• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

लोककथा नव्हे, भाकडकथा!

सदानंद घायाळ (राज्यकारण)

marmik by marmik
April 29, 2026
in राज्यकारण
0
लोककथा नव्हे, भाकडकथा!

१मे २०२६ रोजी आज भारताच्या नकाशावर अस्तित्वात असलेला महाराष्ट्र ६६ वर्षांचा झाला… व्यक्तीच्या हिशोबाने विचार केला, तर आता महाराष्ट्राचा ज्येष्ठ नागरिकाच्या कॅटेगरीत आलाय. म्हणजे आयुष्यातला बराचसा भलाबुरा अनुभव त्याच्या गाठीशी आहे. या अनुभवाच्या जोरावर महाराष्ट्राने अनेक प्रश्नांची, शंकांची अभ्यासपूर्ण उत्तर शोधून काढली. शंकानिरसन केलं. पण आज त्याच महाराष्ट्रात जे प्रश्न शिल्लक नाहीत, किंवा जे मुळात प्रश्नच नाहीत, असल्या गोष्टींवरून वाद निर्माण करण्याचा नवा ट्रेंड आलाय. आणि तो सत्ताधार्‍यांच्या सावलीत सुरू असल्याने या सगळ्या प्रकाराला बहुपदरी गांभीर्य आलंय.
२०२४मध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना मध्य प्रदेशातून आलेल्या बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्री या भोंदू बुवाने महाराष्ट्र पिंजून काढला. प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे महायुती नेत्यांच्या खांद्याला खांदा लावून त्याने महाराष्ट्राला हिंदूच कसे ठेवले पाहिजे, याचे धडे दिले. आता हाच बुवा परत महाराष्ट्रात आला. संघ परिवारातील डॉ. आबाजी थत्ते सेवा व संशोधन संस्थेद्वारे नागपुरात उभारण्यात येणार्‍या भारत दुर्गा शक्ती स्थळाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी मंचावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीतच या बुवाने दावा केला की, छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करून खूप थकले होते. ते एक दिवस समर्थ रामदास स्वामींकडे गेले. त्यांनी आपला मुकुट काढला आणि रामदास स्वामींना विनंती केली की, मी खूप युद्ध केलंय, आता तुम्ही माझ्यावर दया करा आणि हा राजपाट तुम्ही सांभाळा. मला आता विश्रांती हवी आहे. यावर हसून रामदास स्वामी म्हणाले की, मला हे स्वीकार आहे. पण तू माझा कोण आहेस? शिवाजी महाराज म्हणाले, मी आपला शिष्य आहे. तेव्हा रामदास स्वामी म्हणाले, शिष्याचे कर्तव्य काय असतं? शिष्याचं कर्तव्य गुरूच्या आज्ञेचं पालन करणं हे असतं. त्यानंतर रामदास स्वामींनी तो मुकुट उचलला, स्वतःच्या डोक्यावर ठेवला आणि म्हणाले की, आजपासून हे माझे राज्य आहे आणि मी ते चालवणार. माझी तुला आज्ञा आहे की तू या राज्याचं संचालन कर.
थोडक्यात रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू होते आणि त्यांच्या आज्ञनेनुसारच महाराजांनी रयतेचं राज्य चालवलं, राज्य कारभार केला, असं या भोंदू बुवाचं म्हणणं आहे. सरसंघचालक, मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री मान डोलावून हा शिवछत्रपतींचा बनावट इतिहास मन लावून ऐकत होते.
या बुवाने जे तारे तोडले त्याची क्लिप व्हायरल झाली आणि महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली. इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी बुवांच्या विधानाचा तीव्र निषेध केला. ते पत्रकार परिषदेत म्हणाले की शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांच्याविषयी अशी भाकड कथा काही लोक सांगत असतात. काही वर्षांपूर्वी अशीच एक बोगस सनद लंडनवरून आणल्याचा दावा करण्यात आला होता, जो इतिहासकार गजानन भास्कर मेहेंदळे यांनी पुराव्यानिशी खोडून काढला होता. उत्तरेतून येऊन महाराष्ट्रात मराठ्यांचा खोटा इतिहास सांगणार्‍या अशा व्यक्तींवर, विचारपीठावर उपस्थित असलेल्या मुख्यमंत्र्यांनी स्वतःहून कारवाई केली पाहिजे. असल्या कोणत्याही बाबाला महाराष्ट्रात पाऊल ठेवू देऊ नये.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज हे ऊर्जेचा अखंड प्रवाह आहेत. ते कधी थकले नाहीत आणि कधी झुकले नाहीत. मात्र, सध्या काही बुवा महाराष्ट्रात येऊन नवीन इतिहास लिहित आहेत किंवा तो बदलण्याचा प्रयत्न करत आहेत, हे महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही. फडणवीस, भागवत हे मंचावर होते. त्यांच्या उपस्थितीतच शिवरायांच्या इतिहासाची मोडतोड केली जात होती. त्यांनी बागेश्वर बाबांना रोखायला हवं होतं. शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा काढला, शाहिस्तेखानाची बोटं छाटली, अशा महापुरुषाला तुम्ही थकलेला माणूस म्हणता? हे विधान जाणीवपूर्वक करण्यात आलंय.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणं हे भाजपा आरएसएसचं राष्ट्रीय धोरण असून महाराजांचे विचार आणि कर्तृत्व त्यांना मान्य नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही. महाराजांचा अपमान केल्याबद्दल धीरेंद्र शास्त्री, देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी व मोहन भागवत यांनी महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू रामदास स्वामी नाहीत, ही ऐतिहासिक संशोधनातून सिद्ध झालेली गोष्ट आहे. तरीही असा चुकीचा, इतिहासाची मोडतोड करणारा जाहीर उल्लेख केला जात असताना मुख्यमंत्री, सरसंघचालक यांनी या बुवाला रोखलं का नाही, असा प्रश्न विचारला जातोय. मुख्यमंत्री फडणवीस नाशिक इथे पत्रकारांशी संवाद साधताना त्रोटक शब्दांत ते म्हणाले की, इतिहासात अशा प्रकारचा कोणताही ठोस दाखला उपलब्ध नाही. महापुरुषांभोवती अनेक लोककथा तयार होतात. त्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या स्वरूपात सांगितल्या जातात. रामायण आणि महाभारत यांसारख्या ग्रंथांमध्येही विविध लोकपरंपरा आढळतात. त्यामुळे अशा कथांना इतिहास म्हणून स्वीकारताना काळजी घ्यावी लागते. मुख्यमंत्र्यांनी भोंदू बुवाची बडबड ही लोककथा आहे, असं म्हटलं पण ही लोककथा खरी आहे की खोटी आहे, याबद्दल मात्र काहीही विधान केलं नाही, हे विशेष लक्षणीय आहे. भाकडकथेला कोणताही ऐतिहासिक, वैज्ञानिक, तार्किक किंवा वास्तवाचा आधार नसतो. अशाच पूर्णपणे तथ्यहीन, कपोलकल्पित आणि अतिशयोक्तीपूर्ण कथांना भाकडकथा म्हटलं जातं. लोकांची दिशाभूल करणं, अंधश्रद्धा पसरवणं हा यामागचा मूळ उद्देश असतो. याउलट पिढ्यानपिढ्या मौखिक परंपरेने एका पिढीकडून दुसर्‍या पिढीकडे हस्तांतरित झालेल्या आणि जनमानसात रुजलेल्या कथांना लोककथा म्हटलं जातं. लोककथा हा लोकसाहित्याचा आणि सांस्कृतिक वारशाचा एक अत्यंत महत्त्वाचा आणि अधिकृत भाग मानला जातो. इतिहासाची पुनर्रचना करण्यासाठी किंवा तत्कालीन सामाजिक स्थिती समजून घेण्यासाठी इतिहासकार आणि समाजशास्त्रज्ञ लोककथांचा एक साधन म्हणून अभ्यास करतात. म्हणजेच भाकडकथा आणि लोककथा यामध्ये जमीन आस्मानाचा फरक आहे. फडणवीस बागेश्वर बुवाची भाकडकथा लोककथा म्हणून खपवताहेत.

