एखादे वाक्य बोलत असताना काही क्षणांचा पॉज घेणे, उगाचच एखादे वाक्य ऐकल्यावरती शेजारी उभ्या असलेल्या हवालादाराकडे सहेतूक बघणे आणि ह्या सगळ्यातून तो सर्वांकडेच संशयाने पाहतो आहे हे दाखवण्याची त्याची पद्धत ह्या सर्वांची कोळसे-पाटील मनातल्या मनात व्यवस्थित नोंद घेत होते.
हातातल्या पेपरवेटला गोल गोल फिरवत, समोर टेबलावर पडलेल्या सोनेरी बटणाकडे इन्स्पेक्टर ध्रुव मोहिते एकटक पाहात बसला होता.
`सर.. मोहिते सर’ जाधव हवालदारांनी ह्यावेळी घाबरतच पण जरा चढ्या आवाजात हाक मारली. कारण समोरच्या टेबलावरती बसलेले सूत, हे कधी भूत बनेल ह्याची खात्रीच देता यायची नाही.
ध्रुव मोहिते म्हणजे मुंबई पोलिस खात्याचा उगवता ताराच होता म्हणा ना.. मुंबईत आला तोच मुळी बढतीवरती. आल्याआल्या पहिली केस कुठली मिळाली असेल, तर ’सोनगाव पतपेढी रॉबरी’ची. पठ्ठ्याने आठवड्यात मुद्देमालासकट चोरांना आता घेतले. त्यानंतर उद्योगपती बिहाणी खून प्रकरण असो किंवा गुरुनानी चाळीतले जळीत हत्याकांड.. प्रत्येकवेळी ध्रुवने गुन्हेगाराच्या मुसक्या शिताफीने आवळलेल्या होत्या. ध्रुवचा कामाचा आवाका, कामाबद्दल त्याची निष्ठा आणि कुठल्याही केसमध्ये स्वत:ला झोकून देण्याची त्याची वृत्ती ह्यामुळे थोड्याच काळात तो वरिष्ठांचा लाडका `ध्रुव द संकटमोचक’ बनला होता. म्हणूनच ह्यावेळी कमिशनर कारंडेनी अत्यंत नाजूक अशी एक केस ध्रुववरती सोपवली होती. माजी राज्यमंत्री विश्वासराव कोळसे-पाटील यांची सून रक्षंदा त्यांच्याच बंगल्यात मृतावस्थेत सापडली होती. गोळी झाडून तिचा खून करण्यात आला होता आणि गोळी कमी पडेल असे वाटले म्हणून की काय, त्या नराधम खुन्याने तिच्या डोक्यात कुठल्याश्या जड वस्तूचा प्रहारदेखील केलेला होता. हा एकूणच खूनाचा प्रकार आणि हाय प्रोफाइल केसचे गांभीर्य बघता, कमिशनर साहेबांनी तत्काळ ध्रुवला पाचारण केले होते.
बंगल्यात शिरल्या क्षणीच ध्रुवने केसचा ताबा घेतला. फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोचलेली होतीच, तिने आपले काम देखील सुरू केलेले होते. त्यांना त्यांच्या कामासाठी एकांत देत ध्रुवने बंगल्यातील इतर गोष्टींकडे आपला मोर्चा वळवला. कोळसे-पाटील स्वत: दुष्काळी दौर्यावरती गेलेले होते, ते बातमी मिळताच तडक माघारी यायला निघाले होते. कोळसे-पाटीलांचा मुलगा अर्थात रक्षंदाचा पती दुर्गेश बेपत्ता होता आणि त्याचा फोनही ’आऊट ऑफ कव्हरेज’ येत होता. ध्रुवने सगळ्यात आधी टेक्निकल टीमला दुर्गेशच्या फोनचे लोकेशन ट्रेस करण्याच्या कामाला लावले. आधुनिक तंत्रज्ञान हे अशा गुन्ह्यांची उकल करताना किती प्रभावी ठरते, हे नव्या पिढीचा ध्रुव चांगलाच ओळखून होता.
