• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

इतिहासाला वर्तमानाशी जोडणारा अखेरचा ऋषी

वरुण सुखराज (आदरांजली)

marmik by marmik
April 8, 2026
in आदरांजली, मोठी माणसं, विशेष लेख
0
इतिहासाला वर्तमानाशी जोडणारा अखेरचा ऋषी

‘जॉर्ज ऑरवेल’चं एक प्रसिद्ध वाक्य आहे‘Who controls the past controls the future. Who controls the present controls the past.’ डोक्याला फेटा, कपाळावर चंद्रकोर आणि बुडाखाली दणादण आवाज करणारी दुचाकी बुलेट, कर्णकर्कश डॉल्बी, डोळ्याला
गॉगल आणि त्याला चिकटून असलेली अदृश्य झापडं. वर्तमान महाराष्ट्राच्या इतिहासप्रेमाचा हा प्रातिनिधिक चेहरा. पुण्या-मुंबईतल्या रस्त्यांपासून ते आताशा पाखरसांगवी आणि वेंगुर्ल्यातही दिसणारा.

आपला इतिहास आठवण्याचं कोणतंही निमित्त असो… ह्या दृश्यानं रस्ते आणि समाजमाध्यमं भरून जातात. पण, वर्षातल्या कुठल्याही दिवशी, दिवसातल्या कोणत्याही वेळी, कोल्हापुरातल्या साने गुरुजी वसाहतीमधल्या एका टुमदार घरात, पहिल्या माळ्यावर पुस्तकांच्या गराड्यात आपल्या खुर्चीत पांढरा सदरा-पायजमा घातलेले, डोळ्याला मोठा चष्मा लावलेले आणि हातात सतत पेन किंवा पुस्तक घेतलेले, पहाडासारख्या दणकट शरीराचे, थेट आणि खोल बघणार्‍या पण माणूसभरल्या नजरेचे, माझ्या आजोबांसारखे गोड हसणारे पण इतिहासाला सत्याच्या तराजूत तोलताना कसलाही मुलाहिजा न बाळगणारे डॉ. जयसिंगराव पवार एखाद्या समुद्री नांगरासारखे घट्ट बसून होते, कालपर्यंत!

महाराष्ट्रात कुठेही काही वावगं घडताना सध्याच्या काळातला राजकीय, सांस्कृतिक आणि सामाजिक र्‍हास बघताना का कोणास ठाऊक, पण सतत एक वाटायचं, एक दिवस असह्य होऊन पवार सर ह्या सर्वांना दरडावतील, ‘हेच शिकलात काय रे छत्रपतींकडून?’ असा सज्जड सवाल करतील आणि मग शाळेतली आगाऊ मुलं जशी प्राचार्यांनी कान धरल्यावर सुतासारखी सरळ येतात, तसे आपण सर्व मराठीजन सरळ येऊ!
आता असे होण्याची अपेक्षा सुद्धा संपली. पोटात खोल खड्डा पडलाय.

डॉ. जयसिंगराव पवारांचं जाणं हे फक्त एका इतिहासकाराचं जाणं नाहीये, तर वर्तमान आपल्या घट्ट मुठीत धरू शकणार्‍या महाराष्ट्रधर्माच्या कर्त्या आणि खमक्या पुरुषाचं जाणं आहे. आता वर्तमान आपल्या हातातून संपूर्णपणे निसटून जाईल आणि मग कदाचित आपला भूतकाळसुद्धा! भयंकराची चाहूल लागल्यासारखं झालंय.

सरांचं जाणं हे माझं व्यक्तिगत नुकसान आहे… हे छापील वाक्य नाहीये. सध्या छापलेल्या शब्दांवर सुद्धा विश्वास न ठेवण्याचे दिवस असताना पोटातला हा खड्डा माझा मलाच जाणवतोय. त्याचं वर्णन तरी कसं करणार? असो.

