• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

भेट पहिली आणि शेवटची

श्रीराम रानडे (मी यांचा सांगाती)

marmik by marmik
May 9, 2026
in मनोरंजन, मी यांचा सांगाती, विशेष लेख
0
भेट पहिली आणि शेवटची

९ मे ही थोर गीतकार जगदीश खेबुडकर यांची जयंती. त्यांचा गीत, कविता लेखनाचा रियाज हा आदर्श आहे. रोज एक तरी रचना करायचीच हे त्यांनी व्रत स्वीकारले होते. या व्रताला अमृताची फळे लागली. पुढील पन्नास वर्षांच्या कला-कारकीर्दीत त्यांनी ३०० चित्रपटांसाठी २,५०० गीते लिहिली. त्यांच्या नावावर पाच नाटकेही आहेत आणि २५ कथाही प्रसिद्ध झाल्या आहेत.

 

`जगदीश खेबुडकरांची आणि तुमची ओळख आहे का?’ माझ्या इचलकरंजीच्या तरुण मित्राने, सुमेध (चिम्या) पोतदाराने मला प्रश्न केला.
`मी त्यांना गेली चाळीस-पंचेचाळीस वर्षे ‘ओळखतो.’ त्यांच्या गीतांचा मी फॅन आहे. माझ्या हातून जी काही थोडीबहुत गीतरचना होते, त्याबाबतीत शांताराम आठवले, गदिमा, खेबुडकर, शांता शेळके, सुधीर मोघे यांना मी आदर्श मानतो, पण एक सुधीर मोघेचा अपवाद वगळता बाकी कोणाशीही माझा प्रत्यक्ष परिचय नाही. मात्र या सर्वांचा मी एकलव्य शिष्य आहे’, मी वस्तुस्थिती कथन केली.
`आज सायंकाळी पौड रस्त्यावरील भारती विद्यापीठात त्यांचा कार्यक्रम आहे. खेबुडकरांचा प्रायव्हेट सेक्रेटरी अमर नाईक माझ्या ओळखीचा आहे. त्याला भेटू. तो आमच्या गावाजवळच्या पट्टण-कोडोलीचा आहे. तो तुमची आणि खेबुडकरांची गाठ घालून देईल,’ सुमेधनं माझ्यापुढे प्रस्ताव मांडला.

मी म्हणालो, ‘कार्यक्रमानंतर खेबुडकरांच्याभोवती चाहत्यांची गर्दी असणार, त्यात होणारी माझी ओळख अत्यंत औपचारिक स्वरूपाची असणार, मला ती नको. त्यापेक्षा त्यांचा मुक्काम उद्या पुण्यात असेल तर माझ्यासाठी पाच-दहा मिनीटे वेळ द्या म्हणावं. त्यात मी समाधानी आहे.’

सुमेधने रात्री बातमी दिली- उद्या सकाळी साडेदहा वाजता साहित्य परिषदेच्या अतिथिगृहात खेबुडकरांना भेटायला जायचं आहे.
पुण्याच्या विजय टॉकीजमध्ये `रंगल्या रात्री अशा’ हा चित्रपट मी पाहिला. आणि `धनी तुमचा नी माझा एक काढा फोटू’, `मला हो म्हनत्यात लवंगी मिरची’ या वसंत पवारांनी संगीत दिलेल्या सुलोचना चव्हाणांनी गायलेल्या आणि जगदीश खेबुडकरांनी लिहिलेल्या अस्सल लावण्यांवर मी बेहद्द खुश झालो. लवंगी मिरचीचा झटका टाळूला घाम फोडून गेला. त्यानंतर खेबुडकरांनी मागे वळून कधी बघितलेच नाही. `पिंजरा’ चित्रपटाने खेबुडकरांच्या काव्यप्रतिभेवर कळस चढविला.

