
मा.महोदय,
आम्हाला आजवर कुठल्याही व्यक्तीचा वैयक्तिक द्वेष, तिटकारा नाही वाटला किंवा वाटणार देखील नाही; कारण कोणतीही व्यक्ती तिच्या व्यक्तिगत आयुष्यात कशी असावी, तिने कसं वागावं, काय आचार विचार करावेत, ही संपूर्णपणे त्या व्यक्तीची खासगी बाब असते. परंतु, जर कोणी व्यक्ती एखाद्या संविधानिक पदावर बसलेली असेल, सत्तेत असेल, शासकीय किंवा प्रशासकीय अधिकार बाळगून असेल, तर अशा व्यक्तीच्या वागण्यातून, कृतीतून समाजावर मोठा परिणाम होत असतो. कारण ते पद, ते अधिकार समाजाच्या कल्याणासाठी, सामाजिक कर्तव्यासाठी असतात. त्या पदावर बसून तुम्ही तुमचे वैयक्तिक विचार, मान्यता, आचार हे सार्वजनिकरित्या अंमलात आणू शकत नाही. तुम्ही तिथे एक जबाबदार आणि उत्तरदायी व्यक्ती म्हणून बसलेले असता. तिथे तुम्हाला संविधानानुसारच जनसामान्यांच्या कल्याणाच्या अनुषंगाने वर्तन करावे लागते. तिथे तुमच्या खाजगी कुठल्या संघाचा, तुमच्या धर्माचा, तुमच्या पक्षाच्या विचारधारेचा दगड जबरदस्ती जनतेच्या माथी मारता येत नाही.
पण, गेली डझनभर वर्षे झाली, राजकारणाने अत्यंत निम्नतेचा कळस नाही, तर पाताळ गाठला आहे. विशेषकरून, ‘मी पुन्हा येईन’ म्हणत हव्यासाने, अधाशीपणाने महाराष्ट्राच्या सर्वोच्च माननीय पदावर बसलेल्या या महोदयांनी, महाराष्ट्राच्या विकासाची, प्रगतीची, पुरोगामित्वाची, संस्कृतीची, इतिहासाची, शैक्षणिक आर्थिक सामाजिक श्रीमंतीची, समृद्धतेची व राजकीय नीतिमत्तेची, घडीच बदलून टाकली आहे. किंबहुना, ती घडी आपल्या सोयीने बिघडवून आपल्या वैयक्तिक खिशात कोंबली आहे. आणि प्रत्येक गोष्टीने समृद्ध असलेल्या, देशात सर्वात अग्रणी असलेल्या या राज्याला गायपट्ट्यात नेऊन ठेवण्याचा कसोशीने, दात ओठ खाऊन प्रयत्न केला आहे.
२०२३ला मंजूर झालेल्या नारीशक्ती विधेयकाबद्दल स्वतःच तेव्हा एक्सवर आनंद व्यक्त करणारी पोस्ट करणार्या या माननीय महाशयांनी आता महिला आरक्षणाच्या आडून उत्तरेच्या लोकसभेच्या जागा वाढवण्याचं कुभांड विरोधी पक्षांनी हाणून पाडल्यानंतर आपल्या हातातील बाहुल्यांच्या फौजेला असं काही कामाला लावलं, ज्यातून या राज्याच्या महिलांना, ‘विरोधांकडून आपल्यावर किती अन्याय झाला आहे’, असं वाटावं. असल्या रिकामटेकड्या कामासाठी यांना भरपूर वेळ आहे. स्वतः जातीने या ठिकाणी उपस्थित राहणे, तिथे भाषण देणे, याव्यतिरिक्त, तिथे शेकडो, हजारो लोकांना ट्रॅफिक जाम करत दमदाटीने, आमिषाने घेऊन जाऊन, सुशेगात कार्यक्रम घेणे.
आणि हो, तिथे काय केलं तर स्टेजवर ‘अन्यायाने पेटून उठलेल्या महिलेचं’ पोस्टर लावून, त्याच स्टेजवर महिलांच्याच नृत्याचा कार्यक्रम घेतला गेला. महिलांचा नृत्याविष्कार म्हणजे तुमचा नारीशक्तीचा कळवळा आहे का? विषयाचे इतके गांभीर्य होते, तर तिथे मौजमजा करायला पैसा खर्च का केला? यासाठी महोदय, इतका जो पैसा खर्च केला, तो कुठून आणला गेला होता? आमच्याच
टॅक्सचा पैसा होता ना तो!
