• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

धर्म आणि विवेक

ह.भ.प.ज्ञानेश्वर बंडगर (अभंगबोध)

marmik by marmik
April 13, 2026
in भाष्य
0
धर्म आणि विवेक

धर्माचे पालन।
करणे पाखंड खंडण ।।१ ।।
हेचि आम्हा करणे काम।
बीज वाढवावे नाम ।।२ ।।
तीक्ष्ण उत्तरे ।
हाती घेऊनि बाण फिरे ।।३ ।।
नाही भीडभार।
तुका म्हणे सानथोर ।।४ ।।

धर्मपालन आणि धर्मरक्षणाच्या संदर्भात वारकरी संप्रदायाची भूमिका स्पष्ट करणारा हा तुकोबारायांचा अभंग आहे. आपण मागच्या भागात तुकोबारायांनी पाखंडी हा शब्द कोणासाठी वापरला हे पाहत होतो. हा शब्द तुकोबारायांनी अद्वैत वेदांती पंडितांना लक्षूनच वापरला आहे हे अभंगाच्या पुढच्या चरणातून स्पष्ट होतं. तुकोबाराय दुसर्‍या चरणात ‘हेचि आम्हा करणे काम। बीज वाढवावे नाम ।।’ असं म्हणतात. याचा अर्थ नामस्मरण भक्ती वाढवण्याला अडथळा ठरणार्‍या लोकांना उद्देशूनच पाखंडी हा शब्द आला आहे. आता नामस्मरण भक्तीला कोणाचा विरोध आहे हे रामेश्वर शास्त्रींच्या आरोपावरून आपल्याला समजतं. ‘सकळ धर्म बुडवूनि निश्चित। नाममहिमा बोले अद्भूत ।।’ ही त्यांची तुकोबारायांविषयीची तक्रार आहे. याचा अर्थ नामस्मरणाच्या आड येणारे हे शास्त्री पंडितच पाखंडी आहेत. त्यांच्या मताचं खंडण करूनच नाममहिमा वाढवणं हे आमचं काम आहे असं तुकोबाराय म्हणतात. ‘ब्राह्मणा न कळे आपुले वर्म। गवसे परब्रह्म एका नामे ।।’ असं नामदेवराय म्हणतात. याचा अर्थ संतांच्या काळात वेदांती पंडितांना नामस्मरणाची महत्ता समजत नव्हती. त्यामुळेच ते नामस्मरणाला विरोध करत असत. त्यांच्या मताचं खंडण करुन नाममहिमा वाढवणं हेच धर्मपालन आहे असं तुकोबारायांना सांगायचं आहे.
आता नामस्मरणाचा महिमा सांगत असताना वैदिक पाखंडांशी जो वादविवाद करावा लागणार आहे त्यासाठी तुकोबाराय शब्दशस्त्रे परजून तयार आहेत. त्यासाठी त्यांनी तीक्ष्ण वाग्बाण जवळच बाळगले आहेत. ‘तीक्ष्ण उत्तरे। हाती घेऊनि बाण फिरे।।’ असं तुकोबाराय म्हणतात. कोणतीही भीडभाड न ठेवता आणि लहानमोठे न बघता तुकोबाराय त्यांची भूमिका मांडत होते. ‘नाही भीडभार। तुका म्हणे सानथोर।।’ असा तुकोबारायांचा बाणा आहे.

