• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

समाजवादी माती खाती…

योगेश वसंत त्रिवेदी (चौफेर)

marmik by marmik
March 23, 2026
in घडामोडी, विशेष लेख
0
समाजवादी माती खाती…

समाजवादी चळवळीचे मूळ मानण्यात येणार्‍या राष्ट्र सेवा दलातर्फे  दरवर्षी १४ ऑगस्टच्या मध्यरात्री भारताचा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात येत असे. कारण स्वातंत्र्यसैनिकांच्या अथक परिश्रमाने भारताला १४ ऑगस्टच्या मध्यरात्री स्वातंत्र्य देत ब्रिटिश भारतातून चालते झाले गेले. ठाणे येथील मो. ह. विद्यालयात स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित राष्ट्र सेवा दलाच्या कार्यक्रमात थोर कवी प्रा. वसंत बापट यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सुस्पष्ट शब्दांत सांगितले की, मी लिहिलेली ‘समाजवादी साथी गाती एका आवाजात, ऐक्याचे हे गीत घुमवू अवघ्या अवकाशात’ ही काव्यरचना आज दुर्दैवाने मलाच बदलून म्हणावेसे वाटते की, ‘समाजवादी साथी गाती सातही आवाजांत’.
राम मनोहर लोहिया यांनी समाजवादी चळवळीचा प्रारंभ केला. लोकनायक जयप्रकाश नारायण, युसुफ मेहेर अली, कर्पुरी ठाकूर अशा दिग्गज समाजवादी साथींनी ही चळवळ पुढे नेण्याचे काम केले. तिथपासून जॉर्ज फर्नांडिस, मुलायमसिंह यादव, लालुप्रसाद यादव, बिजू पटनायक, नितीशकुमार, नवीन पटनायक, हुकूमदेव नारायण अशा असंख्य महानुभावांनी ही चळवळ पुढे नेली. महाराष्ट्रातील समाजवादी चळवळीचे नेतृत्व श्रीधर महादेव उर्फ एसेम जोशी, नानासाहेब गोरे, बॅ. नाथ पै, दत्ता ताम्हाणे, बापूसाहेब काळदाते, प्रा. मधू दंडवते, मधू लिमये, निहाल अहमद, केशव उर्फ बंडू गोरे, मृणाल गोरे, डॉ. जी. जी. पारीख, डॉ. शांती पटेल, एस.के. शेट्ये, मंगला पारीख, कमल देसाई, नारायण तावडे, विवेक खाड्ये, रमेश जोशी, प्रा मा. पिंटो, राजाभाऊ चिंबुलकर, शरद राव, सोहनसिंह कोहली, भाई सामंत, परशुराम टावरे, पंढरीनाथ चौधरी, डॉमनिक घोन्सालविस, प्रा. स. गो. वर्टी यांच्यापासून सुधाकर वावीकर, वासुदेव वर्तक, विलास विचारे यांच्यापर्यंत फार मोठ्या मांदियाळीने केले.

बॅ. विठ्ठलराव गाडगीळ यांचे वडील काकासाहेब गाडगीळ यांच्या पुणे येथील गाडगीळ वाड्यात एक बैठक झाली आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला पर्याय म्हणून राष्ट्र सेवा दल स्थापन करण्यात आले. जसा भारतीय जन संघ (नंतर भारतीय जनता पक्ष) हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून राजकीय पक्ष म्हणून अस्तित्वात आला, तद्वतच राष्ट्र सेवा दलाच्या सेवा दल सैनिकांमधून समाजवादी कार्यकर्ते तयार झाले. शाखानायक शिबिर, दस्तानायक शिबिर भरवून समाजवादी विचारांचा कार्यकर्ता घडत गेला. कला पथकाने त्याला चांगला साज चढविला. मुंबईमधील परळ नायगाव, पुण्यापासून कोकणात समाजवादी चळवळीचे प्राबल्य दिसू लागले. उत्तर महाराष्ट्रात डॉ. मु. ब. शाह, डॉ. पितांबर सरोदे, गुलाबराव पाटील अशा असंख्य नेत्यांनी समाजवादी चळवळीचे काम गतीने पुढे नेले.

