
दरवर्षी ५ जूनला जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. सरकारी कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था आणि विविध कंपन्यांकडून मोठ्या उत्साहात वृक्षारोपणाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. ‘झाडे लावा, झाडे जगवा’, ‘हरित शहर, सुंदर शहर’, ‘एक झाड आईच्या नावाने’ अशा घोषणा दिल्या जातात. वृत्तपत्रांत छायाचित्रे झळकतात, सोशल मीडियावर पोस्टींचा पूर येतो आणि पर्यावरणप्रेमाची भाषा बोलली जाते. पण या सर्व गाजावाज्यामागे एक प्रश्न कायम उभा राहतो- प्रशासनाला आणि व्यवस्था चालवणार्यांना पर्यावरणाची इतकी काळजी असेल, तर शहरातील हजारो झाडे विकासाच्या नावाखाली का तोडली जात आहेत?
ठाणे हे एकेकाळी तलावांचे, डोंगरांचे, खाड्यांचे आणि हिरवाईचे शहर म्हणून ओळखले जायचे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या सान्निध्यात वाढलेल्या या शहरात वड, पिंपळ, उंबर, जांभूळ, कडुलिंब, बहावा, पळस यांसारख्या देशी वृक्षांची समृद्ध परंपरा होती. रस्त्यांच्या दुतर्फा सावली देणारी झाडे होती. पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू यायचा. उन्हाळ्याच्या दिवसांतही झाडांमुळे वातावरणात गारवा जाणवायचा. परंतु गेल्या दोन दशकांत विकासाचा वेग वाढला आणि त्याच वेळी हिरवाईचा र्हासही सुरू झाला. उड्डाणपूल, मेट्रो प्रकल्प, सिमेंट काँक्रीट रस्ते, गृहनिर्माण संकुले, व्यापारी प्रकल्प आणि विविध पायाभूत सुविधांसाठी हजारो झाडांचा बळी देण्यात आला. प्रत्येक वेळी एकच कारण पुढे करण्यात आले- ‘विकासासाठी हे आवश्यक आहे.’
प्रश्न विकासाला विरोध करण्याचा नाही. प्रश्न आहे तो विकास आणि पर्यावरण यांच्यातील समतोलाचा. कारण जगातील अनेक विकसित शहरांनी विकास करताना पर्यावरणाला केंद्रस्थानी ठेवले आहे. पण आपल्या शहरात अनेकदा पर्यावरण हा फक्त कागदोपत्री विषय असल्याचे दिसून येते. कोणत्याही मोठ्या प्रकल्पाची घोषणा झाली की त्याआधी किती झाडे तोडली जाणार आहेत, याची माहिती अनेकदा गौण ठरते. झाडांच्या बदल्यात दहा पट वृक्षारोपण केले जाईल, अशी आश्वासने दिली जातात. मात्र त्याबदल्यात लावलेली झाडे कुठे आहेत, त्यापैकी किती जगली आहेत, किती वाढली आहेत आणि त्यांची देखरेख कोण करत आहे, या प्रश्नांची उत्तरे क्वचितच मिळतात.
प्रमाण उलटे हवे…
ठाणे महानगरपालिकेच्या वृक्षगणना अहवालानुसार शहरात ७ लाख २२ हजार ४२६ झाडे आहेत. हा आकडा ऐकायला मोठा वाटतो. पण जेव्हा याची तुलना शहराच्या लोकसंख्येशी केली जाते, तेव्हा वास्तव समोर येते. आज ठाणे शहराची लोकसंख्या साधारणपणे २५ ते ३० लाखांच्या दरम्यान पोहोचली आहे. म्हणजेच साधारण चार व्यक्तींमागे एक झाड असे प्रमाण आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने ही अत्यंत चिंताजनक परिस्थिती आहे. खरं तर हे प्रमाण याच्या अगदी उलट असायला हवे होते. म्हणजे चार झाडांमागे एक व्यक्ती. कारण शहरातील प्रत्येक नागरिकाच्या श्वासासाठी, आरोग्यासाठी आणि सुरक्षित भविष्यासाठी झाडे अत्यावश्यक आहेत. दुर्दैवाने आपण अशा शहराकडे वाटचाल करत आहोत जिथे माणसांसाठी जागा वाढत आहे आणि झाडांसाठी जागा कमी होत आहे.

वृक्षगणनेतील आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे शहरातील वृक्षसंपदेचे स्वरूप. अहवालानुसार शहरात २७१ विविध प्रजातींची झाडे आहेत. त्यापैकी १८० प्रजाती स्थानिक आहेत, तर ९१ प्रजाती विदेशी आहेत. ही बाब सकारात्मक असली तरी आकडेवारीच्या आत दडलेले वास्तव अधिक महत्त्वाचे आहे. शहरातील सर्वाधिक संख्या सुबाभूळ या प्रजातीची असून तिची संख्या तब्बल १ लाख ११ हजार ६३४ आहे. त्यानंतर काळा उंबर, इंडियन चारकोल ट्री, धामण, करंज, काटेसावर आणि साग या प्रजाती आहेत. पण सांस्कृतिक, पर्यावरणीय आणि जैवविविधतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असलेली वड, पिंपळ, उंबर आणि जांभूळ यांची संख्या तुलनेने अत्यल्प आहे. संपूर्ण शहरात वडाची फक्त १,९६४ झाडे आहेत, पिंपळाची ५,९६०, उंबराची ८,५०८ आणि जांभळाची ८,७२७ झाडे आहेत. लाखोंची लोकसंख्या असलेल्या शहरासाठी ही संख्या अत्यंत कमी म्हणावी लागेल.
