’यां नाटकातील सर्व परिस्थिती, घटना, प्रसंग हे केवळ कल्पनेच्या जगातच आढळतील असे आहे. तरी वस्तुस्थितीच्या निकषावर हे नाटक घासून पाहण्याचा विदुषकी उद्योग निष्कारण कोणी करू नये. पाश्चात्य वाङ्मयातील फार्सिकल कॉमेडीच्या मांडणीचे हे प्रसन्न स्वरूपातील नाट्य आहे. अशा नाटकांचे अतिशोयक्तिपूर्ण अधिष्ठान असते. या नाटकातील पात्रे ही खर्याखुर्या व्यक्तींची स्वभावचित्रे नसून त्यांची ती व्यंगचित्रे आहेत… या नाट्यलेखनात सुप्रसिद्ध फ्रेंच नाटककार मोलिअर यांच्या लेखनतंत्राचा बराच वापर केलाय…..’
-असे विश्लेषण दस्तुरखुद्द आचार्य अत्रे यांनी त्यांच्या ‘भ्रमाचा भोपळा’ या त्यांच्या नाटकाच्या संदर्भात केलाय. मराठी आणि हिंदी चित्रपट, विविध भाषांमध्ये अनुवाद, हजारो प्रयोग यांची साठवण असलेले हे एकेकाळी तुफान गाजलेले फार्सिकल कॉमेडी नाट्य. तत्कालीन परिस्थिती व एकूणच कौटुंबिक मनोवृत्ती आणि प्रासंगिकतेवर बेतलेले नाट्य. मूळचे हे चार अंकी संगीत नाटक. या नाटकाच्या अनेक आवृत्यांवर आवृत्या आजवर पुस्तकरूपाने प्रकाशित झाल्या. परचुरे प्रकाशनातर्फे या नाटकाला पुस्तकरूप मिळालं, जे आज नाट्यअभ्यासकांना पूरक ठरतंय.
वयाची नव्वदी पार केलेला हा ‘भोपळा’ आजही चिरतरुण आहे, याचा अनुभव पुन्हा एकदा रसिकांना आलाय. पंचवीसएक नाटकांचा ऐवज आचार्य अत्रे यांनी रंगभूमीला दिला. त्यांच्या एकापेक्षा एक विलक्षण नाट्यकृती आजही वाचक अन् रसिकांना भुरळ पाडतात. त्यातील ‘तो मी नव्हेच’ तर महाविक्रमी नाटक ठरले. ब्रह्मचारी, अशी बायको हवी, एकच प्याला (विडंबन), सम्राटसिंह, साष्टांग नमस्कार, घराबाहेर, लग्नाची बेडी, मी उभा आहे, मोरूची मावशी, बुवा तिथे बाया, कवडीचुंबक अशा या दर्जेदार नाटकांचा मालिकेतला हा भ्रमाचा भोपळा! १९३५ ते २०२६ असा यांचा प्रवास. पणजोबा, आजोबा ते नातवापर्यंतचा त्याचा हा रंगप्रवाह.
