• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

उकाड्यावर आश्वासनांचा पाऊस!

टोक्या टोचणकर (टोचन)

marmik by marmik
April 25, 2026
in टोचन
0
उकाड्यावर आश्वासनांचा पाऊस!

फोटो-एआय

मुंबईच्या उकाड्यात घामाने चिंब झालेला माझा मानलेला परमप्रिय लाडका मित्र पोक्या सध्या स्वतःवरच वैतागलेला असतो. यंदा तर या उकाड्याने भोंदू अशोक खरातबाबाप्रमाणे मुंबईकरांच्या सहनशीलतेच्या सर्व मर्यादा पार केल्या आहेत, असे तो म्हणतो. मी त्याला किती समजावले की या भूमीवर माणसांची पापंच इतकी वाढली आहेत की ती पाहून निसर्गाचा कोप झालाय. शिस्तीच्या सर्व मर्यादांचे उल्लंघन करून तो मन मानेल तसा का वागतोय याचा माणसानेच शोध घ्यायला हवा. मुंबई-पुण्यात बेकायदा बांधकामांचं इतकं उदंड पीक आलंय की तिथे एक तास जरी पाऊस पडला तरी शहर बुडून जातं. पाण्याचा निचरा व्हायला नदी-समुद्रापर्यंतही मार्गच शिल्लक राहिलेला नाही. मंत्री, आमदार, लोकनेते फक्त वारेमाप आश्वासने देतात की पुढल्या वर्षी पावसाचं पाणी शहरात तुंबणार नाही, अशा उपायोजना आम्ही करणार आहोत. पण यातले काहीच होत नाही. बिल्डरांशी साटेलोटे असल्यामुळे त्यांचे गगनचुंबी टॉवर्स अधिक संख्येने होत असतात आणि त्या टॉवर्सना पाणी, वीज, गॅस कनेक्शन्स पुरवण्यासाठी सामान्य वस्तीतल्या माणसांच्या सुखसुविधांवर हे नेते गदा आणतात. टॉवर्सना सर्वात आधी सोयी दिल्या जातात. आश्वासने देण्याच्या आणि कसल्याही अशक्यप्राय घोषणा करण्याच्या बाबतीत हे सरकार आणि त्यांचे नेते कोणालाच हार जाणार नाहीत. जी कधीच पूर्ण होणार नाहीत अशी आश्वासनं ते देतात आणि ती विसरूनही जातात. वाढत्या उकाड्याने त्रस्त झालेला पोक्या या तीव्र उकाड्यावर काही उपाय करा, ही मागणी करण्यासाठी महायुतीच्या काही मंत्री आणि नेत्यांकडे जाऊन आला. पण एकाही नेत्याने त्याच्या मागण्यांना वाटाण्याच्या अक्षता लावल्या नाहीत, उलट भरघोस आश्वासनं देऊन पोक्याचंं तोंडच बंद केलं. तीच ही आश्वासनं-

मुख्यमंत्री फडणवीस : राज्यात उष्णतेचा पारा कितीतरी वाढलाय हे खरंय. त्यात मुंबईसारख्या गर्दीच्या शहरात जनतेला त्रास होतोय हेही खरंय. त्यासाठी लवकरच कायमस्वरूपी योजना आम्ही करणार आहोत. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात लोकांना डुंबण्यासाठी थंड पाण्याचे भव्य तरणतलाव आम्ही उभारणार आहोत. वेळोवेळी त्यात बर्फाचा पुरवठा केला जाईल. पुरुषांसाठी वेगळा आणि महिलांसाठी वेगळा तरणतलाव असेल. मात्र त्यात पोहता येणार नाही. फक्त डुंबत राहायचं. प्रत्येकाला किमान एक तास डुंबता येईल. शिवाय घरी जाताना थंड पाण्याच्या बॉटलचा संच, आईस्क्रीम, कुल्फी बर्फाच्या पाऊचमध्ये बांधून दिली जाईल. आणि केंद्र सरकारच्या मदतीने आणि इस्रोच्या सहाय्याने अशी भव्य उपकरणे बसविण्यात येतील ज्यांतून पृथ्वीवर सूर्याची किरणं शीतल होऊन येतील. तसंच बीसीसीआयचे प्रमुख जय शहा यांच्यातर्फे प्रारंभी सर्व मुंबईकरांना घरोघरी चिल्ड बीअर आणि थंडगार सरबताच्या बॉटल्स पुरवण्यात येतील. नंतर ही योजना हळूहळू सर्व महाराष्ट्रात आणि गुजरातला सुरू करण्यात येईल.

