• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

जनता जनार्दनाची दशसूत्री

ह.भ.प.ज्ञानेश्वर बंडगर (अभंगबोध)

marmik by marmik
April 20, 2026
in भाष्य, विशेष लेख
0
नामयाचा तुका!

विश्वी विश्वंभर। बोले वेदांतीचा सार।।१।।
जगी जगदीश। शास्त्रे वदती सावकाश।।२।।
व्यापियेले नारायणे । ऐसे गर्जती पुराणे।।३।।
सूर्याचिया परी। तुका लोकी क्रीडा करी।।४।।

आपल्या भारतीय समाजात ईश्वराविषयीच्या धारणा कालमानानुसार बदलत गेलेल्या आहेत. प्राचीन काळात वेदात अनेक देवता सांगितलेल्या होत्या. इंद्र, चंद्र, वरुण, सूर्य, आश्विनीकुमार अशा या वैदिक देवतांची उपासना यज्ञादी कर्मकांडाच्या माध्यमातून होत होती. पुढच्या काळात मानवी जीवन अधिक प्रगल्भ होत गेले. त्यामुळे वैदिक देवता आणि यज्ञादी कर्मकांड मागे पडलं. हा उपनिषदांचा काळ होता. या काळात तत्त्वचिंतनाला गती मिळाली. त्यातून यज्ञादी कर्मकांडाचा फोलपणा लोकांना पटला. त्यामुळेच ‘यज्ञ म्हणजे फुटक्या नौका आहेत’ असं उपनिषदात म्हटलं गेलं. उपनिषदांनाच वेदांत असंही म्हणतात. वेदांत काळापासून पुढे शास्त्र, पुराण आणि त्यानंतर संतसाहित्यात ईश्वराच्या स्वरूपाची तात्त्विक मीमांसा उत्क्रांत होत गेली. वेदांताने विश्वातच विश्वंभर, शास्त्राने जगातच जगदीश तर पुराणांनी जगव्यापक नारायणाची भूमिका मांडली. ईश्वर हा विश्वाच्या रूपाने नटलेला आहे असा वेदांताचा सारभूत गाभा सांगता येईल. वेदांतानंतर वैदिक देवतांची उपासना मागे पडून जगतरूपी ईश्वराची संकल्पना पुढे यायला हवी होती, पण तसं घडलं नाही.

एका बाजूला वेदांत काळापासून ईश्वराविषयीच्या धारणा बदलत असल्या तरी त्याचा संपूर्ण समाजावर प्रभाव पडत नव्हता. एकतर बहुजन समाजाला वेदांताचा अधिकार नव्हता. त्यामुळे बहुजन समाजात बहुदेवतोपासना प्रचलित होती. दुसरीकडे उच्चवर्णीयातही एक प्रवाह कर्मकांडी लोकांचा होता. या प्रवाहात पुरोहित वर्गाचा भरणा होता. त्यांनी पूर्वापार चालत आलेल्या वैदिक देवता आणि यज्ञादी कर्मकांडाचीच परंपरा पुढे नेली. त्यामुळे वेदांत, शास्त्र आणि पुराणात सांगितलेल्या जगव्यापक जनार्दनाची संकल्पना मागे पडली. वेदांत, शास्त्र आणि पुराणातील तत्त्वज्ञानावर भर देणार्‍या शंकराचार्यांनीही मायावादाची नवी मांडणी केली. या मायावादात ब्रह्म हे सत्य तर जगत हे मिथ्या मानलं गेलं. जग मिथ्या असेल तर साहजिकच जगव्यापक नारायणाची संकल्पना बाद ठरते. त्यामुळे जग हेच देव आहे, ही मूळ वेदांताची धारणा या काळातही मागे पडली. याच काळात वारकरी संतांनी पुन्हा एकदा जगव्यापक नारायणाची मूळ वेदांताची भूमिका स्पष्ट केली. ईश्वर हा जगतरूपाने नटला आहे, त्यामुळे जग हेच देव आहे याची संतांनी मांडणी केली.

