नावात काय आहे? तर नावातच खूप काही आहे. उत्सुकता वाढविण्याची ही पहिली पायरीच. या नाटकात अगदी नावापासूनच एकेक योगायोग जुळून आलेत किंवा जुळवून आणलेत! ‘ही दोस्ती तुटायची नाय’ हे टायटल. महेश कोठारे यांच्या ‘धडाकेबाज’ या चित्रपटातलं गाजलेलं हे गाणं. एकेकाळी क्लिक झालेलं. म्हणून एवढ्या लंब्याचौड्या टायटलची निवड केलेली दिसते. दुसरा ‘योग’ म्हणजे याच नाटकाचा नाटककार ओंकार गोखले याचा लेखकांच्या टीममध्ये समावेश असलेला ‘आता थांबायचं नाय!’ हा गेल्याच वर्षी ‘झी’ स्टुडिओने प्रदर्शित केलेला चित्रपट चर्चेत आहेच. आधीचा चित्रपट ‘नाय’. आता नाटकही नाय’. असो. नाटकाकडे वळू या.
मानसी शशांक सदावर्ते आणि शशांक सदावर्ते हे प्रौढत्वाकडे झुकत असलेले दांपत्य. त्यांना एक मुलगा आहे. जो परदेशी शिक्षणासाठी गेलाय. शशांक हा हाडाचा पत्रकार, वर्तमानपत्रात नोकरी करतोय, तर मानसी ही गृहिणी. तिला कविता करण्याचा छंद आहे. नवर्यावर प्रेम आणि त्याची काळजी घेण्याचा तिचा स्वभाव. काहीशी वेंधळी. या दोघांचे शाळेपासून प्रेमप्रकरण नंतर लग्नात रूपांतरित झालेले. पन्नाशीतलं हे जोडपं. अचानक एका क्षणी मानसीच्या मनात घटस्फोट घेण्याचा विचार येतो. त्यावर ती ठाम आहे! त्यामुळे नाटक कलाटणी घेते. सुखी संसारात घटस्फोटाच्या विचारापर्यंत मानसी का आलीय, याला प्रारंभी काहीएक लॉजिक दिसत नाही. हादरून सोडणारा तिचा हा निर्णय मुलालाही कळविण्यात येतो…
सुरभी आणि आदित्य हे नामांकित मॅरेज कौन्सिलर जोडपं. त्याचं घर आणि ऑफिस एकच. घटस्फोटाची शेकडो प्रकरणं सोडवून त्यांनी पुन्हा संसार उभे केलेत. वादामध्ये समेट घडवून आणले आहेत. त्यासाठी त्यांची ऑनलाईन सेशन्सही सुरू आहेत. मानसी आणि शशांक हे दोघे त्यांच्या ऑफिस कम् घरी पोहोचतात. या दोघांच्या घटस्फोटाची नेमकी कारणे काही केल्या हाती लागत नाहीत. कुठलेही दोघांमध्ये भांडण नाही, दुरावा नाही, वाद-विवाद नाही, गंभीर आजार नाही, व्यसनं नाहीत, प्रॉपर्टीचे वाद नाहीत किंवा दोघांची बाहेर कुठलीही प्रेमप्रकरणही नाहीत. उलट ती काळजीपोटी त्याला ‘बीपीच्या’ गोळ्या देते. तोही तिची काळजी घेतोय. अशावेळी घटस्फोट का, कशाला, हा प्रश्न समुपदेशकांचा एकच गोंधळ उडवितो.
मग घटस्फोटाच्या कारणांचा शोध घेण्यासाठी ते आता नवी वाट निवडतात. त्यासाठी दोघांना सज्ज होण्याच्या सूचना देतात. डोळे बंद करून दोघांनाही गतआयुष्यातील आठवणींमागे जाण्याचा उपचार सुरू होतो. भूतकाळ जिवंत करण्यासाठी सामोरं जावं लागतं. नाट्यपूर्ण असा हा नवा खेळ सुरू होतो आणि त्यांच्या लव्हस्टोरीतले नाजूक असे कंगोरे उघड होतात. शाळेत भेटणारे मित्रमैत्रीण ते आपल्या मुलाला विमानतळावर पोचविण्यासाठी आलेले पालक इथपर्यंतचा त्यांचा प्रवास नजरपुढे येतो.