नामस्मरणाला विरोध होण्याची दोन महत्त्वाची कारणं आहेत. पहिलं कारण नामस्मरणात जातिवर्णाचा भेद नाही. साहजिकच त्यामुळे उच्चवर्णीयांना वर्णवर्चस्वाची संधी मिळत नाही. दुसरं कारण म्हणजे नामस्मरणाने यज्ञादी कर्मकांडावर गदा येते. त्यामुळे कर्मकांडातून मिळणारी दानदक्षिणा बंद होते. अशा दुहेरी कारणाने ही मंडळी नामस्मरणाला विरोध करत होती. वास्तवात तुकोबाराय आणि वारकरी संतानी जो धर्म सांगितला त्यामुळेच बराच काळ धर्मरक्षण झालं. पुढच्या काळात शुष्क वेदांती पांडित्याला कंटाळलेले अनेक उच्चवर्णीय लोक ख्रिश्चन धर्मातल्या ईश्वरी प्रेमाच्या संकल्पनेने भारावले आणि त्यांनी स्वेच्छेने धर्मांतर केलं. त्याचवेळी वेदांती मंडळींच्या जातिभेदाला कंटाळूनही अनेकांनी धर्मांतर केलं. या काळात भागवत धर्माचं रक्षण केलं असेल तर ते वारकरी संप्रदायाने. एकतर वारकरी संप्रदायाने शुष्क वेदांताला महत्त्व न देता ईश्वरी प्रेमाची अनुभूती दिली होती आणि त्यांच्या विचारसरणीत जातिभेदही नव्हता. उलट संतांच्या व्यापक मानवतावादी विचारसरणीने इतर धर्मातील लोकही वारकरी संप्रदायात आले. त्यांनाही वारकरी संप्रदायाने सन्मान दिला. कबीर, लतिफ, अनगडशा फकीर, शेख महंमदबाबा यांच्यापासून ते अगदी अलीकडच्या काळातल्या वजीरखान, जैतुनबी माऊली आणि अकबर आबा शेख यांच्यापर्यंत अनेक लोक वारकरी संप्रदायात सन्मान्य झाले. संतांनी कोणताही धर्मभेद-धर्मद्वेष न करता आणि परधर्मीयांची निंदा न करता सर्वधर्मसमभावाचा विचार दिला. सर्वधर्मसमभावाची विचारसरणी स्वीकारूनही वारकरी संतांनी धर्मरक्षण केलं.

वारकरी संप्रदायाची धर्मरक्षणातील ही भूमिका आपल्याला प्रबोधनकार ठाकरे यांच्या आत्मचरित्रातून समजते. प्रबोधनकार मुंबईतल्या जमशेटजी सकलातवाला यांच्या बंगल्यात धर्मचर्चा करण्यासाठी जात असत. जमशेटजी सकलातवाला हे सर्व धर्मांचे अत्यंत ताकदीचे अभ्यासक होते. ते सतत काहीतरी वाचत बसलेले असायचे. त्यांच्या घरात धर्माविषयीच्या पुस्तकांनी अनेक कपाटे भरलेली होती. एकदा त्यांच्या घरी फरक्हॉर नावाचे जागतिक पातळीवरचे ख्रिस्ती पंडित आले होते. त्यावेळचा त्यांच्यातला संवाद प्रबोधनकार सांगतात- ‘महाराष्ट्रातील खेडूत जनता नाक्षर आणि अशिक्षित यावर आमची चर्चा चालली असता, फरक्हॉर म्हणाले,’मी हा सिद्धांत मांडायला तयार नाही. खेडूतांना अक्षरांची ओळख नसेल. त्यांना लिहिता येत नसेल. पण त्यांना अडाणी किंवा अप्रबुद्ध म्हणायला मी तयार नाही. उलट शहरी साक्षरांपेक्षा त्यांची नीती आणि धर्मविषयक बौद्धिक पातळी उंचावलेलीच मला जागोजागी आढळली. मी ख्रिस्ती धर्म प्रचारासाठी एका खेड्यात गेलो असता शेतावर काम करीत असलेल्या एका वृद्ध खेडूताने ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, जनाबाई इत्यादी कितीतरी संतांचे अभंग फडाफड माझ्या तोंडावर फेकून माझ्या प्रत्येक मुद्द्याला सडेतोड उत्तर दिले. खेडूतांचे संतवाड्मयाचे पाठांतर म्हणजे त्यांच्या बौद्धिक परिणतीचा रोखठोक पुरावा नव्हे? खेड्यातील भजनी मंडळे म्हणजे भागवत धर्माच्या किल्लेकोटच म्हणावे लागतील.’ प्रबोधनकारांनी लिहिलेल्या या हकीकतीतून आपल्याला वारकरी संप्रदायाचे धर्मरक्षणातील कार्य लक्षात येईल.

