• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

शनी पोलिस आणि डायनामोही

सचिन परब (प्रबोधन-१००)

Nitin Phanse by Nitin Phanse
April 20, 2026
in प्रबोधन १००
0
गोव्यात सामाजिक क्रांतीचा एल्गार

प्रबोधनकारांच्या शनिमाहात्म्य पुस्तकातली शनिमाहात्म्यावर शोधनप्रकाश हे नववं आणि साडेसातीची आवश्यकता हे दहावं अशी दोन्ही प्रकरणं महत्त्वाची आहेत. प्रबोधनकार चमत्कारांनी भरलेल्या थोतांडाच्या पोथीवर विचारमंथन घडवून प्रयत्नवादाचं अमृत काढून वाचकांना देतात.

 

आता आपण प्रबोधनकारांनी लिहिलेल्या शनिमाहात्म्य या पुस्तकाच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. एका पारंपरिक कथेकडे आधुनिक दृष्टीने कसं पाहता येऊ शकतं, याचं हे पुस्तक म्हणजे जिवंत उदाहरण आहे. चमत्कार आणि अतिशयोक्तीने भरलेली शनिमाहात्म्याची पोथी कुणी विचारी माणूस उचलून फेकून देईल. पण प्रबोधनकार त्याच चमत्कारांकडे बघण्याचा आकाशकेंद्री नाही, तर जमीनकेंद्री विचार देतात. म्हणजे ही पोथी वाचणार्‍या साध्या माणसांच्या खर्‍या भल्याचा विचार केला तर या थोतांडातूनही प्रयत्नवादी अमृत काढण्याचं काम त्यांनी केलंय.

पुस्तकाचं शनिमाहात्म्यावर शोधनप्रकाश हे नववं आणि साडेसातीची आवश्यकता हे दहावं अशी दोन्ही प्रकरणं त्या दृष्टीने महत्त्वाची आहेत. मुळात ही शनिमाहात्म्याची पोथी वाचकाला निराश आणि हताश करते, हे त्यांनी समजावून सांगितलं आहे. ते म्हणतात, हे तात्याजी महिपतीकृत शनिमाहात्म्य वाचणारांच्या मनावर काय परिणाम होत असतील बरे?… साडेसातीची जाहिरात फडकल्याशिवाय आधी कोणी शनिमाहात्म्य हाती घेत नाही. घेतल्यानंतर, त्याच्या पारायणाने वाचकाला काही धैर्य येण्याच्या ऐवजी दिवसेंदिवस तो मनातल्या मनात खचतच जातो. एवढा मोठा उज्जनीचा चक्रवर्ती विक्रमराणा, पण त्याचासुद्धा शनीने चिकण्या चेंदामेंदा केला, माझी काय कथा? या सत्वधीर पुरुषोत्तमांची हाडे शनीने ठेचून काढली, तर आता माझी अवस्था तो काय करणार? असल्या कल्पनांच्या भाराखाली वाचक अर्धमेला होऊनच, शनिमाहात्म्य-पारायणाच्या फलश्रुतीची, अर्धवट विश्वासाने आणि कच्च्या दिलाने, आशा बाळगून दिवस कंठतो… नुसत्या पोथीची घोकंपट्टी करून विक्रमाच्या आणि हरिचंद्र नळाच्या आपत्तीचा वङ्काप्रहार मला खरोखरच टाळता येईल काय? असाही संशय मधूनमधून त्याच्या भाविक वृत्तीला उंदराप्रमाणे कुरतडीतच असतो. अशा लटपटीत व लंजूर मनाच्या अवस्थेत एकदा का तो पोटभरू ज्योतिषी आणि पोटाळ भटजी यांच्या तडाक्यात सापडला की मग त्याच्या चरित्राचे आणि चारित्र्याचे जे वाभाडे उडतात ते सांगता पुरायचे नाहीत. आकाशस्थ शनि पत्करला, पण हे देशस्थ, कोकणस्थ शनि नकोत, असा त्याचा जीव मट्ट्याला येतो. तात्पर्य, तात्याजी महिपतीकृत शनिमाहात्म्याच्या पारायणाने पाठक श्रोत्यांच्या आत्माराम जागृत तर होत नाहीच, पण उलट तो निराशेच्या आणि कुकल्पनांच्या काळ्याकुट्ट अंधारात मात्र अधिकाधिक गुरफटतो.