बंगल्याचा परिसर व इतर खोल्यांची तपासणी करून झाल्यावरती ध्रुवने नोकरांच्या खोल्यांकडे आपला मोर्चा वळवला. बंगला मोठा असला, तरी कामाला माणसे मोजकीच होती. मंगला मावशी आणि तिची नवर्याने टाकलेली मुलगी दुर्गा घरातील धुणी भांडी आणि स्वयंपाकाचे बघायच्या, तर मंगला मावशीचा नवरा बाग आणि बाजारची कामे सांभाळायचा. भोला नावाचा एक चौकीदार देखील होता, पण गावाकडे मामा वारल्याने, तो दोन दिवसांपूर्वीच गावाला गेलेला होता. घटना घडली, तेव्हा बंगल्यात फक्त मंगला मावशी आणि त्यांची मुलगी ह्या दोघीच होत्या. दोघींनीही कुठलाही आवाज किंवा झटापट झाल्याचे ऐकले देखील नव्हते, किंवा त्यांना तसे काही जाणवले देखील नव्हते.
नोकरांच्या चौकशा आटोपून ध्रुवने आपला मोर्चा आता घटनास्थळाकडे वळवला. फॉरेन्सिक टीमचे काम पूर्ण झालेच होते. रक्षंदाचा जीव गोळी लागताच गेला होता, मात्र त्यानंतरही डोक्यात दणकट वस्तूचा घाव घालण्यात आला होता. आजुबाजूला कोणतेही सामान विस्कटले नव्हते, किंवा झटापटीच्या देखील काही खुणा आढळत नव्हत्या. रक्षंदाच्या अंगावरचे किमती दागिने देखील जिथल्या तिथेच होते. म्हणजेच खून चोरीच्या उद्देशाने झाला नव्हता, हे नक्की.
’सर, घटना घडून जवळजवळ चार तास उलटून गेलेत. गोळी हृदयातून आरपार गेली आहे. अगदी हृदयावर बंदूक टेकवूनच गोळी झाडण्यात आलीये, असे म्हणालात तरी हरकत नाही.’ डॉ. भास्कर माहिती देत होते.. ’मृताच्या शरीरावर मारहाणीच्या कोणत्याही खुणा नाहीत आणि झटापट घडल्याचे देखील दिसत नाहीये.’
’याचाच अर्थ खून अगदी जवळच्या, विश्वासातल्या माणसाने केलेला आहे आणि तो असे काही करणार आहे, हे अगदी जवळ येईतो रक्षंदाला कल्पनेतही वाटले नसावे.’ ध्रुवने आपले मत मांडले.
पुन्हा एकदा घटनास्थळाची नीट पाहणी करून ध्रुवने प्रेत हलवण्याची व्यवस्था केली आणि कमिशनरसाहेबांना फोन लावला.
हां.. काय म्हणतोय तपास ध्रुव?’
’सर खून चोरीच्या उद्देशाने झाला नाहीये हे तर स्पष्ट दिसते आहे. खुनी विश्वासातलाच कोणीतरी आहे, हे देखील नक्की.’
’काही पुरावे वगैरे..?’
’सर मृत महिलेच्या मुठीत एक सोनेरी रंगाचे बटण सापडले आहे, ज्यावरती ‘ॐ’ कोरलेले आहे. बहुदा गोळी लागल्यावर खाली कोसळताना रक्षंदाने खून्याचाच आधार घेण्याचा प्रयत्न केला असावा आणि हे बटण तुटून तिच्याच हातात राहिले असावे.’
’हं! ध्रुव मला सांग, दुर्गेशचा काही तपास लागला?’
’माझी टीम पूर्ण प्रयत्न करते आहे सर. त्याच्या फोनचे लास्ट लोकेशन बंगल्याच्या आस्ापासचेच दाखवत आहे. खुनाच्या वेळी तो आसपासच होता हे नक्की! आता काही वेळातच कोळसे-पाटील साहेब बंगल्यावरती पोचतायत; त्यांच्या चौकशीत काही अधिक माहिती मिळते का, ते बघतो.’
