
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे यंदाचे शंभरावे वर्ष आहे. त्यामुळे संघाच्या उदात्तीकरणासाठी दिल्ली ते गल्लीपर्यंत कोणतीही कसूर राहणार नाही, हे तर त्रिकालाबाधित सत्य आहे. ‘हवं होतं ते मिळालं’ असंच आहे.२०१४ पासून आजवर संघाच्या कार्यक्रमांना किंबहुना संघाला राजमान्यता मिळालेलीच आहे. आणि नोंदणीकृत नसलेल्या (सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या सांगण्यानुसार) संघाचा शतकमहोत्सव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून खालच्या कार्यकर्त्यांपर्यंत धुमधडाक्यात साजरा करण्यात येतो आहे. अगदी १०० रुपयांच्या नाण्यांपासून अखंड भारताचे स्वरूप असलेल्या भारतमातेचेही नाणे प्रकाशित करण्यात आले आहे.
आता तर ‘शतक’ हा संघाच्या १०० वर्षांच्या प्रवासावर आधारित एक माहितीपट/चित्रपट प्रदर्शित करण्यात आला आहे, जो २० फेब्रुवारी २०२६ रोजी प्रदर्शित झाला. आशिष मल्ल दिग्दर्शित या चित्रपटात सुप्रसिद्ध अभिनेता अजय देवगण याने निवेदकाची भूमिका बजावली आहे, जो संघाचा इतिहास आणि त्याग अधोरेखित करतो. या चित्रपटाचा निर्माता वीर कपूर आहे. या चित्रपटाचा एक खास खेळ नुकताच ऑपेरा हाऊस येथील ‘रॉक्सी मुक्ता ए २’ या चित्रपटगृहात संघ आणि भाजपच्या कार्यकर्त्यांसाठी दाखविण्यात आला. एरवी मैदानात भरणारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाखा चक्क रॉक्सी चित्रपटगृहात भरली असल्याचा आभास या निमित्ताने होत होता. कारण मूळ चित्रपट सुरू होण्यापूर्वी संघाच्या पदाधिकार्यांनी सर्वांना ‘दक्ष आरम’ असा आदेश दिला. ‘सावधान विश्राम’ झाल्यानंतर चक्क संघाच्या शाखेत म्हणण्यात येणारी ‘नमस्ते सदा वत्सले मातृभूमे’ ही प्रार्थना सर्वांनी अगदी हात छातीशी घेत खड्या आवाजात म्हटली. पुन्हा ‘दक्ष आराम’ झाल्यानंतर ‘जन गण मन’ हे राष्ट्रगीत झाले आणि मग पूर्ण लांबीचा ‘शतक’ हा चित्रपट दाखविण्यात आला.

शंभर वर्षांच्या वाटचालीचा हा चित्रपट म्हणजे डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्यापासून तर आताचे (२००९पासून असलेले) डॉ. मोहन भागवत यांच्यापर्यंत सर्वच सरसंघचालकांच्या कारकीर्दीचा आढावा घेतला असावा, असे वाटले होते. परंतु काँग्रेसमधून बाहेर पडून संघाची १९२५ साली स्थापना करणार्या डॉ. केशव हेडगेवार, माधव गोळवलकर (श्री गुरुजी) आणि बाळासाहेब देवरस यांच्या सुरुवातीच्या काळातील घटना तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ते श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी १९५२ साली स्थापन केलेल्या ‘भारतीय जनसंघ’ या संघाच्या राजकीय वारसा सांगणार्या पक्षाचा प्रारंभीचा काळ एवढेच चित्रीकरण आपल्याला पाहायला मिळते. संघाचे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात योगदान नाही, संघाचा राष्ट्रीय पातळीवर केंद्र सरकारशी कोणताही संबंध नाही, असे सांगण्यात येते. परंतु हा चित्रपट पाहताना संघानेच सारे काही घडविले. अगदी तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी विनवणी केल्यावरुन गुरुजी गोळवलकर यांनी आपल्या स्वयंसेवकांना घेऊन पाकिस्तानला धडा शिकवला असल्याचे दाखविण्यात आले आहे. डॉ. हेडगेवार यांच्या बालपणापासूनची कहाणी, डॉ. हेडगेवार आजारी पडतात आणि आपले उत्तराधिकारी गोळवलकर गुरुजी यांच्या नावाची घोषणा करतात मग गोळवलकर गुरुजी इहलोकीची यात्रा संपविण्याच्या सुमारास बाळासाहेब देवरस यांना आपले अनुगामी म्हणून नियुक्त करतात, इथवर हा ‘शतक’ (म्हणजे खरं तर ‘पाव शतक’) स्वयंसेवकांच्या दृष्टीस पडतो.