जगदीश खेबुडकरांच्या विषयी मी जमेल तितकी माहिती मिळवत होतो आणि त्यांचा कलाप्रवास पाहून अधिकच प्रभावित होत होतो. १० मे १९३२ हा खेबुडकर यांचा जन्मदिन. कोल्हापूरजवळील हळदी या गावी त्यांचा जन्म झाला. वडील शिक्षक होते आणि अगदी लहानपणापासूनच खेबुडकरांना वाङ्मयाची नाटकाची, चित्रपटाची गोडी लागली. महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्यांनी पुण्याच्या प्रसिद्ध फर्गसन महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि तिथेच कला शाखेतील पदवी प्राप्त केली. महाविद्यालयीन जीवनात त्यांच्या कलाप्रेमाला अधिकच चालना मिळाली. ३० जानेवारी १९४८ रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधींचा दिल्ली येथे खून झाला. अवघा देश शोकसागरात बुडाला. त्यावेळी महाराष्ट्रात उसळलेल्या जातीय दंगलीत खेबूडकर यांना सगळ्या कुटुंबीयांसह मारहाण करून, बाहेर काढून त्यांचं घरही पेटवून दिलं गेलं. आपलं घर धडाधडा जळत असताना विद्यार्थीदशेतील, १६ वर्षांच्या खेबुडकरांनी त्या आगीत शिरून, जळत्या कपाटातून आपली वही काढली आणि त्या वहीत ‘मानवते, तू विधवा झालीस..’ ही कविता लिहिली… हीच त्यांची पहिली कविता. इथून त्यांचा गीतलेखनाचा प्रवास सुरू झाला…

गीतकार खेबुडकर
गीत लिहिण्यापूर्वी खेबुडकर त्या प्रसंगांचा संगोपांग सर्व प्रकारे अभ्यास करीत असत. त्यासाठी लेखक, दिग्दर्शक, संगीतकार,
कॅमेरामन, नायक, नायिका, वातावरण, व्यक्ती कोणत्या स्तरातली आहे. शहरी, ग्रामीण, आदिवासी, शिक्षित, अशिक्षित, मृदू स्वभावाची, खतरनाक, संतापी, पापभिरू, परोपकारी किंवा गायक, भिकारी, गरीब, श्रीमंत, शिक्षित, अडाणी सर्व कंगोरे बारकाईने अभ्यासून मगच लेखणी हाती घेत आणि विचार पक्का झाला की कोर्‍या कागदावर गीतांचे शब्द झरझर उतरू लागत. प्रेमगीत, विरहगीत, अभंग, ओवी, लावणी, पोवाडा, भावगीत, थीमसाँग कोणत्याही प्रकारचे गीतरचना असो- त्यांच्या प्रत्येक गीतांची शब्दकळा अत्यंत प्रासादिक, रसाळ, प्रसंगाला न्याय देणारी आणि संगीतकाराला आवाहन आणि आव्हान देणारी आणि गायक-गायिकांची, वादकांची साथीदारांची कसोटी पाहणारी असायची. राजा ललकारी अशी दे, विठू माऊली तू’, `देवापुढे माणूस’, `अशी कशी ओढ बाई’, `मंगळा ग मंगळा’, `अग नाच नाच नाच राधे’, `झनझन झनझन छेडिल्या तारा’, `दोघे लुटुया रंगबहारा’, `निसर्गराजा ऐक सांगते’ किती किती गीतांची नावे ओठावर येतात. ‘दुर्गा आली घरा’ हे गीत तर अखंड पंधरा मिनिटांचे आहे पण अखेरपर्यंत दृश्य आणि श्राव्य आहे. `ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले, मला हे दत्तगुरु दिसले’ या `आम्ही जातो आमच्या गावा’ या चित्रपटातील गीताने गीताचे शब्द, चित्रपटातील प्रसंग, गीताचे संगीत गायकाची गीत पेश करण्याची पद्धती, कलाकारांचा अभिनय, कॅमेरामनने दृश्य टिपणे आणि दिग्दर्शन आणि तो सीन उत्तम प्रकारे सादर करणे- सार्‍या सार्‍या गोष्टी कशा जुळून आल्या आहेत.

`धुंदी कळ्यांना’ या गीतानेही अशीच कमाल केली आहे. बैठक संपवून खेबुडकर निघाले आणि संगीतकार सुधीर फडके सहज म्हणाले या गीताची चाल ऐकून रसिक धुंद झाले पाहिजेत. हे शब्द खेबुडकरांच्या कर्णसंपुटातून मेंदूपर्यंत पोचले आणि गीताचे शब्द उमटले- `धुंदी फुलांना, धुंदी कळ्यांना, शब्दरूप आले, मुक्या भावनांना’ आजही ते गाणे तितकेच हळुवार रसरशीत आणि हृदयाच्या तारा झंकारणारे आहे.