’गुड गुड.. प्रगतीबद्दल मला कळवत रहा. आणि ध्रुव, तपास करताना जरा सांभाळून कर, माजी मंत्री असले, तरी पाटीलसाहेब राजकारणात अजून वजन राखून आहेत.’
’शुअर सर!’
’ध्रुव साहेब ध्रुवच ना? हा तर तुम्हाला वाटते तसे सुनबाई आणि दुर्गेशमध्ये काही गंभीर असे वाद नव्हते. हा, आता प्रत्येक घरात असते, तशी थोडीशी धुसफूस चालायची.. पण ती एखाद दिवसात शांत पण व्हायची. सूनबाई देखील शब्दाला शब्द देणारी, वाद घालणारी नव्हती, त्यामुळे वाद असे कधी ह्या वास्तूत घडलेच नाहीत.’
’पण जी काही धुसफूस व्हायची, तिच्या मागे नक्की कारण काय असायचे?’ ध्रुवने शांतपणे विचारले. समोर कोचावर बसलेला तरणाबांड इन्स्पेक्टर कितीही नम्रपणे वागत असला, तरी बोलताना त्याचे डोळ्यात डोळे रोखून बोलणे, मध्येच एखादे वाक्य बोलत असताना काही क्षणांचा पॉज घेणे, उगाचच एखादे वाक्य ऐकल्यावरती शेजारी उभ्या असलेल्या हवालादाराकडे सहेतुक बघणे आणि ह्या सगळ्यातून तो सर्वांकडेच संशयाने पाहतो आहे हे दाखवण्याची त्याची पद्धत ह्या सर्वांची कोळसे-पाटील मनातल्या मनात व्यवस्थित नोंद घेत होते. आज चाळीस वर्षें राजकारणात मुरलेले व्यक्तिमत्व होते शेवटी त्यांचे. त्यामुळे शक्यतो काहीही न लपवणेच चांगले हे त्यांनी ओळखले होते.
’आता तुमच्यापासून काय लपवायचे साहेब? दुर्गेशला दारू आणि बेटिंग ह्या दोन्हीचे प्रचंड व्यसन होते. त्याची आई त्याच्या लहानपणीच गेली आणि बाप म्हणून कधी त्याला आम्ही वेळ देऊच शकलो नाही..कमी पडलो. बरेचदा कानावर त्याचे पराक्रम यायचे, पण तरूण रक्त आहे, येईल भानावर म्हणून दुर्लक्ष केले. पण प्रकरण फारच हाताबाहेर जातंय लक्षात आल्यावरती शेवटी दोनाचे चार हात करून दिले. वाटले, आयुष्यात जोडीदार आल्यावरती तरी त्याची पावले घरात टिकतील. पण दोन महिन्यातच त्याचे जुने धंदे पुन्हा सुरू झाले आणि त्यावरूनच अध्ये मध्ये नवराबायकोच्यात खटके उडायचे’
’त्याच्याकडे फक्त दोनच मोबाइल नंबर आहेत? घरच्यांसाठी किंवा अगदी जवळच्या लोकांसाठी म्हणून एखाद अजून नंबर वापरात नाही?’
