• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

हनीट्रॅपचं मायाजाल

सुधीर साबळे (सायबर जाल)

marmik by marmik
April 18, 2026
in सायबर जाल
0
हनीट्रॅपचं मायाजाल

चित्र-नचिकेत

आजच्या युगात खिशात असलेल्या एका छोट्याशा स्मार्टफोनने जगाला मुठीत आणले आहे. सोशल मीडिया, डेटिंग अ‍ॅप्स आणि चॅटिंग साइट्समुळे कोणाशीही संवाद साधणे काही क्षणाचे काम झाले आहे. मात्र, संवाद साधताना फार भान ठेवावं लागतं. समोरच्या बाजूला सायबर लफंगे बसलेले असतील तर त्यांच्या शब्दांचा गोडवा विषासारखा काम करतो आणि प्रेमाचे नाटक ही केवळ एका विनाशाची नांदी असते. यालाच आपण ‘हनीट्रॅप’ म्हणून ओळखतो. यात सायबर ठग माणसांच्या भावनांशी खेळतात आणि शेवटी त्याला उद्ध्वस्त करून टाकतात.

श्रेयाचीच गोष्ट पाहा.

पुण्यातल्या आयटी पार्कमध्ये काम करणारी श्रेया. वय २५ वर्षे. दिसायला सुंदर, कामात हुशार आणि स्वभावाने अत्यंत मोकळी. मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेल्या श्रेयाने स्वतःच्या कष्टावर इथे स्वतःचे स्थान निर्माण केले होते. तिला अभिनयाची आणि साहित्याची प्रचंड आवड होती. ऑफिसच्या कामातून वेळ मिळाला की ती प्रायोगिक नाटकांमध्ये काम करायची. तिचे आयुष्य अगदी सुरळीत चालले होते. मात्र ती एक संध्याकाळ तिच्या आयुष्याची दिशाच बदलून टाकणारी ठरली…

ती शनिवारची संध्याकाळ होती. श्रेया आणि तिची मैत्रीण स्नेहल एका कॅफेमध्ये कॉफी घेत बसल्या होत्या. स्नेहलने सहज आपला फोन दाखवत विचारले, ‘अगं श्रेया, तू अजूनही सिंगल कशी काय? बघ ना, आजकाल किती छान डेटिंग अ‍ॅप्स आले आहेत. तिथे आपल्या आवडीनिवडी जुळणारे लोक सहज भेटतात.’

सुरुवातीला श्रेयाने याकडे दुर्लक्ष केले. पण घरी जाताना तिच्या मनात कुतूहल जागे झाले होते. तिने विचार केला, अशा एखाद्या
अ‍ॅपवर जाऊन चांगल्या माणसाशी मैत्री करायला काय हरकत आहे? तिने एका प्रसिद्ध डेटिंग अ‍ॅपवर आपले प्रोफाईल बनवून ते अपलोड केले. प्रोफाईल बनवल्यानंतर अवघ्या काही तासांतच तिला अनेक ‘लाईक्स’ आले, पण एका प्रोफाईलने तिचे लक्ष वेधून घेतले. त्याचे नाव होते मोहित. त्यावरचे मोहितचे फोटो फारच आकर्षक होते. निळे डोळे, टोकदार नाक, परदेशातील नयनरम्य लोकेशन्सवर काढलेले फोटो आणि त्याची स्टायलिश जीवनशैली. त्याच्या प्रोफाईलमध्ये दिलेल्या माहितीनुसार तो लंडनमध्ये एका मोठ्या सॉफ्टवेअर कंपनीत सिनिअर मॅनेजर होता. विशेष म्हणजे त्याला चित्रपट निर्मितीची आवड होती.

‘हाय श्रेया, तुझे प्रोफाईल वाचले. तुझे विचार आणि तुझी अभिनयाची आवड पाहून खूप छान वाटले,’ मोहितचा पहिला मेसेज आला.
श्रेयाला ते वाचून छान वाटले. तिनेही उत्तर दिले. हळूहळू त्यांच्या गप्पा वाढू लागल्या. मोहितचे बोलणे अत्यंत सुसंस्कृत आणि ओघवते होते. तो तासन्तास श्रेयाशी बोलायचा. तो तिला लंडनच्या गल्ल्यांबद्दल, तिथल्या थंडीबद्दल बोलायचा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, तो श्रेयाच्या स्वप्नांना दाद द्यायचा. ‘श्रेया, तू खूप टॅलेंटेड आहेस. मी लवकरच भारतात एक शॉर्ट फिल्म बनवणार आहे. त्यात तू लीड रोल करावा अशी माझी इच्छा आहे,’ मोहितने एकदा तिला सांगितले. श्रेयाला वाटले की तिला आपल्या आयुष्याचा राजकुमार आणि स्वप्नांचा मार्ग या दोन्ही गोष्टी सापडल्या आहेत.

