संघ म्हणून नाव कमावलं. अल्पाइन स्कीइंग, बास्केटबॉल आणि अ‍ॅथलेटिक्स हे क्रीडा प्रकारही त्यांनी गाजवले. इटली, सर्बिया, प्रâान्स आणि इंग्लंडविरुद्ध क्रोएशियाचं वैर हे फुटबॉल मैदानावर गाजलं. यापैकी इटली आणि सर्बियाविरुद्ध सामने स्थगित करण्याची परिस्थितीसुद्धा उद्भवली होती.

पहिली सुवर्णपिढी
मिरोस्लाव्ह ब्लेझेव्हिच यांच्या मार्गदर्शनाखाली क्रोएशियाच्या गौरवशाली अध्यायाला प्रारंभ झाला. १९९६च्या युरोपियन अजिंक्यपद स्पर्धेत उपांत्यपूर्व ़फेरी गाठणार्‍या क्रोएशियानं १९९८च्या विश्वचषक स्पर्धेत गटसाखळीत जमैका आणि जपानला हरवलं, पण अर्जेंटिनाकडून त्यांनी हार पत्करली. मग बाद फेरीत रोमानियाला नमवून उपांत्यपूर्व फेरी गाठल्यानंतर जर्मनीचं आव्हान मोडीत काढलं. पण यजमान फ्रान्सनं उपांत्य फेरीत क्रोएशियाला पराभूत केलं. त्यानंतर क्रोएशियानं नेदरलँड्सला पराभूत करून पहिलं विश्वचषक कांस्यपदक प्राप्त केलं. या विश्वचषकात सर्वाधिक सहा गोल करणार्‍या डाव्हर शुकरनं ‘गोल्डन बूट’ पुरस्कार पटकावला, तर रॉबर्ट प्रोसिनेकी, रॉबर्ट जार्नी, मारिओ स्टॅनिच आणि गोरान व्हलाओव्हिच यांनीही ही स्पर्धा गाजवली. पहिल्याच हंगामातील संस्मरणीय कामगिरीमुळे आंतरराष्ट्रीय स्पर्धात्मक फुटबॉलमध्ये महत्त्वाचं स्थान निर्माण करणार्‍या या खेळाडूंच्या फळीला ‘सुवर्णपिढी’ संबोधलं गेलं. यशाची ही परंपरा २००२ आणि २००६च्या विश्वचषक स्पर्धांमध्ये क्रोएशियाला राखता आली नाही. गटसाखळीतच त्यांचं आव्हान संपुष्टात आलं. मग २०१०च्या विश्वचषकात क्रोएशियाचा संघ पात्रसुद्धा होऊ शकला नाही, तर २०१४मध्ये पुन्हा गटसाखळीपर्यंतच वाटचाल मर्यादित राहिली. या कालखंडात शुकर, मारिओ मान्झुकीच, डॅरिजो सर्ना, लुका मॉड्रिच, इव्हान पेरिसिच, इव्हान रॅकिटिच, इव्हाका ऑलिच, एड्युर्डो डासिल्व्हा, आंद्रेज क्रॅमारच असे अनेक दर्जेदार फुटबॉलपटू मात्र क्रोएशियातून घडत होते.

