
‘काय चिंतामणराव? काय काम काढलं?’ अर्ध्या पुतळ्याखाली बसलाय, तो समोरून बुलेटवर आलेला चिंतामण तिथं उभा राहून काही शोधू लागला.
‘नम्या नाही आला का रे?’ चिंतामणराव विचारायला लागला.
‘तो? काही पिक्चर आलाय ना? हाणामारीचा? तिकडं बघायला गेला थेटरात!’ अर्ध्या सहजपणे उत्तरला.
‘मग तू नाही गेला?’ चिंतामणरावांना प्रश्न!
‘त्याचं काय आहे, दिवसभर कामावर डोकं खराब झालं. त्यामुळं हे असले पिक्चर बघायला जायचं म्हणजे आणखी डोकं खराब करायचं
काम!’ अर्ध्या वेतागल्या चेहर्यानं बोलला.
‘पण झालं काय?’ चिंतामण विचारू लागला.
‘हे सुपरवायझरबरोबर भांडण झालं. साला दुसरं काम मिळालं ना? तर ह्या कंपनीत जाऊन फटाके फोडून पेढे वाटीन मी!’ अर्ध्या भडभडला.
‘चल, माझ्याबरोबर! ग्यारंटेड काम मिळंल तुला!’ चिंतामण सहज बोलला खरा. पण अर्ध्यानं चमकून वर पाहिलं.
‘मी खळ्यावर नाही येणार बरं का?’ अर्ध्यानं मनातल्या पहिल्या शंकेला नकार कळवला. दुसरं यायचंबी काय त्याच्या डोक्यात? हा चिंतामण मार्वेâटात माल पुकारायला राहतो. याच्या ओळखी म्हणजे व्यापारी, अडते, हमाल आणि मार्वेâट कमिटी! त्यात ही बहुतेक पदं लिलावात जात्या. मग उरतं काय? खळ्याबिळ्यावर काम देणं एव्हढंच उरतं! ते तर अर्ध्याला नकोय. काय आहे? तिथं कामाला प्रतिष्ठा नाही. मग कश्याला सांगितली ही उठाठेव?
‘कुठं जायचं न् कुठं नाही! हे तुझं तू ठरव! त्याच्यात माझं काय?’ चिंतामण हात झटकून मोकळा झाला. अर्ध्याला प्रश्नं पडले. हा म्हणतो, तू ठरव. वर त्याच्यात माझं काय? म्हणून ग्यारंटेडला सुरुंग लावणं बरं दिसतं का?
‘काम तुम्ही दाखवणार! तेव्हा…’ अर्ध्याला पुढं बोलून कुठं दिलं?
‘अरे मी काम नाही दाखवणार! तुला मार्ग दाखवणार!’ चिंतामण अगदी आत्मविश्वासानं बोलला.
‘वाटा तर मलाबी माहीत आहे गावच्या! त्याच्यानं काय होणार? विषय झटपट दुसरं काम मिळायचा आहे. दुसरं काम नाही मिळालं तर लग्न पण व्हायचं नाही. म्हणजे मेले का..?’ अर्ध्या कावला.
‘अरे नम्या पण ह्याच प्रॉब्लेमसाठी माझ्याबरोबर येणार होता. तू आला तर तुलाबी मठात घेऊन जातो. काय? हात पाहिला की लगेच बाबा अचूक उपाय सांगतात. हे मी नाही का? आधी लिलाव पुकारायला होतो. बाबानं मार्ग दाखवला तर आता मी पोटखरेदीदार झालोय. तेबी मागच्या दीड महिन्यात एव्हडी प्रगती. बाकी तू विचार कर.’ चिंतामणनं अर्ध्याच्या डोक्यात भुंगा सोडला. खरंच एव्हढी प्रगती होते? अर्ध्या विचार करायला लागला.
‘आलो असतो. पण थोडं…’ अर्ध्या चाचरत बोलला. जावं की जाऊ नये हाच तो पेच.
‘हां, आलो असतो पण थोडे अंडे उबवायचे राहिले! असंच ना? अरे काय हे? नाही पटलं तर तुला तिथं कुणी डांबून ठेवणार आहे का? माझ्याबरोबर चल! तीर्थप्रसाद आटोपला का पंधरा वीस मिनिटांत परत येऊ? चल बस पटकन!’ चिंतामण घाई करत बोलला तसा अर्ध्या जड पावलानं उठला आणि त्याच्याबरोबर ढळला.