प्रस्तुत अभंगात तुकोबाराय सांगतात की वेदांताचा गाभा म्हणजे ‘विश्वातच विश्वंभर आहे’ हा सिद्धांत. विश्वंभर म्हणजे विश्वाचे भरण-पोषण करणारा ईश्वर. तोच विश्वात आहे. त्यामुळे विश्व हाच खरा देव आहे. ‘ऐसा ज्याचा अनुभव। विश्वदेव सत्यत्व। असं तुकोबाराय आणखी एका अभंगात म्हणतात. उपनिषद काळानंतर शास्त्रांनीही जगातच जगदीश म्हणजे जगाचा मालक असलेला ईश्वर आहे असं सांगितलं. संतांच्या उपदेशाचा गाभाही तोच आहे. ‘जग अवघे देव। मुख्य उपदेशाची ठेव।’ असं तुकोबाराय म्हणतात. त्यानंतर तुकोबाराय पुराणात आलेलं ईश्वराचं जगव्यापक स्वरुप सांगतात. नारायण संपूर्ण जगतात व्यापून उरला आहे असा बोध देणार्‍या अनेक कथा आपल्याला पुराणात सापडतात.

संतांनी हा सिद्धांत अधिक व्यवहार्य केला. त्यात अधिक नेमकेपणा आणला. आजवर वेदांताने आणि शास्त्राने तत्त्वज्ञान मांडलं तर पुराणाने केवळ कथा सांगितल्या. पुराणातल्या कथांमधून काही प्रमाणात अर्थ सांगितला गेला होता, पण संतांच्या काळात पुराणांचा अर्थ लोपून गेला. लोक पुराणातल्या केवळ कथाभागावरच भर देत होते. त्यामुळे ‘अर्थे लोपली पुराणे। नाश केला शब्दज्ञाने।।’ अशी त्यावेळची गत झालेली होती. त्यामुळे तत्त्व आणि व्यवहार अशा दुहेरी पातळीवर लोकांना उपदेश करण्याची गरज होती. ते कार्य संतांनी केलं. त्यातूनच ‘जनी जनार्दनाची’ संकल्पना संतांनी पुढे आणली. ‘जनी जनार्दन। संत बोलती वचन।।’ असं तुकोबाराय म्हणतात.

‘जग हेच देव आहे’ या वेदांताच्या तात्त्विक सिद्धांताच्या पुढची पायरी म्हणजे जनी जनार्दन. देव जगाच्या रूपाने नटलेला आहे म्हणून त्या जगातल्या जिवांना ईश्वररूप मानणं हाच संतांचा विचार आहे. संतांची ही जनी जनार्दनाची भूमिका जगून दाखवली ती गाडगेबाबांनी. वारकरी संप्रदायात विदर्भ माऊली म्हणून ओळखले जाणारे वासुदेव महाराज अकोटकर या अभंगावर निरुपण करताना आवर्जून गाडगेबाबांचा दाखला देत असत. त्यांनी गाडगेबाबांचं पद्य चरित्र लिहिलं आहे. त्यातही हा अभंग त्यांनी वारंवार वापरला आहे. गाडगेबाबांनी लोकांतच ईश्वर पाहिला. जनसेवा आणि जनप्रबोधनावरच त्यांचा भर होता. त्यांनी मंदिरातला ईश्वर मंदिराबाहेरच्या भाविकात दाखवला. या भाविकांसाठी त्यांनी पंढरपूर, आळंदी, देहू, नाशिक, पुणे आणि मुंबईसह अनेक ठिकाणी धर्मशाळा उभारल्या. या धर्मशाळेतून लोकांची राहण्याची सोय केली. दलितांपासून उच्चवर्णीयांपर्यंत सर्वांसाठी त्यांनी धर्मशाळा बांधल्या. या भाविकांची जेवणाची सोय व्हावी म्हणून त्यांनी जागोजागी सदावर्तांची सुरुवात केली. अनेक ठिकाणी पूल बांधले. घाट बांधले. मठ आणि मंदिर बांधून त्यातून स्वतःच्या पोटापाण्याची सोय करणारे अनेकजण होते, पण गाडगेबाबांनी भाविकांच्या पोटापाण्याची सोय केली. कर्मवीर भाऊराव पाटील बहुजन समाजाच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी गावोगावी शाळा काढत होते. वसतीगृह बांधत होते. त्यांना आर्थिक मदत मिळवून देण्यातही गाडगेबाबांनी मोलाची भूमिका बजावली.
गाडगेबाबांनी एक दशसूत्री मांडली होती.
१. भुकेलेल्यांना – अन्न
२. तहानलेल्यांना- पाणी
३. उघड्यानागड्यांना- वस्त्र
४. गरीब मुलामुलींना- शिक्षणासाठी मदत
५. बेघरांना- निवारा, आश्रय
६. अंध, पंगू, रोग्यांना- औषधोपचार
७. बेरोजगारांना- रोजगार
८. पशु-पक्षी, मुक्या प्राण्यांना- अभय
९. गरीब तरुण-तरुणींचे- लग्न
१०. दुःखी व निराशांना- हिंमत

