एका वर्षानंतर देशात पुन्हा रामराज्य अवतरेल आणि महाराष्ट्रात तर स्वर्गसुखाचे नंदनवन प्रगटेल या सुखस्वप्नात माझा मानलेला परमप्रिय मित्र पोक्या याला झोप कधी लागली ते कळलेच नाही. नेहमीच महागाई, टंचाई, दुष्काळ, अन्याय, अत्याचार यांच्या कोंडीत सापडून सारखा तोच विचार करणार्यांचा त्याला मनापासून राग आला. कितीही संकटे, दु:खे, अडीअडचणी आल्या तरी माणसाने हताश न होता त्यांचा धैर्याने सामना करावा; आयुष्य आज आहे, उद्या नाही, त्यामुळे मिळेल तो क्षण आनंदाने हसत हसत जगून घ्यावा हे तत्वज्ञान त्याने अलिकडे अंगी बाणले होते. त्या रात्री तो सुखात झोपला. पहाटे अर्धवट जाग आल्यावर वर्षभरानंतर सुखाच्या राशीवर लोळतानाची स्वप्ने त्याने डायरीत सविस्तर लिहून काढली आणि पुन्हा निद्रादेवीच्या मिठीत गेला. सकाळचे आठ वाजले तरी तो घोरतच होता. मात्र त्याची डायरी माझ्याजवळ होती. मी अधाशासारखी काही पाने वाचून काढली. त्यातील काही भाग-
बघता बघता एक वर्ष कधी निघून गेले ते कळलेच नाही. सोन्याची लंका हे शब्द ऐकून माहीत होते, पण आज सोन्याच्या विटांचे माझ्या घराचे बांधकाम पाहिले आणि धन्य झालो. या महाराष्ट्राला, देशाला आणि माझ्या घराला सोन्याचे दिन कधी काळी येतील, असे वाटलेच नव्हते. पण मोदींनी चमत्कार केला आणि आपला शब्द खरा करून दाखवला याबद्दल त्यांचे किती आणि कसे आभार मानू हेच कळेनासे झाले आहे.
माझी रिलेशनशिपमधील मैत्रीण तर आता इतकी खूश होईल की विचारूच नका. मोदींनी वर्षभर सोने खरेदी करू नका असे आवाहन केल्यावर केवढी खट्टू झाली होती ती. आता मी म्हणेन, दादरच्या पेठेंपासून पेडणेकरांपर्यंत कुठल्याही मराठी ज्वेलर्सच्या दुकानात जा आणि तुला हव्या त्या डिझाइनचे डोक्याच्या बिंदीपासून पैजणांपर्यंत हवे ते दागिने खरेदी कर. मला तू सुवर्णसुंदरी दिसली पाहिजेस. वर्षभर मनावर ताबा ठेवल्याने सरकारही प्रत्येक घरात किमान पंचवीस तोळे सोने बक्षीस म्हणून देणार आहे. आहेस कुठे? शिवाय तुझी इच्छा होती ना, आपली स्वत:ची मर्सिडीझ कार हवी म्हणून! आता जगातली कुठलीही महागडी कार घेऊ शकतो आपण, तू फक्त नाव सांग, कार हजर. पेट्रोल, डिझेल, इलेक्ट्रिक कसलाही खर्च नाही. अल्कोहोलवर चालणार्या कार आल्यात आता. पेट्रोल-डिझेल पंप गेले आता बाराच्या भावात. तुमच्या आवडत्या ब्रँडची व्हिस्की, रम, ब्रँडीचे पंप दिसतील आता गल्लोगल्ली. गाडीला झिंग पण लवकर येते आणि चालतातही तुफान. कंटाळा आल्यास डायरेक्ट टाकीतून पेग मारण्याची सिस्टीमही आहे गाडीला. आता सामान्य लोकांचे आलिशान कारचे स्वप्न प्रत्यक्षात उतरलेच आहे ही मोदीजींची कृपा.
