
शनिमाहात्म्य अर्थात ग्रहदशेच्या फेर्याचा उलगडा हे प्रबोधनकारांचं एक अतिशय लोकप्रिय पुस्तक. जवळपास शंभर वर्षांपूर्वी ते प्रसिद्ध झालं, तेव्हाही ते गाजलं, आजही विविध प्रकाशक त्याच्या प्रती काढतच असतात. पिढ्या बदलल्या तरी आजही ते आवडीने वाचलं जातं. शनिमाहात्म्य या पोथीवरचं हे प्रबोधनकारांचं भाष्य आहे. ते करताना प्रबोधनकारांनी प्रयत्नवादाचा पुरस्कार केला आहे.
आपण याआधी बघितलंच की प्रबोधनकारांवर संकटांची मालिका चालून आली. त्यातून बाहेर पडण्याचा त्यांचा प्रयत्न अपुराच पडत होता. अशा वेळेस त्यांच्याभोवती ज्योतिषांचा गराडा पडला. प्रत्येकाने सांगितलं की तुमची साडेसाती सुरू आहे. त्यासाठी करंदीकर नावाच्या एका ज्योतिषाने शनिमाहात्म्य वाचण्याचा आग्रह केला. साडेसाती सोडवणारी ही पोथी वाचताना प्रबोधनकारांना त्यानिमित्ताने सुचलेला नवा विचार मांडण्याची इच्छा झाली. त्यातून शनिमाहात्म्य अर्थात ग्रहदशेच्या फेर्याचा उलगडा या पुस्तकाचा जन्म झाला. ग्रहदशेच्या फेर्याचा उलगडा या उपशीर्षकात प्रबोधनकारांनी या पुस्तकाचं स्वरूप सांगितलं आहे. ज्योतिषाकडे नेमकं बघायचं तरी कसं, या अनेकांना पडणार्या प्रश्नाचं खास प्रबोधनकारांचं उत्तर या पुस्तकात आहे. तेव्हा अडचणीच्या काळात प्रबोधनकारही ते उत्तरच शोधत होते. पुस्तकाच्या शनिमाहात्म्यच का घेतले? या दुसर्या प्रकरणात प्रबोधनकार तेच सांगतात, प्रस्तुत ग्रंथातील विचारसरणीला माझी सध्याची परिस्थिती मूळ कारण झालेली आहे आणि तिच्या कठोर घर्षणातील एका चमकदार ठिणगीने शनिमाहात्म्याविषयी नवविचाराचा प्रफुल्ल दीप माझ्या मनोमंदिरात उजळला. ही गोष्ट प्रथमच सांगून टाकलेली बरी. या दिव्याच्या उजेडाने मला जे जे दिसले आणि अनुभवाला पटले ते ते प्रिय वाचकांच्या विचारक्रांतीसाठी नमूद करीत आहे.
याच प्रकरणात त्यांनी ग्रहदशेच्या नावाने दैववादी बनण्याचा साफ निषेध करून आपली भूमिका स्पष्ट केली आहे, शनीच्या या साडेसातीच्या चक्रातून एकही माणूस आजपर्यंत निसटू शकला नाही. माणसेच काय, पण संस्था, गावे, राष्ट्रे यांनाही राहू शनि मंगळादिकांची ग्रहदशा यथाक्रम यथाकाळ भोवल्याशिवाय चुकत नाही आणि त्यांनी ती भोगल्याशिवाय सुटका नाही, असे माझे ज्योतिषी मित्रच म्हणतात. याचा असा सरळ अर्थ निघतो की आम्ही माणसे आणि आमची ही पृथ्वी ह्या आकाशस्थ डझनभर ग्रहांचे खाद्य, अथवा ह्या ग्रहरूपी मांजरांच्या तडाक्यात सापडलेले उंदीरच होत… असल्या कल्पनेचा अगर भावनेचा प्लेग आज हिंदुस्थानात जितका जास्त पैâलावलेला आहे, तितका जगाच्या पाठीवर इतरत्र दिसून येत नाही, ह्या भावनेमुळे कोट्यवधी हिंदी लोकांचे संघ बडवलेल्या बैलाप्रमाणे हव्या त्या परिस्थितीच्या जोखडाखाली बिनतक्रार मान देण्याइतके निष्क्रीय आणि अचेतन होऊन बसले आहेत. प्रतिकाराची धमकच ठार मेल्यामुळे, हिंदुस्थानचे स्वातंत्र्य भस्मसात् होऊन, आज हा अफाट भरतखंड परक्यांचा अक्षरशः गुलाम होऊन पडला आहे.
