परवा राजेंद्र महाराजांशी फोन झाला. ओम कितवीत जाईल रे आता? असं महाराजांनी विचारताच मी उत्तरलो, जाईल नाही हो महाराज, गेला तो सातवीत. सुरू पण झाली म्हटलं शाळा त्यांची! अरे म्हणाले, फारच बदललीये नाही का सगळीच पद्धत? आपल्या वेळी वार्षिक परीक्षा संपून एकदाच उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागायच्या आणि मग थेट जूनच्या मध्यावर शाळा उघडत. पावसाने नुकतीच लावलेली हजेरी, आभाळात काळे ढग आणि सगळ्या चरचरात नव्याने डोकावणारी हिरवी पाती! छान असायंच नाही का ते वातावरण? असे अनेक मुद्दे पुढे येताना शालेय खरेदीचा विषय निघाला. वह्या पुस्तकांची आणि बाकी साहित्याची जुळवाजुळव हा फार आवडीचा प्रांत असतो नं प्रत्येकाचाच? पुस्तकंही खूप बदलली आहेत म्हटलं महाराज. पूर्वीसारखी बालभारतीची पुस्तकं नसतात ओमची. एक गोष्ट मात्र म्हटलं अजूनही तशीच आहे, त्या कोर्या पुस्तकांचा कोरा करकरीत सुगंध! कागद, शाई वा छपाई, पुस्तक बांधणीसाठी वापरले जाणारे चिकटवण्याचे वगैरे साहित्य ह्या सर्वांच्या मिलाफातून तो एक शब्दातीत, अवर्णनीय असा विशिष्ट गंध तयार होतो. हा गंध न आवडणारा वा नव्या पुस्तकाला हुंगण्याचा मोह न होणारा माणूस विरळाच!
मला आठवतंय, नव्या आणलेल्या वह्यापुस्तकांचा हा गंध कित्येक दिवस सोबत करायचा! कमी अभ्यास करणार्या विद्यार्थ्याच्या बाबतीत, ह्याच्या पुस्तकांचा वास सुद्धा नसेल उडाला अजून असे सर्रास बोलले जायचे, इतका हा गंध नव्या पुस्तकाची ओळख बनलेला असे. माझं पहिलं पुस्तक प्रकाशित झालं, तेव्हाही ते हातात घेऊन न्याहाळताना नकळत नाकाजवळ नेलं गेलं नी तान्हुल्याच्या जावळाच्या गंधास्पर्शाने सुखावलेल्या मातापित्यासारखी माझी अवस्था झाली!
ह्या गंधाचा पुस्तकाच्या विषयाशी काही संबध नसतो, म्हणजे मराठीचं पुस्तक जास्त सुगंधी वा गणिताचं जरा कमीच… असं काहीच नाही! विषय कठीण वा सोपा हा भाग नंतर येतो, पण आनंद मात्र कोणत्याही कोर्या पुस्तकाचा गंध सारखाच पसरवतो! कालांतराने तो पुस्तकाचा नवेपणा ओसरतो पण त्यातले ज्ञान नकळत आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनते की नाही?
आयुष्याची, रोजच्या दिवसाची वा येणार्या प्रत्येक घडीची तुलना ह्या कोर्या गंधित पुस्तकाशी किती सहज होते बघा. येणारा प्रत्येक कालखंड हा नवा अध्याय वा नवे पुस्तक असल्यासारखा कोणताही दूषित पूर्वग्रह मनात न ठेवता उलगडला तर तो सुगंधी असतो हे नक्की. बघा, एखादं पान वा एखादा विभाग कठीण किंवा नावडता ठरला तर काय आपण संपूर्ण पुस्तकालाच दुरावतो का? नाही नं? मग तसेच आयुष्याच्या वाटेवरही कटुगोड अनुभवांची शिदोरी यथावकाश उलगडत जातेच की हो! एखाद्या नकोशा अनुभवाने का मग संपूर्ण जीवनाकडेच नकारात्मकतेने बघायचे का? धडा कठीण असला तरी का त्या सुगंधाला मुकायचे?
पुस्तकाचे एकच पान जसे कायम उघडे राहून उपयोग नसतो किंवा ते यथायोग्य वेळी नक्की पालटावेच लागते नं, तसेच कोणत्याच गोष्टीला फार धरून ठेवण्यात सुज्ञता नसते. पुढच्या पानांत काय दडलेय हे जसे माहित नसते आणि त्याकरिता आपली तयारी करण्याचे काम अलिकडची पानं करत असतात, तसेच भूतकाळातील अनुभवांचा वापर, वर्तमान समृद्ध व भविष्यकाळ उज्ज्वल करण्यासाठी करायचा असतो.
एखादी गोष्ट माझ्याच वाट्याला का आली, असा मनात विचार आला की मनोमन देवाला हात जोडावेत. बा परमेशा ही परिस्थिती हाताळण्याची पात्रता मला दिली आहेस म्हणूनच ही परिस्थितीही दिली आहेस रे दयाळा. ज्याच्या त्याच्या वकुबानुसारच ज्याची त्याची वाटचाल अधोरेखित असते हे नक्की. काही कारणानी असलीच तर पूर्वीची कटुता आणि नकारात्मकता जितकी लौकर मागे सारता येईल तेवढी आपली माणूसपणाची वाटचाल वेगवान होते. दगड मग तो लहान असो वा मोठा पतंगाला जसा खाली खेचतो तशीच कटुता वा नकारात्मकताही आपल्याला मागेच खेचते. अनुभवांतून लाभलेले शहाणपण नाकारायचे नसले तरी त्यावेळच्या मनोदेहिक कष्टांना मात्र कुरवाळत बसून फायदा नसतो. कालचा दिवस काल संपला, होणारा सूर्योदय आजचा असेल, आजच्या अनेक नव्या संधी माझे दार ठोठावायला सरसावलेल्या असतीलच आणि माझ्या कुवतीनुसार मी त्यांचे सोनेच करीन, हा पक्का विश्वास एकदा का मनात रुजवला नं की मग नकळतच प्रत्येकच दिनु सोनियाचा दिनु बनतो ह्याची शाश्वती! नव्या क्षणाला खुल्या मनोभूमिकेने सामोरं गेलं की आपोआपच तो क्षणही नवा सुगंधी अध्याय उलगडतो, प्रगतीच्या अनेक आयामांशी आपली नाळ जोडतो. अगदी त्या कोर्या पुस्तकाच्या गंधासारखाच मनोमन सुखावतोही!

