माझा मानलेला परमप्रिय मित्र पोक्या सध्या भोंदूबाबा अशोक खरात यांच्याकडे पावन होऊन आलेल्या आजी-माजी मंत्र्यांची, आमदारांची, नेत्यांच्या नावांची यादी घेऊन बसलेला असतो. त्याच्या दृष्टीने त्यापैकी काहीजण त्याला सभ्य वाटतात. तर काहीजण `चालू’ वाटतात. त्यातील काही जणांनी खरातची भेट घेतल्याचे मान्य केले आहे. या भेटीचे व्हिडिओ व्हायरल झाल्यावर त्यांना हे मान्य केल्यावाचून गत्यंतरच नव्हते. मात्र भेट का घेतली अर्थात भेटीचे कारण काय, हे मात्र कोणीही स्पष्ट केल्याचे पोक्याला आढळले नाही. फक्त एकच अपवाद होता तो केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा. ते स्वतः खरातला भेटायला गेले नव्हते, तर खरात त्यांना भेटण्यासाठी स्वतः त्यांच्या निवासस्थानी दिल्लीला गेला होता. त्या भेटीच्या व्हिडिओत अमित शहा अवघडलेले दिसतात. कुठून ही नसती ब्याद भेटायला आली असे पोक्याचे म्हणणे आहे.
मात्र बाकी नेत्यांच्या भेटीचा उद्देश काय होता, हे जाणून घेण्याची उत्सुकता असल्यामुळे पोक्याने काही दिवसांपूर्वीच या नेत्यांच्या `त्या’ भेटीबद्दल खास मुलाखती घेतल्या. त्यातील हा संक्षिप्त भाग आपल्या माहितीसाठी.

मुख्यमंत्री फडणवीस : अशोक खरात अचूक भविष्य सांगतो अशी माहिती मला मंत्रिमंडळातील एका सहकार्याने दिली होती. आता तुम्ही म्हणाल, मग तुम्ही खरातकडे कशासाठी गेला होता. तुमची शंका रास्तच आहे. मी ईश्वराला स्मरून सांगतो, मी माझे नव्हे तर आमचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे भविष्य जाणून घेण्यासाठी गेलो होतो. अलीकडे त्यांच्या उचापती बर्याच वाढल्या आहेत. भाजपावर सतत कुरघोडी करण्याचा त्यांचा प्रयत्न कसा सुरू असतो ते तुम्ही अलीकडच्या सर्व निवडणुकांमध्ये पाहिले आहे. त्यांच्या भविष्यात नक्की काय आहे, याची उत्सुकता मला होती. त्या दृष्टीने सावधही राहता आले असते, हा एकच उद्देश त्यापाठी होता. त्यावेळी खरात म्हणाला, कुणाला सांगू नका, पण त्यांचे यापुढे दिवस वाईट आहेत. ज्या गोष्टी ते त्यांच्या आणि पक्षाच्या भल्यासाठी करायला जातील त्या त्यांच्यावर उलटतील… एवढेच आमचे बोलणे झाले आणि मी तिथून त्यांचे आभार मानून निर्धास्त मनाने निघालो. बस् एवढेच.