शिवाजी महाराजांचे रामदास स्वामी हे गुरू होते, ही भाकड कथा आहे की लोककथा? ६६ वर्षांच्या इतिहासात महाराष्ट्रानं अभ्यासाअंती, संशोधनाअंती या प्रश्नाचं उत्तर दिलंय. काही अपवाद वगळले, तर जवळपास सर्वच इतिहास अभ्यासक, संशोधक आणि इतिहास लेखक यांच्या मते, इसवी सन १६७२च्या आधी शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांची भेट झाल्याचे उल्लेख नाहीत. १६४२ साली शिवाजी महाराजांचं कार्य सुरू झालं. १६५८ सालापर्यंत शिवरायांचा समर्थ संप्रदायही ठाऊक नव्हता. भाटेकृत सज्जनगड आणि समर्थ रामदास पुस्तकात भास्कर गोसावी यांनी दिवाकर गोसावी यांना लिहिलेलं एक पत्र आहे. यानुसार भिक्षेसाठी महाराजांकडे गेले, तेव्हा भास्कर गोसाव्यांनी आपण समर्थांचे शिष्य असल्याचं सांगितलं. त्यावर महाराजांनी कोण समर्थ, समर्थांचे मूळ गाव वगैरे काय यासारखी विचारपूस केली. शिवाजी महाराज-समर्थ यांची १६७२मध्ये भेट झाल्याचा उल्लेख भाटे यांनी केलाय. म्हणजेच म्हणजे, रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे गुरू होते, ही निव्वळ भाकडकथा आहे, त्याला लोककथा म्हणणे चुकीचं आहे. मग मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाकडकथेला जाणीवपूर्वक लोककथा का म्हटलं? धीरेंद्र बुवाने चुकीचा इतिहास सांगितला, असं स्पष्टपणे का सांगितलं नाही? महापुरुषांभोवती अनेक लोककथा तयार होतात, असं म्हणून उलट फडणवीसांनी रामदास स्वामी हे शिवरायांचे गुरू होते, या विधानाचं समर्थन तर केलं नाही ना?
या भोंदू बुवाने मात्र फडणवीस कृत लोककथेसाठी माफी मागितली. ‘शिवाजी महाराज हे पूजनीय आहेत. पण माझ्या बोलण्याचा विपर्यास करून चुकीचं वक्तव्य मांडण्यात आलं. त्यामुळे कुणाची मनं दुखावली गेली असल्यास मी माफी मागतो,’ असा हा दांभिक माफीनामा. आपल्या वक्तव्याचा विपर्यास केला, हा दावा त्यात आहेच.
याच कार्यक्रमात बागेश्वर बुवा म्हणाला की, ‘भारतातील नागरिकांनी चार मुलं जन्माला घालावीत आणि त्यातील एक मूल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला द्यावं. तेच मूल संकटाच्या वेळी इतरांचे प्राण वाचवण्याच्या कामी येईल.’ म्हणजे ज्या महाराष्ट्राचं हम दो हमारे दो किंवा कुटुंब नियोजन हे सरकारी धोरण आहे, तिथे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसमोरच हे विधान करण्यात आलंय. त्यात संकटकाळी धावणार्‍या संघ कार्यकर्त्यांचा हास्यस्फोटक विनोद आहेच.
इकडे, शास्त्री बुवांचं पुराण सुरू असतानाच तिकडे शिंदेसेनेचे बुलढाण्याचे नववी पास आमदार संजय गायकवाड यांनी कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित शिवाजी होता या ८० पानाच्या पुस्तकाच्या शीर्षकात छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केल्याचा मुद्दा उपस्थित केला. पुस्तकाचे कोल्हापूर येथील प्रकाशक प्रकाश आंबी यांना मध्यरात्री उशिरा कॉल करून आई-बहिणीवरून शिवीगाळ केली. जीवे मारण्याची धमकी दिली. पानसरेंचं काय झालं ते माहिती आहे ना, असं विचारत धमकावलं. शिवाजी महाराजांचा उल्लेख छत्रपती शिवाजी महाराज असा केला पाहिजे, असा मुद्दा मांडला. शेवटी प्रचंड टीका झाल्यानंतर गायकवाडांनीही माफी मागितली. पण जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार करूनही पोलिसांनी गायकवाडांवर कोणतीही कारवाई केली नाही.

महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली तेव्हा सुरुवातीलाच १९६२मध्ये स्वतः पहिले मुख्यमंत्री, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांनीच हा मुद्दा सोडवला होता. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या नावावर काहीजणांनी हरकत घेतली होती. तेव्हा त्यावर राज्य सरकारनेच प्राचार्य सी. रा. तावडे यांच्या नेतृत्वात ख्यातनाम अभ्यासकांची एक समिती नेमण्यात आली होती. श्री. छत्रपती शिवाजी युनिव्हर्सिटी कमिटी असं नाव असलेल्या या समितीनेच विद्यापीठाचं नाव शिवाजी विद्यापीठ असावं, अशी सूचना केली होती. तीच सूचना मान्य करून यशवंतरावांनी संपूर्ण नाव देण्याचा आग्रह खोडून काढला होता. संपूर्ण नाव दिलं तर लघुरूप, शॉर्टकट वापरलं जाईल, असं चव्हाणांनी सांगितल्यानंतर हा निर्णय सर्वांनी मान्य केला होता.
धीरेंद्र शास्त्री असो की संजय गायकवाड या दोन्ही प्रकरणात दोन साम्यस्थळं आहेत. एक म्हणजे, दोघांचाही सत्तेशी संबंध आहे. एकजण स्वतः सत्ताधारी आहे, तर दुसरा सत्तेच्या सूत्रधारांना मार्गदर्शन करणारा आहे. दुसरं म्हणजे, दोघांनीही माफी मागितलीय. माफी मागितली असली, तरी मूळ प्रश्न तसेच आहेत. शिवाजी महाराजांचे गुरू कोण हा निकालात निघालेला मुद्दा फेब्रुवारी २०२२मध्ये तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उकरून काढला होता. त्यांनी रामदास स्वामी हे महाराजांचे गुरू असल्याचं म्हटलं होतं. आता मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीतच धीरेंद्र शास्त्रींनी कोणताही पुरावा नसलेली, निराधार भाकडकथा लोककथा म्हणून मांडलीय. सत्ता आणि भाकडकथा हा ट्रेंड महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी धोक्याचा इशारा आहे.

Previous Post

महाराष्ट्राचा बट्ट्याबोळ करूनच थांबणार का?

Next Post

भाजपाचा एकमेव अजेंडा तोडा फोडा आणि राज्य करा!!

Next Post
भाजपाचा एकमेव अजेंडा तोडा फोडा आणि राज्य करा!!

भाजपाचा एकमेव अजेंडा तोडा फोडा आणि राज्य करा!!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.