काही नाट्यकृती त्यांतील व्यक्तिरेखांमुळे कायम स्मरणात राहतात. एवढेच नव्हे तर त्या व्यक्तिरेखांच्या कथा-व्यथा या सुन्न करून भूतकाळ जिवंत करतात. ‘एका ज्वलंत मानसिक समस्येवरलं नाट्य’ म्हणून मराठी रंगभूमीवर आठवणीत राहणारे ‘सविता दामोदर परांजपे’ हे नाटक. त्याला सत्यघटनेचा आधार असून एकेकाळी या नाटकाने रसिकांना अक्षरशः हादरून सोडलं होतं. अष्टपैलू अभिनेत्री रिमा लागू यांची भूमिका त्यांच्या रंग-वाटचालीतील अविस्मरणीय ठरली. आज चाळीस वर्षे उलटली तरी हे नाटक आणि त्यातील टायटल रोल विस्मृतीत गेलेला नाही, यातच या नाट्यकृतीचे श्रेष्ठत्व दडलेले आहे. पुनरुज्जीवित नाटकांच्या दालनातला हा आविष्कार चार दशकांनंतरही रसिकांना खुणावतो आहे.
गोष्ट दोघा मैत्रिणींची. कुसुम आणि सविता दामोदर परांजपे यांची. दोन घट्ट मैत्रिणी. एकमेकांना कायम साथसोबत करणार्या. ऐन तारुण्यात या दोघींच्या जीवनात शरद अभ्यंकर हा सुशिक्षित, महत्त्वाकांक्षी तरुण येतो. दोघी त्याच्याकडे ओढल्या जातात. दोघी लग्नाची स्वप्ने बघू लागतात. दोघीजणी सुंदर, प्रेमळ. कोणाशी लग्न करायचे याबद्दल शरद संभ्रमात पडतो. शरदचं आपल्यावरच प्रेम असल्याचा सविताचा पूर्ण विश्वास आहे. पण प्रत्यक्ष शरद हा कुसुमवर प्रेम करत असतो. लग्नही करण्याचा निर्णय घेतो. यामुळे सविता कमालीची निराश होते. तिचा कोंडमारा होतो. ज्या दिवशी कुसुम शरदचे लग्न होते त्याच दिवशी सविता आत्महत्या करते. स्वतःला जाळून घेते.
या घटनेमुळे अपराधी असल्याची भावना शरदच्या मनात कायम आहे. कुसुमलाही आपल्या मैत्रिणीने ज्या कारणामुळे आत्महत्या केली त्याचे दुःख आहे. त्याचा जबरदस्त प्रभाव आता तिच्या जीवनावर पडत चाललाय. या पार्श्वभूमीवर शरदच्या घरात एक थरारक गूढ नाट्य सुरू होतं.
कुसुम आणि शरदचा लग्नानंतरचा संसार. वसई मुक्काम. दोघेही उच्चशिक्षित. घरही श्रीमंती थाटाचे. दोघांची दैनंदिन देहबोली एकमेकांना पूरक असली तरी अपत्यसुख नाही. लग्नाला आठ-दहा वर्षे उलटली. मूलबाळ नाही. शरद शरीरिक संबंधातून पळवाट काढत असल्याची चिन्हे आहेत. कारण कुसुमचा भयानक आजार. पोटदुखीचा प्रचंड त्रास मधूनच तिला सुरू होतो. त्यावर नियंत्रण करताना शरद हादरून जातोय. कुसुम कॉलेजमध्ये मराठीची शिक्षिका. मनाने हळवी आणि कमकुवत. डॉ. मलिक हे फॅमिली डॉक्टर रोज तपासणी करण्यासाठी येतो. कुठल्याही निष्कर्षापर्यंत डॉक्टर पोहोचू शकत नाहीत. या घरात आणखी एक तरुणी आहे, मीतू ही शरदची पुतणी.

कॉलेज शिक्षणासाठी त्यांच्यासोबत आहे. टाटा फंडामेंटल रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये संशोधक असणारा तरुण अशोक. त्याला या आजारावर काही उपचार करण्यासाठी शरद एके दिवशी घेऊन येतो. प्रयोग करण्यास अनुमती देतो. हा आजार चमत्कारिक. कुसुमच्या पोटात अचानक कळा सुरू होतात. पोटात कुणीतरी दबाव देत असल्याचे दिसते. त्यावेळी तिचा आवाज बदलतो. ती किंचाळते. मंगळसूत्राशी चाळे करते. सौभाग्याची ही खूण भिरकावून देते. एक वेगळीच ऊर्जा जणू तिच्या सर्वांगात शिरलेली. शारीरिक सुखाची मागणीही करते. जणू तिच्या शरीरात दुसरी व्यक्ती म्हणजे सविताच शिरलेली. भूतबाधा, संचार वेड असे हे वर्तन! काही वेळानंतर कुसुमचे हे वादळ शांतही होतं. त्यावेळी तिला या काळातले काही एक आठवत नाही. भानामती किंवा अंगात येण्यासारखं हा प्रकार.
