• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

विज्ञानाचा हिटलरी गैरवापर!

मिलिंद कोकजे पुस्तक परिचय

marmik by marmik
June 15, 2026
in पुस्तकाचं पान
0
विज्ञानाचा हिटलरी गैरवापर!

‘जिनोमच्या अंतरंगात’ हे मिलिंद कोकजे यांचे पुस्तक रोहन प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. हिंस्त्र, नरसंहारी सत्तेपुढे वैज्ञानिकही कशी लोटांगणे घेतात आणि त्या सत्तेच्या सोयीची ‘संशोधने’ किती हिरीरीने करतात, याचं भयंकर दर्शन घडवणारा हा त्या पुस्तकातील एक अंश…

आल्फ्रेड प्लोएट्झ (१८६०-१९४०) या जर्मन भौतिक व जैवशास्त्रज्ञाने ‘रेशियल हायजिन’ (वांशिक स्वच्छता) हा शब्द तयार करून १८९५मध्येच वापरला होता. त्याचा साधा अर्थ होता वंशाचे आनुवंशिक शुद्धिकरण, म्हणजेच आनुवंशिक ‘कचरा’ (म्हणजे आनुवंशिक विकारग्रस्त लोक) नष्ट करणे. अशा प्रकारे रोगी, विकारग्रस्त लोक नष्ट केले की ते त्यांच्यासारखी नवी प्रजा जन्माला घालू शकणार नाहीत आणि मग हळूहळू अतिशय निरोगी व शुद्ध वंशाचेच लोक शिल्लक राहतील. ते त्यांच्यासारखीच प्रजा जन्माला घालतील व परीणामी निरोगी व शुद्ध वंशाचा समाज तयार होईल. प्लोएट्झचा सहकारी जर्मन जेनेटीसिस्ट हाय्नरीच पोल (१८७७-१९३९) याने या सिद्धांताची तुलना एखाद्या व्यक्तीला वाचवण्याकरता त्याच्या शरीरातील एखादा रोगग्रस्त अवयव कापून टाकण्याशी केली होती. त्यांच्या या प्रचाराचा आणि प्रयत्नांचा परिणाम असा झाला की अनेक जर्मन विद्यापीठांमध्ये ‘रेस बायोलॉजी’ (वांशिक जीवशास्त्र) आणि ‘रेशियल हायजिन’ (वांशिक स्वच्छता) या विषयांकरता प्राध्यापकांची पदे निर्माण करण्यात आली. प्लोएट्झ पुढे १९३० साली नाझींना सामीलच झाला. गंमत म्हणजे पोल हा ज्यू होता. ज्या यूजेनिक्स विचारांचा पुरस्कार त्याने केला, नाझींनी सत्तेत आल्यावर त्याच विचारांचा विस्तार करून ज्यूंनाही त्यात आणले व शास्त्रज्ञ म्हणून त्याचे करिअर संपवले. जर्मनीने लादलेल्या अनेक अटींसह त्याला जर्मनी सोडून स्वीडनमध्ये स्थलांतर करावे लागले.