राज्यात शेतकरी रोज आत्महत्या करत असताना त्या गरीब शेतकर्यांच्या जमिनी, बेभाव किंवा कवडीही न देता अधिग्रहित करत, त्यांच्या मालाला भाव न देता, त्यांना आणखीनच मरणाच्या दारात ढकलून देणारे, या राज्यातील हे एकमेव मुख्यमंत्री. विविध क्षेत्रांत लाखांवर पदे रिक्त असताना, तरुणांना रोजगार नसताना भरती न काढता, त्यांना वेतन देऊ शकत नसल्याचे हे लोक कारणं देतात. पण फुकट मतलाटू लाडक्या बहिणीसारख्या योजनांना यांना पैसा असतो. त्यात देखील गरजू महिलांना लाभ न मिळता, आवश्यकता नसलेल्या महिला याचा लाभ घेतात, त्यासाठी कसलीही शहानिशा न करता ४५ हजार कोटींहून अधिक रक्कम हे घालवतात. परंतु वृद्धांना पेन्शन आणि पगार देण्यासाठी यांच्याकडे पैसा नाही.
इतर निवडणूक प्रचारासाठी, किंवा तत्सम कामासाठी भरपूर पैसा असतो. अतिवृष्टीग्रस्त शेतकर्यांसाठी जमा झालेला मुख्यमंत्री सहाय्यता निधी कुठे जातो, याचं गणित जनतेला कळत नाही… कळू दिले जात नाही… माहिती अधिकारातून कळते की शेकडो कोटी जमा झालेल्या मदतीपैकी, केवळ ७५ हजार रुपये या मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून वाटण्यात आले! कसल्याशा भंपक विकासाच्या नावाखाली, ‘वेस्ट इंडिया कंपनींच्या’ भांडवलशहांना पायघड्या घालून मुंबईच काय तर बहुतांश महाराष्ट्र, महाराष्ट्राची साधन संपत्ती त्यांच्या पायावर अलगद ओतणारे हे महोदय… त्यासाठी इथल्या नैसर्गिक, पर्यावरणीय समृद्धतेचा दडपशाही वापरून विनाश घडवून आणणारे हे महोदय… महाराष्ट्रातील जवळपास प्रत्येक शहराला प्रदूषणाच्या खाईत लोटणारे महोदय… आणि यावर जनतेने विरोध केल्यास, त्यांच्यावरच उलट गुन्हे दाखल करण्याचे असत्कर्म यांनी केले.
तसेच, अलीकडे आता, रोज वेगवेगळे उपटसुंभ येऊन या महाराष्ट्राच्या अस्मितेला पायदळी तुडवतात. बागेश्वरसारखे, खरातसारखे भोंदू पोसून त्यांना हवं ते बोलण्याची, हवं ते करण्याची मोकळीक देऊन हे आमच्या मराठी मातीतील अस्मितेवर चिखलफेक करतात. बहुजन प्रजाप्रतिपालक छत्रपतींपासून ते सर्व बहुजन महापुरुषांना सतत अपमानित करत सुटतात. त्यांचे महत्व कमी करण्याचा वर्चस्ववादी प्रयत्न वारंवार होतो. आणि अशांना हे आपल्या संघी कार्यक्रमात सन्मानाने बोलावणे पाठवतात. ते काहीही बरळून गेले तरीही एक शब्द यांच्या तोंडून त्याच्या विरोधात निघत नाही. उलट त्या वक्तव्यावर पांघरूण घालण्याचे प्रकार करत त्यांना ‘संत महात्मा’ संबोधत, ‘लोककथेत कसे बदल होतात’ अशी काहीतरी तकलादू विधाने यांच्याकडून केली जातात. महोदय, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास म्हणजे रामायण महाभारतासारखी कोणती लोककथा नाही… तो या मातीचा सत्य, अभिमानास्पद आणि समृद्ध इतिहास आहे… संघी भोंदू बाबांना इतके पाठीशी घालायचं असेल, तर या संविधानिक पदावरून पायउतार होऊन संपूर्ण वेळ संघी कार्य करावे आपण महोदय, आम्हाला त्यावर काहीही आक्षेप नसेल!