तर चिंतामण ज्या मठाबद्दल बोलत होता तो मठ नव्यानं जन्मलेल्या बाबाचा! अशी बाबालोकं अख्ख्या जिल्ह्यात बरीच जल्मली! सगळ्यांची जल्मकथा एक सारखीच! एकाएक स्वप्नात इष्टदेवतेचा साक्षात्कार होणार. का बाबा अमुक ठिकाणी तमुक वारी ठमुक इंच/फूट खोल खोदलं का? एक जुनी मूर्त सापडंल. ती वर काढायची. तिच्यावर तात्पुरतं छप्पर बांधायचं. नव्या-नव्यानं लांबून लांबून लोकं पहायला येतील. तेव्हा सुरुवातीला कुठलीबी एक पोथी काढून पारायणं करायची. त्याचं मोठं उद्यापन करत भंडारा घालायचा. जेवढी जास्त लोकं खाऊन जातील तेवढी पब्लिसिटी वाढती. मग गावाच्या तथाकथित सार्या पुढार्यांपुढं एकदिवस भव्यदिव्य मंदिर उभारणीचा संकल्प मांडायचा. त्याला देणगी मिळवायची, गावातून, पंचक्रोशीतून. जो बाबा जागा मिळवू शकतो अन् मंदिर उभारू शकतो. त्याचा स्टार्टअप सुरू झालाच म्हणायचा.
फक्त ह्या बाबाचं जरा वेगळंय. त्याला त्याच्या गावातून लोकांनी छेड काढल्याच्या कारणावरून बदडून बाहेर हाकलला. तो मग आसपासच्या गावात भजनी मंडळात टाळ-मृदुंग असं जे जमंल ते वाजवत बसायचा. हळूहळू जम बसला. मग कीर्तन झोडू लागला. एकदिवस इथं फॉरेस्टच्या जमिनीवर दगडाला शेंदूर फासून देवळी बांधली. मग बाजूला झाप टाकून कुटी. आता पत्रे टाकून चार खोल्या पक्कं बांधकाम झालंय. आता उत्तरेतल्या कुठल्या देवाच्या मंदिराची आहे त्यापेक्षा भव्य प्रतिकृती उभारायचा संकल्प बाबानं सोडलाय फॉरेस्टच्या जागेतच. त्याच्यासाठी कोकणातून जांभे दगड येऊन पडलेत. राजस्थानमधून संगमरवर आलंय. काही मौल्यवान रत्नं लावून कळस उभारायचा आहे, म्हणून गावकरी दागदागिने दान देऊ राहिले. आमदार आणि खासदारांनी त्यांचा फंड द्यायचं कबूल केलंय..
अखेर चिंतामणसह अर्ध्या मठात पोहोचला. तर अर्ध्या बघतो काय? बाबा तांब्याच्या की चंदनाच्या? काठवदीत बसलाय. उघडाबंब! त्याच्या डोक्यावर नवविवाहिता दूध ओतताय. त्याच्या भोवती फेर धरून त्या कुठल्याश्या हिंदी गाण्याच्या चालीवर नाचत गात त्याला सप्तनद्यांच्या पाण्यानं भिजवताय. पुढं बसून म्हातार्या-कोतार्या मान डोलवताय. पुरुषमंडळी दूर उभी राहून हात जोडून बघताय. अर्ध्या हे पाहून हबकला! साला हा उघडा बाबा, दुधात बेडका सारखा बसलाय. जाणती म्हणवणारी मंडळी टाळ्या पिटताय.तरण्या पोरी, विवाहिता त्याचं अंग घासताय. यांना कसलं काहीच वाटत नाही? आपण ’’वेळेवर आलो बघ! आपल्याला तीर्थ मिळणार आज!’’ चिंतामणी खुशीनं बोलला.’’तीर्थ? ़कुठंय?’’ अर्ध्याला साहजिकचं प्रश्न पडला.
‘आंधळ्या हे काय?’ चिंतामण काठवद दाखवत बोलला. आता अर्ध्याला केवळ ओकारी यायची बाकी राहिली. तोच बाबा उठला आणि गोपिकांच्या गराड्यात आत गेला.