आपल्या सिद्धांताने प्लोएट्झ्घ्ने ज्या लोकांना प्रभावित केले त्यात अर्थातच एक अ‍ॅडॉल्फ हिटलर होता. १९२० साली म्युनिकमधील हिटलरचा उठाव फसल्यानंतर त्याला जेव्हा अटक करण्यात आली, तेव्हा तुरुंगात त्याने प्लोएट्झच्या वांशिक विज्ञानाविषयी वाचले. जर्मन राष्ट्रवादाचा पुरस्कार करणार्‍या हिटलरला दोषपूर्ण जीन्स हा भक्कम, मजबूत, सबळ राष्ट्रनिर्मितीतील एक महत्त्वाचा अडथळा असल्याची खात्री पटली. सत्ता मिळाल्यावर १९३३ साली त्याने लॉ फॉर दि प्रिव्हेंशन ऑफ जेनेटिकली डिसिज्ड ऑफस्प्रिंग (आनुवांशिकदृष्ट्या रोगग्रस्त संततीच्या प्रतिबंधासाठी कायदा) असा कायदाच केला. स्टरलायझेशन लॉ (नसबंदी कायदा) या नावाने तो प्रसिद्ध झाला. या कायद्यानुसार आनुवंशिक रोगांची यादी तयार करण्यात आली आणि ते विकार असणार्‍या स्त्री-पुरुषांची सक्तीने नसबंदी करण्याकरता सरकारतर्फे अर्ज करण्यात आले. त्यावर निर्णय घेण्याकरता खास युजेनिक्स न्यायालये स्थापन करण्यात आली. या निर्णयाला लोकांचा पाठिंबा मिळवण्याकरता ऑफिस ऑफ रेशियल पॉलीसीतर्फे (वांशिक धोरण ठरवणारा विभाग) आनुवंशिकता या विषयावर चित्रपट बनवण्यात आले. आनुवंशिक विकारग्रस्त लोक हे कसे सदोष आणि समाजात अयोग्य आहेत हे या चित्रपटांतून लोकांच्या मनावर ठसवण्यात आले. एकुणातच नाझींनी आपल्याला, आपल्या नेत्याला आणि आपल्या धोरणांना लोकप्रिय करण्याकरता, लोकांचा पाठिंबा मिळवण्याकरता चित्रपट माध्यमाचा परीणामकारकरित्या वापर करून घेतला. आनुवंशिक विकारांनी ग्रस्त लोकांना मुले जन्माला घालण्यास बंदी करण्याकरता त्यांची सक्तीने नसबंदी करण्याच्या धोरणांनाही चित्रपटांद्वारेच लोकांचा पाठिंबा मिळवण्यात आला.

कायद्याचा विस्तार
एकदा लोकांचा पाठिंबा मिळतो आहे हे लक्षात आल्यावर कायद्याचा विस्तार करण्यात आला. धोकादायक गुन्हेगारांचाही नसबंदी कायद्यात समावेश करण्यात आला. धोकादायक गुन्हेगारांमध्ये राजकीय विरोधकांचा, लेखकांचा आणि पत्रकारांचाही समावेश करण्यात आला. दोनच वर्षांनी जर्मन लोकांचे आनुवंशिक आरोग्य राखण्याकरता न्यूरेंबर्ग कायदा करण्यात आला. त्यानुसार आनुवंशिक भेसळ टाळण्याकरता यहुदींना (ज्यू) जर्मन जोडीदाराबरोबर लग्न करण्यास आणि जर्मन बायकांना घरकामाकरता नेमण्यासही मनाई करण्यात आली. १९३४पर्यंत नसबंदीचे निर्णय घेण्याकरता २०० आनुवंशिक आरोग्य न्यायालये उभारण्यात आली. त्यांच्या कायदेशीर संमतीने दरमहा ५००० नसबंदी शस्त्रक्रिया केल्या जात होत्या. १९३३ ते १९४३ या दहा वर्षांत चार लाख नसबंदी शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
सक्तीच्या नसबंदीकडून नाझी हळूहळू आनुवंशिक विकारग्रस्त लोकांना ठार मारण्याकडे वळले. त्यांच्या नसबंदी कार्यक्रमाला मिळालेला लोकांचा पाठिंबा बघून त्यांचा आत्मविश्वास वाढला आणि त्यांनी वेगळ्या प्रकारे रोगी, विकारग्रस्तांना ‘दूर’ करण्याची मोहीम सुरू केली. त्याला निमित्त झाले ते १९३९ साली एका कट्टर नाझी दांपत्याच्या अर्जाचे. जन्मतः आंधळा असलेल्या आणि अवयवांमध्ये काही दोष असलेल्या आपल्या ११ महिन्याच्या मुलाला मारून टाकण्याची परवानगी मागणारा अर्ज या नाझी दांपत्याने हिटलरला केला. नाझी प्रचारामुळे आपल्या विकारग्रस्त मुलाला मारून आपण देशसेवाच करीत आहोत अशी त्यांची ठाम समजूत होती. हिटलरला पाहिजे होती ती संधीच मिळाली. त्याने लगेचच त्यांचा अर्ज मान्य केला आणि तोच नियम इतरही मुलांना लागू केला. त्यामुळे, तीन वर्षांखालील सर्व विकारग्रस्त मुलांना त्यांच्यावर उपचार केले जाणार आहेत असे सांगून त्यांच्या पालकांपासून दूर नेण्यात आले आणि मारण्यात आले. मुलांना मारून टाकण्याकरता देशभर ‘उपचार’ केंद्रे उभारण्यात आली. या मुलांना तात्पुरत्या उभारलेल्या उपचार केंद्रांवर पाठवले जात होते. तेथे त्यांच्या पालकांना आणून त्यांची उपचारांबद्दल खात्री पटवली जात होती. मग त्या मुलांना मारण्याच्या जागी नेण्यात येऊन ठार मारण्यात येत होते. मारल्यानंतर त्यांची खोटी मृत्यू प्रमाणपत्रे बनवण्यात येत होती आणि त्यात मृत्यूची काहीही वाटेल ती कारणे दिली जात होती. त्यामळे सरकार आपल्या मुलावर खरोखरच उपचार करीत होते, पण उपचार सुरू असतानाच काही कारणामुळे आपल्या मुलाचा मृत्यू झाला अशीच पालकांची भावना होती. आपल्या मुलांना पद्धतशीरपणे ठार मारण्यात येत आहे असे त्यातील बहुतेकांना वाटतच नव्हते. ज्यांना तसे वाटत होते त्यांच्यात याविरुद्ध आवाज उठवण्याची हिम्मत नव्हती.

