
प्रिय योगेश सोमण जी
सस्नेह नमस्कार!
महाराष्ट्र साहित्य परिषद पुण्याच्या पार पडलेल्या पंचवार्षिक निवडणुकीत आपण सारे निवडून आला आहात, त्याबद्दल लोकशाही मानणारा एक नागरिक म्हणून आपल्या सर्वांचे मी जाहीर अभिनंदन करतो. पण तरीही एक प्रश्न तुम्हाला विचारावासा वाटतो. हा विजय नेमका कोणाचा?
आपल्या विजयानंतर भाजप नेते राजेश पांडे व विनोद तावडे यांच्या अभिनंदनाच्या फेसबुक पोस्ट वाचल्या. त्यामुळे खुद्द ज्यांना हा साहित्य व्यवहार फारसा माहिती नाही किंवा जे याबाबत अनभिज्ञ आहेत, त्यांना असं वाटेल की, विधानसभा, महानगर पालिका किंवा जिल्हा परिषद मध्ये जसा भाजपचा विजय या वर्ष दोन वर्षांत झाला, तसाच हा भाजपचा दैदीपयमान विजय महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीत झाला व आणखी एक विजयचा तुरा भाजपच्या शिरपेचात रोवला गेला आहे असे वाटेल.
कारण राजेश पांडे यांनी त्यांच्या व्हायरल झालेल्या फेसबुक पोस्टमध्ये या विजयाचे सारे श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रकांत पाटील आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना दिले आहे. राजेश पांडे यांची ही पोस्ट वाचताना असे मला जाणवत होते की, या मसाप निवडणुकीची सारी सूत्रे व नेतृत्व त्यांच्याकडे पक्षाने सोपवले आहे. आणि त्याला तुम्हा सर्वांची संमती होती असे दिसते. त्याला पुष्टी विनोद तावडे यांची फेसबुक पोस्ट देते. तावडे लिहितात की,
‘या विजयासाठी राजेश पांडे यांनी घेतलेले परिश्रम व कुशल नियोजनही अतिशय कौतुकास्पद आहे. ‘ भारतीय राजकारणाकडे गंभीरपणे पाहणारा व वेळोवेळी त्यावर लिहिणारा एक लेखक म्हणून, माजी संमेलनध्यक्ष म्हणून व माजी प्रशासक म्हणूनही जे समजले व बिट्वीन द लाईन्स वाचल्यावर व त्यांचा अर्थ लावल्यावर (चूकभूल द्यावी घ्यावी) जे उमगले ते असे की, भाजपने आपले असंख्य निष्ठावान कार्यकर्ते कामास लागले होते व ते मतदार सभासदांशी वैयक्तिक संपर्क साधत होते. वृतपत्रीय बातम्या आणि कानावर आलेल्या चर्चा जर खर्या असतील तर ते मतपत्रिकाही गोळा करीत होते. पराभूत झालेल्या उत्कर्ष आघाडीने पण मतपत्रिका गोळा केल्या हेही सत्यच. पण त्यांचा राजेश पांडेच्या कुशल नेतृत्व व उपलब्ध मनुष्यबळ (इददू ेदत््ग्ीे) यांच्यापुढे निभाव लागणार नव्हता. ते तुमच्याविरुद्ध प्रचार करताना त्यांनी केलेली कामे सांगत होते – आम्ही परिषदेच्या वास्तूचा कायापालट केला. मसापच्या मासिकातील निवडक लेखाचा महत्त्वपूर्ण ग्रंथ संपादित व प्रकाशित केला वगैरे वगैरे. अशाने मतदार भुलत नाहीत हे आता त्यांना कळले असेल.
योगेश सोमणजी, तुम्ही एक प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक व लेखक आहात. प्रदीप निफाडकर हे उत्तम कवी व उर्दूचे महाराट्रातले एक अत्यंत अभ्यासू माजी पत्रकार आहेत. सुनील महाजन, प्रसाद मिरासदार हेही सांस्कृतिक व साहित्य क्षेत्रात काम करणारे आहेत. असं असताना तुमची टीम मतदारांशी संपर्क साधण्यासाठी हिंडली असती तर कदाचित तुम्हाला असेच यश मिळाले नसते का? मग तुम्ही तसा लोकशाहीवादी मार्ग न स्वीकारता का राजेश पांडे यांच्याकडे प्रचाराची सारी का सूत्रे दिली असा मला प्रश्न पडला आहे.
राजेश पांडे यांनी त्यांचे साहित्यप्रेम पुणे पुस्तक महोत्सवाच्या यशस्वी आयोजनातून दाखवून दिले आहे. त्यांनी व्यक्तिगत तुमच्यासाठी चार मते मागितली असती तर माझी काय पण कुणाचीही काही हरकत असण्याचे काही कारण नव्हते. पण त्यांनी साहित्यप्रेमी म्हणून तुमच्या आघाडीचा प्रचार न करता भाजपच्या वतीने कार्यकर्ते कामास लाऊन प्रचार केला. हे तेही अमान्य करणार नाहीत.