मग बाकी मागे उरलेल्या ज्येष्ठ सेविका पुढं आल्या. त्यांनी ते दूधवाटप सुरू केलं. लोकं हातावर चमच्याभर तीर्थ घेऊन गुरुस्मरण करत ते प्राशन करू लागले. चिंतामण घाईने पुढं जाऊन नंबर लावू लागला. पण अर्ध्या मात्र दोन पावलं मागं सरकून आडोश्याला उभा राहिला.
पाचेक मिनिटांत सफेद वस्त्र गुंडाळून बाबा बाहेर आले. अख्ख्या भक्तगणांनी मग एकच कल्ला केला. तो चिंतामण दोन एक-एक लिटरच्या बाटल्या घेऊन अर्ध्या जवळ आला.
‘धर, एक बाटलीभर तीर्थ तुला घे! अरे घेरे! महिनाभर दोन टाइम घे! तुला बायको आणि नोकरी मिळालीच समज!’ चिंतामणच बाबा बनला. आणि त्यानं तोडगा पण सांगितला.
तेव्हढ्यात कुणीतरी माईक बाहेर घेऊन आलं. त्यानं एक चुणचुणीत तरुणीच्या हाती त्या माईकचा ताबा दिला. एकजण बाबाला एक मिनी सिंहासन घेऊन आला. बाबा त्यावर बसला. बाबाच्या खुणेनं भक्तगण आहे त्या ठिकाणी खाली बसले. त्या चुणचुणीत तरुणीनं बाबाला हात जोडत नमस्कार घातला. अन् बाबानं दिलेली एक चिठ्ठी हातात घेऊन ती वाचू लागली.
‘आपले श्री श्री बाबा वाटलावेकर यांचं फाल्गुन ते पौष पर्यंत पौष्टिक मौन आहे. हे आपण भक्तगण जाणताच! पण बाबा, बाबांचं एवढं मौन असूनबी बाबांना तुमच्याशी बोलावं वाटतं. म्हणून बाबांनी खास दोन रात्री जागून ही चिठ्ठी लिहिलीय. ती मी तुमच्यासाठी आता येथे वाचून दाखवते. तर आपल्याला माहितीच आहे, बाबांचा जल्म लोकांना सगळ्या समस्यांतून मुक्त करायलाच झालाय. पण इथं गुरू आहेत, शिष्य आहेत. पण त्यांना सांधणारा गुरुमंत्र आपल्याकडे नाही. बाबा म्हंटले का तो आज सगळ्यांना खुलेपणानं द्यावा! म्हणून आजची ही बैठक आहे. तर सगळ्यांनी डोळे बंद करा. हात जोडा. बाबांचं स्मरण करा. मी तुम्हाला बाबांच्या वतीने एक गुरुमंत्र देतेय, त्याचा रोज जप करायचाय सगळ्यांनी. एकशे एक्यांईशी वेळा. ऐका! मंत्र असा आहे. ओम बब्बाय नम्मा! नमः किंवा नमहा असं चुकीचं कुणीच बोलणार नाही. कळलं का? इथून पुढं सर्व भक्तांनी सहा बुधवारच्या खेटी घालायच्या. मंत्रजाप करत यायचं. सहाव्या बुधवारी सहाच्या पटीत देणगी आणायची. आणि मंदिर उभारणीसाठी हातभार लावायचा. तुम्ही यथाशक्ती जेव्हढं दान द्याल त्याच्या दसपट तुम्हाला धन-धान्य-सौख्य-संतती-संपत्ती-आरोग्य सगळं मिळेल…’ ती तरुणी चभर चभर बोलूच राहिली.
‘ओ चिंतामणराव, चला! घरून फोन येतोय. मला जावं लागेल.’ कंटाळलेला अर्ध्या चिंतामणच्या कानाजवळ पुटपुटला. त्यानं भक्तिभावात तल्लीन झालेल्या चिंतामणची तंद्री भंगली. सोबत अर्ध्या आहे, त्याला लवकर परत सोडायचं आश्वासन दिलंय हे आठवून चिंतामण नाईलाजाने उठला.
गाडी निघाली. अर्ध्यानं हळूच बूच खोलून हातातली तीर्थाची बाटली गटाराच्या दिशेनं भिरकावली. आपल्यातला जब्या एव्हढंच धाडस करू शकतो म्हणत तो स्वतःची समजूत घालू लागला…

