• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

अजितदादांचे निधन आणि अनुत्तरित प्रश्न!

अ‍ॅड. हर्षल प्रधान ( मुद्देसूद)

marmik by marmik
March 23, 2026
in मुद्देसूद
0
अजितदादांचे निधन आणि अनुत्तरित प्रश्न!

बारामतीच्या मातीत, जिथे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात केली, त्या मातीतच त्यांचा अंत झाला. २८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ८:४४ वाजता, जेव्हा लिअरजेट ४५ विमान बारामती विमानतळावर उतरत होते, तेव्हा ते केवळ एक विमान नव्हते ते महाराष्ट्राच्या राजकारणातील एका युगाचा शेवट घेऊन येत होते. पाच जणांचा जीव गेला, उपमुख्यमंत्री अजित पवार, त्यांचा पीएसओ विदिप जाधव, पायलट, सह-पायलट आणि फ्लाइट अटेंडंट. विमान धावपट्टीजवळ कोसळले, पेट घेतला आणि संपूर्ण महाराष्ट्र हादरला. पण ज्या क्षणी ही बातमी समोर आली, त्या क्षणीच एक नव्हे, तर हजारो प्रश्न उभे राहिले आणि आज, दोन महिन्यांनंतरही ते प्रश्न अधिक तीव्र, अधिक काळजाला भिडणारे झाले आहेत.

ज्या माणसाने आयुष्याची चार दशके महाराष्ट्राला दिली, जलसंपदा, ऊर्जा, वित्त, नियोजन अशा प्रत्येक खात्यात निर्णायक भूमिका बजावली, लाखो कार्यकर्त्यांना घडवले, बारामतीला विकासाचा नवा चेहरा दिला, त्या नेत्याच्या अपघाताबाबत त्याच्या स्वतःच्या कुटुंबीयांकडून, विशेषतः पुतणे रोहित पवार यांच्याकडून संशय व्यक्त केला जात असताना, साधी एफआयआरही नोंदवली जात नाही, ही बाब केवळ धक्कादायक नाही, तर ती लोकशाहीला लज्जास्पद ठरवणारी आहे. मन हेलावते, डोळे पाणावतात. अजित दादा ज्यांना ‘दादा’ म्हणून ओळखले जात होते, ते आज आपल्या कुटुंबीयांच्या डोळ्यात संशयाचे अश्रू पाहत असते तर काय म्हणाले असते? ही शांतता, ही निष्क्रियता, ही सत्तेची असंवेदनशीलता, यामुळे सामान्य माणसाचे मन कळवळते.

रोहित पवार यांची मेहनत
रोहित पवार यांनी मुंबई, दिल्ली आणि पुण्यात एकापाठोपाठ एक चार ते पाच वेळा पत्रकार परिषद घेतल्या. प्रत्येक परिषदेत त्यांचा आवाज अधिक तीव्र, अधिक भावनिक आणि अधिक तथ्यपूर्ण झाला. त्यांनी केवळ प्रश्न विचारले नाहीत, तर महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील संशयाला शब्द दिले. ‘हा केवळ अपघात होता की काहीतरी वेगळे घडले?’ हा त्यांचा पहिला आणि सर्वात मोठा प्रश्न आजही मन विषण्ण करत आहे. रोहीत यांनी सांगितले की, अजितदादा उड्डाणाबाबत अत्यंत सावध होते. ते कधीही जोखीम घेत नसत. ‘दादा विमानतळावर वेळेवर पोहोचले, पण उड्डाण उशिरा झाले. हवामान खराब होते, दृश्यमानता कमी होती. तरीही विमान उडवण्यात आले.’
रोहित पवार यांनी सर्वात मोठा मुद्दा उपस्थित केला तो व्हीएसआर व्हेंचर्स कंपनीचा. विमान या कंपनीचे होते. रोहित यांनी स्पष्ट केले की, पायलट कॅप्टन सुमित कपूर यांनी कंपनीच्या मालक व्ही.के. सिंग (विजय सिंह) यांना फोन करून सांगितले होते, ‘सर, दृश्यमानता खूप कमी आहे, विमान उडवणे अशक्य आहे.’ पण मालकाने उत्तर दिले, ‘तुम्ही उडवा, बाकी मी सांभाळतो.’ हा संवाद रोहित यांनी पत्रकार परिषदेत उघड केला. ‘पायलटला बळीचा बकरा बनवले जात आहे,’ असे रोहित म्हणाले. ‘विमान कंपनीला वाचवण्यासाठी पायलटला दोषी ठरवले जाते. पण सत्य काय आहे?’