हे भोंदू बुवा कमी म्हणून राज्यातीलच स्वतःच्या आणि मित्र पक्षातील अंगठाबहाद्दर विधेयकांना व इतर हाके, सदावर्ते, सारख्या भुंकणार्यांना समाजात मोकळे सोडतात! यावर कसल्याही कारवाया होत नाहीत. याचा अर्थ तुम्ही स्वतः या सगळ्यांच्या समर्थनार्थ उभे आहात, असा अर्थ आम्ही का काढू नये?
शिक्षणासंबंधी धोरणांबाबत होईल तेवढी उदासीनता यांच्या सत्तेत दिसते… शाळकरी मुलांना सहज गांजा, इतर अंमली पदार्थ मिळतात, लहान मुलांपासून तरुणाई व्यसनाधीन होत आहे… कुठून उपलब्ध होत आहे हे सगळं? कोण करत आहे? याबाबत आपली जबाबदारी नाही का? गावोगावी रोजगार नसल्याने, महागाईने गुन्हेगारी वाढीस लागली आहे. उलट गुन्हेगारांना सुरक्षित करणार्या लोकप्रतिनिधींवर कारवाई केली जात नाही. उलट त्यावर तात्पुरते काहीतरी स्टेटमेंट देत परिस्थितीवर बोळा फिरवत त्यांना’सेफ’ केलं जातं.प्रश्न विचारलाच, तर माझ्या ‘लेव्हल’च्याच व्यक्तीने बोला, असा अहंकारी सूर काढला जातो!
प्रत्येक गावागावात पुतळ्याचे कधी तर कधी क्षुल्लक कारणाने जाती जाती मध्ये धर्मपंथांमध्ये तेढ निर्माण होईल असं वातावरण तयार केलं जातं. राज्याच्या सर्वोच्च जबाबदार पदावर असणार्या आणि सोबतच ‘गृहमंत्रीपद देखील मीच पाहणार’ म्हणून स्वतःची ताजपोशी करून घेतलेल्या महोदयांना कर्तव्य मात्र निभावायचं नसतं की मुद्दाम त्याला बगल दिली जाते?
आणि सगळ्यात कहर म्हणजे ही महाराष्ट्राची जनता या कपटनीतीला ओळखू शकत नाही? बहुजन म्हणून कोणाच्याही गारूडावर, राजकीय स्वार्थी भूलथापांनी संमोहित होऊन, आपणच आपल्या पायावर दगड मारून घेत आहोत, याचं भान देखील नाही? मागच्या काही वर्षांत महाराष्ट्राचा खरंच प्रचंड कायापालट झाला… महाराष्ट्रात विकासाची उलटी गंगा वाहू लागली… सत्ताधार्यांच्या संघी मानसिकतेला महाराष्ट्र बळी पडला!
अरे, अमेरिकेने भारताला ‘नरकाचे द्वार’ म्हणत संबोधल्यानंतर, इराणसारख्या जुन्या मित्रदेशाने भारताची बाजू घेत, इथल्या समृद्धीचा एक व्हिडिओ प्रसिद्ध केला.. त्यांनी ती समृद्धी दाखवण्यासाठी देशातील एकमेव राज्य निवडले.. ते म्हणजे महाराष्ट्र! यशवंतराव चव्हाणांपासून ते मागच्या दशकापर्यंत सर्व पक्षाच्या सत्तेत बहरलेल्या, देशातील त्या सर्वात सुंदर, विकसित, वैचारिक, सुसंस्कृत आणि समृद्ध राज्याला, उत्तरेकडील जनतेला आमंत्रण देत, कोट्यवधींचा भरणा आणून गायपट्टा बनवून दशा केली… त्यांनाच इथे रहिवासी म्हणत नियमित केले… मराठी माणसाच्या तोंडचा घास हिरावून त्यांना भरवला…
महोदय, वैयक्तिक तुमच्या मान्यता, विचार काहीही असोत. परंतु, तुम्ही ज्या पदावर विराजमान आहात, त्या तुमच्या पदाला हे शोभनीय नाही आणि जबाबदारी पाहता ते अपेक्षित देखील नाही!

