
सार्वजनिकतेच्या नावाने सुरू असणार्या ब्राह्मणी मक्तेदारीला सुरुंग लावण्याची सुरुवात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला विरोध करणार्या दादरमधल्या बहुजन तरुणांनी केली. ही महाराष्ट्रात घडलेल्या आणि इतिहासात कुठेच न नोंदवलेल्या एका मोठ्या परिवर्तनाची सुरुवात होती. पुढे त्याचं नेतृत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि रावबहाद्दूर बोले यांच्यासोबत प्रबोधनकारांनीही केलं.
१९२७ च्या नोव्हेंबर महिन्यात प्रबोधनकार पुण्याहून मुंबईला आले. अंथरुणाला खिळले आणि तिथे पुण्यात त्यांनी उभं केलेलं होतं नव्हतं ते सगळं संपलं. पुढच्या वर्षभरात ते पुन्हा सावरले. शनिमाहात्म्य या पुस्तकाच्या लिखाणाने त्यांना उभारी दिली. त्यांनी हे पुस्तक लिहून हातावेगळं करत असतानाच त्यांच्या आयुष्यात आणखी एक क्रांतिकारक घटना घडली, ती होती दादर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातला जातिभेद संपवण्याचा लढा. शनिमाहात्म्य लिहून संपवण्याचा काळ हाच या लढ्याचा होता, असं ठामपणे म्हणता येईल कारण या पुस्तकाच्या मनोगतात प्रबोधनकारांनी दिलेली तारीख. ती होती, अनंतचतुर्दशी, २८ सप्टेंबर १९२८.
दादरमध्ये आल्यानंतर ते सार्वजनिक जीवनात सक्रिय नव्हतेच. एकतर ते आजारी होते. त्याचबरोबर ते आर्थिकदृष्ट्याही अडचणीत होते. त्यातच त्यांनी शनिमाहात्म्य लिहिण्याच्या कामात स्वतःला गुंतवून घेतलं होतं. त्यामुळे दादरमध्ये काय चाललंय याची फारशी कल्पनाही नव्हती. प्रबोधनकारांच्या शब्दांत, पुण्याहून दादरला आल्यानंतर प्राप्त झालेल्या विपन्नावस्थेची कोडी सोडवण्यात मी गर्क होतो.
अशी परिस्थिती असताना अचानक गणेशचतुर्थीच्या दिवशी सकाळी १० वाजता भास्करराव कद्रेकर धावत धापा टाकत प्रबोधनकारांकडे आले. भास्करराव हे दादरमधल्या चळवळीतले तरुण कार्यकर्ते प्रबोधनकारांच्याच तालमीत तयार झाले होते. ते प्रबोधनकारांसोबत सातारा आणि पुण्यातही मदतीला गेले होते. रावबहादूर सी.के. बोले आणि पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीत मुंबईतले महत्त्वाचे पुढारी म्हणून ते ओळखले गेले. पुढे ते प्रबोधनकारांच्या शेतकर्यांचे स्वराज्य या पुस्तकाचे ते प्रकाशकही होते. त्यांनी प्रबोधनकारांना निरोप दिला, टिळक पुलावर मोठा जमाव गोळा झाला आहे आणि रावबहाद्दूर बोले यांनी तुम्हाला लवकर बोलावलं आहे. त्यामुळे अनपेक्षितपणे प्रबोधनकार दादर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वादात ओढले गेले.