हळूहळू तीन वर्षे वयाची मर्यादा वाढवून नेत अधिक मोठी मुले, मग तरुण, नंतर मोठ्या व्यक्ती यांचाही यात समावेश करण्यात आला. १९४१पर्यंत अडीच लाख लोकांना या प्रकारे ठार मारण्यात आले. त्यांचा गुन्हा फक्त इतकाच होता की ते कोणत्यातरी आनुवंशिक विकाराने ग्रस्त होते आणि त्यांच्यामुळे पुढच्या पिढीतही तो विकार येण्याची शक्यता होती. राष्ट्र सबळ निरोगी करण्याकरता असे रोगी, विकारग्रस्त आणि आपल्यासारखेच रोगी, विकारग्रस्त मुले जन्माला घालणारे लोक अस्तिवातच नसणे नाझींच्या दृष्टीने गरजेचे होते.
याच्या पुढची पायरी म्हणजे आंधळे, मुके, बहिरे, लंगडे, कमकुवत मनाचे या सगळ्यांचा आनुवंशिक विकारग्रस्तांमध्ये समावेश करण्यात आला आणि त्यांना संपविण्यात आले. सर्वांत भयानक प्रकार म्हणजे या सर्व वांशिक हत्येचे समर्थन करण्याकरता असंख्य शास्त्रज्ञांनी अगदी आनंदाने तर्क व तथाकथित शास्त्रीय संशोधनपर लेख पुरवले आणि हिटलरच्या विकृत निर्णयांना ‘शास्त्रीय’ आधार दिला, तर न्यायालयांनी त्यांना कायदेशीर ठरवले. एकुणातच नाझी प्रभावाखाली आलेला जर्मन समाज रोज मानवतेची एकेक खालची पायरी गाठत होता आणि बहुतांश जणांना सबळ राष्ट्रनिर्मितीच्या नावाखाली, राष्ट्रवादाच्या नावाखाली त्यात काहीच चुकीचे वाटत नव्हते. १९३६ साली म्युनिक विद्यापीठाने ‘रेशियल मॉफॉलॉजी ऑफ जॉ’ या विषयावरील प्रबंधाला पीएच.डी. दिली. जबड्याचा आकार हा वंशाने ठरतो आणि तो आनुवंशिक असतो असा ‘सिद्धांत’ या प्रबंधात मांडण्यात आला होता.