अशा दैववाद्यांना प्रबोधनकार कपाळवादी म्हणतात. त्यांनीच हे पुस्तक वाचायला हवं, असं सांगतात देखील; प्रत्येकाचे दैव आणि सुखदुःखाचे फेरे हे जर घड्याळातल्या यंत्राप्रमाणे ठाकठीक ठरलेले आणि यथाकाल यथाक्रम घडणारे, तर त्यासाठी माणसाने आपले हातपाय तरी का हालवावे? दु:ख येणार तर ते अगत्य येणारच येणार आणि सुखाचा मुसळधार पाऊस अमुक वेळी कोसळणार म्हणजे धो धो कोसळणारच असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी! मला हातपाय हलविण्याची जरूरत काय? दैववाद्यांचे विचार जवळजवळ असेच असतात. नवल वाटते ते हेच की ह्या कपाळवाद्यांनासुद्धा आढ्याला तंगड्या लावून स्वस्थ मात्र बसवत नाही. त्यांची काही ना काही धडपड चाललेलीच असते. ज्योतिषबुवाने शनीची साडेसाती वर्तवली की या कपाळवाद्यांनी दर शनिवारी मारुतीला शेंदूर थापून तात्याजी महिपती कृत शनिमाहात्म्याचे पारायण नेटाने चालविलेच, कशाचाही कधी विचार करायचे नाहीत. मारुती शेंदूर, प्रदक्षिणा, तैलाभिषेक, भटपूजा आणि शनिमाहात्म्य यातच सार्या अकलेचा आणि हिमतीचा होम. आज शेकडो वर्षे लक्षावधी दैववादी हिंदू या शनिमाहात्म्याच्या पारायणाने शनीच्या साडेसातीला तोंड देण्याचा चंग बांधीत असतात. असा हा ग्रंथ तरी काय आहे, याचे सत्यशोधन करण्यासाठी, पुढील प्रकरणाच्या उंबरठ्यात वाचकांनी पाऊल ठेवावे.
शनिमाहात्म्य या पुस्तकाची एकूण अकरा प्रकरणं आहेत. लगेच विषयाला हात न घालणं, ही प्रबोधनकारांची शैली आहे. ते एखादा रसाळ विषय सुरुवातीला घेतात आणि त्यात गुंतलेल्या वाचकाला अचानक आपल्या मुद्द्यावर आणतात. तसंच या पुस्तकाचं पहिलं प्रकरण गद्य आणि पद्य रचनांची चर्चा करणारं आहे. दुसर्या प्रकरणाचं सार वरच्या दोन परिच्छेदात आपण बघितलं. तिसर्या प्रकरणात मूळ पोथीत आलेल्या विक्रमराजाच्या साडेसातीच्या कहाणीचा पूर्वार्धाची ओळख करून देतात. त्याची भूमिका अशी आहे-
शनि आणि साडेसाती या भानगडी काय आहेत, ह्याचा विवेकवादाला धरून विचार करण्यापूर्वी, केवळ महाराष्ट्रात प्रचलित असलेल्या मराठी ओवीबद्ध शनिमाहात्म्याचा संशोधनपूर्वक विचार करू. सुप्रसिद्ध संतचरित्रकार तात्या महिपती यांनी गुर्जर भाषेची कथा, अर्थविषयी न्यूनता न ठेविता, महाराष्ट्रभाषेत यथामति वर्णिली तत्त्वता अशी आहे. हा माहात्म्य ग्रंथाला कसल्याही प्राचीन संस्कृत ग्रंथाचा पाया अगर आधार तर नाहीच, पण विशेष आश्चर्याची गोष्ट म्हणजे गुजराती भाषेत शनिमाहात्म्याचा पत्ता नाही. तात्याजी महिपती आत्मविश्वासाने म्हणतो की, हा ग्रंथ करिता श्रवण। सकळ विघ्ने जाती निरसून। ग्रहपीडा अति दारुण। न बाधे कदा कल्पान्ती।। असल्या ह्या पराक्रमी ओवीबद्ध ग्रंथात उज्जनीच्या विक्रमाची कथा काय वर्णन केलेली आहे, ती थोडक्यात नमूद करतो.
