
शनिमाहात्म्याच्या पोथीचा नायक असणार्या विक्रम राजाच्या नावापासून प्रबोधनकार या काव्याचा खरा अर्थ सांगायला सुरुवात करतात. सर्वसामान्य वाचक साडेसाती संपवण्यासाठी पोथीची पारायणं करण्यात धन्यता मानतात, त्या पोथीच्या कहाणीचं वास्तव नेमकं काय आहे, याचे निरनिराळे तर्क मांडून ते वाचकाला विचार करायला प्रवृत्त करतात.
शनिमाहात्म्य अर्थात ग्रहदशेच्या फेर्याचा उलगडा या प्रबोधनकारांच्या पुस्तकाची आपण ओळख करून घेत आहोत. प्रबोधनकार पुस्तकाच्या पहिल्या तीन प्रकरणात तात्याजी महिपतीच्या शनिमाहात्म्य या पोथीची तोंडओळख करून देतात, हे आपण बघितलंच. शनिमाहात्म्याकडे पाहण्याची दृष्टी या चौथ्या प्रकरणापासून ते या पोथीच्या चिकित्सेला खर्या अर्थाने सुरुवात करतात.
त्यांनी चिकित्सेला हात घातलाय, तो राजाच्या विक्रम या नावापासूनच. त्याचा प्रबोधनकारांचा स्वतःचा तर्क आहे. ते लिहितात, शनीच्या साडेसातीचा महापराक्रम रंगविण्यासाठी कवीने ‘विक्रम’ शब्द फार कुशलतेने योजलेला आहे. या एका शब्दाच्या अर्थावरच त्याने आपल्या काव्याची मनोरंजक इमारत उभारली आहे. हा अर्थ एकदा स्पष्ट उमगला की शनिमाहात्म्याचा आत्मा हाती लागला, असे समजावे. शनीची साडेसाती हा शुद्ध गणिती कदरीचा रोखठोक फेरा आहे आणि त्याच्या तडाक्यातून भणंग भिकार्यापासून तो नवकोट नारायणापर्यंत जर कोणीही सुटत नाही; तर तात्याजी महिपतीने एखाद्या चंद्रसेन इंद्रसेन राजाच्या ऐवजी विक्रम राजाच का पसंत केला? अशी वा विक्रम शब्दात काय जादू भरलेली आहे? या जादूचा उलगडा झाला की सार्या शनिमाहात्म्याचेच कोडे उलगडले! विक्रम म्हणे महत्त्वाकांक्षी मनुष्याचा पराक्रम. उज्जैनीचा विक्रम म्हणजे उच्च जनीचा, लोकसमुदायावर विशेषत्वाने परिणाम करणारा, महत्त्वाकांक्षी, पुरुषार्थप्रिय अशा मनुष्याचा पराक्रम. शनीच्या साडेसातीचा ज्वालामुखी पुरुषार्थी आणि पराक्रमी पुरुषावरच विशेष फुटताना दिसतो; कारण त्या पुरुषाच्या सुखदुःखांवर अनेक लोकांचे सुखदुःख बरेच अवलंबून असते. त्यांच्या जीवनक्रांतीने बहुजन समाजाच्या आचार-विचारांत क्रांती घडवायची असते.
विक्रम शब्दाचा हा अर्थ समजून घेतल्यावर शनिमाहात्म्याचं मर्म समजून घेता येतं. पराक्रम असेल तिथेच साडेसातीचा धुमाकूळ असतो असं सांगत त्यांनी लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी या त्यांच्या समकालीन राष्ट्रनेत्यांच्या जीवनाची उदाहरणं दिली आहेत. विशेष म्हणजे ते पहिल्यांदाच टिळकांना लोकमान्य ही पदवी लावताना दिसतात. तोवरच्या प्रबोधनच्या किंवा इतर पुस्तकांमधल्या लेखनात त्यांनी लोकमान्य शब्द वापरणं टाळलं तर आहेच, उलट टिळक कसे खरे लोकमान्य नाहीत, याची चर्चा केली आहे.