खेड्यापाड्यातील शूद्रातिशूद्र बहुजन समाज वारकरी संप्रदायात होता. त्यामुळं त्यांनी ख्रिश्चन धर्माच्या प्रभावाच्या काळातही धर्मांतर केलं नाही. याउलट जे उच्चवर्णीय पांढरपेशा लोक त्यांच्या वर्चस्ववादी भूमिकेमुळे वारकरी संप्रदायापासून दूर होते, त्यांनी मोठ्या प्रमाणात धर्मांतर केलं. यासंदर्भात पंडिता रमाबाई यांच्या चरित्रात प्रबोधनकारांनी महत्त्वाचं विवेचन केलेलं आहे. उच्चवर्णीय लोकांना जेव्हा ख्रिश्चन धर्माचा परिचय झाला तेव्हा त्यांनी त्याला दोन प्रकारचा प्रतिसाद दिला. काहीजणांनी स्मृतीपुराणोक्त वैदिक धर्माचा सरळ त्याग करत ख्रिश्चन धर्मात धर्मांतर केलं. त्याचवेळी काहीजणांनी तुकारामादी वारकरी संतांच्या भागवत धर्माचा नवअविष्कार प्रार्थना समाजाच्या रूपाने घडवून आणली. ख्रिस्ती धर्मातील ईश्वरी प्रेमाच्या नव्या मांडणीने भारावलेले लोक धर्मांतर करत होते. तोच ईश्वरी प्रेमाचा अनुभव वारकरी संप्रदायात असतानाही उच्चवर्णीय लोक वारकरी संप्रदायात प्रवेश न करता ख्रिस्ती धर्मात गेले, त्याविषयी प्रबोधनकार लिहितात – ‘ स्मृतिपुराणोक्त हिंदु धर्मावरील विश्वास उडालेले शेकडो सुधारक बंगालप्रमाणे महाराष्ट्रातही होतेच. प्रत्येक नव्या कल्पनेचा हिरिरीने पुरस्कार करण्यात पुढे पाऊल टाकण्याची शहामत असणार्‍या शेकडो चित्पावन मंडळीनी पूर्वीच क्रिस्ती धर्मात प्रवेश केलेला होता. एवढे साहस ज्याना जमले नाही, ते तुकारामादिकांच्या भागवत धर्माच्या सावली सावलीने जात निवडक अशा प्रार्थना समाजाने आणि परमहंस सभेच्या गुप्त चळवळीने, हिंदुधर्म प्रचारात आणू पहात होते. म्हणजे रमाबाईच्या धर्मविषयक खळबळीच्या हंगामात महाराष्ट्रात स्मृति पुराणोक्त वैदिक धर्माविरुद्ध उघड बंड चालू झालेले होते. ज्ञानेश्वर ज्याचा पाया आणि तुकाराम ज्याचा कळस असा ‘सर्वाभूतीं प्रेम। वैष्णवांचा धर्म। भेदाभेद भ्रम । अमंगळ ।।’ असा जोरदार पुकारा करणारा भागवत धर्म पंढरपूरच्या माहात्म्याने महाराष्ट्रभर शेकडो वर्षे गर्जतच असताना, त्याच तत्वावरच्या क्रीस्ती धर्माकडे विचारवंत ब्राम्हणांचा ओघ का खेचला जावा, यांचे कित्येकांना आश्चर्य वाटण्यासारखे आहे. त्याचे समाधान थोडक्यात असे. भागवत धर्म म्हणजे मागासलेल्या ब्राम्हणेतर ‘लंगोट्या नि घोंगडीवाल्या’ समाजाचा धर्म. ब्राम्हणादि वरिष्ठ वर्गाच्या पांढरपेशांचा त्याच्याशी काही संबंध नाही. ब्राम्हणांची कर्मे तेवढी वेदोक्त, बाकीच्यांची फक्त पुराणोक्त. या समजुतीप्रमाणेच भागवत धर्मपंथाला ब्राम्हणानी आज्जीबात वाळीत टाकले होते. रमाबाईलाहि याच कारणांमुळे त्याचा परिचय करून घेता आला नाही, तर त्यात नवल कशाचे?’

