• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

चौरंगी विहीणबाई योजना!

संजय डहाळे (तिसरी घंटा)

marmik by marmik
April 18, 2026
in तिसरी घंटा
0
चौरंगी विहीणबाई योजना!

शब्दकोड्यातल्या अचूक उत्तराप्रमाणे काही दिग्गजांची नावं ही खास नाटकांशी जुळली जातात. ती एवढी नेमकी ठरतात की त्यामुळे कोडं हे कोडं उरत नाही. अगदी उदाहरणच द्यायचं म्हटलं तर ‘नटसम्राट’ म्हणजे अर्थात डॉ. श्रीराम लागू! सही रे सही- भरत जाधव. ती फुलराणी- भक्ती बर्वे. तो मी नव्हेच- प्रभाकर पणशीकर. वस्त्रहरण- मच्छिंद्र कांबळी… यादी भली मोठी होईल. या यादीत गंगूबाई, जाऊबाई, आजीबाई या देखील आहेत, त्या यादीत आता एक नव्या विहीणबाई जोडल्या गेल्यात- निर्मिती सावंत!

त्यांना विहीणबाईंच्या मध्यवर्ती कॅप्टन भूमिकेत चपखल बसवून विनोदाचा चौरंगी सामना खेळण्यात आलाय आणि तो महाविजेता ठरलाय. त्यांचा स्वतःचा हुकमी प्रेक्षकवर्ग आहे, जो त्यांनी आपल्या सहजसुंदर अभिनयातून हक्काने आजवर मिळविला आहे. आता नव्या रंगरूपात विहीणबाई म्हणूनही त्या बाजी मारतात. त्यांची चौरंगी भूमिका म्हणजे हास्याचे अक्षरशः धबधबेच कोसळत राहतात आणि हेच या नाटकाचे एकमेव आकर्षण ठरते!

जाऊबाई, गंगूबाई, आज्जीबाई- अशा एकापेक्षा एक भूमिकांमधून रंगभूमीवर दिसलेल्या या कॉमेडी क्वीन नव्या नाटकात कहर करतात. हे नवे रूप त्यांचा अभिनयक्षमतेचे दर्शन घडविते, ज्यामुळे त्यांच्या कारकीर्दीत जणू नवा रंगअध्याय सुरू झाला आहे.

नाटकाचं नाव – ‘लाडकी विहीण योजना.’ आता नावापासूनच उलट-सुलट चर्चेला प्रयोगापूर्वी उधाण आलेलं. कारण शासकीय लाडकी बहीण योजनेची ही खिल्ली तर नाही ना? सरकारी योजनांवर हल्ला तर होणार नाही ना?- या प्रश्नांनी मंत्रालयातील काही मंडळींची म्हणे पहिल्या जाहिरातीपासून झोप उडाली. अखेर या प्रश्नांची उत्तरे ‘अजिबात नाही’ अशी मिळाली. प्रशासनाचे टेन्शन संपले. हा निव्वळ योगायोग किंवा ‘कॅची’ नावासाठी केलेलं हे बारसे. त्यामागे पद्धतशीर प्रसिद्धी नियोजन असंच म्हणावं लागेल. ‘लाडकी बहीण’ आणि ‘लाडकी विहीण’ हे शब्दसाधर्म्य इतपतच. कट्ट्यावर चर्चा तर रंगतातच. पण तरीही ‘लकी’ तिकीट ठरलेल्या रसिकाला ‘कर्टन कॉल’च्या वेळी तिकीटांचे पैसे बक्षीसरूपात सर्वांसमक्ष परत करण्याची योजना निर्मात्यांनी आखली आहे. एवढंच काय ते दोन्ही योजनांमधले साम्य!
गोष्ट तशी गावातली. कोकणातलं एक टिपिकल गाव. तिथला पुरातन चिरेबंदी वाडा. या वाड्यातच ग्रामदैवताचे मंदिर. गावातली एक बडी असामी म्हणजे प्रभाकर. त्यांची पत्नी प्रभावती. प्रभाकर हे कमालीचे तिरसट स्वभावाचे. त्याउलट पत्नी ही शांत, सुखभावी, धार्मिक वृत्तीची. त्यांना एक तरुण मुलगी आहे. स्नेहल. जिने दीपराज या तरुणाशी पळून लग्न केलेलं असल्यामुळे बाप कमालीचा संतापलेला. त्यात भर म्हणजे हे नवदाम्पत्य आशीर्वाद घेण्यासाठी वाड्यात पोहचलेले. त्यांच्यासोबत मुलीची सासू म्हणजे विहीणबाई या आलेल्या. त्यांचं नाव ‘योजना.’ त्यांचा स्वतःचा ‘ब्लॉग’ आहे. जिथे जाते तिथे ‘रील’ बनविते. या नवतंत्राने अक्षरशः झपाटलेली. विहीणबाई वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिरेखा!

