
धर्माचे पालन।
करणे पाखंड खंडण ।।१ ।।
हे चि आम्हा करणे काम।
बीज वाढवावे नाम ।।२ ।।
तीक्ष्ण उत्तरे।
हाती घेऊनि बाण फिरे ।।३ ।।
नाही भीड भार।
तुका म्हणे सानथोर ।।४ ।।
वारकरी संतांच्या जीवितकार्याची एक महत्त्वाची प्रेरणा धर्माच्या रक्षणाची होती. अर्थात आजच्या तथाकथित धर्मरक्षकांच्या कार्यात आणि संतांच्या कार्यात मूलभूत फरक आहे. संतांना अभिप्रेत असलेला धर्म अत्यंत व्यापक आहे. संतांची धर्माची व्याख्याच निराळी आहे. ज्ञानोबाराय म्हणतात– ‘एथ वडील जे जे करिती। तया नाम धर्मु ठेविती। येर ते अनुष्ठिती। सामान्य सकळ।।’ या ओवीतून ज्ञानोबारायांनी खरा धर्म सांगितला आहे. वाडवडिलांचं आचरण म्हणजे धर्म. इथे वडील म्हणजे आपले श्रेष्ठ आणि आदर्श असे पूर्वज होत. हे पूर्वज अर्थातच वारकरी संत आहेत. या संतांचं जीवन म्हणजेच धर्म आहे. तुकोबाराय सांगतात.
धर्म रक्षावयासाठी।
करणे आटी आम्हासी ।।१ ।।
वाचा बोलो वेदनिती।
करु संती केले ते ।।२ ।।
धर्मरक्षण म्हणजे संतांप्रमाणे आचरण करणं. वास्तविक पाहता धर्माचरणासाठी त्या त्या धर्माचे स्वतंत्र धर्मग्रंथ आहेत. त्यात आचारधर्म सांगितलेला असतो. पण आपल्या धर्माच्या बाबतीत वेद हा जो धर्मग्रंथ आहे तो कृपण निघाला. त्याचा अधिकार केवळ मूठभर उच्चवर्णीय पुरुषांना दिला गेलेला आहे. साहजिकच शूद्रातिशूद्रांना धर्माची शिकवण मिळण्याचा कोणताच मार्ग शिल्लक नव्हता. त्यामुळे संतांनी वेदप्रामाण्याला औपचारिक मान्यता देत आचरणाच्या बाबतीत संतांचा आदर्श समोर ठेवला. धर्माला मिळालेलं मूर्त रुप म्हणजे संतांचा जीवनादर्श.
संतांनी समाजासमोर पहिला आदर्श निर्माण केला सामाजिक समतेचा. त्यासाठी नामदेवराय आणि एकनाथ महाराजांचं उदाहरण देता येईल. नामदेवांनी चोखोबांची समाधी पंढरपूरच्या मंदिराच्या महाद्वारासमोर बांधली. दलितांना ज्या काळात गावोगावी वेगळी स्मशानभूमी होती त्या काळात एका अस्पृश्य मानल्या गेलेल्या जातीत जन्मलेल्या संतांची समाधी गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी बांधणं ही अत्यंत क्रांतिकारक गोष्ट होती. त्याचबरोबर एकनाथांनीही राणू नामक दलित भक्ताच्या घरी जेवण केलं. त्यातून आंतरजातीय सहभोजनाचा आदर्श निर्माण केला. संतांनी आचरणातून सामाजिक समता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केल्यामुळे समाज एकसंघ झाला. समाजात धर्मभावना जिवंत ठेवण्यात संतांना यश मिळालं.