आणि शेतकरी-कष्टकरी किती आनंदलाय बघ. आता कशासाठीही कसल्याही रांगा नाहीत. वर्षभरात सरकारने पाइपगॅस लाइनचे भूमिगत जाळे टाकलेय देशात. आणि तो गॅसही फुकट. त्याचे सारे श्रेय मोदीजी ट्रम्पसाहेबांना देतात. माणूस वाटतो इतका मूर्ख मुळीच नाही असे शिफारसपत्रही दिलेय त्यांना मोदींनी. शेवटी कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. वाईटातून चांगले निघते ते असे. पावसाळाही वेळेआधीच सुुरू झाला आहे. मुबलक पाणी माणसाची आणि शेतीची तहान भागवत आहे. आता शहरात-गावात कुठेही पाणी तुंबणार नाही. मुंबईतल्या तर सगळ्या नदीनाल्यातील गाळ पूर्णपणे काढून झालाय. नितळ पाणी दिसतेय नाल्यात. खेड्यापाड्यातील खडकाळ, दुर्गम, अरुंद रस्ते आता नावालाही दिसणार नाहीत. समृद्धी महामार्ग काहीच नाही इतके सुंदर रस्ते गावागावात बनविले आहेत. आता एखाद्या गंभीर रुग्णाला किंवा गरोदर महिलेला झोळीतून इस्पितळात न्यावे लागणार नाही. उलट दर अर्ध्या तासाच्या अंतरावर सुसज्ज रुग्णालये उपलब्ध आहेत. रुग्णवाहिका तर सदैव तत्पर आहेत. उपचार पूर्णपणे मोफत आहेत. आरोग्याच्या बाबतीत इतका प्रगतशील महाराष्ट्र आजपर्यंत कोणीही पाहिला नसेल.
बेरोजगारांची टिंगलटवाळी करणे हा काहींचा छंद आहे. त्याकडे दुर्लक्ष करून महाराष्ट्रातील प्रत्येक बेरोजगाराला दर महिना किमान तीस हजार रुपये आता देण्यात येत आहेत. त्याशिवाय त्याला उद्योगासाठी हवे तेवढे कोटीचे भांडवल पुरवण्यात येत आहे, तेही परत न फेडण्याच्या अटीवर. ज्यांनी लाखो रुपये लाच देऊन आयएएसपासून मोठमोठ्या अधिकाराच्या जागा मिळवल्या आहेत, अशा उमेदवारांच्या ज्ञानाची योग्य परीक्षा घेऊन त्यात ते अपात्र ठरल्यास त्यांची तात्काळ हकालपट्टी करण्याचा आदेशही निघाला आहे. त्यामुळे इंग्रजीबरोबर कसल्याही ज्ञानाचा ओ की ठो माहीत नसणार्या परप्रांतीयांच्या जागी आपली मराठी मुले विराजमान होणार आहेत. पेपरफुटी प्रकरणात अडकलेले मोठमोठ्या नावाजलेल्या क्लासेसचे संचालक आणि संबंधित प्राचार्य जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत.
देशात सगळ्यांचे पगार वाढले आहेत आणि जीवनावश्यक वस्तू अगदी माफक किंमतीला मिळत आहेत. आताची शिक्षणपद्धती आणि परीक्षापद्धती यात आमूलाग्र बदल करण्यात आला असून या दोन्ही पद्धती रद्द ठरविण्यात आल्या आहेत. त्याऐवजी बालवयापासून पूर्वीची गुरुकुलपद्धती आचरण्यास सुरुवात झाली आहे. मुलांनी तिथे राहूनच योगापासून चारही आश्रमांचे शिक्षण घ्यावे ही संकल्पना आहे. माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे, सेवा हाच खरा धर्म या तर्हेची शिकवण या गुरुकुलातून देण्यात येत आहे. या देशातील बदमाश राज्यकर्त्यांनी अवैध मार्गाने मिळवलेली संपत्ती जप्त करण्यात आली असून अशा नेत्यांना तुरुंगात टाकण्यात आले आहे. दशदिशात आनंदाचे वातावरण आहे. प्रत्येक व्यक्ती निर्भय मनाने जगत आहे. ही सारी विश्वगुरुंची किमया!