’माझ्या तरी माहितीत असा कुठला नंबर त्याच्याकडे नाही साहेब. आणि रागाने निघून गेला, की दिवस दिवस फोन बंद करून बसायची सवयच आहे त्याला.. विनाकारण संशयाने बघू नका लेकराकडे. हे असे झाल्याचे कळल्यावर त्याची काय अवस्था होणारे ह्याचीच मला काळजी लागून राहिली आहे. कित्येक वर्षांनी स्त्रीची माया मिळाली होती पोराला.. ही दोन व्यसनं सोडली ना साहेब तर हिरा आहे हो पोरगा.. फार जपायचा रक्षंदाला..’ कोळसे-पाटीलांचे वाक्य संपले आणि हवालदार जाधव लागबगीने आत येऊन ध्रुवच्या कानाशी वाकले, ’सर.. दुर्गेश सापडला आणि त्याच्या अंगावरच्या कुडत्याचे एक सोनेरी बटण गायब आहे सर’
– – –
’तर मिस्टर शेखर, गेली चार वर्षे तुम्ही कोळसे-पाटील साहेबांचे सहायक म्हणून काम बघताय. त्यांच्या राजकीय आणि खाजगी आयुष्याविषयी तुम्हाला बरेच काही माहिती आहे. मला त्यांच्यापेक्षाही त्यांचा मुलगा दुर्गेशविषयी जरा माहिती हवी आहे..’ समोर बसलेल्या कोळसे-पाटीलांच्या पीएला पाण्याचा ग्लास देत देत ध्रुव त्याचा अंदाजही घेत होता..
’मोहितेसाहेब, खरे म्हणजे मी साहेबांची बाहेरचीच कामे जास्ती बघतो. घरात माझा फारसा वावर नाही. कधी चहा वगैरे द्यायला आलेल्या वहिनींशी दोन चार गोष्टी बोलल्या जात होत्या, किंवा दुर्गेशसाहेबांची एखादी अडचण साहेबांपर्यंत पोचवायची असायची. ह्यापलीकडे माझा फारसा जिव्हाळा नव्हता.’
’आणि ह्या अडचणी कशा प्रकारच्या असायच्या शेखरजी? बेटिंगमध्ये हरलेले पैसे परत करायचे असायचे किंवा दारू पिऊन एखाद्या बारमध्ये झालेला राडा मिटवायचा असायच बरोबर ना?’ ध्रुवचा चेहरा शेखरच्या चेहर्यावरचे बदलते भाव टिपत होता ’आणि ह्यातल्या बर्याच अडचणी साहेबांपर्यंत न पोचवता, तुम्ही मधल्या मध्येच सोडवून द्यायचात. खरे ना?’
’म्हणजे साहेब’ शेखरच्या आवाजाला आता थोडा कंप जाणवायला लागला होता’ डॉ. गुलाटींच्या मॅटर्निटी होममध्ये नक्की कोणती अडचण सोडवायला गेला होतात तुम्ही शेखरजी?’ गोळीसारखा ध्रुवचा प्रश्न सुटला आणि शेखरचा हात कपाळावरचा घाम पुसायला रुमाल चाचपडायला लागला
– – –
थरथरते हात एकमेकांवरती चोळत, दुर्गेश इन्स्पेक्टर ध्रुवच्या समोर बसला होता.
’दुर्गेशजी खून झाला त्यावेळी तुम्ही कोठे होतात?’
’मी.. मी.. ते इथेच होतो.. मित्राच्या घरी. मॅच.. मॅच बघत होतो.’
’कोणाकोणाची मॅच होती दुर्गेशजी?’
’ऑ? नाही म्हणजे येवढे काही आठवत नाहीये आता’
’फक्त अठरा तास उलटलेत दुर्गेशजी.. येवढेही आठवत नाहीये? मी आठवण करून देऊ?’
’पंजाब आणि दिल्लीची मॅच होती साहेब.. हो हो.. बरोबर’
’चुकताय दुर्गेशजी.. मॅच होती रक्षंदा इलेव्हन व्हर्सेस दुर्गेश दुर्गा इलेव्हन काय बरोबर ना?’
आपल्या पायाला सुटलेली थरथर लपवण्यासाठी दुर्गेशनी दोन्ही पाय घट्टपणे एकमेकांजवळ ओढले आणि नजर झुकवली ’दुर्गा? तिचा काय संबंध ह्याच्याशी? ती तर घरातली एक साधी मोलकरीण आहे फक्त’ ध्रुवची नजर चुकवत दुर्गेश उत्तरला.