शनीच्या साडेसातीवर उपाय आहे, पण तो तात्याजी महिपतीच्या ३८८ ओव्यांचं शनिमाहात्म्य हा नाही, कारण हे फक्त काल्पनिक काव्य आहे, त्यातली एकही गोष्ट खरी नाही, असं प्रबोधनकार स्पष्टपणे सांगतात. त्यापुढे जात ते प्रत्येक माणसाला आणि देवांनाही त्रास देणार्‍या शनीला देव कसं मानायचं असा बिनतोड प्रश्नही विचारतात, सीता-राम, तारामती-हरिश्चंद्र, दमयंती-नळ यांची पाशवी विटंबना केल्याची शेखी जर प्रत्येक देव आणि ग्रह मारतो, तर हे सारे मानव छळक्ये काबुली पठाणांचे बाप की काय? असल्या या गोल्डन गँग यांची माणसांनी काय म्हणून पूजा बांधावी?

शनिमाहात्म्यातल शनीने आपण पुराणातल्या कोणत्या कथेत कोणत्या देवाला किंवा राजाला कसं छळलं, याच्या तपशीलवार फुशारक्या मारल्या आहेत. त्यावर शनी हा तर लोकांचा छळ करणारा पोलिस फौजदारच असल्याचा निष्कर्ष प्रबोधनकार काढतात आणि त्यातून एक नव्याच विचाराची मांडणी करतात, ती अशी-
हे शनिमहाराज स्वतः कितीही `लंब्याचौड्या बाता झोकीत असले तरी यांची पायरी विश्वनियंत्रणाच्या कौन्सिलात मुळीच कोठे नसून, तो कौन्सिल हॉलच्या देवडीजवळ कोठेतरी असली पाहिजे खास. शनिची आत्मस्तोमाची बडबड एखाद्या राजकारणी मुत्सद्याला शोभेशी नसून, ती एखाद्या राक्षसी हृदयाच्या फौजदाराच्या किंवा उलट्या काळजाच्या कारस्थानी पोलिसांच्या तोंडात तर छान शोभते… पोलिशी शनिमाहात्म्याच्या चरकातून ‘सवा प्रहराचा मातेरा’ भोगून बाहेर पडलेले स्त्रीपुरुष जर आपापले आत्मानुभव लिहून निर्भयपणाने प्रसिद्ध करतील, तर पृथ्वीतलावरील पोलिशी शनिमाहात्म्याची ती बाडे प्रसिद्ध करण्यासाठी दहा ज्ञानकोश कंपन्या चालू कराव्या लागतील… शिपायीबुवा एरवी कितीही गुर्मीने वागले किंवा इन्स्पेक्टर साहेब कशाही घाशीरामीने उन्मत्त बनले तरी एकदा थेट कमिशनपुढे किंवा मॅजिस्ट्रेटापुढे एकाद्याने त्यांच्या अत्याचाराची बोंब मारली आणि ते प्रकरण वरून खाली आले की त्यांच्या सैतानी घाशीराम्या भसाभसा वितळू लागतात. हाच न्याय शनिच्या साडेसातील लावून, जर आम्ही खुद्दांच्या दरबारात सणसणीत शंख फुंकून त्याच्या अत्याचाराला पायबंद लागणार नाही का?

पोलिसांनी अत्याचार केले की शिपाईबुवाचे पाय दाबायचे की कमिशनरकडे तक्रार करायची, असा प्रश्न विचारत प्रबोधनकार वाचकाला विचार करायला लावतात. शनी माणसांना कर्माची शिक्षा देतो, हे सांगताना प्रबोधनकार पारंपरिक कर्मसिद्धांताचा आधार घेतात. गेल्या जन्मातलं संचित कर्म, या जन्मात भोगायचं प्रारब्ध कर्म आणि आणि पुढच्या जन्मात फळ भोगायचं क्रियमाण या कर्माच्या तीन प्रकारांचा दाखला देत ते पुरुषार्थाचा नवा अर्थ सांगतात, आपले पूर्वसंचिताचे दही जर आंबटढाण बनलेले असेल, तर त्यात थोडी चतुराईची साखर टाकून ते गोड करून खाणे, ह्यालाच पुरुषार्थ असे नाव आहे.

