अध्वर्यू आज गावातल्या गॅस एजन्सीत आलेला. यायचं काम म्हणजे रवीच्या आज्याचं गॅस कनेक्शन होतं. मागल्या वर्षी म्हातारं वारलं, त्याच्यानंतर ह्या साली कनेक्शनला केवायसी करा म्हणत एजन्सीचे फोन येऊ लागले. त्याच्यात बुकिंग होईना. रव्याला सिलेंडर मिळेना. मग आज कार्ड आणि अर्ध्याला सोबत घेऊन रव्या एजन्सीत आला, तर इथं ह्या पोरांनी म्हातार्याचं कनेक्शन कुणाच्या नावावर करा, नाहीतर बंद पडंल असं सांगितलं. मग आज वेळ काढूनच येयेल होता, तर रव्या म्हणी, सगळी प्रोसेस आज पुरीच करून टाकू. मग काय? त्यानं अर्ध्याला ठेवलं बसवून. अन् लागणारे कागदं आणायला गेला घरी. अर्ध्या स्टीलच्या बेंचवर बसला, मोबाईल बघत. लोकं येत्याच आहे, बुकिंग-बाकिंग, टाकी-टुकी, कनेक्शन-ट्रान्सफर असलं काही-बाही विचारून माघारी जात्याच आहे. गर्दी आता तशी तुरळकच.
‘बया, मुडद्यानं हाफीस पार गावाबाहेर आणलं. एवढं चालत यायचं सोपंय का?’ एक म्हातारी नातसुनाला सोबत घेऊन आलीय. नातसून घाईनं आत ऑफीसमधी आली न् म्हातारीला पायर्या चढायला आधार देऊ लागली. आता ती चवळीगत आणि म्हातारी भोपळ्यावानी. म्हातारीनं नुसत्या फु करत धापा टाकल्या तरी पोर चार कोस दूर पडायची.
‘बया पायर्याबी रडतोंडीगत बांधल्या बाबानं. टाक्यायचे पैशे घेतो, ते पुरती नाही का? एवढी कंजूशी केली ह्यनं!’ म्हातारीचा हाफिसात घुसतानाबी तोंडाचा पट्टा चालूच आहे.
‘बसा, आज्जी!’ नातसून पहिल्यांदा बोलली.
‘बसावंच लागंल. एवढं लांब यायचं म्हंजी दमी भरायचे कामं! पाणी दे बाई! तहान लागली मला. बघ इथं आहे का जारबिर?’ म्हातारीनं अर्ध्याशेजारी बसत नातसुनेला फर्मान सोडलं. तशी पोर भिरभिरत्या नजरेनं अख्ख्या ऑफिसभर बघू लागली. ‘तिथं कोपर्यात ठेवेले पहाय. तुला दिसाना बी! त्या मुडद्याला इचार पेयचं आहे का म्हणून?’ म्हातारी गप्प बसंल तवा!
नातसून तिथं गेली, ग्लासात पाणी घ्यायला लागली. तशी म्हातारी तरातरा उठली. तिच्या हातून ग्लास हिसकला.
‘कोणंबी तोंड लावेल र्हातं, ग्लासाला! हिसळून घेत जावा!’ म्हातारी बारीक आवाजात दातओठ खात नातसुनेला बोल लावू लागली अन् ग्लासात हात घालून ग्लास चांगला धुवून घेतला. मग पदरानं कोरडा करून त्याच्यात पाणी घेतलं.
‘पी पाणी!’ म्हातारीनं नातसुनेपुढं ग्लास धरला. अर्ध्याची तिकडं नजर गेली. त्याला प्रश्न पडला. नेमका तहान लागेल कुणाला होती? नातसुनेनं घटाघटा पाणी पिलं. ग्लास म्हातारीच्या हातात दिला. म्हातारीनं तो जारवर पालथा ठेवला. पदर घेऊन मयेनं नातसुनाच्या चेहर्यावरून फिरवला. ‘बाई, उन्हानं पोर कोमजली गं!’ म्हणत पोरीचा दंड धरून परत अर्ध्यापाशी दोघी आल्या.