इंदिरा गांधी यांनी सत्तेच्या मदमस्त हत्तीवर स्वार होऊन १९७५ साली आणीबाणी लादली आणि समाजवादी पक्ष, भारतीय जनसंघ, भारतीय लोकदल आणि संघटना काँग्रेसच्या नेत्यांना तुरुंगात डांबले. काँग्रेसचे तरुण तुर्क म्हणवले जाणारे कृष्णकांत, मोहन धारिया आणि चंद्रशेखर यांनी इंदिरा गांधी यांना लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्याशी चर्चा करण्याची सूचना केली. परंतु इंदिरा गांधी यांनी त्यांनाही कारावासात टाकले. इंदिराजींविरोधात देशात प्रचंड प्रमाणात वातावरण निर्माण झाले. गुप्तहेर खात्याने इंदिरा गांधी यांना तशी कल्पना देत सावध केले. परिणामी इंदिरा गांधी यांनी १९७७ साली आणीबाणी उठवून जानेवारी १९७७ मध्ये लोकसभेच्या निवडणुका जाहीर केल्या.

दरम्यान, तुरुंगात असताना या सर्व इंदिरा गांधीविरोधी नेत्यांनी आपापसात चर्चा केली आणि मतभेदाचे १० टक्के मुद्दे बाजूला सारून मतैक्याच्या ९० टक्के मुद्द्यांवर एकत्र येण्याचा निर्णय घेतला. भारतीय लोकदलाच्या ‘नांगरधारी शेतकरी’ या निशाणीवर सारे विरोधक मोठ्या संख्येने निवडून आले. भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच आधी सत्तेवर आलेला जनता पक्ष नंतर स्थापन झाला. मार्च १९७७ साली मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली सत्तेवर आलेल्यांनी १ मे १९७७ साली जनता पक्ष स्थापन केला. लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या प्रेरणेने हा स्थापन झाला खरा, परंतु पक्ष स्थापन करा आणि फोडा ही सवय जडलेल्या समाजवाद्यांनी अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी आदी संघाच्या नेत्यांवर दुहेरी निष्ठेचा वारंवार आरोप केला. परिणामी ६ एप्रिल १९८० रोजी वाजपेयी, अडवाणी, मुरली मनोहर जोशी, विजयाराजे शिंदे यांनी मुंबईत महाअधिवेशन भरवून भारतीय जनता पक्ष स्थापन केला. ‘जनता पक्ष’ आणि पूर्वाश्रमीच्या भारतीय जनसंघामधील ‘भारतीय’ हा शब्द घेत हा पक्ष स्थापन केला गेला. विश्वनाथ प्रताप सिंह यांनी जनता पक्षाचे जनता दलात रूपांतर केले, परंतु डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांनी जनता पक्षाचे अस्तित्व कायम ठेवले आणि २०१४ साली नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेण्यापूर्वी डॉ. स्वामी यांनी जनता पक्ष हा भारतीय जनता पक्षात विलीन केला.

जशा समाजवादी पक्षांच्या चिरफळ्या झाल्या, तद्वतच जनता पक्ष, जनता दल हेसुद्धा एकेका नेत्यांनी आपापली ओळख तयार करण्यासाठी स्थापन केले. बिजू पटनायक यांनी बिजू जनता दल, जॉर्ज फर्नांडिस यांनी समता पार्टी, लालूप्रसाद यादव यांनी राष्ट्रीय जनता दल, नंतर शरद यादव आणि नितीश कुमार यांनी संयुक्त जनता दल स्थापन केला. मुलायमसिंह यादव यांनी समाजवादी पक्ष नव्याने अस्तित्वात आणला. प्रारंभीच्या काळात प्रजा समाजवादी पक्ष आणि संयुक्त समाजवादी पक्ष होते. एकाची निशाणी झोपडी तर एकाचे झाड. मग ते दोन्ही पक्ष एकत्र आले. मोठ्या पक्षांनी मग या छोट्या छोट्या पक्षांना गिळंकृत केले. इंदिरा गांधी यांच्याविरोधात तुरुंगात गेलेले सोनिया गांधी यांच्या काँग्रेसमध्ये सुखेनैव संचार करू लागले.