देश सामर्थ्यवान करण्याकरता वांशिक शुद्धिकरण करणे गरजेचे होते म्हणून मग निरोगी ज्यूंच्या हत्यांनाही सुरुवात झाली. साठ लाख ज्यू, दोन लाख जिप्सीज (भटके), लक्षावधी सोविएत आणि पोलिश नागरिक आणि असंख्य समलिंगी, लेखक, बुद्धिवादी, कलाकार आणि राजकीय विरोधकांना चक्क संपवण्यात आले. आपल्या कृती न्याय ठरवण्याकरता नाझींनी बिनदिक्कतपणे जीन्स, अनुवंशशास्त्र यांचा आधार घेतला. आनुवंशिक भेदभावाच्या भाषेत अगदी सहजपणे वांशिक संहाराची भाषा समाविष्ट करण्यात आली. एकीकडे ज्यूंना मारले जात असताना दुसरीकडे त्यांचा वापर भयानक प्रयोगांकरता करण्यात आला. डॉ जोसेफ मेंगला याने भूल न देता अवयव कापणे यासारखे असंख्य विविध प्रकारचे प्रयोग पकडलेल्या ज्यूंवर केले. मेंगला हिटलरच्या एसएसमध्ये अधिकारी होता. आपल्या पदाचा वापर करून छळछावण्यातील ज्यू निवडून हिटलरच्या आशीर्वादाने त्याने त्यांचा गिनिपिगप्रमाणे वापर केला. प्राण्यांवरच्या प्रयोगांकरताही काही नियम असतात, पण ते इथे माणसांवरील प्रयोगांकरताही ते नव्हते. जुळ्यांवरील प्रयोग करण्याकरता त्याने दोन जुळ्यांना एकमेकांना शिवून टाकले आणि त्यांच्यावर काय परिणाम होतो ते बघितले. जुळे एकसारखेच असतात का हे तपासण्याकरता त्याने अनेक जुळ्यांच्या अवयवांची मापे मोजली. हात पाय यासारख्या बाह्य अवयवांपासून तो आतील अवयवांकडे वळला. त्यांची शरीरे फाडून त्यांच्या अंतर्गत अवयवांची मापे तपासली. या प्रयोगांमध्येच अनेक ज्यू जुळे मेले.

एकूणच जुळ्यांचा खूपच अभ्यास नाझी शास्त्रज्ञांनी केला. गाल्टनने निसर्ग विरुद्ध पालनपोषण (नेचर वर्सेस नर्चर) अशी कल्पना मांडली होती. उंची, शरीराची ठेवण, बुद्धिमत्ता यासारखी माणसाची वैशिष्ट्ये ही नैसर्गिक आहेत का बाजूच्या वातावरणाने तयार केली आहेत, नेचर का नर्चर हे कसे ठरवायचे? जुळ्या मुलांमध्ये आनुवंशिक गोष्टी सारख्या असल्याने त्यांच्यात जो सारखेपणा आहे तो जीन्समुळे आणि जो फरक आहे तो आजूबाजूच्या इतर गोष्टींमुळे असा सिद्धांत त्याने मांडला. त्याचे विचार बरोबर असले तरी त्याच्या या सिद्धांतात एक मोठी गफलत होती. त्याने खरोखरचे आनुवंशिक एकसारखे असणारे आणि ज्यांचा जिनोम एकसारखा आहे असे जुळे (ज्यांचा जन्म फळलेले अंडे दुभंगल्यामुळे होतो) आणि जिनोम एकसारखा नसलेले साधे जुळे (ज्यांचा जन्म दोन शुक्रजंतूमुळे एकाच वेळी दोन अंडी फळल्यामुळे होतो) यांच्यात फरक केला नव्हता.

