
संतांचिया पायी माझा विश्वास।
सर्वभावे दास जालो त्यांचा॥१॥
ते चि माझे हित करिती सकळ।
जेणे हा गोपाळ कृपा करी॥२॥
भागलिया मज वाहतील कडे।
त्यांचियाने जोडे सर्व सुख॥३॥
तुका म्हणे शेष घेईन आवडी।
वचन न मोडी बोलिली ते॥४॥
प्रस्तुत अभंगात तुकोबाराय त्यांचा संतांवरचा विश्वास ठामपणे मांडतात. इथे तुकोबाराय संतांच्या ‘पायावर विश्वास ठेवतो’ असं म्हणतात, यातील पाय म्हणजे पाऊल. पाऊल म्हणजे मार्ग. संत त्यांच्या पावलांनी ज्या मार्गाने गेले त्याच मार्गाने आम्ही जात आहोत असं तुकोबाराय सांगतात. इथे पाय, पाऊल आणि मार्ग हे शब्द विचार या अर्थाने आलेले आहेत. आजही व्यवहारात पावलावर पाऊल ठेवून चालणं म्हणजे त्यांनी अनुसरलेल्या विचारांच्या मार्गाने जाणं असंच मानलं जातं. तुकोबांप्रमाणेच ‘मार्ग दावूनि गेले आधी। दयानिधी संत ते॥’ असं निळोबाराय म्हणतात.
तुकोबाराय म्हणतात की मी संतांवर विश्वास ठेवला आणि सर्व भावाने त्यांचा दास झालो. संतांचा दास होणं म्हणजे त्यांच्या वचनांचं अनुकरण करणं. ‘म्हणविता त्यांचे दास। पुढे आस उरेना॥’ जो संतांचा दास होतो तो आशापाशातून मुक्त होतो. या जगात अगदी देवही आशेपासून मुक्त नाही. ‘तुका म्हणे आम्ही देवाहूनि बळी। जाहलो ते निराळी ठेवूनि आशा॥’ संत हे देवाहूनही बलवान असतात, कारण ते आशापाशातून मुक्त असतात. ‘आशा उपजली अनंतासी। नीच वामनत्व आले त्यासी। आशेने हीन केले देवासी। कथा कायसी इतरांची॥’ असं एकनाथ महाराज म्हणतात. आशेमुळेच वामनाने बळीवर अन्याय केला आणि त्याचं फळ म्हणून वामनाला नीचत्व आणि हीनत्व आलं. अशी ही आशा संतांच्या मात्र आसपासही फिरकत नाही.
तुकोबाराय सांगतात की मी संतांवर विश्वास ठेवून आणि त्यांचा दास होऊन त्यांच्या मार्गाने निघालो आहे. त्याच मार्गाने माझं हित होईल याची मला खात्री आहे. या हिताच्या संदर्भात तिघांचा विचार करावा लागतो.
१) आई
आई जीवाच्या हिताच्या काळजी वाहते. तुकोबारायांच्या अभंगात याचा उल्लेख आहे.
लेकुराचे हित । वाहे माऊलीचे चित्त॥१॥
ऐशिया कळवळ्याच्या जाती। करी लाभावीण प्रिती॥२॥
म्हणजे आई तिच्या लेकराच्या हिताची काळजी वाहते, तोच कळवळा संतांच्याही ठिकाणी असतो. अर्थात आईला लेकराच्या हिताची काळजी लागलेली असते, पण त्याचं हित करण्याचं सामर्थ्य तिच्यात नसतं. एखाद्या आईला आजारी पडलेला तिचा मुलगा आजारातून बरा व्हावा असं वाटतं, पण त्याला बरं करायचं सामर्थ्य तिच्यात नसतं. हित करण्याचं सामर्थ्य फक्त संतांच्या विचारात आहे.