पडदा उघडतो, तेव्हा पुणेरी थाटाचा एक भव्य, ऐसपैस वाडा दिसतो. कलेश्वर आणि विद्या गौरी हे दांपत्य. मुलीचं लग्न लवकरात लवकर आता उरकलं पाहिजे अशी चर्चा सुरू आहे. कलेश्वर हे उठता बसता आपल्या प्रकृतीची काळजी करताहेत. दोन मुलींची लग्न हा विषय त्यांचा महत्त्वाचा आहे. आपल्या मुलींसाठी गावातले उनाडटप्पू तरुण सकाळ संध्याकाळ वाड्याभोवती प्रदक्षिणा घालतात, असा त्यांचा समज. विद्यागौरी ही तिसरी पत्नी. सावत्र असली तरी तिचं मुलींवर जिवापाड प्रेम. मुलींना कोणी बघू नये म्हणून घराची अंधारकोठडी केलेली. वयात आलेल्या दोन्ही मुलींची बाहेर प्रेमप्रकरणे सुरू आहेत. त्यांचे प्रियकर घरातच वेषांतर करून वास्तव्य करत आहेत. याचा पत्ता पालकांनाही नाही. कलेश्वरला प्रेमविवाह मान्य नाही. दोन्ही मुलींवर लक्ष ठेवण्यासाठी तसेच वाड्याच्या रक्षणाकरता बाप एक भय्या पहारेकरी ड्युटीवर ठेवतो, पण तो पहारेकरी म्हणजेच मुलींचे प्रेम! नेत्रा आणि निरा या दोन मुली. दिसायला सरळ साध्या पण पूर्ण तयारीच्या. शिकवणीसाठी असलेले पंडित भुलेश्वर आणि डॉक्टर म्हणून पूर्णवेळ घरात वावरणारा तरुण हे दोघेही मुखवटे घालून आहेत. प्रेमासाठी वाटेल ते करण्यासाठी या तरुण प्रेमिकांची तयारी आहे.

अशा या वाड्यात फसवेगिरीचं नाट्य सुरू आहे. दरम्यान जाफराबादच्या श्रीमंत जहागीदाराशी मोठ्या मुलीचं लग्न लावण्याचा बापाचा प्रयत्न आहे. रेल्वे स्टेशनवर श्रीमंत येणार अशी तार येते आणि एकच पळापळ सुरू होते. कठीण समय येता कोण कामाशी येतो? याचे उत्तर म्हणजे नागनाथ! हा एक संकटमोचन हनुमान म्हणून उभा ठाकतो. श्रीमंताना पळून लावण्याची तो जणू सुपारीच घेतो. रेल्वे स्टेशनवर पोहोचतो. तिथे एकेक भन्नाट युत्तäया करून त्यांना सळो की पळो करतो. श्रीमंतांना चक्क गुन्हेगार ठरवून फाशीच्या शिक्षेपर्यंतची धमकी देतो. त्यासाठी वेशांतर, भाषांतर, पळापळ सारं काही होतं. एकूणच यातील सारी पात्रे ही नवनव्या रूपात दिसतात आणि भ्रमाचा भोपळा अधिकच फुगत जातो. वेशांतर, नामांतर, स्थलांतर यातून होणारे गैरसमज घोटाळे यांच्या आधारे नाट्य कळसापर्यंत पोहोचते. तिथपर्यंत पोहोचण्यासाठी नागनाथ ज्या काही करामती करतो तेच या कथानकातील नाट्य!
ही मूळची चार अंकी संहिता. त्यातही संगीत नाटक. आज काळ आणि अनेक संदर्भही बदललेले. काही तर कालबाह्य झालेले. या पार्श्वभूमीवर नाटक दोन अंकात बंदिस्त करण्याचे आव्हान डॉ. श्वेता पेंडसे यांनी पेललं आहे. संपादन, संकलन अप्रतिमच. आचार्य अत्रे यांच्यासारख्या दिग्गज नाटककरांची आवृत्ती तयार करताना मूळ कथानक कुठेही भरकटले जाणार नाही याची पुरेपूर दक्षता त्यांनी घेतली आहे. डझनभर पात्रांची वैशिष्ट्ये आणि संवाद आटोपशीर केलेत. त्यांच्या रंगभूमीवरला अभ्यास व अनुभव कामी आलाय.