भावनिक कोंडमार्यामुळे हा आजार वाढतोय काय? की मानसिक ताण-तणावामुळे पोटावर दबाव निर्माण होतो? का हा एक भुताटकीचा प्रकार- असे अनेक अस्वस्थ करणारे प्रश्न रसिकांपुढे श्रद्धा-अंधश्रद्धा सत्य-असत्य यांच्या कसोटीवर उभे राहतात.
कोरोनाच्या महासंकटात अनेक रंगकर्मींना मुकावे लागले. त्यात नाटककार शेखर ताम्हाणे यांची चटका लावणारी एक्झिट झाली. पेशाने केमिकल इंजिनिअर असलेला हा अभ्यासू आणि कल्पक नाटककार. त्यांची कारकीर्द वेगात सुरू असतानाच ते गेले. या संहितेवर १९८५ साली आधी नाटक आले. त्याचे हजारांवर प्रयोग झाले. तुफान गाजले. नंतर २०१८ साली चित्रपटही आला. अतृप्त शरीराची वेदना आणि विचित्र शक्तीची गूढता हे या संहितेचे वैशिष्ट्य ठरतंय. नाट्यघटनेतील मूळ कथाबीज वसईतील एका कुटुंबातले आहे. या सत्यघटनेच्या मुळापर्यंत जाण्यासाठी शेखर ताम्हाणे हे काही महिने वसई मुक्कामालाही होते. एका भेटीत त्यांनी याची सविस्तर आठवण सांगितली होती. असो. संहितेत या दोघींच्या आयुष्याचा पट अलगद उघडला जातो. संवादाचे सामर्थ्य विलक्षण आहे.

अभिनेत्री मयुरी देशमुख हिने मध्यवर्ती भूमिका केलीय. रीमा लागू यांची भूमिका बघितलेल्या रसिकांना तुलना करण्याचा मोह जरूर होईल. पण ४० वर्षांचा काळ गेलाय. सिनेमा, मालिका यामुळे नव्या रसिकांच्या परिचित असलेल्या या अभिनेत्रीला ही आव्हानात्मक संधी मिळाली आहे आणि तिने संधीचं सोनं केलंय. परस्परांविरुद्ध असलेल्या सविता आणि कुसुम या व्यक्तिरेखा प्रभावीपणे साकारल्या आहेत. कुसुममध्ये होणारा सविताचा प्रवेश थरार उडवणारा ठरतो. आवाज, अभिनय, देहबोली पूरक ठरते. कुसुमच्या पतीची भूमिका आस्ताद काळे यांनी संयमाने साकारली आहे. बायकोबद्दल काळजी तसेच सविताबद्दलची खंत नजरेत भरते. हतबलताही चांगली उभी केली आहे. संवादफेक उत्तम. संग्राम समेळ यांनी अशोक या संशोधक तरुणाच्या भूमिकेचा मुखवटा चढविला आहे. चष्म्याच्या वापरातून प्रौढत्व आणण्याचा प्रयत्न आहे. परिस्थिती हाताळण्यासाठीचा त्याचा प्रयत्न चांगला आहे.
फॅमिली डॉक्टर मलिकच्या भूमिकेत दिग्दर्शक राजन ताम्हाणे यांनी हजेरी लावली आहे. हुकमी आवाज तसेच सहजता असल्याने डॉक्टर शोभून दिसतात. गेली ४० वर्षांपासून या नाटकाशी संबंधित असल्याने प्रत्येक प्रसंग त्यांनी दिग्दर्शक आणि डॉक्टरची भूमिका यात नेमकेपणाने रंग भरलेत. काही प्रसंग अतिरंजित होण्याचे भय आहे, पण ते त्यांनी खुबीने टाळले आहे. सविताचा ‘संचार’ होण्याचे प्रसंग अंगावर येतात. दिग्दर्शक म्हणून नाट्य चांगलेच बांधले आहे. पहिल्या अंकापेक्षा दुसरा अंक हा अधिक थरकाप उडवणारा आणि वेगवान आहे.
ऋचा मोडक (पुतणी) सचिन शिर्के (अंगय्यागार) या दोघांच्या भूमिकांना मर्यादा आहेत. अंगय्यागार यांचं घड्याळ्याचं वेड तणाव कमी करण्यासाठी आहे. पण हा प्रवेश संकलित केला असता तरी चालले असते. कलाकारांचे टीमवर्क सुरेख जुळलय. पात्र निवड अचूक आहे. परिश्रम जाणवतात.