२) वेद
हिताच्या संदर्भात दुसरा विचार वेदाचा करावा लागतो. वेदालाच श्रुती असं म्हणतात. ही श्रुती हिताचा मार्ग दाखवते असं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. ‘अहितापासोनी काढती। हित देऊनी वाढविती। नाही श्रुतीपरौती। माऊली जगा॥’ असं ज्ञानेश्वरीत माऊलींनी म्हटलं आहे. अहितापासून काढून हित करणारी श्रुती ही जीवाची एक प्रकारे माऊलीच आहे असं ज्ञानोबाराय म्हणतात. मग वेदमाऊलीहून संतांचं वेगळेपण काय आहे? याचं उत्तर असं की वेदात जसे हिताचे मार्ग आहेत तसे अहिताचेही मार्ग आहेत. त्या मार्गांमधील भेद सहजासहजी लक्षात येत नाहीत. एकतर बहुजनांना वेदाचा अधिकार नाही आणि ज्यांना अधिकार आहे त्यांना वेद कळत नाही. त्यामुळे वेदाने प्रतिपादित केलेल्या मार्गाचा विवेक समजत नाही. हिताचा मार्ग वेदज्ञाकडून समजत नाही. कारण सहसा वेदज्ञ हा अहंकारी असतो. त्याला वेदांचा अधिकार आणि अभ्यास असल्याचा माज येतो. तोच त्याच्या पतनाला कारणीभूत ठरतो. हा वेदज्ञ अहिताचा मार्ग निवडतो. त्यामुळे त्याच्या हातून ‘कणू सांडून भुसा’ घेण्याची प्रक्रिया घडते. ‘अगा वेदविद जरी जाहला। माते नेणता वाया गेला। कणू सांडुनि उपणिला। भुसा जैसा॥’ असं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. वेदज्ञ हा वेद जाणतो पण परमेश्वराला जाणत नाही. तो धान्य उफणतो पण त्यातील धान्य फेकून भुसा घेण्याचा मूर्खपणा करतो असं माऊली सांगतात. वेदातला हिताचा म्हणजेच भक्तीचा आणि अहिताचा म्हणजे कर्मकांड-ब्रह्मज्ञानाचा मार्ग आहे हे समजण्याची क्षमता वेदज्ञात नाही. वेदार्थाचं असं विवरण फक्त संत करतात. ‘चहुही वेदाचे केलेसे विवरण। अर्थही गहन करुनिया॥‘ असा तुकोबारायांच्या संदर्भात त्यांच्या वेदार्थविवरणाचा गौरव केला आहे. ‘महाराष्ट्री भाषेत वेदांताचा अर्थ। बोलिला लोकांत सर्वद्रष्टा॥’ असं तुकोबारायांच्या अभंगाविषयी बहिणाबाई म्हणतात. वेदार्थाच्या विवरणाविषयी ज्ञानेश्वरीत दृष्टांतासह काही ओव्या आल्या आहेत.
वेदे बहुत बोलिले। विविध मार्ग सुचिले। तरी आपण हित आपुले। तेचि घेपे॥
वेदात भरपूर काही सांगितलं असलं तरी आपण त्यातून फक्त आपल्या हिताच्या गोष्टी घ्याव्यात. ज्याप्रमाणे ‘जैसा प्रकटलेया गभस्ती। अशेषही मार्ग दिसती। तितुके काय चालिजेती। सांघे मज॥’ म्हणजे सूर्य उगवल्यानंतर असंख्य मार्ग दिसत असले तरी आपण सगळेच चालू नयेत. त्यातील योग्य मार्गाने आपण चालावं. त्याचप्रमाणे वेदांतला आपल्या हिताचा मार्ग आपल्याला निवडावा लागतो. तो निवडण्यासाठी मुळात बहुजनांना वेदाचा अधिकार नाही आणि ज्यांना अधिकार आहे ते वेदज्ञ ‘कणु सांडून भुसा घेणारे’ असल्यामुळे हिताच्या संदर्भात वेद निरुपयोगी ठरतात.
३) देवाचे चिंतन
जीवाचं हित करणारी आणखी एक बाब म्हणजे देवाचं चिंतन करणं. ‘हित ते करावे देवाचे चिंतन। करुनिया मन एकविध॥’ असं तुकोबाराय म्हणतात. पण त्यात दोन अडचणी आहेत. एकतर मन एकविध करुन देवाचं चिंतन करावं लागतं. सामान्य माणसाला मनाची एकाग्रता सहजासहजी साधत नाही. मन हे चंचल आणि अस्थिर आहे. बहिणाबाई चौधरी यांच्या भाषेत मन हे वढाय आहे. ते उभ्या पिकातलं जनावर आहे. त्याला पिकातून कितीही हुसकून लावलं तरी ते ‘फिरी पिकावर येतं’. त्यामुळे मनाची एकाग्रता आणि एकविधता साधत नाही. मनाची एकाग्रता साधून देवाचं चिंतन केलं तर भक्तांचं हित होतं पण अभक्तांचं होत नाही. रावणाने भगवान शिवाचं चिंतन केलं होतं, पण त्याचं हित झालं नाही. त्यामुळे देवाच्या चिंतनाने फक्त भक्तांचं हित होतं.