सुखी संसारात मानसीला बदलत्या काळात सोशिकतेमुळे भावनांचा कोंडमारा झाल्यागत वाटतो. स्वतःच्या अस्तित्वाची ओळख दुर्लक्षित होत असल्याचे जाणवते. नवर्यासमोर दुय्यम स्थान मिळत असल्याची खंत वाटते. शशांक आपल्याला सतत गृहित धरतो, थट्टा-मस्करी करतो, ही जाणीव तिला होते. स्त्रीत्वाचा अपमान सहन करून उर्वरित आयुष्य असेच ‘जैसे थे’ विनातक्रार जगायचं, हे आता तिला मान्य नाही. तिच्या कवितांचे पुस्तक प्रकाशन हे निमित्त ठरते. स्वकर्तृत्व सिद्ध करण्यासाठी तिला घटस्फोट हवाय.
आता समुपदेशक दाम्पत्य या पेचातून काही मार्ग काढतं का, दोघे पुन्हा एकत्र येतात का, हे सगळं नाटकातच पाहायचं. घटस्फोटापर्यंत पोहोचलेल्या सुशिक्षित दांपत्याची समस्या आपल्याला किती अंतर्मुख करते किंवा त्यामुळे कितपत अस्वस्थ होणं भाग पडतं, यावरच नाटकाचं यश अवलंबून आहे. नेमक्या पद्धतीने स्त्रीमनाचा घेतलेला मागोवा, त्याला दिलेली ट्रीटमेंट, त्यामुळे हे नाट्य प्रत्येक टप्प्यावर वैशिष्ट्यपूर्ण ठरते. मानसीचा दृष्टिकोन दोघांच्या मनाला दिलासा देणारा ठरतो. मौन बाळगून वास्तव ती नजरेआड करीत नाही. यामुळेच तिला आयुष्यात आशेचा किरण दिसतो. कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी मिळते. पुरुषाला दुय्यम स्थान देऊन तिला प्रथम स्थानाचा दर्जा देणे म्हणजे स्त्रीमुक्तीचा अर्थ होत नाही. तर स्वतंत्र व्यक्तिमत्व म्हणून तिला स्वातंत्र्य, सन्मान, घरादारात, समाजात मिळणे गरजेचे आहे. असा विचार हा नव्या पिढीचा पुणेकर प्रायोगिक तरुण नाटककार ओंकार गोखले यांनी विनोदाच्या अंगाने प्रभावीपणे मांडला आहे. आजच्या काळाची त्याला जोड आहे, त्यामुळे हे कथानक संदर्भहीन वाटत नाही, तर एखाद्या सत्यघटनेचा आविष्कारच वाटतो. दुसर्या अंकातील मानसीचं स्वगत संकलित केलं तर नाट्यवेग वाढू शकेल आणि मनोगत अधिक प्रभावी बनेल. चित्रपट हाती असूनही नाट्यलेखनाकडे, नव्या वेगळ्या विषयांकडे नाटककाराचे लक्ष आहे. त्याबद्दल ओंकारचे कौतुक!

या नाटकात दोन दांपत्यांच्या जोड्या आहेत. तिथेही योगायोग! कारण दोन्ही जोड्या प्रत्यक्ष जीवनातही दांपत्यच आहेत. त्यामुळे एकूणच देहबोलीत सहजता आलीय. कुठेही कृत्रिमता दिसत नाहीच. मानसी सदावर्देच्या भूमिकेत चिन्मयी सुमीत आणि शशांक अर्थातच सुमीत राघवन. तर समुपदेशक दांपत्य- सुरभीच्या भूमिकेत अमृता बने आणि आदित्य- शुभंकर एकबोटे. या चौघा जणांची ही टीम. १४ वर्षानंतर सुमित-चिन्मयी ही रसिकांची लाडकी जोडगोळी नव्या दमाने अवतरली आहे. २०१२च्या ‘लेकुरे उदंड झाली’नंतर दोघेजण एकत्र दिसताहेत. त्यांच्या वैयक्तिक संसारालाही ३० वर्षे पूर्ण झालीत.
चंदेरी-रुपेरी दुनियेतला बालकलाकार म्हणून सुमितचा सुरू झालेला रंगप्रवास. मालिका, जाहिराती, चित्रपट, नाटक, निवेदन या क्षेत्रात प्रदीर्घ काळ वावर असल्याने अनुभवांचे पाठबळ त्याच्या गाठीशी आहे. त्यामुळे या नाटकाची निर्मिती आणि प्रमुख भूमिका त्याने ताकदीने पेलली आहे. पत्रकार शशांक म्हणून तो फिट्ट शोभून दिसतो. गाणे, नृत्य, रसिकांशी थेट संवाद यातून भूमिका बहारदार करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. समुपदेशकांच्या घरात दारू ढोसून केलेला कहर हा धम्मालच उडवितो. पहिल्या अंकात काहीसा आक्रमक तर दुसर्या अंकात मानसीपुढे शरणागती, हा फरक नजरेत भरतो. प्रेक्षकांमध्ये त्याने धरलेल्या नृत्य-गाण्याचा ताल म्हणजे एक ‘इन्व्हेंट’ ठरतो.