’मग दुपारी बंगल्याच्या पुढच्या दारातून बाहेर पडून, पुन्हा मागच्या दाराने आत येऊन, तिच्या रुममध्ये कशासाठी शिरला होतात तुम्ही दुर्गेशजी?’ करारी स्वरात ध्रुव गरजला आणि दुर्गेश फक्त खुर्चीवरून उडायचा बाकी राहिला…
– – –
’बोला शेखरजी काय काम काढले होतेत डॉ. गुलाटींकडे?’ ध्रुव शांतपणे एकेक प्रश्नांचे पत्ते शेखरसमोर टाकत होता.
’ते जरा राजकीय कामासंदर्भात मी त्यांना भेटायला गेलो होतो. साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गरोदर महिलांसाठी एक विशेष योजना राबवण्यासंदर्भात काही एक चर्चा करायची होती’
’एकाच आठवड्यात तीन वेळा चर्चा करायची गरज भासली तुम्हाला शेखरजी? आणि त्यातल्या एका चर्चेला तर दुर्गाने देखील हजेरी लावलेली. ती तर राजकारणाशी संबधित नाही आणि गर्भवती देखील नाही.. मग तिचे नक्की काय काय असावे हो तिथे?’ बोलता बोलता ध्रुव शेखरच्या शेजारी येऊन उभा राहिला आणि शेखरच्या पडलेल्या खांद्यावरती त्याने आपला मजबूत हात टेकवला ’दुर्गाला दिवस गेलेत.. बरोबर शेखरजी? आणि ही अडचण देखील साहेबांपर्यंत न पोचवता, तुम्ही सोडवायला धावलात. कोळसे-पाटीलांचे विश्वासू सेनापती…’
– – –
’रक्षंदाचा खून झाला, तेव्हा तुम्ही बंगल्यातच होतात दुर्गेशजी.. नाही नकार द्यायच्या आधी नीट विचार करा.. कारण तुमच्या मोबाईलचे लोकेशन आमच्याकडे आहे. ज्या बंदुकीने ही हत्या करण्यात आली, ती तुमच्याच मालकीची आहे. आणि हो.. एक जादू तुम्हाला दाखवायचीच राहिली की’ बोलता बोलता ध्रुवने आपल्या हातातले सोनेरी बटण दुर्गेशच्या समोर टेबलावरती ठेवले. ’हे आम्हाला मृत रक्षंदाच्या हातात सापडले..’
दुर्गेश सुन्नपणे टेबलावरच्या बटणाकडे पाहात राहिला
– – –
’दुर्गा.. न घाबरता सगळे खरे सांग. हे बघ जे घडायचे आहे, ते घडून गेलेच आहे. आता ह्यातून बाहेर कसे पडायचे आणि गुन्हेगाराला कसे अडकवायचे हे पाहायला हवे. तुला वाटते ना की तुझ्या ताईसाहेबांच्या खुन्याला शिक्षा व्हायला हवी? सबइन्स्पेक्टर अरुंधती प्रेमळ आवाजात संवाद साधत होत्या तर ध्रुव शांतपणे मोबाइल रेकॉर्डस तपासत बसला होता’
’दुर्गा तुला दिवस गेलेत ही गोष्ट खरी आहे?’ अरुंधतीच्या प्रश्नाने आधीच बावरलेल्या दुर्गाला रडूच फुटले आणि ती हमसून रडायला लागली. अरुंधतीने तिला पाणी पाजले आणि पाठीवर हात फिरवत तिला शांत केले.. ’बोल दुर्गा.. खरी आहे ही गोष्ट?’ ही गोष्ट तू, दुर्गेश आणि शेखर सोडला, तर अजून कोणाला कळली होती का? ह्या सगळ्या प्रकरणाचा आणि रक्षंदाच्या खूनाचा काय संबंध आहे? तिला सुद्धा हे सत्य कळावल्यामुळेच तिचा खून केला गेला का?’ अरुंधतीने आता थोड्या शांत झालेल्या दुर्गावरती प्रश्नांची फैरीच झाडली.