एकनाथ शिंदे : खरात यांची खबर मला पाच-सहा वर्षांपूर्वीच लागली होती. एवढा मोठा दिव्य पुरुष मला माहीत नसणे म्हणजे माझे अज्ञानच ठरले असते. त्यामुळे तेव्हापासून भेटी सुरू झाल्या. भेटीलागी जीवा लागलीसे आस, अशी परिस्थिती होती माझी. त्यांचा एक एक प्रताप म्हणजे त्याची भविष्यावरची कमांड, त्यांचे उपदेशपर बोलणे ऐकून मनाला दिलासा मिळत होता. त्यांच्या काही सामुदायिक धार्मिक विधींना मी भारावल्यासारखा उपस्थित होतो. पण तीर्थप्राशन करण्याची संधी मात्र मला कधीच मिळाली नाही. ती त्यांच्या काही भक्त महिलांना मिळाली, असे आता त्या प्रसंगाचे व्हिडिओ पाहिल्यावर समजले. अगदी मित्रासारखे त्यांचे आश्वासक बोलणे ऐकून दिलासा मिळत असे. तो माणूस इतकी अनैतिक कृत्ये आणि एवढ्या बेकायदा धंद्यात अब्जावधांrची कमाई करत असेल याचा अंदाजही नव्हता. मी मुख्यमंत्री झाल्यावर जवळीक आणखी वाढली. त्यांच्याबरोबर आणखी काय व्यवहार झाले, किती फोन कॉल झाले याची अतिरंजित माहिती आता सोशल मीडियातून येत आहे. ती विश्वासार्ह नाही. मला बदनाम करण्यात कोण आघाडीवर आहे आणि त्यात कोणाचा काय हेतू आहे, हे मी सांगायला नको. माझ्याबरोबरच इतरांची जी सत्ये बाहेर येतील त्यांना त्यांनीही सामोरे गेले पाहिजे. पण कुणालाही सोडणार नाही, असे एकीकडे सांगत मला टार्गेट करणे आणि एका बाईला मोकळे सोडणे हा अन्याय आहे.
चंद्रकांत पाटील : हो, भेटलो ना मी खरातला. अशाच हवापाण्याच्या गप्पा मारण्यासाठी. पुण्याची खुशाली, इकडची खुशाली, तिकडची खुशाली, मंत्रिमंडळाची खुशाली अशा खुशालीच्या गप्पा झाल्या. मला तो माणूस खुशालचेंडू वाटला एवढंच सत्य.
आशिष शेलार : मी सांस्कृतिक कार्यमंत्री झाल्यावर रवींद्र नाट्य मंदिरात शासनातर्पेâ आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून खरातला बोलावण्यासाठी मी त्यांची भेट घेतली होती. पण त्याने कार्यबाहुल्यामुळे कार्यक्रमाला येणे शक्य होणार नाही, असे फोनवरून कळवले. मग मी दुसरा पाहुणा शोधला. आताचे खरातचे पराक्रम ऐकून जे झाले ते बरेच झाले असे वाटल्यावाचून राहिले नाही. शेवटी, होते ते चांगल्यासाठीच. खरातकडे जे जे गेले त्यांची चौकशी झालीच पाहिजे. माझी केली तरीही चालेल. कर नाही त्याला डर कशाला?
धनंजय मुंडे : खरातच्या डोक्यावर छत्री धरणार्या आमच्या पक्षातल्या देखण्या आणि बेडर महिला नेत्याच्या सल्ल्यावरून मी खरातच्या त्या मंदिरात त्याची भेट अनेकदा घेतली होती. माझ्या वैयक्तिक आयुष्यात आणि पक्षात माझ्यावर होणार्या अन्यायामुळे झालेल्या दुःखावर उपाय शोधण्यासाठी मी त्याला भेटलो होतो. तो म्हणायचा ध्यानधारणेत मन रमव. तिथेच तुला सुखाचा झरा सापडेल. लवकर तुझा मंत्रिमंडळात एका रिकाम्या होणार्या जागेवर समावेश होईल. तेव्हा माझी भविष्यवाणी विसरू नकोस.
सुनील तटकरे : काय बोलू? अजितदादा गेल्यापासून बसलेल्या धक्क्यातून मी अजूनही सावरलेलो नाही. तरीही खरात प्रकारणात माझे नाव सतत घेतले जात असल्यामुळे मी एक कारस्थानी माणूस असल्याचे चित्र जनतेसमोर मुद्दाम उभे केले जात आहे. मी एवढेच सांगतो, त्यामुळे मी तुम्हाला जसा वाटतो आणि जसा दिसतो तसा मुळीच नाही. अजितदादांवर, त्यांच्या कर्तृत्त्वावर मनापासून प्रेम करणारा मी पक्षाचा निष्ठावंत नेता आहे. कोणाच्याही मृत्युशी माझा आणि खरातचा संबंध जोडण्याचा प्रयत्न कृपा करून करू नका. खरातइतका नीच माणूस मी नक्कीच नाही.