चिन्मयीने चांगली सोबत केली आहे. नवर्याची काळजी प्रमाणापेक्षा अधिक घेणारी, पत्नी ही एकीकडे तर दुसरीकडे मानासिक कोंडमारा सहन न झाल्याने निश्चयी, आक्रमक बनलेली स्त्री, हा बदल चांगला आकाराला येतोय. शेवटचे तिचे स्वगत हृदयस्पर्शी, हेलावून सोडणारे आहे. एकूणच सुमित-चिन्मयी या दोघांचे ट्युनिंग मस्त जमले आहे.
अमृता बने आणि शुभंकर एकबोटे हे समुपदेशक तज्ज्ञ जोडपं केवळ संवादापुरतं नाही तर त्यांचीही स्वतंत्र कथा-व्यथा आहे. करिअरबद्दल दोघांना असलेला आत्मविश्वास विलक्षण. या दोघांनी घेतलेली प्रश्नोतरांची मालिका आणि यातून उलगडत जाणारी गोष्ट नाट्याची गती वाढविण्यास मदत करते.

दिग्दर्शक सूरज पारसनीस याने नाट्य उभे करताना भूतकाळातले प्रसंग खुबीने उभे केलेत. शाळेतला प्रसंग तसेच बस स्टॉपवरली भेट- यांतील दोन काळातला फरक चांगला आहे. नाट्य कुठेही रेंगाळणार नाही याची दक्षता घेण्यात आलीय. चिन्मयी- सुमित यांच्यावर लक्ष केंद्रित होण्यासाठी जुळवाजुळवी केली आहे. तांत्रिक बाजूंवरही हुकमत दिसते. लेखन, दिग्दर्शन हे तरुणाच्या हाती सोपविल्यामुळे ‘फ्रेश’ ट्रीटमेंट नजरेत भरते.
सस्पेन्स नाटकांमुळे लक्षवेधी ठरलेला नाटककार नीरज शिरवईकर याने नेपथ्यकार म्हणून नवी जबाबदारी कल्पकतेने पेलली आहे. ऑफिस आणि बेडरूम याची मांडणी उत्तम. सातवीच्या वर्गाचा दरवाजा, स्कूटरचा आभास, बसस्टॉप- हे सारं नेमकेपणानं आहे. उभारणीसाठी वेळ न दडवता त्यात सहजता दिसते. निरद-सुमित यांचे संगीत यथायोग्य. तालासुरात सारं काही घडत जातं. खुशबू जाधव हिने सार्यांना चांगले नाचविले आहे. कार्यकारी निर्माती आणि नृत्यदिग्दर्शिका अशी दुहेरी भूमिका आहे तिची. तेजस देवधर यांची प्रकाशयोजना, शरद सावंत याची रंगभूषा, शिवप्रिया सुर्वे हिची गाणी यांनी ही ‘दोस्ती’ परिपूर्ण आहे. एकूणच तांत्रिक बाजूंची जुळणी उत्तम. वेशभूषा आणि रंगभूषा यांची कामगिरीही उत्तम. त्यातून वयाचा बदल नजरेत भरण्यास मदत होते. निर्मितीमूल्ये पूरक आहेत.
वसंत कानेटकर यांचे पंखांना ओढ पावलांची, जयवंत दळवी यांची सावित्री, सई परांजपे यांचे माझा खेळ मांडू दे, प्रशांत दळवींचे चारचौघी, गजेंद्र अहिरे यांचे आईच घर उन्हाचं अशा काही नाटकात कालानुरूप स्त्रियांचा दृष्टिकोन मांडला आहे. स्वतःचं अस्तित्व, कर्तृत्व सिद्ध करण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा दिसते. त्यासाठी पारंपरिक चौकटीतून मुक्त होण्याचा या नायिकांचा प्रयत्न प्रामुख्याने दिसतो. त्याच वाटेवरली ही ‘दोस्ती’ नव्या रंगरूपात खेळकर शैलीत मांडण्यात हा आविष्कार यशस्वी झालाय.
ही दोस्ती तुटायची नाय…
लेखक – ओंकार गोखले
दिग्दर्शक – सूरज पारसनीस
नेपथ्य- नीरज शिरवईकर
प्रकाश – तेजस देवधर
संगीत – निरद सुमित
वेशभूषा – कल्याणी कुलकर्णी-गुगळे
रंगभूषा – शरद सावंत
कार्यकारी निर्माती – खुशबू जाधव
निर्माते – दिलीप जाधव, सुमित राघवन, चिन्मयी सुमित
सूत्रधार – प्रणित बोडके
निर्मिती संस्था -अष्टविनायक/ नाट्यलीला थिएटर्स