या वाड्यात असलेल्या कुलदैवताची पूजाअर्चा करणारा नाना भटजी, जो दशावतारातही भूमिका करतो, तो कायम उघडबंब असल्याने विहीणबाई त्याचे ‘उघडे नाना’ असं बारसं करतात. या घरात आणखीन एक ताया नावाची प्रभाकरची बहीण आहे. जिच्या वेडेपणाच्या खाणाखुणा दिसताहेत. तिच्या मानेला गाठ आलीय, पण डॉक्टरांऐवजी देवस्कीवर तिच्यासह उभ्या घरादाराचा अंधविश्वास! पिढ्यान् पिढ्या चालत आलेली एक धार्मिक परंपरा या वाड्यात आहे. जी श्रद्धेने सारेजण पाळतात. देवीपुढे नतमस्तक होतात. त्यात घरातल्या मोठ्या गृहिणीच्या अंगात देवीचा संचार होतो. रोज संध्याकाळी पूजेच्या वेळी प्रभावती देवीच्या गेटअपमध्ये ‘बायजा’ म्हणून प्रगटते. जणू नवरूप धारण करते. घरादारातल्या समस्यांवर तोडगा सांगते. चुका केलेल्यांना ती चाबकाने मारून शिक्षा देते. संकटांवर उपाय सुचविते. प्रभावती बायजा झाल्यानंतर तिच्यासोबत प्रभाकरही लोटांगण घालतो. पण संचार संपल्यानंतर तो तिच्यावर नवरेशाही गाजवितो.

वाड्यातल्या अंधश्रद्धांना विहीणबाई ़कंटाळते. हैराण होते. अखेर ती एक नाटक रचते आणि ‘बायजा’च्या गेटअपमध्ये येते. सारे चक्रावून जातात. पण ‘बायजा’ तिला मोठी आई म्हणून मान्य करते आणि नवा गोंधळ उडतो. भूतकाळातील घटना, माणसं, याबद्दलही विचारणा करते. खिडकीबाहेर त्यावेळी नेमकं काय झालं, इंग्लिश अधिकारी चार्ल्स कुठे आहे? नागण्णा रामचरणचीचं काय?- असे असंबद्ध वाटणारे प्रश्न बायजा विचारते. पण त्याची उत्तरे विहीणबाईकडे नसतात. आणि नाटकात नवेच ‘नाटक’ सुरू होते. श्रद्धा की अंधश्रद्धा? हा प्रकार सत्य की असत्य? असे अनेक प्रश्न पुढे येतात. जे हसून-हसवून पुरेवाट करतात. सार्‍या प्रश्नांच्या उत्तरासाठी प्रत्यक्ष प्रयोग अनुभवणं उत्तम!

‘टायटल रोल’मध्ये चमकणार्‍या ज्येष्ठ अभिनेत्री निर्मिती सावंत यांचा नवनवीन आव्हानात्मक भूमिका चोखंदळपणे स्वीकारण्याचा कायम प्रयत्न असतो. छोट्या-मोठ्या पडद्यावर आणि रंगमंचावरही त्यांची विविधरंगी वाटचाल सुरू आहे. या नाटकातील विहीणबाईने देखील जबरदस्त चौरंगी भूमिकेचा षटकार लगावलाय. त्यांच्या एंट्रीला मिळणार्‍या टाळ्यांची रसिकांची सलामी बोलकी ठरते. या भूमिकेतून दोन अंकातील अखंड चैतन्याचे दर्शनच त्यांनी घडविले आहे. ‘रील्स’च्या अतिरेकामुळे पुरती अडकलेली योजना! जाऊ तिथे घटना बंदिस्त करणारी अशी ही विहीणबाई! तिचा बिनधास्त बेधडक स्वभाव सार्‍यांनाच हादरून सोडतो.