एकसारखे जुळे आणि साधे जुळे यांच्यात व्यवस्थित फरक करून ही गफलत दूर करून गाल्टनच्या सिद्धांताचा नव्याने अभ्यास करण्याची योजना हर्मन सिमेन्स (१८९१-१९६९) या नाझींबद्दल सहानभूती बाळगणार्‍या शास्त्रज्ञ्ााने १९२४ साली मांडली. मुळात आनुवंशिकता सिद्ध केली तरच वांशिक शुद्धिकरणाचे समर्थन करता येऊ शकेल. एखाद्या मुक्याला मारण्याकरता प्रथम त्याचे मुकेपण हे आनुवंशिक आहे हे सिद्ध करावे लागेल. काही रोगांच्या बाबतीत ते सिद्ध करणे सोपे होते. पण अनेक रोगांच्या बाबतीत ते करणे कठीण होते. सिमेन्सच्या सिद्धांताचा धागा पकडूनच मेंगलाने पुढे आपले भयानक प्रयोग केले. त्याने हजारहून जास्त जुळ्यांवर प्रयोग केले असल्याचा अंदाज आहे. एखाद्या विषाणूचा वा जीवाणूचा जुळ्यांवर सारखा परिणाम होतो की वेगवेगळा हे बघण्याकरता त्याने चक्क जुळ्यांच्या शरीरात विषाणू आणि जीवाणू टोचले. एका जुळ्याचे अवयव कापून ते दुसर्‍याच्या शरीराला शिवून काय परिणाम होतो ते तपासले.

पण त्याचे सर्व संशोधन अत्यंत सामान्य दर्जाचे होते आणि त्यातून काहीच निष्कर्ष निघाले नाहीत. त्याने केलेल्या नोंदी नंतर
ऑस्ट्विझ छळछावणीच्या संग्रहालयात ठेवण्यात आल्या. त्या पाहून एक संशोधक म्हणाला होता, ‘कोणताच शास्त्रज्ञ त्याकडे गंभीरपणे पाहू शकत नाही.’ आपल्या प्रयोगांनी मेंगलाने काय साध्य केले असेल तर एकच गोष्ट. त्याने केलेले भयानक प्रयोग जर्मनीच्या पाडावानंतर बाहेर आल्यावर त्याच्या भयानकतेमुळे तो विषयच इतका बदनाम झाला की शास्त्रज्ञांनी नंतर बराच काळ त्याकडे ढुंकूनही बघितलेच नाही.

शास्त्रज्ञांचे स्थलांतर
नाझींच्या कारवायांमुळे बाकी काही नाही तरी विज्ञानाचा एक फायदा नकळत झाला. हिटलरच्या ज्यूंविरुद्धच्या आघाडीचा अंदाज येऊ लागल्यावर जर्मनीतील अनेक शास्त्रज्ञ देश सोडून निघून गेले. जर्मनी हे तेव्हा विज्ञानाचे माहेरघर असल्याने तेथे अनेक उत्तमोत्तम शास्त्रज्ञ, वैज्ञानिक, संशोधक विविध संस्थांमध्ये काम करीत होते. १९०१ ते १९३२ या बत्तीस वर्षात पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र आणि वैद्यकीय शास्त्रात जे १०० नोबेल पुरस्कार देण्यात आले त्यातील ३३ जर्मन शास्त्रज्ञांना देण्यात आले होते. त्या तुलनेत केवळ १८ ब्रिटिश शास्त्रज्ञांना आणि केवळ सहा अमेरिकन शास्त्रज्ञांना देण्यात आले होते. यावरून जर्मनी ही विज्ञान क्षेत्रातील संशोधनाची कशी पंढरी होती ते लक्षात येते. तेव्हा अल्बर्ट आइनस्टाइन (१८७९-१९५५) वैâसर विल्यम इन्स्टिट्यूट ऑफ फिजिक्समध्ये संशोधन करत होता. १९३२मध्ये हर्मन म्यूलर (१८९०-१९६७) बर्लिनमध्ये काम करण्याकरता आला. ऑट्टो हान (१८७९-१९६८) हा रसायनशास्त्रज्ञ अणू भंजन करण्याचा प्रयत्न करीत होता. असे अनेक नामवंत शास्त्रज्ञ विविध जर्मन संस्थांमध्ये संशोधन करत होते.