प्रसिद्ध इतिहासकार रामचंद्र गुहा एका पुस्तकात म्हणतात की, भारताचा इतिहास म्हणजे केवळ १५ ऑगस्ट १९४७ पर्यंतचा इतिहास अशी आपली सार्वजनिक समज आहे. तसंच मराठ्यांचा इतिहास म्हणजे शिवाजी महाराज आणि त्यानंतर संभाजी महाराज एवढाच आपला समज होता. त्यानंतरचा स्वाभिमानानं भरलेला आणि उत्तुंग व्यक्तिमत्त्वांनी भारलेला इतिहास आपल्यासमोर मांडला तो पवार सरांनी. माझी सरांची डिसेंबर महिन्यात मोकळी-ढाकळी, खूप गप्पांनी भरून गेलेली शेवटची भेट झाली. त्या भेटीत सरांनी एक प्रश्न विचारला, ‘अहो, इंग्रजांचं ठीक होतं, ते बाहेरून आलेले, कधी ना कधी जाणारच ह्या विश्वासावर आपण लढलो… पण आत्ताचं काय? तुम्ही कशाच्या विश्वासावर लढताय?’ मी म्हणालो, ‘सर, तुम्ही आहात, ह्या विश्वासावर.’ फक्त हसले.

मग उठले, शेजारच्या कपाटातून एक पुस्तक काढलं आणि माझ्या हातात देत म्हणाले, ‘ह्यातून बळ घ्या, अतिप्रचंड शत्रूशी झुंजण्याचा आपला इतिहास आहे, तो विसरू नका.’

ते पुस्तक होतं ‘मोगलमर्दिनी ताराराणी’.
८५ वर्षांचा ज्येष्ठ इतिहासकार ३८ वर्षांच्या आणि यथा-तथा समज असलेल्या माझ्यासारख्या मुलाला २०२५ साली लोकशाही आणि संविधानासाठी लढा द्यायला प्रेरणा मिळावी म्हणून १७व्या शतकात होऊन गेलेल्या एका महान लढवय्या स्त्रीची गोष्ट हातात देतात आणि म्हणतात, ‘ह्यातून प्रेरणा घ्या.’

वरचं वाक्य परत वाचा… पुरोगामी महाराष्ट्राची साक्ष देणारा प्रत्येक शब्द. आज महाराष्ट्राच्या राजकारणात-समाजकारणात जो बीभत्स प्रकार सुरू आहे, महिला आयोग नावाची थट्टा हतबलतेनं आपण पाहत आहोत, तेव्हा आम्हा मराठ्यांच्या महाराणीचा इतिहास खणून काढणारे, तो आमच्या हातात देणारे आणि अभिमानानं ‘ताराराणी’चा वारसा सांगणारे सर गेले… इतिहासाला वर्तमानाशी जोडणारा हा ह्या मातीतला कदाचित शेवटचा ऋषी!

आज आपण सगळेच गळे काढतो की ‘महाराष्ट्राचं हे काय झालं?’

हा शाहू-फुले-आंबेडकरांचा देश ना?

त्यावेळी ज्या छत्रपती शाहू महाराजांची आठवण काढून आपण थोडासा तरी हुरूप आणि आशावाद मनात बाळगतो, ते शाहू आपल्याला पवार सरांनी दिले… शाहू महाराजांचं चरित्र हे डॉ. जयसिंगराव पवार सरांच्या आयुष्याचं सार आहे.
आता सरांविषयी एवढी प्राथमिक माहिती सुद्धा नसलेला वाचक समोर नाहीये हे गृहीत धरून मी सर कोण होते ह्या पेक्षा ते कसे होते हे सांगणारे काही प्रसंग लिहितोय :

प्रसंग एक : सरांच्या अभ्यासाच्या खोलीत आम्ही बसलोय, शाहू महाराजांच्या चरित्रपटाच्या संहितेचं वाचन सुरू आहे. त्यात एका गोड, हृद्य प्रसंगी एक संवाद महाराजांच्या तोंडी येतो… ‘काय गं अक्का? काय करतेयस?’ सर चमकून वर बघतात, ‘थांबा… महाराज अक्का साहेबांचा असा एकेरी उल्लेख करणार नाहीत, ते त्यांना अक्कासाहेबच म्हणायचे… ते वाक्य दुरुस्त करा.’ आम्ही मग सिनेमॅटिक लिबर्टी वगैरे कारणं द्यायचा आणि त्यांना पटवायचा प्रयत्न केला, पण सर ठाम होते… ‘जे महाराज बोलूच शकत नाहीत ते त्यांच्या तोंडी घालायची चूक आपण करता कामा नये, बदला ते वाक्य!’