गाडगेबाबांची ही दशसूत्री म्हणजे मानवतेचा जाहीरनामा आहे. त्यामागचा मूळ विचार अर्थातच ‘जनता जनार्दन’ आहे. उपनिषदात विश्वी विश्वंभराचं तत्त्व आहे. हजारो उपनिषदं आहेत. त्यात दहा उपनिषदं प्रमुख मानली गेलेली आहेत. या दशोपनिषदांचा खरा गाभा गाडगेबाबांच्या या दशसूत्रीत आहे. खरंतर उपनिषदांची तात्त्विक संगती लावण्यासाठी बादरायणांनी ब्रह्मसूत्रे रचली, पण उपनिषदांची खरी संगती लावली असेल तर ती गाडगेबाबांच्या या दशसूत्रीने. गाडगेबाबा केवळ ही दशसूत्री मांडून थांबले नाहीत. त्यांनी त्या दशसूत्रीला अनुसरून कार्यही केलं. किंबहुना आधी त्यांनी कार्य केलं आणि त्यानंतर दशसूत्री मांडली. गाडगेबाबांच्या अनुयायांनीही त्यांच्या दशसूत्रीचा आदर्श पुढे नेला. त्यात वैâकाडीबाबा होते. त्यांची एक धर्मशाळा होती. ती त्यांनी गाडगेबाबा मिशनला दिली. त्याचबरोबर त्यांनी दुष्काळात जनावरांना कडबा आणि चारा मिळवून दिला. त्यांनी त्यांच्या मठात वस्त्रदानाचा उपक्रमही चालवला. मठात भुकेलेल्यांना अन्नही दिलं.

वारकरी संतांच्या आचरणातही आपल्याला या दशसूत्रीची मुळं दिसतात. भुकेलेल्यांना अन्न हे सूत्र आपल्याला धन्ना जाट, कबीर आणि नाथरायांच्या कथांमधून दिसतं. धन्ना जाटांच्या घरी एकदा काही साधूसंत आले होते. त्यांना जेवण देण्यासाठी धन्ना जाटांच्या घरी धान्य नव्हतं. त्यांनी काही धान्य पेरणीसाठी बियाणं म्हणून ठेवलेलं होतं. तेच धान्य मागचा पुढचा विचार न करता धन्ना जाटांनी दळलं आणि साधूसंतांना जेवण दिलं. तुकोबाराय त्यांचं वर्णन करताना म्हणतात -‘बीज दळोनिया केली आराधना। लागे नारायणा पेरणे ते।।’ आणखी एका अभंगात ते म्हणतात -‘धन्ना जाटाची शेते पेरी।।’ कबीरांनीही घरी धान्य आणि सामान नसताना निरनिराळ्या मार्गाने धान्य मिळवून साधूसंतांना जेवण घातल्याच्या कथा आहेत. एकनाथ महाराजांनीही त्यांच्या घरी श्राद्धकर्मात भुकेल्या दलितांना जेवण दिलं. त्यासाठी सनातनी ब्रह्मवृंदांची पर्वा केली नाही. एकनाथ महाराजांनी तहानलेल्या गाढवाला गंगेचं पाणी पाजलं. उघड्या-नागड्यांना वस्त्र हे सूत्र आपल्याला कबीरांच्या जीवनात दिसतं. कबीर बाजारात वस्त्र विकायला जात असताना जे उघडे नागडे लोक दिसत त्यांना ते वस्त्र देत असत. ‘मागे काय जाणो आइकिली वार्ता। कबीर साते जाता घड्या वाटा।।’ असं तुकोबाराय म्हणतात.