२१ मार्च २००९ पासून डॉ. मोहन भागवत हे सरसंघचालकपदावर कार्यरत आहेत. संघस्थापनेपासून आतापर्यंत सहा प्रमुख सरसंघचालक राहिले आहेत, ज्यांनी संघाचे नेतृत्व आणि वैचारिक दिशा निश्चित केली आहे, असे सांगण्यात येते. म्हणजे २००९पासूनच्या तीन सरसंघचालक यांच्या कारकीर्दीचा आढावा आगामी चित्रपटात घेण्यात येऊ शकतो, असे म्हणायला हरकत नाही.
या चित्रपटात अटल बिहारी वाजपेयी लालकृष्ण अडवाणी ते नरेंद्र मोदी यांच्या कारकीर्दीवर प्रकाशझोत टाकण्यात आलेला नाही. नरेंद्र मोदी यांचे सरकार २०१४ रोजी स्थापन होण्यासाठी संघाच्या सुमारे ११ कोटी स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले असल्याचे सांगण्यात येते. परंतु भाजपचे माजी अध्यक्ष जयप्रकाश नड्डा यांनी तर संघाचा काही संबंध नाही असे ठासून सांगितले होते. आणि अलिकडच्या काळात भ्रष्टाचारमुक्त भारताऐवजी भ्रष्टाचारयुक्त भाजप तसेच ़काँग्रेसमुक्त भारत ऐवजी काँग्रेसयुक्त भाजप अशी भाजपची परिस्थिती असल्याचे दाखवावे लागले असते.
या चित्रपटावरुन राष्ट्र सेवा दल आणि समाजवादी चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी बोध/धडा घ्यायला हरकत नसावी. कारण स्वातंत्र्यलढ्यात जे नव्हते, ज्यांचे काहीच योगदान नाही, ते जर एवढे उदात्तीकरण करु शकतात (हा तर त्यांच्या डाव्या हातचा मळ आहे) तर ‘बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो’, ‘सदैव सैनिका पुढेच जायचे, न मागुती तुवा कधी फिरायचे’ अशी किंबहुना यासारखी असंख्य स्फूर्तीगीते लिहिणार्या महाराष्ट्र माऊली पूज्य साने गुरुजी, वसंत बापट, राजा मंगळवेढेकर, शाहीर लीलाधर हेगडे, शाहीर दादा कोंडके, निळू फुले अशांची मांदियाळी असलेल्या साथींच्या वारसदारांनी नवनवीन चित्रपट प्रदर्शित करायला हरकत नाही. सरकारी कर्मचार्यांना संघाच्या शाखेत जायला असलेली बंदी भाजपच्या अधिपत्याखाली असलेल्या सरकारने उठविली आहे. संघ्ााच्या शताब्दी वर्षानिमित्त ‘शतक’ दाखवितांना आणि चित्रपटगृहात भरणार्या शाखांपाठोपाठ मंत्रालयाच्या त्रिमूर्ती प्रांगणात सुद्धा भविष्यात संघाच्या शाखा भरल्या तर आश्चर्य वाटायला नको. आणखी काय काय पहायला मिळणार हे येणारा काळच ठरवेल.
जय लोकशाही!
(लेखक ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आहेत.)