जन्मदाती आई, वेद आणि देवाचे चिंतन या तिन्ही गोष्टीतून हित होण्याला काही मर्यादा आहेत. त्यामुळेच तुकोबाराय प्रस्तुत अभंगात फक्त संतच हित करतात असं निःसंदिग्धपणे सांगतात. आता संत जीवाचे हित करतात ते चित्तशुद्धीतून. मनाची शुद्धता हेच हिताचं मूळ आहे. ‘हित व्हावे तरी दंभ दूरी ठेवा। चित्तशुद्धी सेवा देवाची हे॥’ असं तुकोबाराय म्हणतात. हित होण्याची इच्छा असेल तर पहिल्यांदा दंभ दूर ठेवावा लागतो. तो फक्त संतांच्या मार्गाने दूर होतो. इतर मार्गाने उलट दंभ वाढतो. योग, याग आणि इतर कर्मकांडी विधी हे ज्ञानोबारायांच्या भाषेत ‘वायाची उपाधी दंभधर्म आहेत.’ तीर्थाटन, जप, तप, सोवळे-ओवळे, यज्ञ असे कर्मकांडी विधी आणि ब्रह्मज्ञान दंभाला खतपाणी घालणारे आहेत. याउलट संत मात्र दंभमुक्त करणारे आहेत. चित्तशुद्धी करणारे आहेत. ‘धन्य आनंदाची सापडली वेळ। ते हे संत सज्जन भेटले कृपाळ। तेणे फेडियेला बुद्धीचा वो मळ। दृष्टी दाविला यशोदेचा बाळ वो॥’ असं निळोबाराय म्हणतात.
संत हे बुद्धीचा मळ नष्ट करून दृष्टी निर्मळ करतात. किंबहुना चित्तशुद्धी हाच भक्तीचा खरा हेतू आहे. ‘चित्तशुद्धीसाठी व्हावी हरिभक्ती। ऐशी आहे उक्ती तुकोबाची॥’ असा तुकोबारायांच्या चित्तशुद्धीचा आग्रह ज्ञानगिरीबुवांनी सांगितला आहे. चित्तशुद्धीच्या मार्गाने दंभमुक्त करून जीवाच्या हिताच्या मार्ग संत दाखवतात. त्यामुळेच गोपाळाची कृपा होते असं तुकोबाराय म्हणतात.
पुढच्या चरणात तुकोबाराय सांगतात की मी संतांच्या मार्गाने जात असताना जर थकलो-भागलो तर संत मला कडेवर घेतील. संत केवळ मार्ग दाखवत नाहीत तर त्या मार्गावर ते आपल्यासोबत चालतात. आपल्याला थकवा आला तर कडेवर घेतात. याचा अर्थ संत केवळ मार्गदर्शन करत नाहीत तर स्वतः तो विचार आचरून दाखवतात. केवळ वैचारिक उपदेश करत नाहीत. कडेवर घेणं म्हणजे जिव्हाळ्याने आणि प्रेमाने आचरणातून आदर्श उभा करणं. तुकोबाराय याच चरणाच्या उत्तरार्धात सांगतात की ‘त्यांचीयाने जोडे सर्व सुख।’ म्हणजेच संतांमुळे सर्वसुखाची जोड होते. संतांचा देव, क्षेत्र आणि मार्ग सुखाचा आहे. संतांचा देव विठ्ठल हा सुखरूप आहे. ज्ञानोबाराय म्हणतात ‘सर्वसुखाचे आगर बापरखुमादेवीवर।’ म्हणजे विठ्ठल हा सुखाचं आगर आहे. तुकोबाराय म्हणतात ‘सुखरूप ऐसा दुजा कोणी सांगा। माझ्या पांडुरंगासारिखा तो॥’ म्हणजे संतांचा देव हा सुखरुप आहे. इतर देव सोवळे – ओवळे, उच्चनीचता आणि काही देव कोंबड्या बकऱ्याचा बळी मागणारे आहेत. त्यामुळे हे देव दुःखरूप आहेत तर संतांचा देव सुखरूप आहे. संतांचे क्षेत्र म्हणजे पंढरपूर. हे पंढरपूरही सुखरूपच आहे. ‘सुखालागी करिसी तळमळ। तरी तू पंढरीसी जाय एकवेळ॥’ असं तुकोबाराय सांगतात. त्याचबरोबर संतांचा मार्गही सुखाचा आहे. ‘तुका म्हणे मज धाडिले निरोपा। मार्ग हा सोपा सुखरूप॥’ असा संतांचा भक्तिप्रेमाचा सुखाचा मार्ग आहे. थोडक्यात संत देव, क्षेत्र आणि मार्ग अशा सर्व बाबतीत सुखाची जोड देतात.
तुकोबाराय अभंगाच्या अखेरच्या चरणात म्हणतात की संतांची उष्टावळी मी सेवन करीन. शेष म्हणजे उष्टे. उष्टे याचा अर्थ मुखातून बाहेर पडलेले. इथे संतांचा शेष याचा अर्थ संतांची वचने असा आहे. संतांच्या मुखातून बाहेर पडलेल्या वचनांचे मी सेवन करीन असा तुकोबारायांचा निर्धार आहे. त्यामुळेच संतांचे वचन मी मोडणार नाही असं तुकोबाराय ठामपणे सांगतात.