संतांच्या काळात इस्लामचं आगमन झालं होतं. अनेकांनी धर्मांतर केलं. पुढच्या काळात ख्रिश्चन धर्म आला. मिशनरी लोकांनीही मोठ्या प्रमाणात धर्मांतर घडवून आणलं. इस्लाम आणि ख्रिश्चन धर्मात प्रामुख्याने तीन कारणांसाठी धर्मांतर झालं. पहिलं कारण म्हणजे नव्या धर्माविषयी असलेलं आकर्षण, दुसरं कारण म्हणजे स्वार्थासाठी केलेलं धर्मांतर आणि तिसरं म्हणजे या धर्मात सुरुवातीच्या काळात जातिभेद नसणं. पहिल्या आणि दुसर्या कारणामुळे विशेषत्वाने उच्चवर्णीयांनी धर्मांतर केलं तर तिसर्या कारणामुळे शूद्रातिशूद्रांनी धर्मांतर केलं. या धर्मांतराला काही प्रमाणात आळा बसला असेल तर तो वारकरी संप्रदायामुळे. धर्मांतराचा जो प्रश्न हिंदू समाजाला ग्रासत आला आहे त्याचं मूळ ‘धर्मांतर’ या शब्दातच आहे. धर्म आणि माणूस यातील अंतर जेव्हा वाढत जातं तेव्हा धर्मांतर घडतं. हिंदूंच्या धर्मात आणि माणसात अंतर निर्माण करणारी महत्त्वाची बाब म्हणजे जातिविषमता. याविषयी बाबा महाराज सातारकर यांच्या भगिनी कौसल्या माई गोरे – सातारकर यांनी बाबा महाराजांच्या चरित्रात ‘धर्मांतर आणि भागवत धर्म’ असा लेख लिहिला आहे. त्यातील काही महत्त्वाचे मुद्दे
१. धर्मांतर शब्दाची फोड केली असता धर्मांतर या समस्येची उकल होते. धर्म जेव्हा माणसांमध्ये अंतर ठेवून चालतो, तेव्हाच धर्मांतर होते. खरा धर्म तो की, जो सर्वांना समान पातळीवर घेऊन चालतो.
२. भागवत धर्म अंतर्भूत असा जो वारकरी संप्रदाय, त्याच्या परंपरेमध्ये, ब्राह्मणांपासून अतिशूद्रांपर्यंत प्रत्येक समाजात व जातीजमातीत महान भगवतभक्त निर्माण झाले. याला कारण संतांची श्रेष्ठतम समदृष्टीच होय. ती समाजाच्या आचरणात येत नाही, तोपर्यंत धर्मांतर हे होणारच.
३. उपेक्षित समाज आम्हाला कोणीतरी जवळ घेईल, याची कित्येक वर्षे वाट पाहत आहे. त्याला कोणी जवळ केले असेल तर ते भागवत संप्रदायातील संतांनीच. म्हणून धर्मांतर थांबवायचे असेल तर धर्मातील व माणसातील अंतर कमी करणे अत्यंत आवश्यक आहे.
४. भागवतधर्मीय संतांनी विचाराने व कृतीने धर्मातील व माणसातील अंतर कमी केले. म्हणून त्यांच्या विचारांचे व कृतीचे अनुकरण करण्यातच मानवाचे कल्याण व माणुसकीचा खरा धर्म जागृत राहणार आहे.
हीच मांडणी स्वामी विवेकानंदांंनीही केलेली आहे. विवेकानंद म्हणतात- ‘आपल्या देशात ख्रिश्चन आणि मुसलमान यांनी केलेल्या अत्याचारांमुळे झालं नाही. त्यापेक्षा जास्त धर्मांतर उच्चवर्णीयांनी केलेल्या अत्याचारांमुळे झाले आहे. ते आपले अभागी भाऊ आहेत.’ त्याचबरोबर आणखी एका पत्रात विवेकानंद म्हणतात- ‘माझ्या बंगालमध्ये एवढे हिंदू मुसलमान का झाले? तलवारीच्या जोरावर ते मुसलमान झाले, असं म्हणणं मूर्खपणाचं ठरेल. ते मुसलमान झाले, हिंदू जमीनदार आणि हिंदू ब्राह्मणांच्या जाचातून मुक्त होण्यासाठी, स्वायत्ततेसाठी.’ विवेकानंदांनी इतरही ठिकाणी याविषयी स्पष्ट मांडणी केलेली आहे.