विहीणबाईसोबत सिद्धी घैसास (स्नेहल) आणि अधोक्षज कर्‍हाडे (दीपकराज) ही नवोदित प्रेमवीरांची जोडी शोभून दिसते. विनोदाची पक्की जाण असणार्‍या पौर्णिमा अहिरे यांनी तायाची भूमिका सहजतेने केली असून विनोदाच्या जागा नेमक्या हेरल्या आहेत. नाना भटजी उर्फ उघडे नानाच्या भूमिकेत मुकेश जाधव यांचा वावर पूर्ण असल्याने लक्षवेधी ठरतो. अनेक प्रसंगात हसवणुकीत बाजी मारली आहे. या वाड्याचे सूत्रधार- सुनील जाधव यांनी रूबाबदार प्रभाकर चांगला उभा केलाय. वाड्यावरचा त्याचा दरारा आणि बायजासमोर नतमस्तकता अशा दोन्ही वेळा अभिनय नजरेत भरतो. प्रभाकरपत्नी प्रभावती हिने दोन रूपे कौशल्याने साकार केली आहेत. एकूणच कलाकारांचे टीमवर्क उत्तम.

राजेश देशपांडे दिग्दर्शक आणि निर्मिती सावंत अभिनेत्री हा योग यापूर्वीही यशस्वी झालाय. त्याची पुनरावृत्ती याही ‘निर्मिती’त आहे. नाट्य कुठेही रेंगाळणार नाही याची पुरेपूर दक्षता दिग्दर्शकाने घेतली आहे. हा ‘अ‍ॅक्शन ड्रामा’ असल्याने त्यात विविधता भरली आहे. निर्मिती सावंत यांना डोळ्यापुढे ठेवून प्रेक्षकांची मागणी तसा पुरवठा केला आहे. नाटककार प्रथमेश शिवलकर यांची ही पहिली वहिली संहिता. नाटकाच्या शीर्षकापासून ते व्यक्तिरेखांच्या स्वभावापर्यंत ती पकड घेते. अंधश्रद्धेला विरोध करताना श्रद्धाळूंच्या भावना दुखावणार नाहीत, याचे पुरेपूर भान नाटककाराला आहे. ‘रंजन आणि अंजन’- असा दुहेरी खेळ कथानकात आहे. एकाच व्यक्तीने अनेक भूमिका वठवण्याची नाटके अगदी ‘तो मी नव्हेच’पासून ते ‘सही रे सही’पर्यंत रंगभूमीवर आलीत. पण या विहीणबाईची ही चौरंगी रूपे वेगळ्या वाटेवरली आहेत.

ज्येष्ठ नेपथ्यकार प्रदीप मुळ्ये यांनी कोकणातला वाडा सुरेख उभा केलाय. नेपथ्याच्या अभ्यासकांनी त्याचा जरूर अभ्यास करावा. त्यामुळे वातावरणनिर्मिती उत्तम होते. रंगसंगतीही प्रभावी आहे. अजित परब यांचे संगीत, क्षितिज पटवर्धन यांचे गीत, सुनील जाधव यांची प्रकाशयोजना यासह तांत्रिक बाजू चांगल्या जमल्या आहेत.

अनुभवी निर्माते दिलीप जाधव आणि अभिनेते प्रसाद ओक या दोघांनी नाटकाची निर्मिती करतांना कुठेही कसूर ठेवलेली नाही. श्रीमंत निर्मितीमूल्ये आहेत. जाहिरातीपासून ते सादरीकरणापर्यंत निर्मिती देखणी झालीय. दोन घटका मनोरंजनासोबतच मेसेज देण्याचा प्रयत्न त्यामागे दिसतोय. तो महत्त्वाचा. मराठी नाटक हे कायम समाजाला दिशादर्शक ठरतेय. त्याच वाटेवरचा हा प्रयत्न. प्रयोगाला होणारी महिला प्रेक्षकांची तुफान गर्दी आणि दुसरीकडे प्रयोगात होणारे विनोदाचे धुमशान. यामुळे रंगमंचावरती ही विहीण योजना निश्चितच यशस्वी होईल यात शंकाच नाही.

लाडकी विहीण योजना
लेखक- प्रथमेश शिवलकर
दिग्दर्शक- राजेश देशपांडे
नेपथ्य- प्रदीप मुळ्ये
प्रकाश- सुनील जाधव
संगीत- अजित परब
गीते- क्षितिज पटवर्धन
नृत्ये- दीपाली विचारे
वेशभूषा- पौर्णिमा ओक
रंगभूषा- मदन गायकवाड
निर्माते- दिलीप जाधव/ प्रसाद ओक
सूत्रधार- प्रणित बोडके

 

Previous Post

हनीट्रॅपचं मायाजाल

Next Post

खाण्यासाठी जन्म आपुला

Next Post
खाण्यासाठी जन्म आपुला

खाण्यासाठी जन्म आपुला

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.