याहून गंभीर बाब म्हणजे काही वृक्षप्रजाती शहरातून नामशेष होण्याच्या उंबरठ्यावर आहेत. अंजनी, जायफळ, ब्रह्माचा वटवृक्ष, गोल्डन रेन ट्री, एवोकॅडो यांसारख्या अनेक प्रजातींची शहरात केवळ एकच झाड नोंदवण्यात आली आहेत. ही आकडेवारी म्हणजे केवळ एक संख्या नाही, तर ती जैवविविधतेला मिळालेला इशारा आहे. या प्रजातींचे संवर्धन झाले नाही तर पुढील काही वर्षांत त्या ठाण्यातून कायमच्या नाहीशा होऊ शकतात.
काँक्रीटीकरणाचा फास
आज ठाण्यातील सर्वात मोठा पर्यावरणीय धोका म्हणजे झपाट्याने वाढणारे काँक्रीटीकरण. रस्त्यांच्या कडेला असलेली मोकळी माती नष्ट होत आहे. झाडांच्या मुळांभोवती सिमेंट टाकले जात आहे. परिणामी झाडांना श्वास घेणे कठीण होत आहे. त्यांची मुळे कमकुवत होत आहेत. पावसाचे पाणी त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. अनेक झाडे हळूहळू मृत्यूच्या दिशेने ढकलली जात आहेत. ही वृक्षतोड कुर्हाडीने होत नाही, पण परिणाम मात्र तितकाच घातक असतो. पर्यावरण संरक्षणाच्या भाषेत यालाही वृक्षहत्या असेच म्हणावे लागेल.
आज ठाण्यासह संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशात तापमान सातत्याने वाढत आहे. उष्णतेच्या लाटा अधिक तीव्र होत आहेत. पावसाचे स्वरूप बदलत आहे. अचानक अतिवृष्टी आणि पूरस्थिती निर्माण होत आहे. यामागे हवामान बदलाचे जागतिक कारण असले तरी स्थानिक पातळीवर वृक्षतोड, जलाशयांचे अतिक्रमण आणि काँक्रीटीकरण ही महत्त्वाची कारणे आहेत. एकेकाळी शहरातील मोकळी जमीन पावसाचे पाणी जमिनीत मुरवत होती. झाडांची मुळे ते पाणी धरून ठेवत होती. आज त्या जागी सिमेंट आले आहे. परिणामी पाणी थेट नाल्यांत आणि रस्त्यांवर वाहते आणि पूरस्थिती निर्माण होते. त्यावर उपाय म्हणून कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. पण मूळ समस्या असलेल्या पर्यावरणीय र्हासाकडे दुर्लक्ष केले जाते.

झाडाच्या बदल्यात रोप?
आज पर्यावरण दिनी लाखो रोपे लावल्याच्या घोषणा केल्या जातात. पण एखादे शंभर वर्षांचे वड, पिंपळ किंवा उंबराचे झाड तोडून त्याच्या बदल्यात शंभर रोपे लावली तरी त्या झाडाची भरपाई होऊ शकत नाही. कारण मोठा वृक्ष म्हणजे फक्त झाड नसते. ती एक संपूर्ण परिसंस्था असते. त्यावर पक्ष्यांची घरटी असतात. असंख्य कीटकांचे जीवन अवलंबून असते. मधमाश्यांना अन्न मिळते. कार्बन शोषला जातो. तापमान नियंत्रित राहते. एक प्रौढ वृक्ष जे काम करतो, ते नव्याने लावलेले रोप अनेक दशकांनंतर करू शकते.
आज गरज आहे ती घोषणांची नाही, तर कृतीची. पर्यावरणाला विकासाचा शत्रू न मानता विकासाचा अविभाज्य भाग मानण्याची गरज आहे. कोणताही प्रकल्प आखताना सर्वप्रथम झाडे कशी वाचवता येतील याचा विचार झाला पाहिजे. तोडलेल्या प्रत्येक झाडाची सार्वजनिक नोंद असली पाहिजे. बदल्यात लावलेल्या झाडांचे जिओ-टॅगिंग झाले पाहिजे. किमान पाच वर्षे त्यांची देखरेख बंधनकारक झाली पाहिजे. नागरिकांनाही या प्रक्रियेत सहभागी करून घेतले पाहिजे. कारण शेवटी प्रश्न केवळ झाडांचा नाही. प्रश्न आपल्या श्वासांचा आहे. प्रश्न आपल्या मुलांच्या भविष्यातील आहे. प्रश्न हवामान बदलाच्या संकटात टिकून राहणार्या शहराचा आहे. आज ठाण्यासमोर सर्वात मोठा प्रश्न हा आहे की आपल्याला विकास हवा आहे की विकासासोबत निसर्गही हवा आहे? कारण विकासासाठी झाडे तोडणे सोपे आहे; पण हरवलेली हिरवाई परत मिळवण्यासाठी अनेक पिढ्या खर्ची पडतात. म्हणूनच आज एकच संदेश देण्याची वेळ आली आहे. झाडे लावा, पण त्याहून आधी झाडे वाचवा. कारण उद्याचा ठाणे शहराचा श्वास आजच्या झाडांवरच अवलंबून आहे.