’मला काही काही माहिती नाही! ताईसाहेब खूप चांगल्या होत्या. मीच त्यांची फसवणूक केली, माझ्या हातून चूक झाली. शिक्षा देवाने मला द्यायला हवी होती’ दुर्गाने फाडकन स्वत:च्याच मुस्काडात मारून घेतली. अरुंधतीने पटकन पुढे होऊन तिचा हात धरला ’परिस्थितीच्या विचित्र चक्रात अडकलीये बिचारी तिची अवस्था बघून खरच दया आली..’ दारातून बाहेर पडलेल्या दुर्गाच्या पाठमोर्या आकृतीकडे पाहात अरुंधती म्हणाली.
’मला तर तिचा ऑस्करविनिंग अभिनय बघून जाम मजा आली’ डोळे मिचकावत ध्रुव म्हणाला आणि अरुंधती त्याच्या तोंडाकडे बघतच राहिली..
– – –
’साहेब, मोठ्या साहेबांना आधीच हृदयाचे दुखणे आहे, एक अॅटॅक येऊन गेलेला आहे. त्यात हे असे काही त्यांना समजले असते, तर काय झाले असते विचार करा. त्यात सहा महिन्यात राज्यात निवडणुका आहेत. साहेबांकडे मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून बघितले जाते आहे. अशात हे प्रकरण सार्वजनिक झाले असते, तर साहेबांची कारकीर्दच संपली असती.’ शेखर आता बराच सावरला होता.
’पण हे प्रकरण साहेबांसमोर यायलाच हवे आणि दुर्गाला न्याय मिळायलाच हवा असे रक्षंदाने मात्र ठाम ठरवले होते, हो ना शेखरजी? आणि म्हणूनच मग तिचा काटा काढला गेला..’
’काय.. काय बोलताय साहेब तुम्ही हे? मी फक्त दुर्गाच्या बिनबोभाट गर्भपातासाठी मदत करणार होतो. हे खून वगैरे माझ्या स्वप्नात देखील नव्हते. खरेतर वहिनीसाहेबांना हे दुर्गा दुर्गेशजींच्या प्रकरणाबद्द्ल माहिती होते हे देखील मला खुनानंतर तुमच्याकडून समजले.’ शेखरला पुन्हा एकदा कंप सुटला होता.
’दुर्गा आणि दुर्गेशचे कोणते प्रकरण शेखरजी?’ शांत स्वरात ध्रुव विचारता झाला’
’ऑ? ते हेच दुर्गेशजींपासून दुर्गाला दिवस’
ध्रुव खदखदून हसायला लागला आणि शेखरचे वाक्य घशातच अडकले. समोरच्या दारातून दुर्गा आणि दुर्गेश आत येत होते.. ’या दुर्गेश विश्वासराव कोळसे-पाटील आणि दुर्गा विश्वासराव कोळसे-पाटील.’ ध्रुवनी खणखणीत आवाज मारला आणि सावरण्यासाठी दोघांनाही एकमेकांचा आधार घेण्याशिवाय पर्याय राहिला नाही
– – –
’वेल डन माय बॉय!!’ फक्त ७२ तासात तू खुन्याला जेरबंद केलेस! प्राऊड ऑफ यू!’ कमिशनर साहेबांना ध्रुवच्या कौतुकात काय बोलावे आणि काय नाही तेच सुचत नव्हते. चल, आता सविस्तर तुझ्या हुशारीची कथा सांग’
