आपण आध्यात्मिक देश आहोत, असं आपण मानतो, जगही मानतं. मग, जगातल्या आनंदी देशांच्या यादीत आपण तळाला का असतो?- विवेक दरेकर, नागोठणे
शेवटून पहिलं येण्याचे फायदे तुम्हाला माहित नाही का? थोडे दिवस थांबा.. न्यूज चॅनलचे अँकर तुम्हाला समजावतील हे फायदे!
घोडेबाजार म्हणजे काय? राजकारणात घोडोबाजार खंयसून इलो?- अशोक परब, ठाणे
गे बाय माझे… तुमका काय बाजारात उभा राहूचा हा? पण घोडो बाजारात गाढवांचो काय उपेग नाय… कोणी उभो पण करना नाय… म्हणून मीया गप लोकांच्या प्रश्नाची उत्तरं देत बसलंय.
कोणत्याही रस्त्यावर पहिल्या पावसात खड्डे पडतातच. त्यांच्यावर त्यानंतर ट्रीटमेंट झाली की मग ते वाहतूकयोग्य होतात, अशी मौलिक माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. यांना रस्ते अभियांत्रिकीमधलं इतकं ज्ञान, पक्ष फोडण्यामधलं इतकं ज्ञान… मुख्यमंत्रीपदाच्या कामकाजातून कधी करत असतील इतका व्यासंग?- रत्नाकर पाटील, इचलकरंजी
रस्ते बांधताना आधी तिथे खड्डेच असतात… ते बुजवून तिथे रस्ते बांधतात हे समजून घ्या… आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या आधीच्या खड्ड्यांंबद्दल काही म्हटलेलं नाही, हे नशीब समजा आणि ‘पहिल्या पावसात रस्ता फुटतो’ हे ज्ञान त्यांनी फक्त आपल्या पक्षापुरतं न ठेवता, समस्त समाजाला दिलं याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा… पक्ष फोडतात, पक्ष फोडतात… करण्यापेक्षा आपलं स्वतःचं घर कोणी फोडणार नाही याची काळजी घ्या…
राम मंदिराच्या उभारणीशी ज्यांचा संबंध नाही, त्यांना राम मंदिरातल्या दानाच्या लुटीवर बोलण्याचा हक्क नाही, असं भाजपवाले म्हणतायत. या न्यायाने देशाच्या स्वातंत्र्यलढ्याशी ज्यांचा संबंध नाही, त्या संघ-भाजपवाल्यांना तर देशात निवडणूक लढवायचाही अधिकार नसला पाहिजे!- चिन्मय देशपांडे, वर्धा
चिन्मयराव तुम्ही अर्धसत्य सांगताय… ‘आमचा स्वातंत्र्यलढाशी संबंध होता’ असं कोणी म्हटलं आहे का? ज्या गोष्टीशी त्यांचा संबंध नाही, त्या गोष्टी ते बोलतच नाहीत… हे सत्य स्वीकारा… आणि १९४७ बद्दल ते काही बोलत नसले, तरी २०४७ बद्दल बोलतायत ना… त्याबद्दल बोला ना तुम्ही…
ज्यांना देश चालवता येत नाही, मंदिर जपता येत नाही, विदेश नीतीमधलं काही समजत नाही, अर्थव्यवस्थेतलं ओ की ठो कळत नाही, हातात आहे त्यातलं काही धड ठेवता येत नाही, अशा पक्षांना आणि त्यांच्या मातृसंघटनांना तरीही नवनवीन संस्था ताब्यात का घ्यायच्या असतात?- मीनाक्षी शेंडे, बेलापूर
एकदा विकलेली वस्तू परत विकता येते का? विकण्यासाठी नवीन नवीन वस्तू निर्माण कराव्या लागतात आणि ते शक्य नसेल तर जुन्या वस्तू मिळवून त्या विकाव्या लागतात. व्यापारातला हा साधा नियम तुम्हाला माहित नाही मीनाक्षीताई? आणि कुठल्याही व्यापार्याला कमी समजू नका. ‘सैनिकापेक्षा जास्त रिस्क व्यापारी घेतो…’ एका मोठ्या व्यापार्याचं हे महावाक्य तुम्ही विसरला असाल… तरी व्यापारी विसरत नाही… आणि त्याचे व्यापारी मित्र त्याला विसरू देत नाहीत… तुम्ही हे तरी विसरू नका.
आमीर खानने वयाच्या साठीत तिसरं लग्न केलं. तुम्ही का मागे पडले आहात, संतोषराव!- विनय जोशी, कांदिवली
गरीब माणसाला ‘आमीर’ माणसासारखं नाही वागता येत. साठी आल्यावर हाती काठी न येता, तरणी ताठी आलीच, तरी गुडघ्याची वाटी साथ देईल का ते बघायला हवं… आणि सात जन्माच्या गाठी जिच्याबरोबर मारल्या आहेत, तिचं काय लोणचं घालायचं? अहो तेच मुरलेलं लोणचं तोंडी लावत आयुष्य काढायचं असतं, ज्यांच्या नशिबी असं लोणचं नसतं, त्यांनाच साठीतही फास्ट फूड लागतं!
देशातल्या सगळ्या जनतेवर वाहनांचा सत्यानाश करणारा, पेट्रोलमध्ये इथेनॉलमिश्रणाचा ‘प्रयोग’करण्याचा अधिकार पेट्रोलियम खात्याचे मंत्रीही नसलेल्या नितीन गडकरींना कोणी दिला असेल?- चंद्रकांत सुर्वे, वांगणी
त्यांनी अर्थव्यवस्थेचा, परीक्षांचा सत्यानाश केलाय का? वाहनाचं काय ओ, ते उद्या भंगारातच जाणार… ते आज जाईल, एवढाच फरक आहे. आणि अधिकाराचं म्हणाल तर, आपल्या खात्याशी संबंधित उत्तर देण्याचाही ज्यांना अधिकार नाही, त्यांनी दुसर्याच्या खात्याचे अधिकार वापरले… एवढं सोप्पं आहे ते. त्यांनी, त्यांना नसलेले अधिकार वापरले, त्यांना तुम्ही शिव्याशाप द्या… नाही नाही… तुम्हाआम्हाला एवढाही अधिकार नाहीय… पण सध्या हेच ट्रेंडिंग आहे म्हणून म्हटलं.
विचारून टाका प्रश्न
तुम्हालाही अभिनेते संतोष पवार यांना प्रश्न विचारायचाय…? मग वाट कसली बघताय…? उचला पेन आणि टाका विचारून प्रश्न… हा प्रश्न थेट ‘मार्मिक’च्या [email protected] या ईमेल आयडीवर पाठवून द्या… किंवा आमच्या पत्त्यावर पाठवा. मार्मिक प्रश्नाला संतोष पवार उत्तर देतील…