दोघांची जवळीक वाढत होती. त्यामुळेच पुढच्या दोन महिन्यांत मोहित हा श्रेयाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला. सकाळी उठल्यावर त्याचा ‘गुड मॉर्निंग’ मेसेज आणि रात्री झोपण्यापूर्वी तासन्तास होणारे चॅटिंग. श्रेयाला आता मोहितवर पूर्ण विश्वास बसला होता. तिने आपले वैयक्तिक फोटो, आपल्या कुटुंबाबद्दलची माहिती आणि अगदी आपल्या ऑफिसमधील गुपितेही त्याच्याशी शेअर केली होती. मोहितनेही तिला काही ‘पोर्ट्रेट’ फोटो पाठवले होते.

एके दिवशी रात्री श्रेयाला मोहितचा फोन आला. त्याचा आवाज खूपच घाबरलेला वाटत होता. ‘श्रेया, मी खूप मोठ्या संकटात सापडलो आहे!’ श्रेया घाबरली, ‘काय झालं मोहित? तू ठीक आहेस ना?’

मोहित सांगू लागला, मी लंडनहून भारतामध्ये येण्यासाठी निघालो. पण विमानतळावर माझ्या बॅगेत काही तांत्रिक समस्या निर्माण झाली. त्यात दुसरी अडचण म्हणजे माझे कार्ड देखील ब्लॉक झाले आहे. त्यामुळे यामधून बाहेर पडण्यासाठी मला तातडीने दोन लाख रुपयांची गरज आहे. तू मला आता पैसे दिलेस तर लगेचच मी तुला ते परत करेन. प्लीज श्रेया, तू माझी शेवटची आशा आहेस. प्रेमात आणि विश्वासात आंधळी झालेली श्रेया काहीच विचार करू शकली नाही. तिने आपल्या खात्यातून दोन लाख रुपये मोहितने दिलेल्या खात्यावर ट्रान्सफर केले. पैसे पाठवल्यानंतर दोन दिवस मोहितचा फोन बंद होता. श्रेया अस्वस्थ झाली. तिला वाटले त्याला काही झाले तर नसेल?
तिसर्‍या दिवशी जेव्हा त्याला फोन लागला, ‘मोहित, तू कुठे होतास? मी किती काळजीत होते,’ श्रेया रडत म्हणाली.

समोरून एक क्रूर हसण्याचा आवाज आला. अगं वेडे, मोहित-विहित कोणी नाहीये. तुझे दोन लाख तर गेलेच, पण आता पुढचे पाच लाख रुपये तयार ठेव. श्रेयाला धक्काच बसला. ‘म्हणजे? तू काय बोलतोयस?’ ’हे बघ श्रेया, तुझे माझ्यासोबतचे सर्व चॅट्स, तुझे काही वैयक्तिक फोटो आणि तुझ्या ऑफिसचे जे कॉन्फिडेंशियल डेटा तू मला पाठवला आहेस, ते सगळं माझ्याकडे सेव्ह आहे. तू पाच लाख रुपये दिले नाहीस, तर हे सगळं मी तुझ्या आई-वडिलांना पाठवीन आणि सोशल मीडियावर व्हायरल करेन. तुझी नोकरीही जाईल आणि इज्जतही.’
हे ऐकून श्रेयाच्या पायाखालची जमीन सरकली. तिला समजले की ती एका भयानक ‘हनीट्रॅप’ मध्ये अडकली आहे. तो गोड बोलणारा मोहित एक सायबर गुन्हेगार होता. त्याचे फोटो म्हणून त्याने जे फोटो डकवले होते त्याच्या प्रोफाइलवर ते प्रत्यक्षात इंटरनेटवरून चोरलेले होते. मोहित नावाने हा सायबर भामटा भारतातीलच एका कोपर्‍यात बसून तिला फसवण्याचे जाळे विणत होता.