तुकोबाराय या अभंगात धर्मपालनाची भूमिका मांडत आहेत. ते प्रस्तुत अभंगात पाखंड खंडण हा धर्मपालनाचा भाग मानत आहेत. पाखंड याचा अर्थ जे लोक त्यांच्या धर्माची चिकित्सा करतात त्यांना पाखंड मानलं जातं. मराठी विश्वकोशातल्या नोंदीनुसार पाखंड म्हणजे धर्मपरंपराविरोधी कृत्ये. त्यात धर्मग्रंथांचा अर्थ रुढ अर्थाहून वेगळा लावणं यालाही पाखंड मानलं जातं. प्रोटेस्टंट पंथाने बायबलचा असाच नवा अर्थ लावला म्हणून त्यांना त्या धर्मात पाखंड मानलं गेलं. वस्तुतः वारकरी संतांनीही धर्मचिकित्सा केलेली होती. त्यांनी वेदांचा परंपरागत अर्थ नाकारुन नवा अर्थ लावला होता. त्याची काही उदाहरणं देता येतील. वेदशास्त्र हे तोवरच्या काळात जातिविषमतेचं समर्थन करणारं शास्त्र मानलं जात होतं. तुकोबारायांनी बरोबर त्याच्या उलट अर्थ लावला. ‘यातायाती धर्म नाही विष्णुदासा। निर्णय हा ऐसा वेदशास्त्री।।’ असं तुकोबाराय म्हणतात. वेदशास्त्रात जातीविषमता नाही असा उलटापालट करणारा अर्थ लावणं त्या काळातल्या सनातन्यांना सहन झालं नाही. एकतर संतांना वेदांचा अधिकार नाही आणि त्यात परत त्यांनी रुढ अर्थाच्या विरुद्ध अर्थ लावणं त्यांना सहन होत नव्हतं. त्यामुळेच त्यांनी वारकरी संतांवर पाखंडी असण्याचे आरोप केले. त्याची नोंद जनाबाईंनी केलेली आहे. त्या म्हणतात ‘विद्येच्या अभिमाने नाईके कीर्तन। पाखंडी हे म्हणे करिती काई ।।’ वेदांती लोक विद्येच्या अभिमानाने वारकरी कीर्तन तर ऐकत नाहीतच पण त्या कीर्तनावर पाखंडीपणाचा आरोप करतात. वेदात अनेक देव आहेत. याउलट वारकरी संप्रदाय एकविध भाव मानतो. पाखंडीपणाचा आरोप सहन करा पण एकविध भाव ठेवा असं नामदेवराय म्हणतात.
केशवापरते देव आणिक आहेती।
ऐसे श्रुति स्मृती बोलती ।।
तरी ते शब्द झणी कानी हो पडती। पाखंडी म्हणती सहावे ते ।।
तुकोबारायांवरही सनातन्यांनी असाच आरोप केला असल्याचं महिपतींनी त्यांच्या चरित्रात नोंदवलं आहे. ते लिहितात
एक रामेश्वरभट ब्राह्मण।
वाघोलीत वसतसे जाण।
त्यासी चार शास्त्रांचे अध्ययन। राजमान्य असे तो ।।
त्याने तुकयाची सत्किर्ती पूर्ण।
परस्परे केली श्रवण।
ऐकोनि द्वेष उपजला मने।
म्हणे ‘पाखंड’ पूर्ण माजवले ।।
तुकोबारायांनी पूर्ण पाखंड माजवलं आहे असा रामेश्वर शास्त्रींचा आरोप होता. किंबहुना तुकोबाराय इतर कर्मकांड नाकारुन नामभक्तीचा विचार सांगतात तोही त्यांना पाखंडीच वाटत होता. त्याची ही प्रतिक्रिया महिपती सांगतात. ‘सकळ धर्म बुडवूनि निश्चित। नाममहिमा बोले अद्भूत। जनात स्थापिला भक्तिपंथ। पाखंडमत हे दिसे ।।’ मुळात अद्वैत वेदांती लोक भक्तीलाच पाखंडी मानतात. त्याला अनुसरुन रामेश्वरशास्त्रींनी तुकोबारायांवर पाखंडी मताचा आरोप केला.
याला तुकोबारायांनी जोरदार उत्तर दिलं. त्यांनी उलट अद्वैत वेदांतीच खरे पाखंडी आहेत असं सांगायला सुरुवात केली. आज अश्लील वाटावी अशा आक्रमक भाषेत तुकोबाराय या अद्वैत वेदांती पंडितांवर तुटून पडले. तुकोबाराय हे पूर्वकाळात सावकारी करत होते. त्यांनी सावकारीची कर्जखते इंद्रायणीत बुडवून टाकली. त्यांनी पैशांच्या कर्जाची वसुली केली नाही पण तोवर वारकर्यांवर जे आरोप झाले होते त्याची मात्र त्यांनी वसुली केली. किंबहुना या अद्वैत वेदांती पंडितांना तीक्ष्ण वाग्बाणाने घायाळ करुन सोडणं हा तुकोबारायांना त्यांच्या धर्मपालनाचा अविभाज्य भाग वाटला.