दहाव्या प्रकरणात साडेसातीची आवश्यकता सांगताना प्रबोधनकार शांति मुर्द्याची, क्रांति मर्दाची हा त्यांचा आवडता सिद्धांत मांडतात. जित्या मर्दाने क्रांति करावी. मेल्या मुर्द्याने शांति करावी. क्रांति माणसाची, शांति मसणाची, हा निसर्गाचा सनातन धर्म आहे. विश्वरचनेचे ध्येय आहे. विश्वातली अगम्य प्राणज्योत क्रांतीसाठी धडपडत असते, शांतीसाठी नव्हे. माणसाच्या जीवनात ही क्रांती करण्याचं काम शनीची साडेसाती करते असाही त्यांचा शोध आहे, जेव्हा शनि त्याला आपल्या कोलदांड्यात अडकवून, धोब्याप्रमाणे चांगला आडवा उभा हाबकतो, तेव्हा आत्मानात्म विचार काय आहे, शुद्ध ज्ञान काय, त्याच्या शोधनप्रकाशाने अनेक गूढ प्रश्न सोडविण्याची सोपी युक्ती काय, ह्याचा शोध करण्याची आतुरता मुमुक्षुवृत्ति माणसात जागृत होते; आणि तो एकदा त्या आतुरतेच्या मार्गाने नीट जाऊ लागला की अखेरीस शनीच्या कोलदांड्यासारखा जिव्हाळ्याचा उपकारी मित्र दुसरा कोणी नाही, हेच त्याच्या प्रत्ययाला येते.

हाच मुद्दा ते अधिक सविस्तरपणे असा सांगतात, लोखंडी कोलदांडे टाकून प्रत्येक गोष्टीला शनि अटकाव करीत असतो, आणि या अटकावामुळेच आपण पुढे कर्तव्याचा मार्ग कसा चोखाळला पाहिजे, याची स्पष्ट वा स्वच्छ कल्पना आपल्याला करून देतो. आपले सामाजिक स्थैर्य, आपले मित्र आणि आपण मानलेल्या सौख्यसाधनांतली भुलभुलावणी शनि आपल्याजवळून हिसकावून नेतो; आणि आमची खुषी असो व नसो, तो अखेर आम्हाला एकांतवासाच्या शांत वातावरणात नेऊन ठेवतो. या एकांतवासातच शांतीचा गूढ संदेश आम्हाला ऐकू येतो. अर्थात ज्यांना अंतर्दृष्टीची तहान लागलेली आहे… एकदा मनुष्याला शनिची भाषा समजली, त्याच्या उद्दिष्ट हेतूची नीट जाणीव झाली आणि त्याच्या कदरबाज लोखंडी हाताने आपल्याला सन्मार्ग कसा दाखविला, याचे प्रत्यंतर पटेपर्यंत. शनीच्या कोलदांड्याचा शुद्ध अर्थ आमच्या जीवनात प्रत्यक्ष बिंबल्याखेरीज आम्हाला भगवद्मंदिराचा उंबरठा ओलांडताच येणे शक्य नाही.
देवळाचा धर्म, धर्माची देवळें लिहिणारे प्रबोधनकार इथे या मंदिराचा उल्लेख करतात, त्याचा संदर्भ असा आहे, दैववाद आमची डोकी प्रत्यक्ष फोडीत असला, तरी प्रयत्नवादावरही डोकी फोडायला आम्ही कमी करीत नाही. पण या दोनही वादांच्या वादात देववाद मात्र अजिबात डावलून त्या अनंत ब्रह्माण्डनायक परमेश्वराची आम्हाला चुकून सुद्धा आठवण होत नाही. जे देवालाच आम्ही विस्मरणाची बगल मारली, तेथे विश्वनियंत्रणाची आणि जीवविकसनाची देवाची शाश्वत इच्छा आमच्या अशाश्वत आणि तात्पुरत्या सुखाच्या पेनशनीत काढली, तर त्यात आश्चर्य कसले?