‘प्रेक्षकांची आवड’ ह्या एका कारणासाठी वर्तमानातील तथ्यांशी सुद्धा तडजोड करायचे हे दिवस, पण सरांना इतिहासातील एका वाक्याचीसुद्धा तडजोड मान्य नव्हती. त्यांनी ती कधीच केली नाही. त्यांनी लिहिलेला इतिहास नाट्यमय भाषेने उतू जाणारा भावनिक ऐवज नव्हता, ते खणखणीत पुराव्यावर आधारित शंभर नंबरी सोनं आहे. ह्या बाबतीत सरांनी ना कुठली तडजोड केली ना कोणाचा मुलाहिजा ठेवला.

प्रसंग दोन : शाहू महाराजांविषयीचे किस्से हा तर आमच्या बोलण्याचा आत्मा होता… असे किती प्रसंग सरांच्या तोंडून ऐकण्याचं भाग्य मला लाभलं. असाच एक प्रसंग सांगताना सर म्हणाले, ‘…आणि मग शिक्षा म्हणून महाराजांनी त्या शिपायाला सर्वांच्या मागे अनवाणी चालत यायला लावलं, खूप अंतर जंगलात त्याला तसं चालवलं.’ हे सांगताना त्यांच्या डोळ्यात महाराजांचा करारीपणा दिसत होता. पुढे त्याच प्रसंगात सर सांगू लागले, ‘मुक्कामी पोचल्यावर महाराज त्या शिपायापाशी गेले आणि त्याच्या पायाच्या सोलवटलेल्या तळव्यांना स्वतःच्या हाताने तेल लावू लागले…’हे सांगताना सरांना गहिवरून आलं होतं. सांगता-सांगता एकदम शांत झाले.असं वाटत होतं जणू ते त्या तंबूत बसून महाराजांना एका शिपायाच्या पायाला औषध लावताना पाहतायत. आम्ही सरांना पाहत होतो. महाराष्ट्राने आणि देशाने शाहू छत्रपती पाहिले ते सरांच्या नजरेतून, त्यांच्या चिकाटीनं केलेल्या अभ्यासातून आणि ‘वेड’ म्हणता येईल अशा ध्यासातून. हा देश ह्या एका गोष्टीसाठी सरांचा कायम ऋणी असायलाच हवा.

प्रसंग तीन : २०२५, डिसेंबर महिन्याची रात्र… कोल्हापुरात बाहेर गार होतं, गप्पा सुरू होत्या. अचानक सरांनी विचारलं, ‘सोनम वांगचुकचं काय झालं ?’ मी काय उत्तर देणार, मला माहिती असलेले त्या (मुळातच नसलेल्या) खटल्याचे तपशील मी दिले. एक मोठ्ठा पॉज घेऊन म्हणाले… ‘हे असं कुठपर्यंत लढणार तुम्ही?’ त्यांच्या चेहर्‍यावर खिन्न भाव होते.

मी म्हणालो, ‘तुम्ही शिकवलंय आम्हाला सर, लढत राहू…’ खिन्न-गोड हसले.

मग एकदम विषय बदलत इतिहासात शिरले, ‘राजाराम महाराज सुटले नेमके, पण कबिला मिळाला, त्याचाच औरंगजेबाला आनंद…’ ‘तुम्हाला सांगतो संभाजी महाराजांची मुलगी…’ असे काही-बाही प्रसंग. वरवर नुसते गप्पांमधले किस्से वाटणारे, पण नंतर रात्री झोपताना एकदम चमकून गेलं की त्या प्रत्येक किश्शामागे, ते सांगण्यामागे काही एक प्रयोजन होतं. माझ्या बालबुद्धीला ते तेव्हा कळलं नाही, आता लख्ख कळतंय. इतिहास आणि वर्तमानाच्या सीमारेषा खोडून काढणारे सर गेले. आता वर्तमान, इतिहास आणि भविष्य कोणाच्या हातात सुरक्षित राहील… नाही माहिती!

