२०२० हे संपूर्ण वर्षच नैसर्गिक आपत्तींनी घेरलेले आहे. कोरोनासोबतच भूकंप, चक्रीवादळ इत्यादी नैसर्गिक संकटांप्रमाणेच विशाखापट्टणम येथील गॅस गळतीसारख्या मानवनिर्मित संकटांनी लोकांचे बळी घेतले आहेत. याच वर्षी ९ जूनला आसामच्या बाघजान परिसरातील ऑइल इंडिया लिमिटेडच्या एका नैसर्गिक वायूच्या विहिरीत एक मोठा स्फोट झाला आणि आगीने थैमान घालायला सुरुवात केली. संपूर्ण आकाश धुराने काळवंडून गेले होते.
या आगीत ३ लोकांचा होरपळून मृत्यू झाला तर ३ हजार लोकांना स्थलांतरित करण्यात आले. ही लोक तेव्हापासून सरकारने बांधून दिलेल्या तात्पुरत्या निवाऱ्यात राहत आहेत. आज ही आग लागून १५०हुन अधिक दिवसांचा कालावधी उलटला आहे पण अजूनही प्रशासनाला इथल्या आगीवर आपले नियंत्रण प्रस्थापित करता आलेले नाही.
आज अनेक लोक आपल्या घरी परतले असले तरी काही लोक अजूनही तात्पुरत्या पुनर्वसन केंद्रात आपले जीवन कंठीत आहेत.
‘बीबीसी’च्या एका रिपोर्टनुसार या भागातील उष्णता, ध्वनी प्रदूषण व धुरामुळे इथे राहणीमान बिकट झाले आहे. अनेक लोकांना श्वसनाचे, डोळ्यांचे व मायग्रेनचे विकार जडले आहेत, त्यात कोरोनामुळे परिस्थिती अजूनच गंभीर होत चालली आहे.
या दुर्घटनेमुळे लाबण्या सैकिया या तीन अपत्य असलेल्या विधवा महिलेला बेघर व्हावे लागले. आजही ती महिला अत्यंत बिकट अवस्थेत आपले जीवन जगते आहे. तिच्यावर तीन मुलांचा सांभाळ करण्याचे दायित्व येऊन पडले आहे, ते पार पाडताना, तिला असंख्य अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या आगीत तिने तिच्या मृत पतीचा एकमेव फोटो देखील गमावला आहे, आता भविष्यात आपल्या या तीन अपत्यांना काय दाखवावे? हाच प्रश्न तिला सतावतो आहे. लाबण्यासारखे अनेक लोक आज या वायुदुर्घटनेचे दुष्परिणाम भोगत आहेत.
ऑइल इंडिया लिमिटेडकडून आपत्तीग्रस्तांना २५ लाख रुपयांची तत्काळ मदत करण्यात आली आहे. इतकेच नाही दर महिन्याला त्यांना ५० हजार रुपयांची मदत केली जात असून त्या माध्यमातून निर्वासित लोक आपल्या गरजा भागवत आहेत. अजूनही त्या लोकांचे पुनर्वसन न करण्यात आल्यामुळे त्यांच्यात नाराजी आहे. अनेकांनी आंदोलन करून तत्काळ मदतीची मागणी केली आहे. निर्वासित म्हणताय की कंपनीने आम्हाला फक्त आमच्या रोजच्या गरजा भागवता येतील इतकी मदत केली आहे, कंपनीकडून अजूनही आम्हाला नुकसानभरपाई मिळालेली नाही.
एकीकडे निर्वासितांचे प्रश्न असताना दुसरीकडे आग नियंत्रणात आणायचे आव्हान कंपनीसमोर जसेच्या तसे आहे. आम्ही आगीवर या महिन्याअखेरीस विजय मिळवू असा विश्वास कंपनीचा अधिकाऱ्यांना वाटत असला तरी वेगवेगळ्या ठिकाणाहून आगीचे बाहेर येणारे लोट बघता, नियंत्रण कसे करावे हेच त्यांना लक्षात येत नाही आहे.
या आगीमुळे आजूबाजूला पर्यावरणाचे देखील मोठे नुकसान झाले आहे. परंतु अनेक तज्ञांच्या मते या आगीचे पर्यावरणावर दूरगामी परिणाम होणार नाहीत, प्रामुख्याने नैसर्गिक वायुगळतीमुळे ही आग लागली असल्याने त्याचा विशेष परिणाम होणार नाही, पावसाच्या पाण्याने यामुळे निर्माण झालेले धूलिकण पुसले जातील. आसाम सरकारच्या एका कमिटीनुसार काही वर्षांचा कालावधी तरी इथल्या जैवविविधतेचे पुनरुज्जीवन व्हायला लागणार आहे. या आगीमुळे अनेक महत्वपूर्ण जैविक क्षेत्रे बाधित असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
बीबीसीच्या वृत्तानुसार सध्या ऑइल इंडिया लिमिटेड स्नुबिंग या तंत्रज्ञानाचा वापर करून या आगीवर नियंत्रण प्रस्थापित करू पाहते आहे, परंतु यासाठी जे काही टार्गेटस ठेवण्यांत आले होते, जी डेडलाईन ठरवण्यात आली होती, ती ऑइल इंडियाला साधता आलेली नाही, त्यामुळे आता काय होणार हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल.