
एके घाई खेळता न पडसी डाई ।
दुचाळ्याने ठकसील भाई रे।
त्रिगुणांचे फेरी थोर कष्टी होसी ।
या चौघांची तरी धरी सोई रे।।१ ।।
खेळ खेळोनियां निराळाचि राही ।
सांडी या विषयाची घाई रे ।
तेणेचि खेळे बसवंत होसी ।
ऐसे सत्य जाणे माझ्या भाई रे।।२ ।।
सिंपियाचा पोर एक खेळिया नामा ।
तेणे विठ्ठल बसवंत केला रे।
आपुल्या सवंगडिया सिकवूनि घाई ।
तेणे सतंतर फड जागविला रे ।
एक घाई खेळता तो न चुके चि कोठे ।
तया संत जन मानवले रे।।३ ।।
ज्ञानदेव मुक्ताबाई वटेश्वर चांगा ।
सोपान आनंदे खेळती रे ।
कान्हो गोवारी त्यांनी बसवंत केला।
आपण भोंवती नाचती रे ।
सकळिका मिळोनि एकचि घाई ।
त्याच्या ब्रम्हादिक लागती पायी रे।।४ ।।
रामा बसवंत कबिर खेळिया ।
जोडा बरवा मिळाला रे ।
पांचा सवंगडिया एकचि घाई।
तेथे नाद बरवा उमटला रे ।
ब्रम्हादिक सुरवर मिळोनिया त्यांनी ।
तो ही खेळ निवडिला रे ।।५ ।।
ब्राम्हणाचा पोर खेळिया एका भला ।
तेणे जन खेळकर केला रे ।
जनार्दन बसवंत करूनिया ।
तेणे वैष्णवांचा मेळ मेळविला रे ।
एक चि घाई खेळता खेळतो ।
आपणचि बसवंत जाला रे ।।६ ।।
आणिक खेळिये होउनिया गेले ।
वर्णावया वाचा मज नाही रे ।
तुका म्हणे गडे हो हुशारूनि खेळा । पुढिलांची धरूनियां सोई रे ।
एकचि घाई खेळता जो चुकला ।
तो पडेल संसारडाई रे ।।७ ।।
तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या गाथेत टिपरीचे सात अभंग आहेत. त्यातील सहा अभंग तुकाराम महाराजांचे आहेत. सातवा अभंग तुकाराम महाराजांचे बंधू कान्होबा महाराजांचा आहे. टिपरी या शीर्षकाखालील सहा अभंगांतील हा दुसरा अभंग आहे. त्यातून तुकोबाराय वारकरी संप्रदायाच्या इतिहासाचा ओघ सांगतात. त्याचबरोबर या संप्रदायातील प्रमुख संतांच्या कार्याचा संक्षेपाने आढावा घेतात. या अभंगात तुकोबारायांनी संप्रदायाचे प्रमुख चार संत सांगितले आहेत. त्यात नामदेवराय, ज्ञानोबाराय, कबीर आणि एकनाथ महाराज आहेत.
हे सहा अभंग तत्कालीन वारकरी संप्रदाय समजून घेण्याच्या दृष्टीने फार महत्त्वाचे आहेत. त्यांतून त्या काळातील वारीचं चित्रण केलेलं आहे. हे वारीचं चित्रण करत असताना खेळाचं रुपक वापरलेलं आहे. सुरुवातीला त्यांनी हा खेळ वारकरी संतांच्या तत्त्वज्ञानाशी एकरुप होऊन खेळण्याची सूचना केलेली आहे. एकरूप न होता तो खेळला तर संसाराचा डाव अंगावर येतो. त्यामुळे सत्व, रज आणि तमोगुणाच्या फेरीत अडकून दुःख भोगावं लागतं. हा खेळ नीट खेळायचा असेल तर चार वारकरी संतांचा आदर्श ठेवायला ते सांगतात. त्यामुळेच ते ‘या चौघांची तरी आता धरी सोई रे’ असं म्हणतात. चौघांची सोय धरणं याचा अर्थ नामदेवराय, ज्ञानोबाराय, कबीर आणि एकनाथराय यांचा आदर्श घेणं असाच आहे. तरीही या अभंगाचा अर्थ लावताना वै. शंकर महाराज खंदारकर यांनी चौघांची म्हणजेच चार वेदांनी सांगितलेल्या मार्गाचा स्वीकार कर असा अर्थ लावला आहे. या अभंगात चार वेदांचा कोणताही उल्लेख नाही आणि निर्देशही नाही. इथे जो ‘चौघांचा’ हा शब्द आला आहे तो चार संतांचा या अर्थानेच आलेला आहे. वै. शंकर महाराज खंदारकर हे संप्रदायात गाथा भाष्यकार म्हणून प्रख्यात आहेत. ते वेदांती पठडीत तुकोबारायांच्या अभंगांचा अर्थ लावत असत. त्यामुळेच त्यांनी गाथेतल्या काही अभंगांचा अर्थ लावताना वेदांचा महिमा सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