आजही तुम्ही कोल्हापूरच्या नव्या राजवाड्यातल्या संग्रहालयात गेलात तर आत शिरल्या शिरल्या पहिली वस्तू दिसते, ते म्हणजे सरांनी लिहिलेलं शाहू छत्रपतींचं चरित्र. आताच्या शाहू महाराजांनी सरांच्या कामाचा केलेला तो यथोचित सन्मान आहे. छत्रपती शाहूंसारख्या आभाळाएवढ्या माणसाला अभ्यासातून आणि लिखाणातून जिवंत करणारा माणूस आज आपल्याला सोडून गेलाय. साधारण असं पहाडाएवढं काम करणारी मोठी माणसं आपल्याला सोडून गेली तर एक पोकळी जाणवतेच, पण सरांच्या अशा अचानक जाण्याने फक्त पोकळीच नाही तर फार मोठं नुकसान झालंय. सर ‘शिवचरित्र’ लिहीत होते. आज शिवछत्रपतींना देवळात बसवून त्यांच्या नावाने राजकीय धंदा मांडलेला असताना सरांच्या नजरेतून आणि लेखणीतून उतरलेला आपला शिवबा राजा ही आपली समाज म्हणून फार मोठी गरज होती. पन्नाशीत सुखाने रिटायर होण्यासाठी आत्तापासून गुंतवणूक करणार्‍या आमच्या ह्या पिढीला ८५ व्या वर्षी कुळवाडी कुलभूषण शिवाजी महाराजांचं चरित्र लिहिण्याचा ध्यास घेतलेला हा माणूस कसा समजवायचा? सर शेवटच्या काही दिवसांत आयसीयूमध्ये असताना सुद्धा इतर कोणत्याही प्रश्नापेक्षा ठाम आणि पटकन उत्तर ‘शिवचरित्राचं काय?’ ह्या प्रश्नाला अंगठा दाखवून उत्तर द्यायचे.

इतिहासाला जिवंत करणारा हा विद्वान इतिहासकार आता इतिहासाचा भाग झाला, ते सुद्धा इतिहासावर काम करत-करतच. सरांचं अर्धवट राहिलेलं शिवचरित्र हा आपल्या ह्या वर्तमानकाळात अर्धा उभा राहिलेल्या बुरुजासारखा आहे. उरलेली जागा आम्ही कशाने भरून काढायची, सर? आम्ही उघडे पडलोय.

बर्‍याच वर्षांपूर्वी माझे आजोबा गेले तेव्हा असा सुन्न झालो होतो, अर्थात तेव्हाच्या भावना त्या वयानुसार (अकरावीत होतो मी) होत्या, फक्त भावना होत्या. आजही मी ‘त्यांना’ विसरू शकलो नाहीये. पण आज फक्त भावना नाहीयेत…वयाने बर्‍यापैकी मोठा झालोय, भावनांसोबतच विचारसुद्धा करता येतोय आणि त्याच विचाराने बधिर झालोय. आता माझ्या कामावर, लिखाणावर, भाषणांवर ‘लक्ष’ ठेवून कोण असणार?
माझी काल कोल्हापुरात जायची इच्छा आणि हिम्मत दोन्ही झाली नाही.

सरांचं ‘अंत्यदर्शन’ मला मान्यच नाही. जोपर्यंत विचारात ‘शिव-शाहू’ आहेत, तोपर्यंत ते सरांचंच दर्शन असेल, अगदी माझे डोळे मिटेपर्यंत.
काही दिवसांनी जाईन, पहिल्या माळ्यावरच्या त्या खोलीत, जिथे इतिहास जिवंत व्हायचा. त्या रिकाम्या खुर्चीकडे ती सगळी पुस्तकं, नोंदी, पेन, पेपरवेट भांबावून जाऊन बघत असतील. त्यांच्यात जाऊन बसेन. कदाचित आमचा अखेरचा असा हा देदीप्यमान इतिहास इथेच लिहिला गेला म्हणून. येणार्‍या पिढ्यांना ‘अशा’ ताठ खुर्च्या, असे माळे, अशी कपाटं आणि असे रुंद हसणारे पांढरे शुभ्र ‘सर’ लाभणार नाहीतच. आम्ही नशीबवान!