नागनाथ ही मध्यवर्ती सशक्त व्यक्तिरेखा संजय नार्वेकर यांनी पूर्ण ताकदीने केलीये. त्यासाठीची एनर्जी थक्क करून सोडणारी आहे. विदूषकी थाटाचे अनेक मुखवटे त्याने चढवले असून ते रसिक अक्षरश: डोक्यावर घेतात. विविधतापूर्ण देहबोली शोभून दिसते. रसिकांचा थेट उत्स्फूर्त प्रतिसाद वसूल करण्याचे कौशल्य त्यांच्यात आहे. प्रत्येक एन्ट्रीला हश्या आणि टाळ्यांनी स्वागत होते. आजकाल हे भाग्य दुर्मिळ झालंय. ‘मी… सभ्य. बरं’- हे पालुपद किंवा छातीवर वाजवलेला ठेका यांना वन्समोअरची दाद मिळते ‘ऑल द बेस्ट’पासून ते ‘भ्रमाचा भोपळा’पर्यंतची त्यांची रंग वाटचाल एका उंचीवर घेऊन जाणारी. सही रे सहीप्रमाणे प्रत्येक सोंग तुफान हास्यस्फोटक ठरते. नागनाथ पक्का स्मरणात राहतो.
कलेश्वर आणि विद्यागौरी यांच्या भूमिकांमध्ये चित्रपट, मालिका, नाटक या माध्यमांतून स्वतःचा ठसा उमटवणारे सुनील तावडे आणि महाराष्ट्राच्या हास्यजत्रेतून घराघरात पोहोचलेली चेतना भट शोभून दिसतात. दोघांचं ट्युनिंग मस्त जमलंय. विनोदाची उत्तम जाण, वेगवान हालचाली नजरेत भरतात. जाफरबादचे जहागीरदार बनलेले अंकित म्हात्रे देहाचे प्रदर्शन करीत हक्काचे असे वसूल करतात. विशेषत: बुरखाधारी महिलेच्या रूपात कहरच उडतो! मनाने भोळा असलेल्या या श्रीमंताची सारे जण खिल्ली उडवतात, त्याला फसवतात! फाशीची शिक्षाही बहाल करतात! गणेश सोळंकी आणि दत्ता भट या दिग्गज रंगकर्मीनी यापूर्वी ही भूमिका साकारली होती.
शुभंकर तावडे (अरविंद) वरद चव्हाण (निरंजन) अजिंक्य भोसले (भुतेश्वर) प्रकाश कळवे (किशा) यांनीही आपल्या वैशिष्ट्यपूर्ण भूमिकेचे सोनं केले. कांचन प्रकाश (नेत्रा) पूजा गोरे वर्तक (नीरा) आर्यन शर्मा (चित्रा) या मुलींनी चांगली साथ दिली. या डझनभर कलाकारांमध्ये अभिनयाची जणू स्पर्धाच सुरू होती. सार्यांच्या अभिनयात चपळता भरलेली. फार्सिकल विनोदी टच त्यात होता.
विजय केंकरे हे आजचे बिझी दिग्दर्शक. आव्हानात्मक नवनवीन संहितांना नाट्यरूप देण्याकडे त्यांचा एकूणच कल. त्यांनी नाबाद नव्वदीची संहिता निवडली हे विशेष. नाटकाचा ‘कॅप्टन ऑफ द शिप’ म्हणून जबाबदारी समर्थपणे पेलेली आहे. जुन्या काळातील संहिता असल्याने काही अडथळे जरूर आहेत, पण त्यातील व्यंग ओळखून नाटकात ‘भोपळा’सजवलाय. पहिल्या अंकापेक्षा दुसरा अंक अधिक वेगवान आहे. प्रसंग बदल उत्सुकता वाढवणारे आहेत. संजय नार्वेकर या ‘एनर्जी मॅनला’ काहीसे मोकळे रान दिलंय. त्यामुळेही हा लाफ्टर क्लब बहारदार होतो. रंगभूमीच्या मर्यादा व जाणीवा नव्याने तपासून दिग्दर्शक म्हणून केंकरे यांनी घेतलेले परिश्रम या निर्मितीमागे आहेत. जुनं ते सोनं नव्या रंगरंगोटीसह झळाळून पेश करण्याची किमया यातील सादरीकरणामागे दिसते. प्रयोग अत्यंत प्रवेश झालाय.