वारकरी संप्रदायाने वेदांच्या बाबतीत फार सावध भूमिका स्वीकारलेली आहे. तुकोबारायांनी एका अभंगात ‘वाचा बोलो वेदनिती। करू संती केले ते ।।’ असं म्हटलेलं आहे. याचा अर्थ औपचारिक अर्थाने वेदांना मान्यता द्यायची पण आचरण करताना संतांचा आदर्श समोर ठेवायचा. आचरणात वेदांचा आदर्श समोर ठेवता येणार नाही. वेदांचा अधिकार उच्चवर्णीय पुरुषांपुरता मर्यादित असल्यानं बहुजन समाजाला त्याचा उपयोग नाही. वारकरी संप्रदायात बहुजन समाज मोठ्या प्रमाणात असल्यानं त्यांच्यासमोर आचरणासाठी वेदांचा नव्हे तर संतांचा आदर्श ठेवणं गरजेचं होतं. याच भूमिकेतून तुकोबाराय वारकरी संप्रदायाच्या खेळाची परंपरा सांगताना चार प्रमुख वारकरी संतांचा आदर्श घ्यायला सांगतात. हे चार संत, त्यांच्या कार्याची विशेषता, त्यांचे उपास्य दैवत आणि त्यांचे संघटन याचा फार संक्षेपाने आणि अचूकतेने उल्लेख केलेला आहे.
तुकोबाराय अभंगाच्या तिसर्या चरणात सांगतात की नामदेव हा शिंपियाचा पोरगा आहे. त्यांनी विठ्ठलाला आराध्य मानून या खेळाची सुरुवात केली. त्यांनी सवंगडी जमवले आणि त्यांना या खेळाची शिकवण दिली. त्यांनी स्वतंत्र फडाची निर्मिती केली. फड याचा अर्थ समूह. नामदेवराय हे या संप्रदायातील आद्य ज्ञात फडकरी. ते उत्तम संघटक होते. साहजिकच त्यांनी फडाच्या माध्यमातून संप्रदायाची बांधणी केली. गोरोबाकाका, विसोबा खेचर, चोखोबाराय, सावता माळी, नरहरी सोनार, जनाबाई आणि अशाच इतरही संतांची मांदियाळी नामदेवांनी निर्माण केलेली होती. हे संघटन उभं करुन त्यातून त्यांनी वारकरी संप्रदायाला नवी दिशा दिली. आचार-विचार दिला. त्यांनी या खेळात कोणतीही चूक घडू दिली नाही. त्यामुळेच सर्व संतमंडळीत ते सन्मान्य झाले.
खरंतर विसोबा खेचर, गोरोबाकाका, सावता माळी, जनाबाई हे संत नामदेवांपेक्षा वयाने मोठे होते. तरीही त्यांनी नामदेवांचं संघटनकौशल्य पाहून त्यांच्या नेतृत्वाला मान्यता दिली. यातील गोरोबा काका आणि विसोबा खेचर तर आधीपासून नाथ संप्रदायाशी संबंधित होते. विसोबा खेचर हे औपचारिक अर्थाने का असेना, पण नामदेवांचे गुरू होते. तरीही या सर्वांनी नामदेवांच्या नेतृत्वाखाली वारकरी संप्रदायाला बळ दिलं. नामदेवराय फडाचे प्रमुख झाले. ‘तया संत जन मानवले’ असं म्हणत तुकोबाराय तेच सांगतात. सकल संतांची मान्यता असल्यानेच नामदेवराय हे तत्कालीन वारकरी संप्रदायातील प्रमुख कीर्तनकार होते. मुख्य वारीच्या काळात वाळवंटात आणि राऊळातही कीर्तन करण्याचा मान नामदेवरायांनाच असायचा. यात ज्ञानदेव, जनाबाई आणि गोरोबाकाकांपासून सर्व वारकरी संत सहभागी असायचे. ते नामदेवरायांना कीर्तनात साथ करायचे, असं तत्कालीन संतांच्या अभंगाच्या वर्णनातून दिसतं. नामदेवरायांनी केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर पंजाबासह संपूर्ण उत्तर भारतात संघटन केलेलं आहे.
नामदेवराय संघटक होते तसे तत्त्वज्ञही होते. त्यामुळेच तुकोबाराय ‘आपुल्या संवगडीया शिकवुनी घाई’ असं म्हणतात. इथे ‘शिकवुनी’ हा शब्द महत्त्वाचा आहे. नामदेवरायांनी त्यांच्या सवंगड्यांना केवळ संघटित केलं नव्हतं तर त्याआधी त्यांनी त्यांना वारकरी तत्त्वज्ञानाची शिकवण दिली होती. त्याचबरोबर नामदेवरायांचा आणखी एक मुद्दा तुकोबाराय निदर्शनास आणून देतात, तो म्हणजे विठ्ठलभक्तीचा. वारकरी तत्त्वज्ञानाच्या भूमिकेतून विठ्ठलभक्तीची सुरुवात नामदेवरायांनी केली. त्या अगोदर विठ्ठलाची उपासना विविध स्वरुपात होत होती. नामदेवरायांनी विठ्ठलाच्या कथा लिहिल्या. विठ्ठलनामाचा महिमा सांगितला. वारी-भजन-कीर्तनाचा आचारधर्म दिला. आधीच्या भाविकांच्या विठ्ठलभक्तीला तात्विक अधिष्ठान दिलं. विठ्ठलभक्तांचं संघटन केलं. तुकोबाराय या अभंगातून सांगतात की नामदेवरायांनी या खेळात विठ्ठलाला बसवंत केलं.
अभंगाच्या चौथ्या चरणात तुकोबाराय या खेळातील आदर्श अशा दुसर्या संताचे नाव सांगतात. हे आहेत ज्ञानदेव. नामदेवांनी विठ्ठल म्हणजे हरीभक्ती शिकवली तर ज्ञानदेवांनी कृष्णभक्ती शिकवली. त्यांनी ‘कान्हो गोवारी’ म्हणजे कृष्ण बसवंत केला. ज्ञानदेवांच्या घरात विठ्ठलभक्ती होती. तिची तात्विक भूमिका विशद करुन नामदेवांनी खेळ सुरू केला होता. तिला कृष्णभक्तीचं तात्विक अधिष्ठान ज्ञानदेवांनी दिलं. त्यांनी कृष्णोक्त गीतेवर मराठीत भाष्य लिहून नामदेवांच्या कार्याला बळ दिलं. कृष्ण-विठ्ठलाची एकरुपता वारकरी संप्रदायात होतीच, तिची तात्त्विक संगती ज्ञानदेवांच्या गीताभाष्यामुळे अर्थात ज्ञानेश्वरीमुळे लागली. त्यामुळेच ज्ञानदेवांनी कान्हो गोवारी बसवंत केला असं तुकोबाराय म्हणतात.
त्यानंतर तुकोबाराय ज्ञानदेवांची लोकसंग्रहाची भूमिका स्पष्ट करुन सांगतात. सहसा आपण नामदेव हे संघटक तर ज्ञानदेव हे तत्त्वज्ञ म्हणून बघतो. इथे तुकोबाराय मात्र नामदेवांची तत्त्वज्ञाची भूमिकाही मांडतात आणि ज्ञानोबारायांची लोकसंग्रहाची भूमिकाही मांडतात. सहसा तत्त्वज्ञ हे लोकसंग्रहाच्या खटपटीत पडत नाहीत. त्यात ज्ञानदेव तत्त्वज्ञ तर आहेतच, पण सोबतच ते योगीही आहेत. योगी आणि तत्त्वज्ञ हे सहसा आत्ममग्न असतात. ते सहसा लोकसंग्रह करत नाहीत. इथे ज्ञानदेव तत्त्वज्ञानाच्या बाबतीत तुकोबा म्हणतात त्याप्रमाणे ‘ज्ञानियांचे राजा’ आहेत. प्लेटोने ‘तत्त्वज्ञ राजा’ अशी कल्पना मांडली होती. इथे ज्ञानदेवांच्या बाबतीत ते ‘तत्त्वज्ञांचा राजा’ आहेत. पण तरीही त्यांची लोकसंग्रहाची वृत्ती असल्यामुळे ते ‘तत्त्वज्ञ लोकसंघटक’ आहेत. लोकसंग्रहाला कमी लेखण्याची एक प्रवृत्ती भारतात पूर्वीपासून आहे. त्यामुळे ज्ञानदेवांची लोकसंग्रहाची प्रतिमा कोणी पुढे आणली नाही. ती पहिल्यांदा तुकोबारायांनीच पुढे आणली आहे. या अभंगात तुकोबाराय सांगतात की ज्ञानदेवांनी सोपानकाका, मुक्ताई आणि चांगदेवादी संतांना या खेळात एकत्र जमवलं. ज्ञानदेवांची ही प्रभावळ तुकोबारायांनी आणखी एका अभंगातही तुकोबारायांनी ‘जयाने घातली मुक्तीची गवांदी। मेळवली मांदी वैष्णवांची ।।