त्यांनी पुढे सांगितले की, कंपनीचा मालकाचा मुलगा रोहित सिंह हा अमेरिकेत बसून विमानाचे रिमोट कंट्रोल करत होता. ‘मुख्य आरोपी अमेरिकेत बसला आहे आणि त्याला राजकीय संरक्षण दिले जात आहे.’

विमानतळाजवळ एकही झाड नाही!
एएआयबीच्या प्राथमिक अहवालावर रोहित पवार यांनी सडकून टीका केली. ‘अहवालात मोठे-मोठे तथ्यात्मक चुका आहेत,’ असे ते म्हणाले. अहवालात म्हटले आहे की विमान ‘झाडांवर आदळले.’ पण बारामती विमानतळाजवळ एकही झाड नाही! सीसीटीव्ही फुटेजशी अहवाल जुळत नाही. ‘हा अहवाल व्हीएसआर कंपनी आणि डीजीसीए अधिकार्‍यांना वाचवण्यासाठी लिहिला गेला आहे,’ असा रोहित यांचा आरोप आहे. त्यांनी पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन दाखवून विचारले की, विमानात अतिरिक्त इंधन टँक होते का? ते ‘बॉम्ब’सारखे होते का? पायलटला इंधन वाचवण्यासाठी सांगितले गेले का? बारामती विमानतळावर हवामान निरीक्षण आणि माहिती सुविधा नाही, तरीही विमान उतरवण्याची परवानगी कशी मिळाली? रोहित यांनी आणखी एक गंभीर मुद्दा उपस्थित केला तो राजकीय संबंधाचा. ‘काही ‘बिग पर्सनॅलिटी’ व्हीएसआर कंपनीला संरक्षण देत आहे,’ असे त्यांनी सांगितले. कंपनीचा टीडीपीशी (तेलुगु देसम पार्टी) संबंध असल्याचा आरोप केला. केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री के. राममोहन नायडू यांच्या राजीनाम्याची मागणी केली. ‘डीजीसीएने व्हीएसआरच्या चार विमाने ग्राउंड केली आहेत, तरीही अपघातापूर्वी कंपनीला परवानगी कशी मिळाली?’ रोहित यांनी विचारले. त्यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली. एफआयआर का नाही? ़फक्त अ‍ॅक्सिडेंटल डेथ रिपोर्ट? निष्काळजीपणाची शक्यता असताना गुन्हा दाखल करण्यास विलंब का? असे प्रश्न त्यांनी वारंवार विचारले.

प्रश्नांची उत्तरं कुठे आहेत?
या प्रकरणात प्रफुल्ल पटेल यांचे नाव चर्चेत आले. रोहित यांनी अप्रत्यक्षपणे संकेत दिले की, विमान कंपनीच्या मालकांचे प्रभावी राजकीय संबंध आहेत. प्रफुल्ल पटेल यांचा नागरी विमान वाहतूक क्षेत्रात दीर्घ अनुभव आहे. त्यांच्या नावाने हा मुद्दा अधिक गाजला. रोहित म्हणाले की ‘व्हीएसआर दोषी असेल तर डीजीसीएही दोषी आहे. संपूर्ण यंत्रणा गुन्हेगारांना संरक्षण देत आहे.’ पण या सर्व प्रश्नांची उत्तरं कुठे आहेत? सत्ताधारी पक्ष शांत आहे. विधानसभेत, विधान परिषदेत चर्चा होत नाही. विरोधकांनी चर्चेची मागणी केली, पण सत्ताधार्‍यांनी ‘तपास सुरू आहे, चर्चा करू नका’ असे उत्तर दिले. रोहित पवार यांच्या पत्रकार परिषदांनंतरही सत्ताधारी नेते मौन बाळगत आहेत. अपघात की घातपात? हा साधा प्रश्न विचारण्याचीही तयारी नाही. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीसाठी ही शांतता चिंताजनक आहे. सत्तेसाठी असंवेदनशीलता इतकी वाढली आहे की, एका मोठ्या नेत्याच्या मृत्यूमधूनही राजकीय फायदे-तोटे पाहिले जातात.
अजित पवार यांचे महाराष्ट्रातील स्थान अविस्मरणीय आहे. बारामतीच्या मातीतून उभे राहिलेले हे नेतृत्व. त्यांनी राज्याला जलसंपदा, ऊर्जा, वित्त आणि नियोजन क्षेत्रात नवी उंची दिली. त्यांच्या समर्थकांसाठी ते ‘कणखर’ आणि ‘निर्णयक्षम’ होते. पण आज त्यांच्या कुटुंबीयांना, कार्यकर्त्यांना आणि जनतेला फक्त एकच प्रश्न पडतो सत्य काय आहे? रोहित पवार यांनी सांगितले की, ‘दादा कधीही जोखीम घेत नसत. हवामान खराब असताना विमान उडवण्याची गरज नव्हती. हा अपघात नव्हता, तर काहीतरी वेगळे होते.’ त्यांच्या डोळ्यात अश्रू आणि आवाजात संताप दिसला जेव्हा त्यांनी म्हटले, ‘महाराष्ट्राला सत्य हवे आहे. जनतेला फसवू नका.’