या दोघांविषयीच्या इथे आलेल्या मतांचं सार म्हणून पुढचा परिच्छेद देता येईल, ज्योतिषज्ञ परंतु विक्रमी टिळक आकाशातील ग्रहांना पायातील जोड्यांप्रमाणे वागवीत गेला, यात काही आश्चर्य नाही. आकाशातील शनि पत्करला. त्याचा फेरा ३० वर्षांनी तरी येतो आणि केवळ साडेसात वर्षे छळून जातो. पण ब्रिटिश सत्तेच्या शनीची साडेसाती आज शंभर वर्षांवर जी हिंदुस्थानच्या पावणेआठीच्या खपाटी बसली आहे, ती उठता उठत नाही आणि सुटता सुटत नाही. टिळकांनी या शनीला त्यांच्याच पाचपेचांनी विरोध करून, त्याची दशा त्याच्या माथी थापली; पण गांधी तर टिळकांच्याही पुढे गेले! या सैतानी शनीच्या भारतीय अस्तित्वाला मुळांसकट उखडून टाकणे, हेच माझ्या जीवनाचे ध्येय आहे. असा त्यांनी छातीठोक जाहीरनामा फडकवून, आपल्या असहकारी चळवळीच्या बातेरी मार्याने त्याच्या पाऊण अधिक तेजाला कायमचे ग्रहण लावले. जो विक्रमी गांधी शस्त्रास्त्रसंपन्न ब्रिटिश सत्तेला ‘निकल जाव बाहर’ अशी धमकी देताना, प्राणाची व सर्वस्वनाशाचीही दिक्कत बाळगीत नाही, तो आकाशस्थ राहू शनीची काय म्हणून पर्वा ठेवील?
गांधी-टिळकांसारखे कर्तृत्ववान नेते महान ध्येयासाठी सर्वस्व उधळून द्यायला तयार असतात, त्यांच्या लेखी साडेसातीला काहीच अर्थ नसतो, असं स्पष्ट करताना ते लिहितात, पुष्कळांच्या पुष्कळ सुखासाठी जे विक्रमीवीर नानाविध दुःखांच्या आडातानी आपली मनोभूमिका पोलादाइतकी टणक बनवितात; राष्ट्रोद्धारातच आपला आत्मोद्धार शोधण्यासाठी जे आपल्या प्रामाणिक प्रयत्नांचा पिच्छा पुरवितात; आणि स्वतःला अजिबात विसरून जगाच्या कल्याणासाठी स्वतःचा जीव हव्या त्या संकटांच्या आगीच्या खाईत झुगारण्यास केव्हाही सिद्ध असतात, त्यांना राहूच्या महादशेचा किंवा शनीच्या साडेसातीचा फेरा कितीसा भेदरवणार? ‘सबसे जी प्यारा.’ प्रत्येक प्राणीमात्राला आपला प्राण प्यारा. त्या प्राणाचीच ज्या विक्रमाला तमा नाही, त्याने शनीच्या साडेसातीच्या धमकीला कवडीचीही किंमत दिली नाही, हे रास्त झाले.
विक्रमाने ब्राह्मणांच्या जपजाप्यादि उपायांचा का धि:कार केला? मी म्हणतो का करू नये?, असा रोखठोक प्रश्न विचारून प्रबोधनकार काव्याच्या पलीकडे जाऊन शनिमाहात्म्याचा विचार करण्याचा सल्ला देतात. ते सांगतात की आपल्या आयुष्यात नेहमी घडणार्या घटनांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करणारेच शनिमाहात्म्याची कहाणी समजून घेऊ शकतील, लोकांना विक्रमाची कहाणी म्हणजे केवळ अद्भुत चमत्कार, देवाची करणी किंवा सब झूट यापैकी काहीतरी एक असावी, असे वाटणे अगदी शक्य आहे. जे विचारी जन आहेत आणि असा माणूस हजारात एकादाच! ते आपल्या चरित्रातील हकीकतींचा कार्यकारणभाव चौकस बुद्धीने नित्य संशोधन करून, त्यात मिळालेल्या अनुभवांचा संशोधनप्रकाश कर्तव्याचा पुढील क्षेत्रावर पाडून, पुरुषार्थाची शिकस्त करीत असतात. आपल्या रोजच्या दिनचर्येत घडणार्या लहान-मोठ्या, बर्यावाईट सोप्या कठीण, उघड गुप्त आणि साहजिक चमत्कारिक, सर्व हकीकतींच्या उत्पत्ती-स्थिती-लयाची चिकित्सा करूनच माणसाच्या अनुभवाचा खजिना श्रीमंत बनत असतो. अनुभवी आणि बिन अनुभवी माणसाची कसोटी याच चिकित्सेवर अवलंबून असते. ‘असे का झाले? का व्हावे?’ अशा चिकित्सेने आपल्या क्रांतिमय चरित्र्याचे शोधन करणार्या विचारवंताला विक्रमाच्या कहाणीत ‘अशक्य’ असे फारसे काही आढळणार नाही.