अंध, पंगू आणि रोग्यांना औषधोपचार हे आणखी एक सूत्र आहे. ते सूत्र नामदेवराय आणि नाथरायांच्या जीवनात दिसतं. नामदेवरायांनी कुष्ठरोगी केसो कलंदर आणि नाथरायांनीही एका रोग्यावर औषधोपचार करुन सेवा केल्याची कथा आहे. पशुपक्षी आणि मुक्या प्राण्यांना अभय हे सूत्र तर वारकरी संप्रदायाचा गाभाच आहे. कोणत्याही प्राण्याची हिंसा वारकरी संप्रदायाला मंजूर नाही. एकदा तुकोबाराय आळंदीच्या ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिराला प्रदक्षिणा घालत होते. तेव्हा शेतातील पाखरं माणसाची चाहूल लागली म्हणून उडून गेली. पाखरं आपल्या भीतीने उडून गेली याचं तुकोबारायांना दुःख वाटलं. ते उद्विग्न होऊन बसले. थोड्याच वेळात पाखरं आली आणि तुकोबारायांच्या अंगाखांद्यावर खेळायला लागली. तुकोबारायांनी त्यांच्या अभंगातही ‘भूतदया गाईपशूंचे पालन। तान्हेल्या जीवन वनामाजा।।’ असं म्हटलेलं आहे. आदर्श गृहस्थाश्रमी तहानलेल्या पशुपक्ष्यांना पाणी देतो असं तुकोबाराय म्हणतात. पशुपक्ष्यांना अभय देण्याची वारकरी संप्रदायाची भूमिका गाडगेबाबांच्या दशसूत्रीत आली आहे. थोडक्यात वारकरी संप्रदायातील संतांनी त्यांच्या अभंगातून आणि जगण्यातूनही जनता जनार्दनाचं जे तत्त्व मांडलं त्यातूनच दशसूत्री जन्माला आली. ती वेदांतापासून संतांपर्यंतचा विचार सूत्ररूपाने मांडते.
जे का रंजले गांजले। त्यासी म्हणी जो आपुले।।१।।
तोचि साधू ओळखावा। देव तेथेचि जाणावा।।२।।
हा तुकोबारायांचा एक गाजलेला अभंग आहे. तो राजर्षी शाहू महाराजांनी त्यांच्या राज्यकारभाराची प्रेरणा म्हणून स्वीकारला होता. या अभंगात दशसूत्रीचा विचार बीजरूपाने आहेच. त्यामुळे राज्यकारभाराची मार्गदर्शक तत्त्वे म्हणून आपण या दशसूत्रीचा अवलंब करायला हवा होता. भारतीय संविधानातील मार्गदर्शक तत्त्वे आणि दशसूत्री यांचा गाभा समानच आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेमुख्यमंत्री असताना त्यांनी मंत्रालयातील फलकावर दशसूत्री लावली आणि त्याप्रमाणे राज्यकारभार करण्याची भूमिका मांडली. गाडगेबाबांच्या परंपरेत हा विचार प्रभावीपणे रुजलेला होता, त्यामुळेच त्यांच्या मिशनच्या मुखपत्राचं नावही ‘जनता जनार्दन’ असंच होतं. या जनता जनार्दन पाक्षिकात प्रबोधनकार ठाकरे यांचं लिखाण असायचं. त्यांच्या नातवाने बाबांच्या दशसूत्रीला राज्यकारभाराची प्रेरणा मानणं हा सुखद योगायोग आहे.

Previous Post

शनी पोलिस आणि डायनामोही

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.