प्रबोधनकारांना या वादातले ताजे तपशील आणि घडामोडी माहीत नव्हत्या. मात्र दादर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात सुरू असलेल्या ब्राह्मण ब्राह्मणेतर वादाची पार्श्वभूमी त्यांना माहीत होती. कारण १९२५च्या गणेशोत्सवात झालेल्या वादाचं उत्तम रिपोर्टिंग त्यांनीच प्रबोधन`मध्ये केलं होतं. `सार्वजनिकपणाचे गाडगे फुटले अशा मथळ्याचं प्रबोधन`चं संपादकीय तेव्हा गाजलं होतं. मुळात दादरमध्ये पुण्यासारखा ब्राह्मण ब्राह्मणेतर वाद असण्याचं काही कारण नव्हतं. `माझी जीवनगाथा`मध्ये प्रबोधनकार त्याचं कारणही सांगतात, `यावेळी आणि त्यापूर्वी कधीही दादरला किंवा मुंबईला बामण-बामणेतर वाद कसलाच कोठे नव्हता. आणि मुंबईसारख्या `ये रे दिवसा भर रे पोटा वृत्तीच्या लोकांनी गजबजलेल्या विभागात कसलाही वाद खेळायला लोकांना उसंतच असणार कुठून? शिवाय, दादरला आज जे बकाल मुंबईच्या फादरचे रूप आहे, त्याची त्यावेळी नुकतीच झुंजूमुंजू होत होती. सगळ्याच जाती जमाती पोटार्थी! आगगाड्यांच्या टाईमटेबलांच्या मुहूर्तावर धावपळ करणारे.`
पण दादर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या जातीय कारभारामुळे हा रोग दादरमध्येही पसरला. लोकमान्य टिळकांनी रुजवलेल्या गणेशोत्सवाला सार्वजनिक किंवा राष्ट्रीय उत्सव म्हणायची पद्धत असली, तरी त्याचं नेतृत्व प्रामुख्याने ब्राह्मण आणि त्यातही चित्पावन ब्राह्मणच करत होते. बहुजन समाजातली चार दोन होयबा मंडळी तोंडी लावायला कार्यकारी मंडळात घेऊन धूळफेक केली जात असे. प्रबोधनकारांसारख्या सत्यशोधकी कार्यकर्त्यांना ही फसवणूक सहज कळत होती. त्यामुळे बहुजनी विचारवंत मंडळी सातत्याने याला विरोध करत आली होती. शिवाय त्यात मेळ्याच्या रूपाने शिविगाळीला उत आलेला होता आणि वर्गणी गोळा करण्याच्या निमित्ताने आर्थिक अपहार होत होतेच. यापैकी बरीचशी दांडगाई दादरच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातही स्थापनेपासून सुरूच होती, असं दिसतं.
सार्वजनिकपणाचे गाडगे फुटले या अग्रलेखात प्रबोधनकार ही पार्श्वभूमी विशद करताना लिहितात, दादरला ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद उघड नव्हता, ही गोष्ट खरी. पण तो बुरख्यांतूनही वावरत नव्हतां, असें मुळीच मानता येणार नाहीं. भिक्षुकी कारस्थानाचे काटे पदोपदीं पायांत रुतत, पण तिकडे फारसे कोणी लक्षच दिले नाहीं. लक्ष न देण्याचें कारण संघटनेचा अभाव. मात्र ब्राह्मण स्वतःच्या जातीची संघटना करीत होते. या संघटनेच्या जोरावरच ते सार्वजनिक बुरख्याखाली बहुजन समाजाचे पुढारपण बळेंच अंगांवर घेऊन शिंगावर नाचविण्यास समर्थ झाले. पण आता घडलेल्या चिडखोर व अपमानकारक भिक्षुकी गुंडगिरीनें बहुजनसमाज जागा न होईल, तर तो कायमचा तुडविला जाईल. प्रत्येक चळवळीचा झेंडा ब्राह्मणाच्या हातीं आणि लोकांनीं मात्र नुसते फंड देऊन, ब्राह्मण ठरवतील ती पूर्व दिशा मानून, स्वस्थ बसणें यालाच गुलामगिरी असें म्हणतात.
हेच प्रबोधनकार अधिक तपशीलात सांगतात, फंड सगळ्या दादरचा आणि कारभार मात्र या भिक्षुकी रेवरंड फादरचा असा हा मामला गेली १५-१६ वर्षे बिनअटकाव निखटका इतर ठिकाणांप्रमाणेच दादरला चालू होता. कार्यकारी मंडळांत एकजात एका पराचे भट. जणू काय सर्व जनांच्या सार्वजनिकत्वाचे हे आमरण जन्मसिद्ध वंशपरंपरेचे अनभिषिक्त मुखत्यार! हे करतील ते कारण आणि बांधतील तें तोरण…! यांचे सर्व जीवितेच सार्वजनिक, यांची स्वतःची जायवळे, मुलींच्या मंगळागौरी, पोरांच्या मुंजी, बापाचीं तेरावी, सुनांची गर्भादाने, गणपति गौरीचे उत्सव, झाडून सार्या गोष्टी सार्वजनिक. ब्राह्मणांचे जातिविषयक असें कांहींच नसतें. त्यांचे सर्वच सार्वजनिक! त्यांचीं वर्तमानपत्रे सार्वजनिक, त्यांची व्याख्यानें पुराणें कीर्तनें प्रवचने सार्वजनिक; फार काय, पण त्याचें जगणें व मरणेंसुद्धां सार्वजनिकच.