माझा स्वर्ग-नरकावर विश्वास नाही. माणसाच्या श्वासाबरोबर सगळं संपतं, ह्यावर माझा ठाम विश्वास आहे. पण सर..? त्यांच्या सारखी माणसं श्वासावर जगत नसतातच मुळी, ध्यासावर जगतात. त्याच्या कणभर तरी ध्यास आम्हाला मिळो.

मी गोष्टी सांगणारा माणूस आहे. असंच एक दृश्य डोळ्यांसमोर येतंय…

सर ‘त्या-तिथे पलीकडे’ गेलेत, कोणालातरी ‘पेन-पेपर कुठे मिळेल’ असं विचारतायत आणि तेवढ्यात त्यांच्या पाठीत डोंगराएवढ्या मोठ्ठ्या शाहू छत्रपतींनी थाप मारली आहे, ‘आलास ? चल, तुला आणखी काही गम्मत सांगतो…’ सर त्यांच्याकडे बघतायत, हळूच दोन्ही हात जमिनीकडे नेऊन, कमरेत हलकेच वाकून मुजरा करतायत…

…इतिहास अखंड सुरू राहतोय, आपल्याला सुद्धा कवेत घ्यायची वाट बघत.
माझ्या मते, डॉ. जयसिंगराव पवार हे आम्ही ‘जय-जय’ करत मोठं झालेल्या महाराष्ट्राचं व्यक्तिरूप होतं, शांत, संयमी, करारी, खर्‍या अर्थाने पुरोगामी, खंबीर, अभ्यासू… प्रसंगी दिग्गजांनाही खडसावून विचारणारा महाराष्ट्र! आपण शिवछत्रपती, ताराराणी आणि शाहू छत्रपतींकडून नक्की काय शिकायचंय? ह्याचं पक्कं भान असणारा.

ह्या अशा महाराष्ट्राचं दर्शन मला आणि माझ्या पिढीला झालं… पण पुढच्यांच काय? ह्या विचारानं बधिर झालोय.
माझ्या मुलीला कसा महाराष्ट्र दिसेल? ह्या राज्याचं Personification करेल असं कोण आहे?
उत्तर आशादायी नाहीये.
कॉ. गोविंद पानसरे, डॉ. नरेंद्र दाभोळकर आणि आता डॉ. जयसिंगराव पवार… ढासळणार्‍या गढीचे हे बुरुज, गढीच्या आत अनेकांना अजून कल्पना नाहीये, उत्तरेकडून आलेला तोफेचा लालबुंद गोळा अडवायला आपल्याकडे फार कमी तटबंदी उरली आहे. सावध असा. काळ भयंकर आहे, रस्ता दाखवणारे दिवे विझत चाल्लेत. ह्या जाडजूड पुस्तकांना घट्ट धरून राहायला हवंय, तरच आपण ह्या भयकारी वादळात तगून राहू कदाचित. The Ones Who Are Controlling our Present, will Sadly control our Past.
‘मोगल-मर्दिनी ताराराणी’ हे पुस्तक हातात घेतलं, आठवण म्हणून मंजुश्री ताईंनी फोटो काढला, मी खाली वाकून सरांच्या पायांना हात लावला. सर नेहमीप्रमाणे म्हणाले… ‘औक्षवंत व्हा!’

आता सरांशिवाय उरलेल्या ह्या महाराष्ट्रात ‘औक्षवंत’ होणं हा खरोखर आशीर्वाद ठरावा ह्यासाठी आपल्यालाच काम करायचंय. दोन्ही हात लावून स्पर्श करावेत असे पाय उरले नाहीयेत. ‘बरबटलेल्या’ महाराष्ट्राला आणि ‘भेदरलेल्या’ देशाला तुमची गरज होती, सर. ‘आम्हाला’ तुमची गरज होती. काम करत राहू असा तुम्हाला शब्द दिलाय… डोळे पुसून, ‘पेन-पेपर’ घेऊन बसलोय… जमेल तशी गढी सांभाळू.
तुमचा,
-वरुण

Previous Post

बेरोजगारांसाठी शिवसेनेचा जागर!

Next Post

बाबा

Next Post
बाबा

बाबा

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.