या प्रकरणात एफआयआरचा मुद्दा सर्वात मोठा आहे. सामान्य मृत्यू प्रकरणात तात्काळ गुन्हा दाखल होतो. पण येथे अॉक्सिडेंटल डेथ रिपोर्ट नोंदवली जाते आणि तांत्रिक तपास पूर्ण झाल्यानंतर गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. रोहित यांनी विचारले ‘जर निष्काळजीपणा, देखभाल त्रुटी किंवा दबाव असेल तर विलंब का?’ त्यांनी बारामती पोलिस स्टेशनसमोर मोर्चा काढण्याची घोषणा केली. ‘एफआयआर दाखल करा, व्हीएसआर कंपनीविरुद्ध गुन्हा नोंदवा,’ अशी मागणी केली.

लोकशाहीत पारदर्शकता ही सर्वात मोठी ताकद आहे. पण आज संशयाचे ढग अधिक काळे होत चालले आहेत. सीआयडी तपास करत आहे, पण रोहित यांच्या मते ‘तपास योग्य दिशेने होत नाही.’ त्यांनी सीबीआय आणि स्वतंत्र पॅनलची मागणी केली. ‘संपूर्ण तपास अहवाल जनतेसमोर यावा. ब्लॅक बॉक्स डेटा, सीसीटीव्ही, पायलट-मालक संवाद सर्व काही सार्वजनिक व्हावे.’

महाराष्ट्राच्या जनतेला आज अनेक प्रश्न पडले आहेत अपघाताची संपूर्ण माहिती काय आहे? एफआयआर का दाखल नाही? तपास अहवाल कुठे आहे? व्हीएसआर कंपनीचे मालक कोण? त्यांचे राजकीय संबंध कोणते? डीजीसीएने पूर्वी का कारवाई केली नाही? हे प्रश्न केवळ रोहित पवारांचे नाहीत, ते संपूर्ण महाराष्ट्राचे आहेत. लोकशाहीत सत्य ही सर्वात मोठी शक्ती आहे. अजितदादांच्या जीवनाने महाराष्ट्राला खूप दिले. आता त्यांच्या मृत्युनंतर कमीत कमी सत्य तरी सांगा सगळ्यांना!
रोहित पवार यांच्या प्रत्येक पत्रकार परिषदेत एकच भावना होती, वेदना, संताप आणि न्यायाची मागणी. ‘दादांसाठी न्याय हवा,’ असे ते म्हणाले. बारामतीकर, महाराष्ट्रातील कार्यकर्ते, सामान्य जनता सर्वजण आज एकच मागणी करत आहेत- सत्य समोर आणा. अपघात असो किंवा घातपात, लपवाछपवी चालणार नाही. लोकशाही व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे राहू देऊ नका.

आज महाराष्ट्र शोकात आहे, पण तो संशयातही आहे. अजित पवारांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी सत्य आवश्यक आहे. रोहित पवार यांनी जे मुद्दे उपस्थित केले पायलटवर दबाव, अहवालातील चुका, कंपनीचे राजकीय संरक्षण, एफआयआरची मागणी, सीबीआय चौकशी, डीजीसीएची जबाबदारी हे सर्व मुद्दे जनतेसमोर यावेत. सत्य दडपले जाणार नाही. महाराष्ट्र जागा आहे. आणि सत्याची ही लढाई रोहित पवारांसह संपूर्ण जनता लढेल.

(प्रवक्ता आणि जनसंपर्क प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष)

Previous Post

संघ-भाजपा यांचे निव्वळ बेगडी सावरकर प्रेम!

Next Post

फटकारे बाळासाहेबांचे

Next Post
फटकारे बाळासाहेबांचे

फटकारे बाळासाहेबांचे

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.