कसाशिवाय माल नाही, शनीशिवाय कस नाही, असं सांगत प्रबोधनकार सांगतात, खरे सज्जन संकटांना धैर्याने तोंड देत साडेसातीच्या कसोटीत पास होऊनच पुढचं ध्येय गाठतात. अशा कर्तृत्ववान सज्जनांची थोरवी सिद्ध करण्यासाठी शनीच्या साडेसातीची गरज असते. त्यासाठी प्रबोधनकार त्या काळात नव्याने मुंबईत आलेल्या विजेवर चालणार्‍या लोकलचं उदाहरण देतात. ते मुळातून वाचण्यासारखं आहे. हे वाचताना यांत्रिक ऊर्जेचं विद्युत ऊर्जेत रूपांतर करणार्‍या डायनॅमो जनरेटरचा संदर्भ लक्षात ठेवावा लागतो फक्त-
मुंबई लत्त्याला आता विजेच्या रेलगाड्या सुरू झाल्या आहेत. (आता ‘आगगाडी’ शब्द मागे पडून ‘वीजगाडी’ शब्द रूढ झाला पाहिजे) माथ्यावरील तारेतून बिजलीचा पुरवठा होत असला, तरी खुद्द वीजगाडीत इलेक्ट्रिक एनर्जीचा पुरवठा करणारा डायनामो अखंड चालूच असतो. पॉझिटिव आणि निगेटिव विद्युत्प्रवाहांचा संयोग होतो तेव्हा विद्युच्चैतन्याची ठिणगी पडून वीजगाडी धावू लागते. माथ्यावरच्या तारेत पुष्कळ विद्युत्प्रवाह असला, पण खुद्द गाडीच्या पोटातला डायनामो जर रुटखुद करू लागला किंवा अज्जीबात बंद पडला, की वीजगाडी ठिकच्या ठिकाणी थंडगार! म्हणून डायनामोची एनर्जी अखंड भरपूर राखण्यासाठी रेल्वे कंपनीचे इंजिनीयर डोळ्यात तेल घालून अखंड श्रमात असतात. ह्याच नियमाप्रमाणे प्रत्येक व्यक्तिमात्राच्या आत्म्याच्या उत्क्रांतीच्या डायनामोमध्ये जीवनविकासाची एनर्जी किती कमीजास्त आहे, ह्यावर काटेकोर नजर ठेवण्याची कामगिरी सृष्टीविधात्याने नवग्रहांकडे सोपविलेली असून, ह्या इंजिनियर खात्याची मुख्य सूत्रे शनिग्रहाच्या हाती आहेत. या शनि इंजिनियरची तपासणी ३० वर्षांनी असते. आमच्या डायनामोमध्ये एनर्जीचा पुरवठा बहुतेक दिवाळ्यातच निघालेला असतो. मग ही चीफ इंजिनियरांची स्वारी आपल्या असिस्टंटांवर भयंकर उखडते. कोणाची कसलीही सबब न ऐकता ताबडतोब तो डायनामो स्वतःच निखळू लागते. सारे सांधे स्क्रू खिळे पट्ट्या वगैरे सर्व सामान निखळून त्याची धूसपूस पॉलीश रिपेर स्वतः हाती घेते. वाकडे तिकडे भाग घणाचे घाव घालून सरळ करते. सरळ झाले नाहीत तर नवीन बसविते. गंजलेली यंत्रे उकीरड्यावर झुगारून देते. कित्येक लिबलिबित स्प्रिंगांना भट्टीत भाजून पाणी चढविते. असा हा रिपेरीचा धूमधडाका साडेसात वर्षे स्वतः चाल्ावून, तो डायनामो फर्स्टक्लास एनर्जी देणारा बनला, की पुढे साडेबावीस वर्षे त्याच्या कामाकडे पहावे लागत नाही. बिनखटका एनर्जी चालू. खुद्द बडे इंजिनिअर साहेब डायनामोची रिपेर करीत असल्यामुळे, त्याच्या पुढील साडेबावीस वर्षाच्या समाधानकारक कामाची निराळी विमा पॉलिसी घ्यावीच लागत नाही. साडेसात वर्षांची कमाई खर्च करायला साडेबावीस वर्षांची मुदत. अर्थात ही मुदत संपण्याबरोबरच आमच्या कमाईचेही भांडवल संपुष्टात येते. एनर्जी देण्याची आमच्या डायनामोची पॉवर लंजूर पडते. म्हणून पुन्हा ३० वर्षांनी शनि `इंजिनिअरचा इन्स्पेक्शन रिपेरीचा दौरा येतो. त्या दौर्‍यालाच साडेसातीचा फेरा असे म्हणतात. ह्यात अनिष्ट भयंकर आत्मनाशक असे आहे तरी काय? तलवारीचे पाणी गेले तर ते जर वरचेवर द्यावेच लागते, वीजगाडीच्या डायनामोच्या बॅटर्‍या जर मंद पडल्या तर त्यांचीही उलथापालथ आणि अदलाबदल करावी लागते, तर ३० वर्षांनी आमच्या जीवनविकासाच्या चैतन्याची वासपूस करायला शनिग्रहाच्या साडेसातीची आवश्यकता किती अगत्याची आहे, याच वाचकांना आता स्पष्ट पडताळा पटलाच असेल.
प्रबोधनकारांच्या खास शैलीतला हा उतारा वाचला की `शनिमाहात्म्य पुस्तकाचा गाभा लक्षात येतो.

Previous Post

दिवाळीत फुटणार ‘महागाई बॉम्ब’!

Next Post

जनता जनार्दनाची दशसूत्री

Next Post
नामयाचा तुका!

जनता जनार्दनाची दशसूत्री

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.