• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

लबाडाघरच्या आवतणाला भुलू नकोस, ताई!

मर्मभेद

marmik by marmik
April 23, 2026
in मर्मभेद
0
लबाडाघरच्या आवतणाला भुलू नकोस, ताई!

ताई, तुझी परिस्थिती समजू शकते आम्हा भावांना. पण, किती काळ फसत राहणार आहेस? कधी लाडकी बहीण नावाच्या भुलाव्याला तर कधी नारी शक्ती वंदना नावाच्या कांगाव्याला? तुझे हे बळेबळे एकतर्फी गळ्यात पडलेले तथाकथित लाडके भाऊ फक्त तुझ्या मतावर डोळा असलेले सत्तालंपट, धनपिपासू लांडगे आहेत, हे तुला कळणार कधी?

ताई, आम्हालाही कल्पना आहे की गेल्या ११-१२ वर्षांत तू पार गांजून गेली आहेस. काय करशील, या काळात महागाई पार आभाळाला भिडली आहे. घरात उत्पन्न १० वर्षांपूर्वी होतं तेवढंच येतंय. घरात कमावते हात दोन असोत की तुझेही धरून चार असोत; घरातले खर्च, पोराबाळांच्या फिया, शाळेचे खर्च या सगळ्याला तोंड तुलाच द्यावं लागतं. त्यांची मिळवणी, जुळवणी करता करता जीव मेटाकुटीला येतो तुझा. अशात कोणी ‘लाडकी बहीण’ म्हणून तुला हरभर्‍याच्या झाडावर चढवलं आणि महिन्याला थोडी रक्कम दिली, तर तुला तो रक्षाबंधनाला ओवाळणी घालणारा दिलदार, तारणहार भाऊरायाच वाटतो आणि तू भाऊबीज म्हणून त्याच्या झोळीत मत घालून मोकळी होतेस! यात तुझा दोष नाही, ताई. तुझ्याजागी कोणतीही बहीण असती तरी तिने त्यावेळी असाच विचार केला असता.

पण, आता तरी जरा वेगळा विचार कर ताई. जरा खोलात जा, नीट तपासून बघ… या लबाड भावांनी तुला ओवाळणी घातली ती कुठून? तुझ्या नवर्‍याच्या म्हणजे त्याच्या दाजीच्या खिशात आणि तुझ्याच पर्समध्ये हात घालून काढलेल्या करांच्या पैशांतून एकीकडे महिन्याला ओवाळणी टाकण्याचा आव आणतायत भाऊराया. त्याबदल्यात तुझ्या मुलांचं शिक्षण बंद पाडतायत, ज्या सुविधा सर्वात आधी पुरवायला पाहिजेत, त्यांच्या नावाने बोंब! आणि ही भावांनी घातलेली ओवाळणी कसली? इकडून तिकडून ओरपून गब्बर बनलेत तुझे हे दोडके भाऊ. तुला ओवाळणी देण्यासाठी यांचा हात कधी स्वत:च्या खिशात गेलाय का?

तीच गत त्या नारी शक्ती वंदना वगैरे फोकनाडबाजीची! संसदेत आम्ही बायकांना ३३ टक्के आरक्षण देणार होतो, पण विरोधकांनी हा पवित्र यज्ञ उधळून लावला आणि नारीशक्तीचा अपमान केला, अशी बोंब हे जातिवंत सोंगाडे जिथे तिथे मारतायत. मेंदू गहाण ठेवलेल्या काही तायाही झिलकरी बनून त्यांना साथ देतायत,