नेपथ्यकार संदेश बेंद्रे यांची नेपथ्यरचना अभ्यासपूर्ण दिसते. त्यात हालचालींना पुरेसा वावर आहे. रंगसंगतीही शोभून दिसते. बेडरूमचे प्रसंग त्यामुळे परिणामकारक ठरतात. ‘स्थळ : वसई’ हे मागील केळ्यांच्या पानांमुळे साकार झाले आहे. शितल तळपदे याची प्रकाशयोजना आणि निनाद म्हैसाळकर यांचे संगीत यांनी सविताचा संचार ठळक करण्यात बाजी मारली आहे. ध्वनीप्रकाशाचा हा खेळ भयानकता वाढविते. चैताली डोंगरे यांची वेशभूषा आणि शरद सावंत यांची रंगभूषा यात नेमकेपणा दिसतो. पडदा उघडण्यापूर्वीचे मोबाईलच्या संदर्भातले निवेदन अर्थपूर्ण आणि नोंद घेण्याजोगे आहे. पडद्यामागल्या तांत्रिक बाजू या पूरक आहेत. चोख कामगिरी बजावली आहे. निर्मितीमूल्यातही कुठेही तडजोड केलेली नाही. एक पुनरुज्जीवित नाट्य म्हणून अनेक स्पर्धांमध्ये या नाटकाने पुरस्कार पटकावले आहेत. कौतुकाचे क्षण पुन्हा एकदा चालून आलेत.

एखाद्या व्यक्तीसोबत कायमचा सहवास असला तर दोघांचंही एकमेकांशिवाय जगणं उरत नाही. असे घडले तर या सातत्यामुळे काहीदा त्या व्यक्तीच्या गैरहजेरीतही ती सोबत असल्याचा भास होतो. मनाचे दोन कप्पे उलगडतात. नवा खेळ सुरू होतो. अशा केसेस मानसशास्त्रीय तज्ज्ञांपुढे आल्या आहेत. हे वेड नव्हे तर प्रभावामुळे निर्माण झालेली मानसिक विकृती म्हणावी लागेल. आणि असंच काहीसं कुसुमच्या संदर्भात घडलेलं आहे. आत्म्याचा प्रवेश, भूतबाधा, भानामती हे सारं काही आजच्या वेगवान संगणक युगात विनोदाचा, चेष्टेचा विषय आहे. त्याकडे मानसशास्त्रीय चष्म्यातून गंभीरपणे बघितले पाहिजे. काही तज्ज्ञांनी कुसुमच्या अवस्थेची निष्कर्ष हा ‘सेक्स हिस्टेरिया’ असाही केलाय.
रत्नाकर मतकरी यांचे स्पर्श अमृतांचा, शं.ना. नवरे यांचा वर्षाव, जयवंत दळवी यांचे स्पर्श, विजय तेंडुलकर यांची मित्राची गोष्ट, सुरेश खरे यांची मंतरलेली चैत्रवेल, या संहिता डोळ्यांपुढे आहेत, ज्यांत महिलांच्या मानसिक, शारीरिक विकृती किंवा व्याधी प्रामुख्याने अधोरेखित केल्या होत्या. त्याच प्रकारातले हे नाट्य, जे शेखर ताम्हाणे यांनी सत्यघटनेच्या आधारासह उभे केले. आज पुन्हा एकदा या इतिहासाला उजळा मिळालाय ज्याची नोंद यंदाच्या रंगवाटचालीत निश्चितच घेतली जाईल.
नाट्यसृष्टीची आर्थिक गणित बदलून ‘हाऊसफुल्ल’ची श्रीमंती आणण्याचा नियोजनबद्ध प्रयत्न अभिनेते सुनील बर्वे यांनी २०१० ते २०१२ यादरम्यान केला होता. एकेकाळी गाजलेल्या, दर्जेदार, क्लासिक नाटकांचा त्यांचा ‘हर्बेरियम’ प्रकल्प नाट्यसृष्टीला नवी दिशा अन कलाटणी देणारा ठरला. रसिकांनीही या संकल्पनेला उत्स्फूर्त अशी दाद दिली. त्यानंतर अनेक निर्मात्यांनी निवडक नाटके रंगभूमीवर वाजत- गाजत आणली. अशा प्रकारात किमान डझनभर नाटके गाजली. जुनं ते सोनं. ठरलं तसंच हे नाट्य.
अस्वस्थ अनुभव देणारा सविता दामोदर परांजपे यातील आशय-विषय कालबाह्य होणार नाही. आजही प्रभाव कायम आहे. हे या पुनरुज्जीवित नाटकातून दिसते. आवर्जून पहावा असा हा गूढ थरारक आविष्कार!
सविता दामोदर परांजपे
लेखन- शेखर ताम्हाणे
दिग्दर्शन- राजन ताम्हाणे
नेपथ्य- संदेश बेंद्रे
प्रकाश- शितल तळपदे
वेशभूषा- चैताली डोंगरे
रंगभूषा- शरद सावंत
सूत्रधार- श्रीकांत तटकरे
निर्माते- निरंजन ताम्हाणे, मैत्रेय रिसबुड, आलाप मोहिते
निर्मिती- त्रिकूट/ मॅनमेकर्स मीडियो