उपमुख्यमंत्री शिंदे : राज्यातील लाडक्या बहिणींना घरोघरी एअर कंडिशनची सोय देण्यासाठी आम्ही लवकरच सदुसष्ट लाख कोटी रुपये मंजूर करणार आहोत. त्याचं वीज बिल मी स्वतः भरीन. उगाच सरकारी तिजोरीवर ताण नको. तसंच उन्हापासून संरक्षण करण्यासाठी थंडगार कापडी छत्र्या आणि रेनकोट नव्हे तर हीटकोट पुरवण्यात येतील. तो खर्चही मी माझ्या खिशातून करणार आहे.
बावनकुळे : राज्यातील स्त्री-पुरुषांसाठी तळव्याला थंडगार लागतील अशा चपला आणि बूट पुरविण्याचा माझा विचार आहे. मात्र मुख्यमंत्री फडणवीसांना विचारूनच मी हा निर्णय अंमलात आणीन. सर्व नागरिकांना डोळ्यांना थंडावा देणारे गॉगल्स पुरवण्याचाही माझा संकल्प आहे. मात्र हा विषय मी कॅबिनेटपुढे मांडीन आणि त्यानंतरच त्याची अंमलबजावणी होईल.

किरकीट थोमय्या : त्यांचे विचार आम्हाला पटत नसतील तरीही माझ्या डोळ्यासमोर महात्मा गांधी यांचा आदर्श आहे. तीव्र उन्हाळ्यात कमीत कमी कपडे घाला, असा संदेश मी महाराष्ट्रभर दौरा करून देणार आहे. स्वतः धोतर नेसून मी हा दौरा करणार आहे. मात्र हातात काठी नसेल, कारण अभी तो मै जवाँ हूँ।

सुनील तटकरे : तीव्र उन्हाळा सुसह्य होण्यासाठी कृत्रिम पाऊस पाडण्याशिवाय दुसरा चांगला उपाय नाही. यापूर्वीही आपण हा प्रयोग केला होता, परंतु तो तेवढा यशस्वी झाला नाही. आता परिस्थिती वेगळी आहे. कधी अवकाळीत पिकं वाहून जातात तर कधीही कडक उन्हाने ती करपून जातात. पण आता नवनवीन तंत्रज्ञान आलं आहे. विज्ञानाच्या बरोबरीने आपण श्रद्धायुक्त उपायांनी काय वाट्टेल ते करू शकतो. मात्र माझा दुसर्‍या उपायावर फारसा विश्वास नाही. माझ्या खात्याकडे पैसे खर्च करण्याचे अधिकार असते आणि आमच्या सुनेत्रा वहिनींनी मला ते सर्व संमतीने दिले असते तर खास विमानातून पाहणी करून बारामतीला कृत्रिम पाऊस पाडण्याचं नवं तंत्रज्ञान मी यशस्वी केलं असतं आणि अतिवृष्टी झाली असती तर बारामतीच्या आभाळाला प्लास्टिकचं छत घालण्याचा यशस्वी प्रयोगही केला असता. पण आजकाल माझ्याकडे आणि प्रफुल्ल पटेल साहेबांकडे बारामतीकर नको त्या संशयाने बघतात, त्यामुळे मनावर दडपण येतं. नाहीतर हे प्रयोग मी नक्कीच यशस्वी केले असते.

अदिती तटकरे : सरकारात सर्वगुणसंपन्न असूनसुद्धा आमचे अजितदादा म्ाहाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत, पण पुढील काळात आता राज्याच्या उपमुख्यमंत्रीपद भूषवत असलेल्या आमच्या लाडक्या सुनेत्राताई जर मुख्यमंत्री झाल्या तर राज्याची इतकी भरभराट होईल की तुमचा विश्वास बसणार नाही. उष्माघाताची समस्या असो, अतिवृष्टीची समस्या असो, दुष्काळाची समस्या असो सर्व समस्या चुटकीसरशी सुटतील. माझ्या पप्पांच्या स्वप्नातील महाराष्ट्र तुम्हाला साकार झालेला दिसेल.

Previous Post

राशीभविष्य (२५ एप्रिल ते १ मे २०२६)

Next Post

नाय नो नेव्हर

Next Post
नाय नो नेव्हर

नाय नो नेव्हर

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.