प्रबोधनकारांनी केलेलं हे विवेचन रास्त आहे. उच्चवर्णीय समाजात वारकरी संप्रदाय म्हणजे अडाणी खेडुतांचा समाजधर्म आहे अशी समजूत होती. त्यामुळेच ते वारकरी संप्रदायापासून बाजूला होते. ते जर वारकरी संप्रदायाचा भाग झाले असते तर त्यांना वारकरी संप्रदायातच ईश्वरी प्रेमाचा अनुभव मिळून त्यांनी धर्मांतर केलं नसतं. पंडिता रमाबाईंनी धर्मांतर विचारपूर्वकच केलं होतं. वारकरी विचारांचा त्यांना परिचय असता तर कदाचित हे धर्मांतर घडलं नसतं.

इंग्रज राजवटीच्या काळात घडलेल्या धर्मांतराचं आणखी एक कारण म्हणजे ख्रिश्चन मिशनरींचा सेवाभाव. त्या सेवाभावाचा आपल्याकडे अभाव होता. माणुसकीची महान तत्त्वं केवळ सांगून चालत नाहीत तर ती आचरणात आणावी लागतात. संतांनी आपल्याला हे भान दिलं होतं. नामदेवांनी एका कुष्ठरोगी केसो कलंदराची सेवा केली. त्यांना पंजाबातील त्यांच्या कार्याचे उत्तराधिकारी बनवले. त्याचप्रमाणे एकनाथांनीही एका रोग्याची सेवा केल्याची कथा आहे. तुकाराम महाराजही अशीच सेवाभावाची परोपकारी कामं करत असल्याचा संदर्भ आहे. संतांनी ज्याप्रमाणे सेवाभावाचा एक आदर्श घालून दिला तो आपल्याला जपता आला नाही. त्यामुळेच ख्रिश्चन मिशनरींचा सेवाभाव पाहून रमाबाईंनी धर्मांतर केलं. प्रबोधनकार लिहितात- ‘शिवाय मनाला केवळ तात्विक शांति देणारा आणि माणुसकीची नुसती महान तत्वे सांगणारा धर्म रमाबाईच्या चिकित्सक प्रकृतीचे समाधान करू शकतच नव्हता. येशूने प्रवचित केलेली भूतदया, सर्व कृत्ये मिशनरी संस्था प्रत्यक्ष कशा आचरणात आणीत आहेत, याचे दाखले दाखवून, त्या धर्माकडे त्यांची प्रवृत्ति वळवण्याचे बरेचसे काम पुण्याने साधून घेतले होते.’ आपल्या धर्मात निर्माण झालेल्या सेवाभावाच्या अभावाची ही उणीव पुढे वारकरी संप्रदायातीलच गाडगेबाबांनी भरुन काढली. त्यांनी सेवाभावाचा एक आदर्श निर्माण केला. संतविचार प्रत्यक्ष आचरणात आणून दाखवला.

अलीकडेच महाराष्ट्र सरकारने फसवणूक, आमिष आणि बळजबरीच्या मार्गाने होणारी धर्मांतराची प्रक्रिया रोखण्यासाठी धर्मस्वातंत्र्याचं विधेयक आणलंय. वास्तविक पाहता कायदा आला की त्याला पळवाटा येतातच. धर्मांतराचं मूळ धर्म आणि माणूस यात जे अंतर पडतं त्यात आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. केवळ कायदा करून उपयोग नाही. जेव्हा जातिविषमता नष्ट होऊन संतप्रणित भागवत धर्माचा विचार समाजात रुजेल त्यावेळी कोणताही कायदा न करता लोक आमिष, फसवणूक आणि बळजबरीला बळी पडणार नाही. त्याऐवजी ते विवेकाच्या आधारे धर्माचा निर्णय घेतील.

Previous Post

लोकशाहीला पडलेल्या घेरावाचे काय?

Next Post

हे तर जाहिरातपुराण

Next Post
विक्रमाच्या साडेसातीचं फॅक्टचेक

हे तर जाहिरातपुराण

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.