म्हणून पुन्हा तोच प्रश्न! हा विजय तुमच्या साहित्य संवर्धन आघाडीचा आम्ही मानायचा का? की तुमच्या विजयाचे श्रेय राजेश पांडे यांचे व भाजपचे – त्यांनी स्वतः फेसबुकवर लिहिल्याप्रमाणे? विविध वृतपत्रात आलेल्या बातम्या व पत्रकारांनी केलेले विश्लेषण तेच सूचित करीत नाही का? निवडणूक प्रचाराच्या काळात जळगाव येथील एका झूम मिटिंगची व्हायरल झालेली एक क्लिप मी पहिली. त्यात पांडे काय बोलले होते, हे तुम्हाला माहिती आहे ना? ही क्लिप खोटी किंवा एआय जनरेटेड होती असे पांडे म्हणाले नाही.हे खरे ना?
योगेशजी, तुम्ही एक उत्तम कलाकार आहात. तुमचे तुमचे नाट्यकर्तृत्व ही माहिती आहे. अनेक मतदार सेलिब्रेटीजना सहज निवडून देतात, मग तुमचा आपल्या कलावंतीय कर्तृत्वावर विश्वास नव्हता का? मिलिंद जोशी व त्यांच्या टीमने असा घाऊक राजकीय सहारा घेतला नाही, हे तुम्हालाही मान्य असेलच. यामुळे काय झालं? तुमचा विजय हा तुमचा न होता तो भाजपचा झाला व तुम्ही त्यांच्या विचारधारेचे आहात असा तुमच्यावर शिक्का बसला. तो तुम्हाला मान्य असेल तर मग मी बापडा काय बोलणार?
आता पुढला प्रश्न!

तुम्ही व तुमची टीम स्वतःचे निर्णय स्वतः घेणारे की त्यांच्या कलाने कारभार करणार? हा प्रश्न मला व माझ्यासारख्या मसाप या मातृसंस्था मानीत तिच्या हिताची काळजी करणार्या लोकांना आणि मतदारांनाही पडला आहे.तिचे प्रेम व ममत्व आहे; त्यामुळे तिच्या भवितव्याची काळजी वाटते.
योगेश जी,आमचा तुम्हाला एक सवाल आहे- मसापची साहित्य संस्था म्हणून तिची स्वायत्तता टिकणार आहे की की…? (अर्धवट सोडलेले वाक्य तुम्ही पूर्ण करुन घ्या).आता तुम्हाला तुमच्या स्वतंत्र कामातून तुमच्या स्वतःवर आणि तुमच्या टीमवर बसलेला राजकीय शिक्का पुसून काढायचा आहे! हे आव्हान तुम्ही पेलणार का हे येता काळ सांगेल. आम्ही वाट पाहू.
शेवटी एकच म्हण सांगतो. म्हातारी मेल्याचे दुःख नाही, पण काळ सोकावता काम नये. तुमच्या लक्षात मला काय म्हणायचे आहे ते लक्षात आले असेलच.
शंभरावे साहित्य संमेलन आता तुमच्या अध्यक्षतेखाली पुण्यात होईल. ते भव्य होईल यात शंका नाही. राजेश पांडे तुमच्या सोबत असतील काय अशक्य आहे? पण ते स्वायत्त असेल का? दर्जेदार साहित्यिक असेल का? मी नकारार्थी विचार करीत नाही, पण मनात हे प्रश्न येतात, ते तुम्हाला प्रांजळपणे सांगत आहे!
अलीकडच्या काळात धाराशिवचे साहित्य संमेलन खरे स्वायत्त होते, त्याची माहिती घेऊन पुण्याचे १०० वे साहित्य संमेलन यांचे जनक असलेले न्या. रानडे व त्यांना साथ देणार्या टिळक व केळकर या महापुरुषांच्या स्वतंत्र बाण्याला साजेसे व्हावे अशी अपेक्षा मी केली तर हे लई मागणे नाही ना? म. फुले यांनी रानडे यांना घालमोडे दादा संबोधत त्यांचे पहिल्या संमेलनाचे निमंत्रण नाकारले होते, हे आपणास नक्कीच माहिती असेल. २९२६-२७,हे म.फुले यांच्या द्विजन्म शताब्दीचे वर्ष आहे, त्या काळात शंभरावे साहित्य संमेलन होणार आहे, ते त्यांना जसे अभिप्रेत आहे, तसे तुम्ही करुन दाखवले तर सर्वात आधी मी तुमचे अभिनंदन करीन!
तुम्हाला पुन्हा शुभेच्छा देतो. आमच्या शंका व वाटणारी राजकीय हस्तक्षेपाची चिंता आपण प्रत्यक्ष कामातून भ्रामक होती असे सिद्ध करावे ही अपेक्षा!
(लेखक माजी संमेलनध्यक्ष आहेत)