यातली संपूर्ण गोष्ट वाचण्यासाठी शनिमाहात्म्य हे पुस्तकच वाचायला हवं. पण थोडक्यात इथे वाचता येईल. उज्जैनचा राजा विक्रम हा दरबारात पंडितांशी चर्चा करताना शनीचा अपमान करतो. तेव्हा शनी स्वतः येऊन त्याला साडेसातीची धमकी देतो. साडेसाती सुरू झाल्यावर शनी घोड्याच्या व्यापार्याचा वेष घेऊन येतो. त्याचा घोडा राजासह आकाशात वार्यासारखा गायब होतो. तो एका तामलिंदा नावाच्या नगरात पोचतो. तिथे एक वैश्य व्यापारी त्याच्यावर मोत्याचा किमती हार चोरल्याचा आरोप ठेवतो. त्याची तक्रार नगरीच्या चंद्रसेन राजाकडे तक्रार करतो. तो विक्रम राजाला हात पाय तोडण्याची शिक्षा देतो.
इथपर्यंतची कहाणी तिसर्या प्रकरणात येते. पण ही कहाणी सांगताना प्रबोधनकारांची रसाळ शैली आहेच. मध्येच ते वाचकांना वेगळी माहितीही देतात, उदाहरणार्थ, विक्रमादित्य ही `केसर-इ-हिंद’ पदवीप्रमाणे उज्जनीच्या चक्रवर्ती राजांची पदवी असे. चार-पाच विक्रमादित्य इतिहासात दिसतात. त्यात शनीच्या तडाख्यात सापडलेला विक्रम कोणता, हा वादग्रस्त प्रश्न आहे. विक्रम शक नावाचा एक शक चालू आहे, पण त्याच्याही कुळामुळाचा पत्ता लागलेला नाही.
विक्रमराजाला शनीने धमकी दिल्यावर त्याची परिस्थितीही प्रबोधनकारांनी नेहमीच्या खोचक शैलीत मांडली आहे. राजे लोकांवर आपत्तीचा फास पडला की त्यांना पोखरून खाण्यासाठी मदतनीसांचा, हितचिंतकांचा, सल्लागारांचा, ज्योतिषांचा, मांत्रिकांचा मोठा अफाट घोळका सभोवती जमत असतो. त्यात पहिला नंबर भटाब्राह्मणांचा. साडेसाती वर्णविणारे त्रिकालज्ञ भटच आणि तिचा फेरा परतविणारे तांत्रिक मांत्रिकही भटच. अगदी प्राचीन काळच्या अयोध्येच्या दशरथ राजापासून तो थेट चालू काळच्या रंगेल रसूल तुकोजीराव होळकरापर्यंत, कोणचाही दरबार घ्या. छावणी घ्या. नाहीतर अंतःपुर घ्या, सर्वत्र भटांचा सुळसुळाट. बर्याला भट, वाईटालाही भटच. उलट सल्ला भटाचा आणि सुलट सल्लाही भटाचाच. शनीची साडेसाती जरी साडेसात वर्षांची असते. तरी भटांची पावणेआठी हिंदुस्थानातल्या प्रत्येक हिंदू राजाच्या सिंहासनाच्या पिंडाला जी एकदा अतिप्राचीन काळी झोंबली आहे, ती काही केल्या सुटत नाही. आपत्तीत सापडलेल्या राजाला ही भटसेना एकदा का उपायावर उपाय सुचवू लागली, की प्रत्येकाचा कानमंत्र निराळा, एक म्हणतो असे करावे, दुसरा म्हणतो तसे करावे. शंभराचे शंभर सल्ले, सर्वांचे सल्ले एकदा का या संकटग्रस्त राजावर हल्ले चढवून स्वार्थाचे डल्ले हबकू लागले की वैतागून जाऊन तो अडला नारायण अखेर गाढवाचे पाय धरतो. याची उदाहरणे आज आपल्या नजरेसमोर प्रत्यक्ष घडत आहेत. ब्राह्मणी भटांच्या किंवा ब्राह्मणेतरी भटाच्या पायांवर कपाळे घासून आपल्या फुटक्या दैवाचे सांधे सांधले न जाता उलट तणावतात आणि त्यांच्या पवित्र मसलतीने आजपर्यंत अनेक शहाणे राजे नरातले नारायण असताही अखेर या गाढवांचे पाय धरून प्रत्यक्ष गाढव बनतात, तरीही भटांची पायचाटी करण्याचा गाढवपणा बर्याच पदधारी व पदच्युत हिंदु राजांना अजून सुटत नाही, या भटी पावणेआठचे माहात्म्य लिहिणारा तात्याजी महिपति कधी अवतरणार कोण जाणे!