’सांगण्यासारखे फार काही नाहीचे सर. विश्वासरावांबरोबर काम करता शेखर त्यांच्या फार जवळचा झाला होता. अगदी आपल्या सख्ख्या मुलापासून दडवलेले एक सत्यही ते शेखरपाशी उघड करून बसले, ते सत्य म्हणजे दुर्गाच्या जन्माचे. दुर्गा ही विश्वासरावांची अनौरस मुलगी आहे, हे कळताच राजकारणात मुरू लागलेल्या शेखरचे व्िाचारचक्र जोरात सुरू झाले आणि त्याने एक डाव खेळला. दुर्गाला विश्वासात घेत त्याने तिला तिच्या जन्माचे रहस्य सांगितले आणि तिला तिचा हक्क मिळवून देण्याचे वचनही दिले. दोघांच्या गाठीभेटी वाढायला लागल्या आणि त्यातून दोघेही एकमेकांच्या जवळ आले. शेवटी त्यातून नको ते घडले आणि दुर्गाला दिवस गेले. दुर्गाने गर्भपाताला ठामपणे नकार दिला आणि शेखर चक्रव्यूहात अडकला. दुर्गाला तर विरोध करून, नाराज करून उपयोग नव्हता, कारण ह्या सगळ्या खेळात महत्त्वाचे प्यादे तिच होती. मग त्याने हुशारीने कोळसे-पाटीलांविषयी असलेल्या दुर्गाच्या मनातील द्वेषाला हवा दिली. रक्षंदाला मारून, त्या गुन्ह्यात दुर्गेशला अडकवायचा प्लॅन देखील हुशारीने तयार केला. एकदा असे झाले, की असहाय्य विश्वासरावांना दुर्गाचा स्वीकार करायला लावणे सहजसोपे होते. दुर्गा आधी बिचकत होती, पण पोटातल्या मुलासाठी, त्याच्या भविष्यासाठी ती तयार झाली. उद्या आपल्या मुलाची अवस्था देखील आपल्यासारखी व्हायला नको, हाच तिचा विचार होता.
घरात कुठल्या वस्तू कुठे असतात ह्याची दुर्गाला माहिती होतीच. एके दिवशी तिने बरोबर संधी साधली, आणि बंगल्याबाहेर पडलेल्या दुर्गेशला फोन करून काही महत्त्वाचे सांगायचे असल्याचे निमित्त करून माघारी बोलावून घेतले. खरे तर हा जुगारच होता आणि तो अपेक्षेपेक्षा जास्ती फायद्याचा ठरला. दुर्गेश चक्क मागच्या दाराने दुर्गाच्या रुममध्ये आला आणि इकडे दुर्गाने डाव साधला. तिने आपल्याला दिवस गेल्याचे आणि दुर्गेशच्या मदतीची गरज असल्याचे सांगत रडायला सुरूवात केली. दुर्गेशच्या खांद्यावरती रडता रडता त्याच्या कुडत्याचे एक बटणही शिताफीने हस्तगत केले. दुर्गाची कथा ऐकून सुन्न झालेला दुर्गेश तिरमिरीत बाहेर पडला आणि नेहमीप्रमाणे फोन बंद करून शेखरच्या शोधात रवाना झाला.
इकडे दुर्गाने थंड डोक्याने रक्षंदाला संपवले. काही गडबड झालीच, तर आपली अनौरस मुलगी एका सामान्य सहाय्यकाच्या प्रेमात पडलीये आणि तिची वहिनी तिला तिचा जन्महक्क मिळवून द्यायचा प्रयत्न करतेय हे सहन न झाल्याने, स्वत:ची कारकीर्द आणि घराण्याची अब्रू वाचवण्यासाठी बाप-लेकानेच शेखरला अडकवण्यासाठी हे कुभांड रचले असा देखावा देखील उभे करण्याचा दुसरा प्लॅन शेखरने आणि तिने आखून ठेवला होता. जोडीला दिवस गेल्याची मदत होतीच. पण मी डीएनए चाचणीचा विषय काढला आणि त्यांच्या हातापायातील ताकदच गेली.
’ओह!! पण तुला ह्या दोघांची शंका आली कधी?’
’’जेव्हा मला दुर्गेशकडून हे समजले की, दुर्गेश आणि रक्षंदाच्या वादांचे कारण त्याची व्यसने नव्हती, तर त्याचे पौरुषत्वहीन असणे होते.’