श्रेया पुढचे दोन दिवस कोणाशीही बोलली नाही. तिला आत्महत्येचे विचार येऊ लागले. मग तिला तिच्या नाटकातील एका संवादाची आठवण झाली. संकट कितीही मोठं असलं, तरी त्याला पाठ दाखवू नका. तिचे धाडस एकवटले आणि स्नेहलला सर्व काही सांगितले. स्नेहलने तिला धीर दिला. दोघींनी मिळून सायबर पोलीस स्टेशन गाठले. सायबर सेलचे अधिकारी इन्स्पेक्टर भोसले यांनी श्रेयाची तक्रार ऐकून घेतली. घाबरू नकोस श्रेया, अशा गुन्हेगारांचे भीती हेच हत्यार असते. तू तक्रार केलीस, हेच खूप मोठे पाऊल आहे, इन्स्पेक्टर म्हणाले. पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला. मोहितने दिलेला बँक अकाऊंट नंबर बनावट कागदपत्रांवर आधारित होता. पण त्याने ज्या आयपी अ‍ॅड्रेसवरून मेसेज केले होते, त्यावरून त्याचे लोकेशन ट्रेस झाले. तो लंडनमध्ये नसून राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्याजवळील एका छोट्या गावातून हे रॅकेट चालवत होता. पोलिसांनी एक सापळा रचला. श्रेयाला मोहितशी बोलत राहण्यास सांगितले आणि पैसे देण्याचे कबूल करायला लावले. पैशांच्या हव्यासापोटी मोहितने पुन्हा एक नंबर दिला. इथे तो अडकला. या तांत्रिक धाग्यांच्या आधारे पोलिसांनी अवघ्या आठवडाभरात त्या गुन्हेगाराला बेड्या ठोकल्या.

मोहितला पोलिसांनी पकडलं तेव्हा त्याचे खरे नाव ‘आकाश’ असल्याचे समोर आले होते. तेव्हा श्रेयाला विश्वासच बसेना. तो फोनवर इतका देखणा आणि श्रीमंत वाटणारा मुलगा प्रत्यक्षात एक साधा, पण अत्यंत धूर्त गुन्हेगार होता. त्याने श्रेयासारख्या इतर दहा मुलींनाही अशाच प्रकारे फसवले होते.

श्रेयाने या संकटातून स्वतःला बाहेर काढले, पण प्रत्येक जण इतका नशीबवान नसतो. श्रेयाला तिचे दोन लाख रुपये मिळाले नाहीत, पण तिला तिचे हरवलेले आयुष्य परत मिळाले. आज ती सायबर सुरक्षिततेबाबत तरुणींमध्ये जनजागृती करण्याचे काम करते आहे. कोणाचेही शब्द कितीही गोड’ असले तरी त्यामागील हेतू ओळखणे गरजेचे आहे, हे सांगते आहे.

हे लक्षात ठेवा

अनोळखी मैत्रीवर विश्वासू नका : सोशल मीडियावर किंवा डेटिंग अ‍ॅपवर कोणीही अनोळखी व्यक्ती अचानक खूप जवळीक साधत असेल, तर सावध व्हा.

वैयक्तिक माहितीची सुरक्षा : आपला पत्ता, ऑफिसची माहिती, बँक डिटेल्स आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे खासगी फोटो कधीही कोणाशीही शेअर करू नका.

पैसे मागणे हे धोक्याचे लक्षण : ऑनलाइन ओळखीच्या व्यक्तीने पैशांची मागणी केली, की समजून जा हा फसवणुकीचा प्रकार आहे.

प्रोफाईलची पडताळणी : ‘गूगल रिव्हर्स इमेज सर्च’वापरून समोरच्या व्यक्तीचे फोटो खरे आहेत की चोरलेले, हे तपासा.

घाबरू नका, तक्रार करा : कोणी ब्लॅकमेल करत असेल, तर घाबरून पैसे देऊ नका. यामुळे गुन्हेगाराची हिंमत वाढते. तत्काळ जवळच्या सायबर पोलीस स्टेशनला किंवा www.cybercrime.gov.in   वर तक्रार करा.

Previous Post

नाय नो नेव्हर

Next Post

चौरंगी विहीणबाई योजना!

Next Post
चौरंगी विहीणबाई योजना!

चौरंगी विहीणबाई योजना!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.