डॉ. पी. व्ही मंडलिक ट्रस्ट, ताडदेव येथील जनता केंद्र, साने गुरुजी ट्रस्ट अशा काही संस्थांनी समाजवादी चळवळीची धुगधुगी कायम ठेवली आहे. परंतु जॉर्ज फर्नांडिस यांनी अटलबिहारी वाजपेयींशी जुळवून घेत सत्तेचा सोपान स्वीकारला तर त्यांचे शिष्योत्तम शरद राव यांनी शरद पवारांच्या नेतृत्वाखाली काम करणे पसंत केले. जो कित्ता जॉर्ज यांनी गिरवला तोच मग त्यांचे शिष्योत्तम नितीशकुमार यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर मोहित होत गिरवला आणि इकडून तिकडे उड्या मारीत ‘पलटूराम’ हा किताब पटकावला.
बिहार हे समाजवादी चळवळीचे मुख्य केंद्र. सिताबदियाराला जन्मलेल्या जयप्रकाश नारायण यांनी पाटणा येथील निवासस्थान सरकारच्या ताब्यात दिले आणि ते स्वतः पत्नी प्रभावती देवींच्या समवेत भाडे भरून रहात होते. आज केंद्रापासून सर्वच राज्यांत जेपींचे अनुयायी राज्यशकट हाकीत आहेत. परंतु नैतिकता आणि मूल्याधिष्ठित राजकारणाला तिलांजली देत आयाराम गयाराम बनून राजकीय पर्यटन करीत आहेत. कर्पुरी ठाकूर यांच्यापासून नितीशकुमार यांच्यापर्यंत सुरू असलेल्या समाजवादी चळवळीचे खच्चीकरण करण्याचा विडा जणू भाजपने उचलला आहे. दिवंगत ज्येष्ठ पत्रकार माधवराव गडकरी यांनी मुंबई सकाळमध्ये ‘चौफेर’ या स्तंभात दिलेले उदाहरण बोलके आहे. बापूसाहेब काळदाते हे समाजवादी आणि रामभाऊ म्हाळगी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे. म्हाळगी हे जेव्हा पाचशे लोकांपर्यंत पोहोचत तेव्हा बापूसाहेब हे केवळ पन्नास लोकांपर्यंत पोहोचत. त्याचे कारण दोघेही खासदार असताना लोकांनी पाठविलेल्या पत्रांना उत्तर देणे हे कर्तव्य समजून ते काम आधी करायचे. पण फरक एवढाच की म्हाळगी हे संघाच्या स्वयंसेवकांकडून पत्र लिहून घेत आणि स्वाक्षरी स्वतः करीत. संघ स्वयंसेवकांना रोजगार देण्याचे समाधान त्यांना लाभत असे. दुसरीकडे बापूसाहेब राष्ट्र सेवा दलाच्या सैनिकांना न सांगता स्वतः खर्डेघाशी करीत. भाजपच्या नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत (आताच्या नव्हे) सार्‍यांना संघाच्या शाखेत जाण्यात कमीपणा वाटत नव्हता, पण समाजवादी नेत्यांनी राष्ट्र सेवा दल वाढविण्यासाठी प्रयत्नच केले नाहीत. याचा पूरेपूर फायदा उठवत भाजप नेतृत्वाने समाजवादी चळवळीचे पद्धतशीर खच्चीकरण केले. ज्याचे दृश्य परिणाम नितीशकुमार यांच्या आताच्या राजकीय परिस्थितीवरून दिसत आहेत. बिहारच्या मुख्यमंत्रीपदावरुन थेट राज्यसभेवर पाठविण्याचे कार्य (कारस्थान) त्यांच्या संदर्भात झाले आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. एका समाजवादी नेत्याने ‘समाजवादी साथी गाती एका आवाजात,’ऐवजी ‘समाजवादी माती खाती एका आवारात’ हे म्हणणे ही समाजवादी चळवळीची घोर विटंबनाच म्हणावी लागेल. भाजपने प्रत्येक ठिकाणी मित्रपक्षांना कमजोर करण्याचेच काम केले. मग त्यात समता, ममता, जयललिता, मेहबूबा मुफ्ती, अकाली दल, शिवसेना हेही आलेच. अर्थात समाजवादी चळवळ खतम करण्यासाठी आपणही किती जबाबदार आहोत याचे आत्मपरीक्षण सर्वच साथींनी करणे आवश्यक आहे. संघाचे स्वयंसेवक कुठेही असले तरी एकत्र येतात, परंतु राष्ट्र सेवा दलाच्या सैनिकांनी एकत्र येऊन समाजवादी चळवळ मजबूत करण्यासाठी काय प्रयत्न केले? राष्ट्र सेवा दल हा माझा प्राणवायू आहे, असे म्हणणारे महाराष्ट्र माऊली पांडुरंग सदाशिव साने उर्फ साने गुरुजी यांचे अनुयायी आज साने नव्हे तर ‘नाणे गुरुजी’ झाले आहेत, हेच खेदाने म्हणावे लागते. भारतीय जनता पक्ष आणि जनता दल यांची आजची परिस्थिती काय आहे, हे पाहण्यासाठी नरीमन पॉइंट येथील दोन्ही पक्षांची कार्यालये पाहिलीत तरी चित्र स्पष्ट होईल.
(लेखक ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आहेत.)

Previous Post

विरोधी पक्षमुक्ततेचे `फडणवीस मॉडेल’

Next Post

संघ-भाजपा यांचे निव्वळ बेगडी सावरकर प्रेम!

Next Post
संघ-भाजपा यांचे निव्वळ बेगडी सावरकर प्रेम!

संघ-भाजपा यांचे निव्वळ बेगडी सावरकर प्रेम!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.