• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

गंध नवारंभाचा… भिंतीरंगाचा!

वैभव भाल्डे (सु-गंध)

marmik by marmik
March 17, 2026
in विशेष लेख
0
गंध नवारंभाचा… भिंतीरंगाचा!

गेल्या आठवड्यात ठाकुरांच्या उत्सवामुळे मी एकटाच दोनतीन दिवस अनुबंधमधील घरी राहिलो. काहीतरी शोधताना नवे जुने बरेच कप्पे धुंडाळत होतो. त्यात एक नूतनीकरणानंतर बहुदा कायम बंद राहिलेला कप्पा उघडला अन भिंतीच्या रंगाचा नवेपणाचा गंध नाकाला एकदम जाणवला! काहीसा मंद झाला असला तरी मूळचा तीव्र आणि रंगाचा ठरावीक गंध, कप्प्यातील छान स्वच्छ भिंती नूतनीकरणाच्या, नवारंभाच्या खुणा ठळकपणे मिरवत असल्या तरी मी मात्र काहीसा भूतकाळात रमलो…

…श्री रामकृष्ण मठाला अगदी लागून असलेले अनुबंध हे बरेच जुने गृहसंकुल. जवळपास गेल्या दहा बारा वर्षांपासून आम्ही तिथे वावरतोय. आता स्वतःच्या झालेल्या ह्या वास्तूत पूर्वी भाड्याने राहायचो तेव्हाही एक निराळीच प्रसन्नता जाणवायची तिथे. बाहेर सदैव वर्दळ असलेला रस्ता असला तरी ह्या परिसरात एक शांतता भरलेली असते, कायमच. पर्वतीचं रम्य दर्शन, मठप्रांगणाचा घरबसल्या मिळणारा सत्संग आणि सगळीकडे बहरलेली सुरेख हिरवाई ही खास वैशिष्ट्ये. घर म्हटलं तर चार खोल्यांचंच पण ऐसपैस, छान हवा-उजेड असलेलं. गेल्या वर्षी घर विकत घेतलं तेव्हा राहायला जाण्यापूर्वी काही आवश्यक डागडुजी, सोयी तसेच रंगकाम करून घेतले. मुळातच प्रसन्न असलेल्या त्या वास्तूनं जणू कातंच टाकली मग. नवारंभाची ती नांदीच की. भिंतीचा रंग घासून काढणं, मग सगळीकडे बारकाईने बघून कुठे असलेल्या बारीकसारीक भेगा पुट्टीने बुजवणं वगैरे सोपस्कार पार पाडत अखेरीस प्रायमरचा पहिला हात लागला तेव्हाच एक वेगळंच नवेपण जाणवायला लागलेलं. मुख्य रंगाचे दोन हात देऊन झाले नी मग तर एकदमच नवेपण आले घराच्या कोपर्‍या नी कोपर्‍याला. ही सगळी प्रक्रिया म्हटलं तर त्या भिंतींसाठी त्रासदायकच होती, नाही का? वर्षानुवर्षं ज्या रंगाने इमानेइतबारे साथ दिली त्याला जाताना बघणं, नव्या पुट्टीशी नव्या रंगाशी जुळवून घेणं… मात्र त्या भिंतींने हा बदल स्वीकारला म्हणून तर नवारंभाच्या साक्षीदार ठरल्या की हो त्या!

जुनं कितीही कवटाळावंसं वाटलं तरी वाटचाल नव्या भविष्याकडेच करावी लागते नाही का आपल्यालाही? साचलेल्या पाण्याची दुर्गंधी येते पण नदीचा प्रवाह जीवनदायी बनतोच की. हा बदल घडवणं, स्वीकारणं सोप्पं नक्कीच नसतं पण खरंच अशक्यही नसतं, नाही का? मूळ तत्व व प्रवृत्ती सांभाळत स्थळकाळपरिस्थितीनुरूप केलेले सकारात्मक बदल सर्वार्थाने आवश्यक तर असतातच, पण फायद्याचेही ठरतात. सकारात्मक नवारंभ हा कायम नवसृजनाची, नवचैतन्याची व नवआयामांची कवाडंच खुली करतो.

नेमकं काय हो मग बदलवायंचं? केवळ बाह्यरूप बदलवून फार लांबचा टप्पा तर नाहीच गाठता येत, पण एकदा का आतून काही गोष्टी अंगीकारायला सुरुवात केली की सुयोग्य बदल जाणवायला लागतात. विचारांची दिशा, दृष्टिकोन आणि मानसिकता लवचीक, प्रवाही ठेवली तर आपला प्रत्येक क्षण हा नवारंभी होतो! जुनं सोडायंचं म्हणजे विसरायचं नक्कीच नाहीये, त्यातल्या मूळच्या चांगल्या गोष्टींच्या पायावरच हा नवा मनोरा रचला जाऊन तग धरू शकतो हे नक्की. मात्र केवळ त्या स्मरणरंजनाच्या वाटेनीच जायचे म्हटले तर सुरू होणारा उलटा प्रवाह फारसा टिकू शकत नाही. मुळातच असलेल्या दृढ धारणा, शिकवणी व अनुभवसिद्ध उपाय हे गरजेनुसार काहीसे बदलवले की त्यांची व्याप्ती कैकपटीने वाढते.

मुळात गीतेमध्ये श्रीकृष्णानी अर्जुनाला सांगितलेलं भारतीय तत्वज्ञान भारताबाहेर पोहोचणं आणि रुजणं कसं शक्य झालं बरं? स्वामी विवेकानंदांनी जेव्हा त्याच तत्वांच्या आधारावर, मूळ आशयाला धक्का न लावता व्यावहारिक वेदांत सांगितला तेव्हाच नं? योगांविषयी गीतेत असलेल्या टिप्पणीलाच अनेक पैलूंनी उलगडवत जेव्हा स्वामीजी प्रत्येक योगावर भाष्य करतात, ते केवळ पुराणातील वानगी न राहता जगण्याचा नवा मूलमंत्र देऊन जातात. जातीधर्माच्या बोजड कल्पनांबाहेर पडून सर्वात आधी माणूस म्हणून एकमेकांकडे बघणार्‍या माताजी श्री सारदादेवी व भगिनी निवेदिता ह्यापण नवारंभांचे एक नवे दालन नकळत उघडून गेल्यात, नाही का?

तुम्हाआम्हाला हा नवारंभ वेळोवेळी साधावाच लागतो, इच्छा असो वा नसो. होणारा बदल प्रारंभिक अवस्थेत दरवेळीच सुखावह असतो असेही नाही, पण त्याकडे पाठ फिरवण्याचा करंटेपणा केला तर आपलीच कुपमंडुक वृत्ती जाहीर होते. त्या मूळच्या पक्क्या भिंतींनी जसा तो पक्केपणा कायम राखत आवश्यक तो नवा बदल सहजच स्वीकारला आणि त्यांनाच नवी झळाळी लाभली तसेच आपल्यातल्या सकारात्मक गुणांची कास पक्की धरत, आपणही आवश्यक ते बदल स्वीकारले की नक्कीच नवचैतन्याचे, प्रगतीचे अनेक नवारंभ निनादतील आणि ह्या नरदेहाचे सार्थक होईल ह्यात दुमत नसावे…

Previous Post

महागडी आणि वेळखाऊ रो रो रो रो ऽ

Next Post

दागिने कोणी चोरले?

Next Post
दागिने कोणी चोरले?

दागिने कोणी चोरले?

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.