ग्रामीण, नगर, शिक्षित-अडाणी, उच्च-नीच, श्रीमंत-गरीब अशा सर्व प्रकारच्या माणसांशी आलेला संबंध, निसर्गविषयी प्रचंड आकर्षण, विविध कामगारांचा जीवनसंघर्ष, प्रत्यक्ष अनुभवलेले सुख- दुःखाचे जिवंत आणि जगलेले प्रसंग त्यातूनच- `ऐरणीच्या देवा तुला, ठिणगी ठिणगी वाहू दे, आभाळागत तुझी माया आम्हावरी राहू दे’ असं राखेतून अंगार फुलवणारं, धगधगतं गीत लेखनेतून सहज उमटतं. हे ते प्रचितीचे लिहिणे.

पिंजरासाठी त्यांनी तब्बल एकशेवीस गाणी लिहिली. त्यातली दहा-बाराच दिग्दर्शक शांतारामबापूंनी निवडली. हे समजल्यावर खेबुडकरांच्या विषयीचा आदर अधिकच दुणावला. ’तुमच्या नावानं गळ्यात माझ्या बांधा एक डोरलं’ हे खेबुडकरांचे शब्द राम कदम स्वरबद्ध करीत असतानाच वसंत पवारांच्या दुःखद निधनाची बातमी आली. राम कदम सांगायचे- वसंत पवार त्याच संगीताचं डोरलं माझ्या गळ्यात बांधून गेले आणि ते शब्दशः खरे ठरले. राम कदम संगीतकार आणि जगदीश खेबुडकर गीतकार अशी भन्नाट जोडी जमली.

राम कदमांचा आणि माझा चांगलाच परिचय. कारण तेही माझ्याप्रमाणेच मिरजेचेच. नवीन चित्रपटांची जुळवाजुळव सुरू झाली की राम कदम गीतरचनेसाठी कोल्हापूरहून खेबूडकरांना बोलावून घ्यायचे. `उद्या सकाळी त्यो येतोय बघ,’ राम कदम अत्यंत विश्वासानं सांगायचे. आणि खरोखरच खेबुडकर यायचे. त्यांचे दर्शन प्रसन्न असायचे. अत्यंत नीटनेटके पोशाख आणि न विसरता बांधलेला टाय. उंची बेताची, नाक धारदार आणि डोळ्यात प्रचंड आत्मविश्वास. त्यांचे दुरून दर्शनच मी घेत असे. ओळख करून घ्यावी असं वाटायचं, पण भिडस्त स्वभावामुळे मी मागे सरायचो.

जगदीश खेबुडकरांची एकाहून एक सरस गाणी रसिकांच्या मुखी बोलत होती. `देहाची तिजोरी’ हे गाणं तर गल्लोगल्ली गायलं जात होतं. लावणी, पोवाडा, सवाल-जवाब, भावगीत, भक्तीगीत, शृंगारगीत, युगलगीत… खेबुडकरांनी अशा नानाविध गीतांची बरसात सुरू केली होती. अत्यंत प्रासादिक शब्दरचना, संपन्न आशय, सहज सोपी संगीतरचना यामुळे खेबुडकरांची गाणी रसिकांच्या मनात घर करत होती. राम कदम, सुधीर फडके, दत्ता डावजेकर, वसंत देसाई, विश्वनाथ मोरे, बाळ पळसुले, प्रभाकर जोग, एन. दत्ता, अनिल-अरुण ते आताचे अजय-अतुल अशा अनेक नामवंत संगीतकारांनी खेबुडकरांची गीतरचना चित्रपट माध्यमातून रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली. `गदिमा’ अर्थात शब्दप्रभू ग. दि. माडगूळकर यांच्यानंतर मराठी चित्रपटसृष्टीत जगदीश खेबुडकर हा परवलीचा शब्द झाला आणि खेबुडकरांनीही कुणालाही निराश केलं नाही.

मनात उत्कट इच्छा असूनही कविवर्यांची प्रत्यक्ष ओळख होत नव्हती. मध्यंतरी तसा योग आला होता. महाराष्ट्र शासनातर्पेâ आरोग्यविषयक प्रचारगीते सादर करण्याचा कार्यक्रम कोल्हापुरात आयोजित केला होता. पल्स पोलियो, स्वच्छता अभियान, मलेरिया निर्मूलन, या विषयांवर आनंद माडगूळकरांच्या सांगण्यावरून मी अनेक गीतरचना केल्या होत्या. त्यावेळचे आरोग्यमंत्री दिग्विजय खानविलकर, विलास देशपांडे, आनंद माडगूळकर यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले होते. गंगाधर महांबरे, जगदीश खेबुडकर आणि अनेक मान्यवर आपली गीते सादर करणार होते. मलाही आमंत्रण होते. महांबरे, खेबुडकरांच्या बरोबर आपणही व्यासपीठावर असणार, आपली रचना ते ऐकणार, त्याची प्रतिक्रिया मी विचारणार, प्रत्यक्ष ओळख होणार, कदाचित मैत्र जुळणार अशा मनोराज्यात मी गुंग होतो. कार्यक्रम सुरू झाला. खेबुडकर व्यासपीठावर आले. त्यांच्या अंगात ताप होता. तरीही त्यांनी दोन गाणी प्रथम सादर केली आणि संयोजकांची परवानगी घेऊन निघून गेले. माझा मनोरथ कोसळला.