कॅमेर्‍यासमोर रडून भेकून दाखवतायत, यांच्या या नाटकाला भुलू नकोस, ताई. पुन्हा जरा विचार कर, महिलांना आरक्षण द्यायची यांची एवढी उबळ दाटून आली आहे, ती प्रामाणिक असती तर मग यांच्या संघटनेच्या प्रमुखपदावर कधी कोणी बाई कशी नेमली गेली नाही? संस्कारी रांगोळ्या काढणं एवढंच बायकांचं काम असतं का? यांच्या पक्षाच्या अध्यक्षपदावर कधी एखादी बाई कशी नेमली गेली नाही? त्या दिवशी नटश्रेष्ठ नंबर एक काँग्रेसच्या नावाने बोटं मोडायचा एककलमी कार्यक्रम करायला दूरदर्शनवर आले, तेव्हा त्यांनी बाणेदारपणे स्वत:च्या सर्वोच्च पदाचा राजीनामा देऊन आपल्याजागी एखाद्या सक्षम महिलेची नेमणूक करून झोळी उचलून निघून जायचं होतं. सगळा देश खूष झाला असता. पण, तसं त्यांनी काही केलं का? संसदेत व्हायचं तेव्हा होवो, आम्ही आमच्या पक्षात आजपासून महिलांना ३३ टक्के आरक्षण देतो आहोत, अशी घोषणा त्यांनी केली का? आपल्या पक्षाचं जिथे जिथे सरकार आहे, तिथे तिथे आजपासून मंत्रीपदांमध्येही ३३ टक्के आरक्षण लागू होणार, असं जाहीर करण्यापासून त्यांना कुणी अडवलं होतं? पण तसंही त्यांनी काही केलं नाही. बरोबर ना?
कारण, मुळात आज हे विधेयक आणलं गेलं, हेच मुळात खोटं आहे. आज जे निलाजरे (यात यांचे सगळ्या राज्यांमधले प्रमुख सत्ताधारी असावेत हे आपलं दुर्दैव) नेते नारी शक्तीचा अपमान म्हणून गळे काढतायत, त्यांनी तीनच वर्षांपूर्वी याच विधेयकावरून नारी शक्तीचा विजय झाला म्हणून नाच केला होता. नीच कद्रूपणा इतका की त्या विधेयकाला विरोधकांनीही पाठिंबा दिला होता, त्याचा उल्लेख केला नाही, त्याबद्दल कृतज्ञता नाही. सगळं काही यांचे नॉन बायोलॉजिकल पॉपॉच करतात! २०२३मध्ये तेव्हाच्या निवडणुकांमध्ये तुझ्यासारख्या तायांना गंडवण्यासाठी, त्यांना आपण फार मोठे अधिकार देतो आहोत, असं भासवण्यासाठी महिलांना ३३ टक्के आरक्षण देणारं विधेयक मंजूर झालंच आहे… पण तो कायदा का नाही बनला? कारण, यांची तेव्हाही आरक्षण देण्याची नियत नव्हती आणि आताही नाही.
ताई, मुळात हे लोक बाईला दुय्यम नागरिक मानतात. चूल आणि मूल एवढंच तिचं कार्यक्षेत्र मानतात. ज्यांनी लग्नच केलेलं नाही आणि ज्यांनी संसार केलेला नाही, असे लोक सर्वसामान्यांना दुसर्‍या धर्माची भीती घालून ‘आपली’ लोकसंख्या वाढवायचं आवाहन करतात, तेव्हा ते तुझ्या पायात बेड्या अडकवत असतात. हा पोरवडा जन्माला घालायचा तू, तो नंतर सांभाळायचाही तूच. गेल्या काही वर्षांत त्यांनी कोणते बुवा बाबा पोसले आहेत, त्यांचे उद्योग काय, हे तू पाहते आहेसच ना? बलात्कारी, अत्याचारी बाबांना कसा हवा तेव्हा पॅरोल मिळतो, ते कसे आरामात फिरतात, ते तू पाहते आहेस ना? बलात्कार्‍यांचे हारतुरे घालून सत्कार करणारे आणि बलात्कार बाईनेच ओढवून घेतला, अशी नीच मांडणी करणारे हे लोक! हे तुला सत्तेत खरंच हिस्सा देणार आहेत?

तो द्यायचा असता तर २०२३ लाच दिला असता. पण त्यात अटीच अशा घालून ठेवल्या की हे आरक्षण तुला २०३४च्या आधी मिळूच शकणार नाही. शिवाय, तीही गाजराची पुंगीच. हुकूमशाही प्रस्थापित करण्याचा हेतू साध्य झाला की २०३४च्या आधी महिला आरक्षणाची पुंगीही ते मोडून खातील.

वाईट याचंच वाटतं की सावित्रीबाईंनी आणि जोतिबांनी संघर्ष करून जो शिक्षणाचा अधिकार दिला, भारतरत्न, महामानव डॉ. बाबासाहेबांनी संविधानात पुरुषांच्या विरोधाला न जुमानता मतदानाचा अधिकार दिला, त्या अधिकारांविषयी तूच जागरूक नाहीस. आपलं स्वातंत्र्य तू आपल्या हातांनी या विश्वासघातकी, लबाड भावांच्या हातात सोपवत चालली आहेस.

जागी हो ताई, आता तरी जागी हो! खरे भाऊ कोण ते आता तरी ओळख आणि या दोडक्यांना घरातून हुसकावून लाव. यांचं नारी शक्तीचं वंदन हे एक लबाडाघरचं आवतण आहे, हे कधीच विसरू नकोस… त्या आवतणाच्या भरवशावर राहशील तर उपाशी मरशील.

Previous Post

जनता जनार्दनाची दशसूत्री

Next Post

डाव उधळला, कांगावे सुरू!

Next Post
डाव उधळला, कांगावे सुरू!

डाव उधळला, कांगावे सुरू!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.