सार्वजनिकपणाच्या नावाखाली केवळ जन्माने ब्राह्मण म्हणून कर्तृत्व नसतानाही गणेशोत्सवाचं नेतृत्व ब्राह्मण तरुणांकडे होतं. जन्मजात मक्तेदारीच्या मानसिकतेमुळे त्यांनी इतर समाजांना या उत्सवात सामावूनच घेतलं नव्हतं. पण या अरेरावीमुळी बहुजन समाजात अस्वस्थता होती. तरीही एकीकडे गुंडगिरी करून आणि दुसरीकडे गोर्या पोलिसांचे तळवे चाटून बहुजन तरुणांचा असंतोष मोडून काढण्याचा आपला शिरस्ता चालू राहील असं सार्वजनिक गणेशोत्सवाच्या कारभार्यांना वाटत होतं. पण घडलं उलटच. १९२५च्या गणेशोत्सवात भालाकार भोपटकरांच्या व्याख्यानाच्या निमित्ताने या असंतोषाचा भडका उडाला. भोपटकर अत्यंत विखारी जातीय बोलत आणि लिहित असत. त्यामुळे गणेशोत्सवात गोळा झालेल्या ब्राह्मणेतर तरुणांनी हे भाषण बंद पाडलं. कार्यकारी मंडळाने प्रयत्न करूनही ते पूर्ण होऊ शकलं नाही. नंतर दुसर्या दिवशी व्यंकटेश बळवंत अर्थात बापूसाहेब पेंढारकर यांचं गाणं सार्वजनिक मंडळाने होऊ दिलं नाही. ललितकलादर्श नाटक मंडळीची जबाबदारी ताकदीने पुढे चालवणारे बापूसाहेब या भांडणात कुठेच नव्हते. त्यांना मंडळानेच गाण्यासाठी निमंत्रित केलं होतं. पण ते ब्राह्मण नव्हते, हाच त्यांचा दोष होता. सगळं ठरलं असूनही आयोजकांनीच त्यांचं गाणं होऊ दिलं नाही. त्यावरून बराच वाद झाला. वर्तमानपत्रांतही टीका आणि खुलासे आलेले दिसतात.
या सगळ्या वादाला ब्राह्मण विरुद्ध कायस्थ या पुरातन वादाचीही झालर होती. दादरमध्ये कायस्थांची चांगली वस्ती होती. प्रबोधनकार सांगतात, कायस्थांचे साधारणपणे ५०० बिर्हाडं होती. कायस्थ तरुण सार्वजनिक गणेशोत्सवातल्या ब्राह्मणी अरेरावीला विरोध करण्यात आघाडीवर होते. मुळात जातीय असणार्या ब्राह्मणी कारभार्यांनी या तरुणांच्या विरोधाला जातीय म्हटल्यामुळे प्रबोधनकारांनी त्यांना उत्तर दिलं नसतं तरच नवल, चार दोन तरूण कायस्थ कुलुगी कुत्री पेशवाई भटजींच्या कोंकणी पायतणांत लुडबुडली म्हणून इतर कायस्थ तरुणांचा स्वाभिमान आजच कांहीं सोनापुरांत गेलेला नाहीं. कायस्थ हा बहुजन समाजाच्या हितवादासाठींच जन्मलेला असतो. श्री. केशवराव ठाकरे दादर सोडून गेले, तरी त्यांच्या मागे त्यांचें जनसेवेचें कार्य चालवायला त्यांचे धाकटे बंधु यशवंतराव दादरला आहेत. प्रस्तुत प्रकरणीं यशवंतरावांच्या खांद्याला खांदा भिडवून श्री. बोले जे. पी., श्री. कवळी जे. पी., श्री. नारायणराव पाटील. जे. पी., वगैरे पुढारी व श्री. पडवळ, श्री. कोलेकर, ताम्हणे, कवळी, मोकाशी वगैरे शेंकडों तरूण उभे राहिले, तरीहि ज्या बुद्धिमदांना ही ‘कायस्थी चळवळ’ वाटते, त्यांना तरी सार्वजनिकत्वाचें सर्टिफिकीट कोणत्या गध्यानें दिलें आहे हें बाहेर पडले तर बरे होईल.
भोपटकरांचं भाषण बंद पाडण्याच्या निमित्ताने बहुजनांच्या असंतोषाचा भडका बघून प्रबोधनकारांना आनंद झालेलाही या लेखातून दिसतो. ही घटना त्यांना बहुजन जागृतीच्या क्रांतीचं प्रतीक वाटते. ते लिहितात, सार्वजनिकपणाच्या बुरख्याखाली ब्रह्मणेतरांवर कुरघोड्या चढविण्याचे केलेले लाखों ढोंगधत्तुरे आजपर्यंत बिनबोभाट सफाई पचले गेले, पण आतां मनू बदलला आहे- नव्हे, ठार मेला आहे, हेहि ज्यांना आतां नीट उमगत नाहीं, त्यांच्या पायाचें तीर्थ पिऊन बेचाळीस पूर्वज वंशजांसह उद्धरून जाणारे कोण पागल असतील ते असोत. बहुजन ब्राह्मणेतर समाजरूपीं झोपी गेलेला सिंह आतां जागृत होऊन आपली भयंकर आयाळ झटकून पंजांची नखें पाजळीत आहे. त्याच्या जागरूकतेची पहिली गर्जना झाली न झाली तोंच अवघा महाराष्ट्र पडसादानें गदागदा हादरू लागला. धर्ममार्तंडांची तिरपिट उडून एकजात जगद्गुरूंची पीठाळ दर्भासनें धडाड कोसळू लागली. राजकारणांतल्या भिक्षुकी ढोंगधत्तूर्यांना आडव्या कोलदंड्याचा चाप बसून, समाज व धर्मकारणांत आज भिक्षुकाला नासक्या बटाट्याचीहि बाजारांत किंमत येईना अशी स्थिती झाली आहे. लोकमान्यतेची बडवेगिरी आज जेथें नागडी उघडी पडली असतां माबाप सरकारची पोलिशी पुण्याईच काय ती तिच्या पट-वर्धनार्थ शिल्लक उरली आहे. तेथें फंडगुंडांना भर बाजारांत पाद्यपूजेचा सन्मान मिळून, सार्वजनिकपणाचे गाडगें कडांड फुटलें तर त्यांत नवल काय?
सार्वजनिकतेच्या नावाने सुरू असणार्या ब्राह्मणी मक्तेदारीला सुरुंग लावण्याची सुरुवात काम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला विरोध करणार्या दादरमधल्या बहुजन तरुणांनी केलं. ही महाराष्ट्रात घडलेल्या आणि इतिहासात कुठेच न नोंदवलेल्या एका मोठ्या परिवर्तनाची सुरुवात होती. पुढे त्याचं नेतृत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि रावबहाद्दूर बोले यांच्यासोबत प्रबोधनकारांनीही केलं. अर्थातच या स्थित्यंतराला कारणीभूत ठरलेल्या असंतोषाचे जनक प्रबोधनकारच होते. त्यांनी १९२०च्या दशकाच्या सुरुवातीच्या चालवलेल्या समाजजागृतीच्या प्रयत्नांतूनच हा आक्रोश जन्माला आलेला होता. त्याची पहिली महत्त्वाची दखलही प्रबोधनकारांच्या सार्वजनिकपणाचे गाडगे फुटले या अग्रलेखाने घेतली होती. त्यानंतर तीन वर्ष नेमकं काय घडलं होतं, याचे तपशील आपल्याकडे नाहीत. पण तीन वर्षांनी म्हणजे १९२८च्या गणेशोत्सवात या असंतोषाचा भडका उडाला. तेव्हा मात्र प्रबोधनकार दादरमध्ये होते. पण आजारपणामुळे सार्वजनिक जीवनापासून दूरच होते. गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी टिळक पुलावर गर्दी गोळा झालेली होती आणि भास्करराव कद्रेकर प्रबोधनकारांना बोलावण्यासाठी त्यांच्या घरी आले. यानंतर जे घडलं, तो महाराष्ट्राला कलाटणी देणारा इतिहास आहे.