तो योग १४ जानेवारी २०११ला जुळून आला. मी आणि सुमेध पोतदार बरोब्बर साडेदहा वाजता साहित्य परिषदेच्या अतिथीगृहात पोचलो. दारावर टकटक करताच अमर नाईक बाहेर आले. त्यांनी आत जाऊन आम्ही भेटायला आलो याची वार्ता कविरायांना दिली. त्यांनी आम्हाला आत बोलावले. एका बाजूच्या कॉटवर बसून ते काहीतरी लिहिण्यात मग्न होते. आम्ही त्यांना वाकून नमस्कार केला. त्यांनी आम्हाला समोरच्या कॉटवर बसण्यास सांगितले. `बोला काय काम आहे?’ त्यांनी सवाल केला. आम्ही आमची ओळख सांगितली. रंगपंचमी, रामचरितगुणगान, श्री गुरुप्रसाद ही माझी कवितांची पुस्तके आणि सीडी-कॅसेट्स मी त्यांना दिल्या आणि पाच दहा मिनिटे त्यांच्याशी बोलण्याची परवानगी मागितली. माझी पुस्तके त्यांनी चाळली. `सीडीज मी नंतर ऐकेन आणि अभिप्राय देईन, पण आमच्याच स्कूलचे आहात तुम्ही’- असा अभिप्रायही दिला आणि कविराज गप्पांत रंगून गेले. मी सांगली-मिरजेचा आहे असं सांगितल्यावर अधिकच जवळीक निर्माण झाली. जवळजवळ तासभर गप्पा रंगल्या. अनेक चित्रपट-अनेक आठवणी. मीसुद्धा त्यांच्या गाण्याचे शब्द त्यांनाच ऐकून गप्पा रंगवण्याचा प्रयत्न करीत होतो. गडी खुष होत होता. बघता बघता तास सव्वा तास संपला. पुन्हा दारावर टकटक झाली आणि गायिका अंजली दाते (सारेगम फेम शरयू दातेंची आई) आणि त्यांच्याबरोबर तिची नातेवाईक वसुधा कुलकर्णी आल्या. अंजली आमच्याच ग्रुपमध्ये गायची.

त्यांच्या आगमनानंतर आम्हाला निरोप देताना खेबुडकर म्हणाले, मी तुमच्या घरी येणार. खूप गप्पा मारू. गीतांचा व्यासंग सुरूच ठेवा.
नाना, अवश्य या. घर तुमचेच आहे- आम्ही निरोप घेतला.

…दिनांक ३ मेला मिरजेच्या वसंत व्याख्यानमालेत माझ्या `भारद्वाज’ प्रकाशन तर्पेâ प्रसिद्ध होणार्‍या `स्मरणसाखळी’ पुस्तकाच्या प्रकाशन समारंभासाठी आम्ही मिरजेला निघालो होतो. मिरजेच्या वसंत व्याख्यानमालेचे प्रमुख आधारस्तंभ आणि माझे शिक्षक वसंतराव आगाशे यांनी लिहिलेले हे पुस्तक. आमची मोटार आष्ट्यापाशी आली, आणि मोबाईल वाजला. मी चिनू पोतदार बोलतो आहे. एक वाईट बातमी आहे. आज सकाळी जगदीश खेबुडकर गेले.

माझ्या गळ्यातून हुंदका फुटला.

माझ्या पत्नीने विचारले- काय हो? काय झाले? अश्रूदाटल्या नयनांनी मी सांगितले `जगदीश खेबुडकर- आपले नाना गेले. कायमचा चटका लावून गेले. पुढील तासभर मी खेबुडकर याच विषयावर बोलत होतो.
जगदीश खेबुडकर या कवीची, गीतकारांशी झालेली पहिलीच भेट अखेरची ठरली- काय म्हणावं या दैवयोगाला? कालाय तस्मै नमः।।

Previous Post

द फीस्ट ऑफ द गोट– व्यक्त होण्याला किंमत आहे!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.