‘अय पोरा, काय एक सोयीनं बस! मधीच बसला. आम्ही बसावा कुठं?’ म्हातारीला मधोमध बसलेला अर्ध्या दिसला. मघा म्हातारी एक कडंला बसली होती, पण आता नातसुनेला पण बसवायचं असंल. अर्ध्या एक कडेला सरकला. म्हातारी मधोमध आणि नातसून दुसर्या कडेला बसली. म्हातारीनं सोबत आणेल बाचके-बोचके अर्ध्याच्या साईडला बेंचवर ठेवले. अर्ध्याला प्रश्न पडला म्हातारीनं हे आणेल कव्हा आहे? पण खाली ठेवा नाहीतर बाजूला ठेवा म्हणायची सोय नाही. म्हातारी एकतर फाटक्या तोंडाची दिसती.
‘अय पोरा, तुझा मालक कुठंय?’ म्हातारीनं बसल्या जागेवरून टेबलाच्या मागं कम्प्युटरवर बसलेल्या पोराला आवाज दिला.
‘ते बँकेत गेले!’ पोरानं लागलीच उत्तर दिलं.
‘बाई, गावात सायकलवर आमच्या दारापुढून बुरकळ्या मारत फिरायचा. आता ढुंगणाखाली बुलेट घेऊन फिरतो. वर बंगलेबिंगले झाले. दोन लग्न झाले. पहिली बया थैल्या घेऊन पळून गेली. तवा असा रडरड रडायचा!’ म्हातारी कुठल्या काळाचे किस्से कुठल्या काळात ऐकवतेय, कुणास ठाऊक! त्याची टोटल कुणालाच लागंना.
‘अहो पण त्यांना एकच बायको अन् एकच मुलगा आहे. त्याच्यात सात पिढ्यांपासून ते श्रीमंतच आहेत. मग तुम्ही सांगताय कोणाचं?’ त्या कम्प्युटरवाल्याला सवाल पडला.
‘तू कोणाच्या इथला? इशाचा का?’ म्हातारीनं त्या पोराचा चेहरा न्याहळत एक ठोका लगावला.
‘तुम्हाला कसं माहीत?’ पोरगं आश्चर्यानं पाहायला लागलं.
‘तुहा बाप ढुंगणाला पॅन्ट घालत नव्हता, गल्लीत कुणाच्याबी घरात जाऊन भाकरी मोडायचा. तवा माझं मोठं पोर वायरमन होतं गावचं! मला काय माहीत म्हणजे?’ म्हातारी अश्या थाटात सांगायला लागली, जसा पोरगा आमदार खासदार असल्यावानी तोरा तिचा.
‘बरं, सांगा ना आज्जी! काय काम होतं?’ ते पोर गार झालं, म्हातारीच्या बोलण्यानं. पण काम विचारून करून द्यावा म्हणून त्यानं प्रश्न केला.
‘तुहा मालक येऊ दे! त्याच्याकडून करून घेते.’ म्हातारी बसलीच ऐटीत.
‘ते लवकर यायचे नाहीत.’ त्या पोरानं उत्तर दिलं.
‘मग हे हाफीस कुणाच्या भरवशावर सोडून गेला तो बाबा? हे लावून घ्यायचं ना? आम्ही उगाच बसलो का?’ म्हातारी जशी बिझनेस डील करायला येयेल आहे. अर्ध्या गालातल्या गालात हसला.
‘तुमचं काम काय आहे सांगा ना! मी आहे, आमचा इतर स्टाफ आहे. बोला!’ तो कम्प्युटरवाला सौजन्यपूर्वक की नम्रतापूर्वक असं बोलला.
‘तुह्याचणी व्हईल का? मग ह्या पुरीची केवायशी करायचीय म्हणून फोन आला होता, बघ! काय लागंल?’ म्हातारीनं येण्याचं कारण सांगितलं तसं अर्ध्याला हसू फुटायचंच राहिलं. मग यधळून म्हाताराr मालकाला शोधत होती, पण करायचं तर काय म्हणी केवायसी? पण त्यानं तोंड दाबून मोबाईल चाळणं चालू ठेवलं.
‘पाठवा त्यांना करून देतो.’ ते पोर बसल्या जागेवरून पुटपुटलं!