परंतु, नाझींच्या वाढत्या प्रभावाबरोबर बदलणारी परिस्थिती त्यांच्या लक्षात येत होती. १९३३ साली सर्व सरकारी विद्यापीठांतील ज्यू प्राध्यापकांना त्यांच्या पदांवरून दूर करण्यात आले. ही धोक्याची घंटा ओळखून अनेक ज्यू शास्त्रज्ञ दुसर्‍या देशांमध्ये गेले. त्याच वर्षी आइनस्टाइन एका परिषदेकरता अमेरिकेला गेला आणि त्याने जर्मनीला परत जायचे नाकारले. तो तेथेच स्थायिक झाला. क्रेब्ज हान्स (१९००-१९८९), विल्यम फेल्डबर्ग (१९००-१९९३), अर्नेस्ट चेन (१९०६-१९७९) हे सर्व जर्मनी सोडून पळून गेले. मॅक्स पेरूट्झ (१९१४-२००२) १९३७ साली केंब्रिजला गेला. परिस्थिती जसजशी अधिक वाईट होत गेली तसतसे अनेक ज्यू नसलेले शास्त्रज्ञही त्यांना कोणताच धोका नसतानाही नैतिकतेच्या मुद्यावर आपला देश सोडून गेले. यात जर्मन विज्ञानाचे नुकसान झाले. पण त्यात जगाचा मात्र फायदा झाला. जे शास्त्रज्ञ देश सोडून गेले त्यातील अनेक जण आनुवंशिकतेच्या विविध पैलूंवर काम करीत असल्याने आनुवंशशास्त्राचा फायदा झाला.

पण त्याचबरोबर हेही लक्षात घेण्याची गरज आहे की अनेक शास्त्रज्ञ जरी देश सोडून गेले तरी इतर अनेक देशांत राहून हिटलरला हवे असलेले संशोधन करत होते. त्यात अगदी अणुबॉम्बचेही संशोधन सुरू होते. देशातच राहून नाझींच्या वैज्ञानिक प्रयत्नांना मदत करण्याकरता संशोधन करणार्‍या हुशार शास्त्रज्ञांची संख्याही काही कमी नव्हती. अनेक न्यूरोलॉजिस्ट नाझींना सहकार्य करत होते. पण त्यातील काही नंतर गैर-आर्यन ठरल्याने ते बळी पडले. डसेलडॉर्फ युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्ये वैद्यकशास्त्राचा इतिहास आणि नैतिकता शिकवणारे हेनर फॅनोराऊ, डसेलडॉर्फमधील हेनरिक हेन विद्यापीठातील मायकेल मार्टिन आणि कोलोन विद्यापीठातील एक्सेल कारेनबर्ग यांनी जर्मन सोसायटी ऑफ न्यूरोलॉजिस्टकरता थर्ड राईश (नाझी काळ) काळातील न्यूरोलॉजिस्ट या विषयावर विस्तृत संशोधन केले आहे.

जे शास्त्रज्ञ देश सोडून गेले त्यातील अनेकांनी केवळ देशच बदलला असे नाही तर आपल्या संशोधनाच्या, अभ्यासाच्या शाखाही बदलल्या. त्यातून संशोधनाच्या नव्या शाखा पुढे आल्या. विज्ञानातील नव्या प्रश्नांकडे आपल्या अभ्यासाचा मोहरा वळवण्याची संधी त्यांनी साधली. विविध शाखांच्या एकत्रीकरणातून यातील बर्‍याच शास्त्रज्ञांनी जनुके, जिनोम, आनुवंशशास्त्र याबद्दलच्या संशोधनाकडे आपले लक्ष वळवले. त्यातून हे शास्त्र एकदम पुढे गेले.

असे असले तरी आपले राजकारण पुढे रेटण्याकरता राजकारणी विज्ञानाचा आपल्या सोयीने किती भयानक प्रकारे वापर करून घेतात आणि वैज्ञानिकही तो त्यांना कसा करून देतात याचा काळाकुट्ट इतिहास म्हणजे जर्मनीतील नाझी कालखंड.

Previous Post

चला! `काजवा स्नेही महोत्सव’ आयोजित करू या!

Next Post

खेळकर रंगरूपातली ‘दोस्ती’!

Next Post
खेळकर रंगरूपातली ‘दोस्ती’!

खेळकर रंगरूपातली ‘दोस्ती’!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.