या प्रकरणाचं पुढचं पाचवं प्रकरण आकाशस्थ ग्रह माणसांची सोंगे घेतात काय? हा प्रश्न घेऊन येतं. प्रबोधनकार प्रकरणाच्या पहिल्या वाक्यालाच त्याचं उत्तरही देऊन टाकतात, आकाशस्थ ग्रहतार्यांचा परिणाम माणसांवर होतो, ही कल्पना खरी धरून चालले, तरी एखाद्या विक्रम राजासाठी किंवा गुंडोपंतासाठी, शनीचा तारा माणसाचे रूप घेऊन पृथ्वीवर येऊ शकतो, ही कल्पना कोणालाही पटणार नाही. पुढचं पूर्ण प्रकरण हे याच वाक्याचं स्पष्टीकरण असलं तरी त्यांनी ही गोष्ट अनेक बाजूंनी तपासलीही आहे.
शनी आणि इतर ग्रहांचा पृथ्वीवरच्या माणसांवर प्रभाव पडणार असेल, तर पृथ्वी इतर ग्रहांवरच्या लोकांना अशीच पीडा देत नसेल कशावरून, असा उलटाच तर्क ते मांडतात, शनि जर माणसाचे रूप घेऊन पृथ्वीवरील विक्रमाच्या किंवा गुंडोपंताच्या घरी बिनचूक पत्त्यावर अचूक येऊन भेटतो, तर आमची पृथ्वीसुद्धा असेच काही तरी बाई बुवाचे रूप घेऊन, इतर नऊ ग्रहांवरील रहिवाशांच्या बोकांडी बसायला कशावरून जात नसेल? शनीची साडेसाती जर पृथ्वीवरील लोकांच्या मानगुटीला असते, तर आमच्या पृथ्वीची पावणेआठी शनिग्रहावरील रहिवाश्यांच्या खपाटीला कशावरून बसत नसेल? ‘अ’ला जर ‘य’चे आकर्षण बरे वाईट भोवते, तर तेच आकर्षण ‘अ’ला बाधलेच पाहिजे. हा निसर्गाचा शास्त्रसिद्ध सिद्धांतच आहे.
हा तर्क ते आणखी पुढे नेतात आणि विचारतात पृथ्वी आपल्या सगळ्यात जवळ असल्यामुळे तिचाच आपल्यावर सर्वाधिक प्रभाव पडायला हवा ना, या आकाशस्थ ग्रहांना ‘देव’ मानणे, हा तर आमच्या देवभोळेपणाचा कळसच होय. शुक्र, गुरू, मंगळादि तारे हे जर पुल्लिंगी देव, तर ही आमची पृथ्वी ‘देवी’ का नसावी? कितीजण या देवीची पूजा करतात? शनिमाहात्म्याप्रमाणे पृथ्वीमाहात्म्य आणि तिचे एखादे अनुष्ठान का नसावे? अंतराळातले दूरस्थ ग्रहदेव जर आम्हाला बरे वाईट भोवतात, तर ही अगदी निकटची, अगदी घरातली ग्रहदेवी पृथ्वी आमच्या राशीला का कधी येऊ नये? का, अतिपरिचयात अवज्ञा?
विश्वाच्या पसारातल्या मोठ्या ग्रहांनी आपल्यासारख्या यत्किंचित माणसांची दखल घ्यावी याला काहीच अर्थ नाही, असं सांगून ते ज्योतिषशास्त्राविषयी वाचकाला विचार करायला भाग पाडतात, या अनंत विश्वाच्या विस्तारात मनुष्याला कीटकाची तरी किंमत किंवा महती असू शकेल काय? मनुष्य स्वतःला केवढेही महत्त्व देत असला, तरी एकंदर विश्वरचनेत त्याच्या वाट्याला फुटक्या कवडीचीही किंमत येणार नाही… अशा मानवी किड्यांनी अंतराळात कोट्यवधी मैलांवर परिभ्रमण करणार्या ‘शनीची माझ्यावर वक्रदृष्टी आहे, राहू माझ्या धनस्थानावर पाहत आहे, किंवा मंगळ चंद्री सुंद्रीच्या लग्नस्थानी बसला आहे’ अशी भाषा बोलणे आणि तसल्या कल्पनेत मग्न राहणे, ही कदाचित माणसांची माणुसकी ठरत असली, मनाचा व बुद्धीचा क्षुद्रपणा होय… त्या लोकांच्यासाठी राहू, शनीने माणसांची रूपे घेऊन, त्यांच्या बिर्हाडांचा पत्ता काढीत काढीत पोष्टमनाप्रमाणे सादर हजर व्हावे, हा कसला पाणचट कोशिंबिरीचा आंधळा खेळ? ज्यांना गावात कोणी पुशीत नाही, आणि आळी चाळीत कोणी विचारीत नाही, त्यांची दखल दूरवर अंतराळातल्या राहू, शनीने घ्यावी, यात शहाणपणाचा आणि मोठेपणाचा वाटा त्या लोकांकडे जातो का शनि राहूकडे जातो, हे कोणी आणि कसे ठरवावे.