‘ अशा शब्दांत मांडली आहे. ज्ञानदेवांनी पसायदानात ‘ईश्वरनिष्ठांची मांदियाळी’ निर्माण व्हावी अशी आळी निवृत्तीनाथांजवळ व्यक्त केलेली होती. ती प्रत्यक्षात यावी म्हणून स्वतः ज्ञानदेवांनीही वैष्णवांची मांदियाळी मेळविली होती हे तुकोबाराय सांगतात. ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीत ‘मार्गाधारे वर्तावे। विश्व मोहरे लावावे। अलौकीक नोहावे। लोकांप्रती ।।’ असं म्हणत लोकसंग्रहाची भूमिका मांडलेली आहे. हेच वैशिष्ट्य तुकोबाराय या अभंगात मांडतात.
अभंगाच्या पाचव्या चरणात तुकोबाराय या खेळातील कबीरांची भूमिका सांगतात. कबीरांनी रामाला बसवंत केलं असं तुकोबाराय म्हणतात. वास्तविक पाहता ‘रामकृष्णहरी’ हा वारकरी संप्रदायाचा मंत्र आहे. या मंत्रातील हरिभक्ती नामदेवांनी, कृष्णभक्ती ज्ञानदेवांनी आणि रामभक्ती कबीरांनी शिकवली आहे असं तुकोबाराय सांगतात, हे लक्षवेधक आहे. या संप्रदायात त्या काळात नामदेव, ज्ञानदेव आणि कबीर हेच प्रमुख तीन संत मानले जात होते. या तिघांचा वारसा अनुक्रमे तुकोबाराय, एकनाथराय आणि शेख महंमदबाबा यांनी चालवला. त्यामुळेच ‘नामाचा तुका, ज्ञानाचा एका आणि कबीराचा शेखा’ अशी लोकोक्ती महाराष्ट्रात प्रचलित झाली. तुकाराम्ाांच्या या रचनेबरोबर आणखी एक रचना लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांच्या लिखाणात सापडते. त्यात वारकरी संप्रदायातील पाच प्रमुख संतांचा उल्लेख आहे. ही रचना आजरेकरांसारख्या पारंपरिक वारकरी फडांवरही म्हणतात. या रचनेत नामदेवराय, ज्ञानोबाराय, कबीर, एकनाथ आणि तुकोबाराय या पाच संतांचा उल्लेख आहे. कबीरांचा तुकोबारायांच्या अभंगांवर खूपच प्रभाव होता याचे अनेक दाखले सापडतात. तुकोबारायांच्या जवळपास पाच-सहा अभंगात कबीरांचा उल्लेख आला आहे. अगदी अलीकडच्या काळापर्यंत वारकरी संप्रदायात अनेक कबीरपंथी महंत होते. असेच एक कबीरपंथी वारकरी महंत महात्मा फुल्यांना भेटले होते. त्याचा वृत्तांत स्वतः फुल्यांनी लिहिला आहे. तो त्यांच्या समग्र वाड़मयात सापडतो. त्याचबरोबर सत्यशोधक समाजातील बहुतेक कबीरपंथी महंत हे वारकरी होते. सन्नितीसार ही सत्यशोधक कीर्तनमालिका लिहिणारे ओतूरचे रामदासबाबा लोंढे आणि विठ्ठल रामदासबाबा लोंढे हे पितापुत्र वारकरी संप्रदायातील होते. त्यांच्या भावकीतील पंढरीनाथ लोंढे-कबीरबुवा, तुकारामबाबा कबीरबुवा आणि केशवबापू कबीरबुवा हे लोंढे-कबीरबुवांचे घराणे आळंदीतील प्रसिद्ध वारकरी घराणे आहे.
(उत्तरार्ध पुढील अंकी)