‘मग हे काय? घेऊन आले तिला! आता आणखी कुठं पाठवू? बोल काय कागदं लागत्या?’ म्हातारीची कॅशेट ट्रॅक सोडून चालू.
‘अहो, त्या समक्ष लागतात…’ ते पोर काही बोलायचा प्रयत्न करू बघतंय.
‘मग हे काय समक्षच आणलं न् तिला. कागद बोल.’ म्हातारी बोलता बोलता कागदाची एक पिशवी चाळू लागली.
‘अहो, फोटो काढावा लागतो. केवायसी करायला.’ अर्ध्यानं मधीच तोंड मारलं.
‘असं असतं होय? बँकेत तर दोनचार झेरॉक्सच दिल्या. अन् होऊन गेलं समदं! मग काढ फोटो!’ म्हातारीनं आदेश दिला. तसं ते कवदरलेलं पोर, म्हातारी नातसून तिकडं त्याच्यापुढं पाठवणार नाही हे गृहीत धरून उठलं आणि तिघांच्या समोर आलं. हातात मोबाईल घेऊन.
‘गॅस कार्डचा नंबर बोला,’ ते मोबाईलमधी काही टायपू लागलं. त्या नातसुनानं बारीक मांजरागत नंबर सांगितला. ‘उभ्या रहा इथं.’ त्या पोरानं एक जागेवर खूण केली. तशी ती पोर म्हातारीकडं बघत उभी झाली.
‘अय बया! अजून तुही आज्सासू जिती आहे. डोईवर पदर घे! आमच्या येळी आम्ही पार नाकापोहतर पदर ओढून घ्यायचो. आजच्या पिढीला वळणंच राहिले नाही. तिकडं दिल्लीत मोदीनं असा उघड्या डोक्याचा फोटो बघितला तर तो काय म्हणंल?’ म्हातारी तरातरा उठली न् खांद्यावर घसरलेला पदर डोक्यावर ठेवला.
‘आज्जी, आज्जी! पदराची गरज नाहीये. इथं डोळे स्कॅन करायचे आहेत. त्याची गरज पडत नाही.’ बोलता बोलता त्यानं फोटो घेतला बी.
‘हां, अशे फोटू काढितो तू! तिकडं कुणी पहात असंलच ना? झाला का पाठवून? मोबाईलमधून डिलीट कर लगेच! नाहीतर करायचा काहीबाही! आजकाल लै बातम्या येत्या!’ म्हातारीचं तोंड चालुच्चे!
‘आज्जी सेव्ह होत नाही ते! झालं तुमचं काम!’ त्या पोरानं आवरतं घेतलं. तसं पुढून एक म्हातारं आलं.
‘बसा बाबा! आमचं झालं म्हणतो.’ म्हातारी पिशव्या गोळा करीत बोलली.
‘माहावालं होईल का?’ म्हातारं उदासवाण्या चेहर्यानं त्या पोराला विचारायला लागलं.
‘तुमचं नाही होत बाबा. डोळे स्कॅन होत नाहीत, थम्ब कॅप्चर करत नाही. तुमची केवायसी होतच नाही.’ ते पोर बीफरलं.
‘मग रे आता? माही बुकिंग होईना. टाकी संपली. शिजवावा कश्यावर? हां? तुहे मशीन ठशे घेईना, डोळे पाहिना. माही चूलबंद व्हायची वेळ झाली. सांग आता काय करावं?’ म्हातारंबी खिजलं!
‘मग पोरासोराच्या नावावर…’ म्हातारी सल्ला द्यायला जाती.
‘सगळे मेले XXXX मी आणि म्हातारी आहे. आम्ही दोघांनी काय खायचं? इष खावा का?’ म्हातारं तणतणत आलं तसं माघारी निघालं. मागून म्हातारी त्याच्याशी बोलत नातसुनंला घेऊन गेली. तो रव्या कागदं घेऊन डोकावला. पण अर्ध्याच्या डोक्यात ठशे बसले. तसा तो बसल्या बसल्या हातावरच्या रेषा बघू लागला. आयला आता ह्या जपाव्या लागतील नाही? पुसल्या तर कागदी आपुन मेलोच!
अर्ध्या विचार करायला लागला.