त्यामुळे याला पोटार्थी आणि भोळ्या लोकांचा कल्पनेचा खेळ ठरवून प्रबोधनकार सांगतात की याकडे मानला तर देव नाही तर धोंडा इतकंच महत्व द्यायला हवं. त्यानंतर प्रबोधनकारांनी ज्योतिषाच्या तुलनेत विज्ञानाचं महत्त्व सांगितलं आहे. माणसाने वैज्ञानिक संशोधनाच्या जोरावर पुराणातल्या कल्पना वास्तवात आणल्या आहेत. त्यामुळे आता शनीला का घाबरायचं असा सवाल ते मांडतात, मनुष्याच्या प्रगमनशीलतेने आज निसर्गालासुद्धा चिमटीत धरून त्याला हमाल बनविण्यात केलेली कमाल पाहून, शनि, मंगळादि ग्रहांच्या पोटात खात्रीने भीती धडकी भरली असावी, यात काही संशय नाही. कारण, आता अवघ्या पृथ्वीला चोखाळून, माणसांनी आपल्या तीक्ष्ण संशोधनाचा मोर्चा आता या शनि, मंगळ ग्रहांकडे वळविला आहे… मनुष्यप्राणी इतका जबरदस्त हिकमती आणि पराक्रमी असताही, पुष्कळ माणसांनी शनि, राहूच्या वक्र किंवा चक्र दृष्टीला इतके का भेदरावे, हे समजत नाही.
ग्रहदशेला घाबरण्यासारखंच त्यावरचे अंधश्रद्धाळू उपायही ते उडवून लावतात. हे दगडमातीचे अचेतन जड गोळे पृथ्वीवरील, विशेषतः हिंदुस्थानातील माणसांकडे किंवा ठराविक व्यक्तीकडे मेहेरबानीच्या किंवा सूडाच्या दृष्टीने पाहत असतात, ही किती अडाणीपणाची समजूत आहे, याचा विचारवंतांनी विचार करावा; आणि असल्या ग्रहांच्या वक्रदृष्टीच्या पाखड आगीची झळ शमविण्यासाठी भटांची पूजा, मारुतीची शेंदुरथापणी आणि तेलगाळणी किंवा घोड्याच्या नालापुढे डोकेघासणी इत्यादी प्रकार करणे, म्हणजे डोक्याला जखम आणि पायाला मलमपट्टी लावण्यासारखाच आचरटपणा नव्हे काय?
एकीकडे असे तर्काचे किंवा उपदेशाचे डोस पाजताना प्रबोधनकार माणसाच्या स्वभावाची साधी तर्हा सांगून वाचकांचे डोळे उघडतात, माणसाला सुखाची समृद्धी असली, किंवा त्याला अवचित काही धनलाभ झाला, तर मात्र त्या वेळी, ‘कोणत्या ग्रहाच्या मेहरबानीने हे असे घडले?’ याची ज्योतिष्याजवळ चौकशी करण्याच्या यातायातीत तो हटकून पडत नाही. धनलाभ किंवा इतर काही लाभ झाले, तर लाभग्रहाची चौकशी करून त्याला अनुष्ठान तर राहोच पण नुसता नमस्कार करण्याचीही आम्हाला शुद्ध नसते… उलटपक्षी, माणसाचा व्यवहार बिघडला किंवा कोणी बिघडवला, तो लाखाधीशाचा खाकाधीश बनला, धंदा बुडाला किंवा नोकरी गेली, अगर सुखाच्या भरतीतून दुःखाच्या खडकावर आदळू लागला की मग तो आकाश पाताळातले ग्रह हुडकू लागतो.
यापुढे तर प्रबोधनकारांची शनिमाहात्म्याची चिकित्सा अधिकच रसाळ वळण घेते. ते पुढच्या आठवड्यात.