अद्वैत वेदांती ब्रह्मज्ञानावर भर देतात. त्यांच्या मते वेदोपनिषदातील ज्ञान हेच खरे ब्रह्मज्ञान. त्या ज्ञानानेच मोक्ष मिळतो. या ज्ञानासाठी वेदाध्ययन, वेदाध्ययनासाठी मुंज आणि मुंजीसाठी उच्चवर्णीय पुरुष असणं आवश्यक आहे. पर्यायाने मोक्षाचा अधिकार फक्त उच्चवर्णीय पुरुषांनाच आहे. ब्रह्मज्ञानाने जीवनमुक्त स्थिती प्राप्त होते आणि तोच त्याचा मोक्ष असतो. मग कर्माचा त्याग गरजेचा ठरतो. तुकोबाराय अशा कर्मत्यागी वेदांत्याची कठोर निर्भत्सना करतात. ‘धर्म रक्षावयासाठी।’ या त्यांच्या अभंगात ‘न बाणता स्थिती अंगी। कर्म त्यागी लंड तो।।’ असं तुकोबाराय म्हणतात. ‘भोगे घडे त्याग। त्यागे अंगा येती भोग ।।१ ।। ऐसे उरफाटे वर्म। धर्माअंगीच अधर्म ।।२ ।।‘ तुकोबाराय म्हणतात जे जीवनमुक्तीनंतर त्याग करतात त्यांच्याकडून खरा त्याग घडत नाही. उलट त्यागाने भोगाची लालसा निर्माण होते. त्याऐवजी विधिपूर्वक भोग घेतल्यास त्यागाची भावना निर्माण होते. हा असा उरफाटा मामला आहे. जे धर्मरक्षणाचा दावा करतात तेच अधर्मी असतात असं तुकोबारायांना म्हणायचं आहे. त्या काळात वेदप्रामाण्य न मानणारा अधर्मी आणि पाखंडी मानला जायचा. तुकोबारायांनी मात्र वेदांतीच खरा पाखंडी आणि अधर्मी आहे हे दाखवून दिलं. वेदांती लोकांना भक्तिपंथ पाखंडी वाटतात. त्यामुळेच रामेश्वरशास्त्रींनी तुकोबांना ‘जनात स्थापिला भक्तिपंथ। पाखंडमत हे दिसे ।।’ असं म्हटलेलं आहे. भक्तीत अधिकारभेद नाही. भक्ती सर्वांसाठी खुली आहे. त्यामुळेच वेदांती मंडळी भक्तिपंथीयांना पाखंडी म्हणत होती. अत्रीस्मृतीत तर भक्तीपंथीयांची निंदा करणारा एक श्लोक आहे. त्यांच्या मते ‘जो वेद अध्ययन करु शकत नाही तो शास्त्र शिकतो, जो शास्त्र शिकू शकत नाही तो पुराण शिकतो, जो पुराणही शिकू शकत नाही तो शेती करतो आणि जो सर्व प्रकारे भ्रष्ट होतो तो भागवत भक्ती करतो’
वेदैर्विहीनाश्च पठन्ति शास्त्रं शास्त्रेण हीनाश्च पुराणपाठा:।
पुराणहिना: कृषिणो भवन्ति भ्रष्टास्ततो भागवता भवन्ति ।।
भागवतधर्मीय लोक भक्तीला महत्त्व देतात म्हणून स्मृतीकार वेदांती पंडित त्यांना भ्रष्ट, पाखंडी मानतात. याऊलट तुकोबाराय वेदांती लोकांना पाखंडी म्हणतात.
वाखाणी अद्वैत भक्तिभावेवीण।
दुःख पावे सीण श्रोता वक्ता ।।
अहंब्रह्म म्हणोनी पाळितसे पिंडा।
न बोलावे भांडा तयासवे ।।
वेदबाह्य लंड बोले जो पाखंड।
काळे त्याचे तोंड संतांमध्ये ।।
या अभंगात तुकोबाराय अहंब्रह्मास्मी म्हणून भक्तीभावाला महत्त्व न देता अद्वैत वेदांतावर प्रवचन देणार्या पंडिताला ‘वेदबाह्य पाखंड’ म्हणत आहेत. या संपूर्ण अभंगाचा रोख वेदप्रामाण्य न मानणार्या पंडितांवर नसून अद्वैत वेदांती पंडितावर आहे. या अभंगांवरुन निरुपणाच्या प्रस्तुत अभंगातल्या पाखंडी शब्दाचा खरा अर्थ लागतो. या अभंगातला पाखंडी शब्दही वेदांती मंडळींना लक्षूनच आहे. इतर चरणांतूनही ते दिसून येतं. कसं ते पुढच्या भागात पाहू.