पुण्यातील एक टिपिकल वाडा आणि त्यातील अनेक दरवाजे, खिडक्या पडदा उघडता नजरेत भरतात. त्यातील रंगीतसंगतीही अनुरूप. डझनभर कलाकारांचा वावर सुरळीत बनेल याची दक्षता त्यामागे आहे. हे ज्येष्ठ नेपथ्यकार प्रदीप मुळये यांनी आकाराला आणलं आहे. रेल्वे स्टेशनबाहेरचा प्रसंग, एक खोली हे देखील यथायोग्यच. आजकाल नाटकाला टायटल साँग देण्याची प्रथा आहे. इथेही मंदार चोळकर यांचे गीत हजर आहे. मंगल केंकरे यांची वेशभूषा भूमिकांना उठाव देणारी ठरते. अजित परब यांचे संगीत आणि शितल तळपदे यांची प्रकाशयोजना उत्तम. दिग्दर्शकाची तांत्रिक टीम अनेक नाटकात कायम असल्याने ट्युनिंग चांगलं जमतं.
दामू अण्णा जोशी (कलेश्वर), बापूराव माने (विद्यागौरी), राजा गोसावी (कलेश्वर), श्रीधर राजगुरू (किशा), भालबा केळकर (भुलेश्वर), छोटा गंधर्व (अरविंद), नागेश गद्रे (अरविंद), किशोर नांदलस्कर( मास्तर/ पंडित) सेवा चौहान (विद्यागौरी), रेखा उर्फ कुमुद कामत (नीरा), मंगेश कदम (अरविंद), गणेश सोळंकी (जहागीरदार), दत्ता भट (जहागीरदार), सुरेखा राणे (विद्यागौरी), श्रीरंग नार्वेकर (चंडीराम)… यादी भली मोठी होईल. गेल्या ९० वर्षांत स्पर्धेपासून ते व्यावसायिकपर्यंत अनेक दिग्गज कलाकारांची नावे या नाटकाशी जोडली गेली आहेत. याचा शुभारंभी प्रयोग ११ फेब्रुवारी १९३५ या दिवशी पुण्याच्या विजयानंद नाट्यगृहात झाला. बालमोहन नाटक मंडळींनी हा प्रयोग सादर केला होता. असो.
फार्स शैलीची नाटके मराठी रंगभूमीवर १९ व्या शतकाच्या अखेरीस आलीत. त्यात अफजलखानचा वध, अनारासाचा फार्स अशी काही प्रहसने-फार्स जरूर आली होती. पण ती रसिकांनी मान्य केली नाहीत किंवा म्हणावी तशी स्मरणात राहिली नाहीत. पण आचार्य अत्रे यांनी फार्सचे नवे तंत्र मोलिअरच्या पद्धतीने आणले. त्याला वेगळा बाज दिला. त्यामुळे रंगभूमीवरील मरगळ ही दूर झाली. त्यातील ‘मोरूची मावशी’ आजही गर्दी खेचतेय. अत्रे युगानंतर बबन प्रभू, आत्माराम भेंडे यांनी फार्स रसिकांपर्यंत पोहोचविला. पण तरीही अत्रे यांच्या भक्कम पायावर उभ्या असलेल्या संहिता नाटककारांना कायम प्रेरणा देत राहिल्या.
‘अॅक्शन ड्रामा’ म्हणून त्या लक्षवेधी ठरल्यात. मराठी माणसाला जाहीरपणे खळखळून हसवणारी अत्रे यांची ही फार्सिकल व्यंगचित्रे आवर्जून पाहायला हवीत!
भ्रमाचा भोपळा
लेखन- आचार्य अत्रे
रंगवृत्ती- डॉ.श्वेता पेंडसे
दिग्दर्शन- विजय केंकरे
नेपथ्य- प्रदीप मुळ्ये
प्रकाश- शितल तळपदे
संगीत- अजित परब
वेशभूषा- मंगल केंकरे
रंगभूषा- प्रदीप दरने, संदीप नगरकर
गीत- मंदार चोळकर
निर्माते- संतोष भरत काणेकर, श्रीकांत तटकरे