ऐतिहासिक उपविजेतेपद
युरो २०१६च्या समाप्तीनंतर विक्रमी १३४ सामन्यांत प्रतिनिधित्व करणार्‍या डॅरिजो सर्नानं निवृत्ती पत्करली. त्यामुळे मॉड्रिच्ाकडे कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली. त्यानंतर अँटी कॅसिच यांची प्रशिक्षकपदावरून हकालपट्टी करीत झ्लॅटको डॅलिच यांच्याकडे प्रशिक्षकपद देण्यात आलं. विश्वचषकाच्या तयारी अभियानातच लक्ष वेधणार्‍या क्रोएशिया संघाला ‘दुसरी सुवर्णपिढी’ असं संबोधण्यात आलं. अपेक्षेप्रमाणेच २०१८च्या विश्वचषक साखळीत क्रोएशियानं नायजेरिया, अर्जेंटिना आणि आइसलँड यांना धूळ चारत गटविजेत्याच्या अविर्भावात बाद फेरी गाठली. मग क्रोएशियानं पेनल्टी शूटआऊटमध्ये डेन्मार्कचा अडसर दूर केला. गोलरक्षक डॅनिजेल सुबासिचनं या यशात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत यजमान रशियानं बरोबरीत रोखल्यानंतर सलग दुसरा सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये जिंकण्याची किमया त्यांनी साधली. उपांत्य फेरीत पुन्हा बरोबरीत सामना सुटला. पण यावेळी अतिरिक्त वेळेत मारिओ मान्झुकिचचा गोल निर्णायक ठरला. आता जगज्जेतेपदापासून क्रोएशियाचा संघ एका पावलाच्या अंतरावर होता. पण फ्रान्सनं ४-२ असा विजय मिळवल्यानं त्यांचं जेतेपदाचं स्वप्न धुळीस मिळालं. या सामन्याला वादग्रस्त पंचगिरीचा फटका बसला. परंतु स्पर्धेतील ‘गोल्डन बॉल’चा पुरस्कार मिळवणारा मॉड्रिच हा क्रोएशियाचा पहिला फुटबॉलपटू ठरला. संघाच्या या ऐतिहासिक कामगिरीचं देशात जल्लोषात स्वागत करण्यात आलं. राजधानी झाब्रेकमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांनी रस्त्यावर उतरून दिवाळी साजरी केली. पुढे २०२२च्या विश्वचषकात क्रोएशियाच्या आशा उंचावल्या होत्या. फ-गटात समावेश असलेल्या क्रोएशियानं मोरोक्कोशी गोलशून्य बरोबरी साधली, तर कॅनडावर ४-१ असा दणदणीत विजय साकारला. अखेरच्या लढतीत बेल्जियमलाही त्यांनी गोलशून्य बरोबरीत रोखलं. मग उपउपांत्यपूर्व फेरीत क्रोएशियानं जपानचा पेनल्टी शूटआऊटमध्ये फडशा पाडला. गोलरक्षक डॉमिनिक लिव्हाकोव्हिच विजयाचा शिल्पकार ठरला. मग क्रोएशियानं आणखी एका धक्कादायक निकालाची नोंद करताना नेमारच्या ब्राझीलला पेनल्टी शूटआऊटमध्ये हरवलं. सलग दुसर्‍या विश्वचषकाच्या बाद फेरीत दोन पेनल्टी शूटआऊट सामन्यांचे अडथळे त्यांना पार करावे लागले. पण उपांत्य फेरीत अर्जेंटिनापुढे त्यांचा निभाव लागला नाही. किमयागार मेसीचा दिमाखदार खेळ आणि ज्युलियन अल्वारेझचा गोलधडाका क्रोएशियासाठी धोकादायक ठरला. पुढच्याच वर्षी नेशन्स लीगच्या अंतिम सामन्यात पेनल्टी शूटआऊटमध्ये स्पेनकडून ४-५ असा पराभव पत्करल्यानं त्यांना आणखी एका विजेतेपदानं हुलकावणी दिली. यंदाच्या विश्वचषकातील पहिल्याच सामन्यात क्रोएशियानं कट्टर प्रतिस्पर्धी इंग्लंडकडून २-४ असा सपाटून मार खाल्ला. पण पनामा आणि घानाला हरवून त्यांनी बाद फेरी गाठली. इथे मात्र क्रिस्टियानो रोनाल्डोच्या पोर्तुगालनं त्यांना रोखलं. गेल्या एक तपातली ही त्यांची सर्वांत वाईट कामगिरी ठरली.

मॉड्रिच : क्रोएशियाचा ध्रुवतारा!
क्रोएशियाच्या दुसर्‍या सुवर्णपिढीचा शिल्पकार कर्णधार मॉड्रिच येत्या दोन महिन्यांत ४१ वर्षांचा होईल. झादार येथे जन्मलेल्या लुका मॉड्रिचचं बालपण १९९१मध्ये क्रोएशियाच्या स्वातंत्र्ययुद्धाला सुरुवात झाल्यानंतर संघर्षमय गेलं. सर्बियन लष्करानं त्याच्या आजोबांची हत्या केली आणि त्यांच्या कुटुंबाचं गावातील घर जाळून टाकलं. त्यामुळे त्याच्या कुटुंबाला गाव सोडून पलायन करावं लागलं आणि त्यांनी हॉटेलमध्ये आश्रय घेतला. त्यानं जडणघडणीची महत्त्वाची वर्षं निर्वासितांप्रमाणे घालवली. दररोज सायरनचा कर्कश आवाज आणि बॉम्बहल्ल्यांच्या छायेत जगत असताना लुकानं हॉटेलच्या छोट्याशा पार्किंगमध्येच फुटबॉल खेळण्यास सुरुवात केली. त्या खेळामुळेच त्याला युद्धातील हिंसाचार, भीती आणि अस्थिरतेपासून काही क्षणांचा दिलासा आणि मानसिक आधार मिळाला. याच मॉड्रिचनं क्रोएशियाला फुटबॉल नकाशावर अधोरेखित करण्यासाठी अथक प्रयत्न केले. त्यानं क्लब फुटबॉलही गाजवलं. कदाचित येत्या काही दिवसांत तो निवृत्तीही पत्करेल. त्याची जागा इव्हान पेरिसिच घेण्याची दाट शक्यता आहे. परंतु तोही ३७ वर्षांचा आहे. त्यामुळे क्रोएशियाच्या दुसर्‍या सुवर्णपिढीचा हा शेवट ठरेल. पण भविष्यात क्रोएशियाची तिसरी सुवर्णपिढी तरी त्यांची ही अधुरी कहाणी पूर्ण करीत विश्वविजेतेपद जिंकून देईल का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.
 

Previous Post

केवायसी

Next Post

कुहू… पियू… पेरते व्हा…कोकिळकुलाची किमया!

Next Post
कुहू… पियू… पेरते व्हा…कोकिळकुलाची किमया!

कुहू... पियू... पेरते व्हा...कोकिळकुलाची किमया!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.