या तिसर्या प्रकरणाच्या शेवटी प्रबोधनकार लिहितात, आश्चर्याची गोष्ट एवढीच की कोणीही या कहाणीतले सत्य शोधण्याचा प्रयत्न करीत नाही. भाविक लोक लिहिला मजकूर अक्षरशः खरा मानतात. ज्ञान आणि अज्ञान यांच्या मध्यावर कोठेतरी असलेले, परंतु शिक्षित (एज्युकेटेड) म्हणून मिरवणारे माध्यमिक लोक काही गोष्टी खर्या व काही गोष्टी खोट्या मानतात; आणि विशेष ज्ञान्यांकडे पाहावे तो ते ह्या दोनही प्रकाराच्या लोकांना मूर्खात ढकलून आपल्या विद्वत्तेच्या हिमालयात थंडगार बसतात; किंवा स्वतःच्या अक्कलकाढ्याला विशेष रामायण ठरविण्यासाठी जसा वारा वाहील तशी खंडन मंडनाची पाठ फिरवतात.
चौथ्या प्रकरणापासून खर्या अर्थाने शनिमाहात्म्याच्या भाष्याला सुरुवात होते, असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. या प्रकरणाचं नावच आहे, शनिमाहात्म्याकडे पाहण्याची दृष्टी. त्याच्या पहिल्याच परिच्छेदात प्रबोधनकार एक भारी प्रश्न विचारतात आणि त्याचं नेमकं उत्तरही देतात, शनिमाहात्म्य म्हणजे एक काव्य. त्यातील तत्त्वांवर कवीच्या कल्पनेचे चढलेले वारूळ नीट बाजूला काढल्याशिवाय त्यात बसलेला तत्त्वरहस्याचा वाल्मिक मुनी दिसायचा नाही. विक्रमाच्या साडेसातीची कथा म्हणजे एका जिवंत खर्याखुर्या राजाच्या हालअपेष्टांची कहाणी मानली, तर त्यातल्या अनेक अशक्य गोष्टींचे समर्थन कोणालाही साधणे शक्य नाही; साधले किंवा तसा कोणी प्रयत्नच केला तर तो विवेकाला पटणार नाही. अर्थात हे काव्य कोणत्या तत्त्वरहस्याचे प्रतिपादन करण्यासाठी कवीने लिहिले, ह्याची बिनचूक दृष्टी आपण ठेवली, तर त्यातील अशक्य गोष्टीतील कल्पनेचेही वास्तविक स्वरूप आपणास पटत जाईल. आता विक्रमाच्या दरबाराचीच गोष्ट घ्या. तेथे त्याने शनीचाr कुचाळी केली नसती, तर शनीची साडेसाती आलीच नसती काय? गणिती अंदाजाने विक्रमाच्या कन्या राशीला शनीची पीडा जर होणारच होती, तर त्यासाठी दरबार कशाला, पंडित कशाला, शनीची कुचाळी कशाला, दरबारात प्रत्यक्ष शनि आला कशाला आणि स्वतः धमकी देऊन गेला कशाला? पण कवीचे काव्य त्याशिवाय रंगले नसते.
पुढे याच प्रकरणात ग्रहदशेच्या फेर्यांचा उलगडा करायला सुरुवात केली आहे. निमित्त आहे शनिमाहात्म्यातल्या कहाणीचं, पण एकंदर मानवी आयुष्यात आणि स्वभावत नशीबाचं स्थान आणि त्यावरचा प्रयत्नवादाचा उपाय याचं विवेचन पुढे वाचायला मिळतं. पुस्तक मोठं असलं तरी पुढील काही आठवड्यात आपण ते थोडक्यात समजून घेणार आहोत.
