• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

ज्योतिषांच्या मगरमिठीत

सचिन परब (प्रबोधन-१००)

marmik by marmik
March 9, 2026
in प्रबोधन १००
0
नाव शिवाजीचे घ्यावे, पुढे पाऊल टाकावे…

प्रबोधनकारांसारखा कट्टर प्रयत्नवादी माणूस कधीतरी ज्योतिषांच्या नादी लागेल असं त्यांचं लिखाण वाचताना चुकूनही वाटत नाही. पण सर्व बाजूंनी हतबल करून टाकणारी परिस्थिती इतकी भयंकर होती की प्रबोधनकार ज्योतिषाच्या वाटेला गेलेच. पण ते काही महिन्यांपुरतेच. आश्चर्य म्हणजे त्यातूनही `शनिमाहात्म्य` हे प्रयत्नवादाचा आग्रह करणारं वेगळं पुस्तक जन्माला आलं.

 

एकीकडे कोर्टाच्या खटल्यांनी बेजार केलेलं. त्यात पुण्यात उभं केलेला प्रबोधनाचा संसार उद्ध्वस्त झालेला. कमाईचा एकमेव आधार संपलेला. आर्थिक परिस्थिती तर डबघाईला आलेली. इथे मुंबईत धाकटा भाऊ आणि मेहुण्याच्या आधारे कसेबसे दिवस काढले जात होते. आजारपणाने अंथरुणाला खिळवून ठेवलेलं. तब्येत इतकी तोळामासा झालेली की काही नव्याने करणं शक्यही नव्हतं. प्रबोधनकार सांगतात तशी या सगळ्याची चर्चाही खूप झाली होती. प्रबोधनकारांच्या वैचारिक फटकार्‍यांनी जखमी झालेल्यांना असं वाटणं स्वाभाविकच होतं. त्यांनी ठाकरे संपल्याची घोषणाही करून झाली. प्रबोधनकारांच्या शब्दांत `कित्येकांनी तर ठाकर्‍यांचा अवतार संपला अशा सिद्धान्ताचा बकवाही केला.` अर्थातच प्रबोधनकार संपलेले नव्हते.ते संपले असं त्यांच्या आयुष्यात अनेकांना अनेकदा वाटलं. पण ते फिनिक्स पक्ष्याप्रमाणे पुन्हा पुन्हा राखेतून झेप घेतच राहिले.

पण ही परिस्थिती फारच बिकट होती. हतबल माणसाला सुटकेचा कोणताही मार्ग दिसत नाही, तेव्हा मदतीला हात पुढे करणारे, प्रेमाने आधार देणारे मित्रच दैववादाचा पिंजरा घेऊन येतात. प्रबोधनकारांचेही मित्र, मित्रांचे मित्र त्यांना अडचणीतून बाहेर पडण्यासाठी ज्योतिषांचे उपाय सांगू लागले. त्यांच्या दादरच्या घरी ज्योतिषांची गर्दी गोळा झाली. `माझी जीवनगाथा`मध्ये प्रबोधनकारांनी याचं वर्णन असं केलंय, `सहानुभूती व्यक्त करणारे जे स्नेही आजूबाजूला जमले, त्यात ज्योतिर्विदांचा भरणा बराच झाला. प्रत्येकाने माझ्या कुंडलीतल्या सप्तग्रह नवग्रहांच्या मुलाखती घ्यायला सुरुवात केली. गणिताने कागदांचे तावच्याताव त्यांनी आकड्यांनी भरून काढले. कुंडलीतले ग्रह बेटे असे मिस्किल का ते प्रत्येक ज्योतिषाला निरनिराळे भविष्य सांगू लागले. एकाचा मंगळ उच्चीचा तर दुसर्‍याला गवसला तो नीचीचा, एकाचा गुरू बलवान तर दुसर्‍याचा पेकाट मोडलेला.`

याचं वर्णन प्रबोधनकारांनी `ज्योतिषांच्या मगरमिठीत` असं केलंय. `शनिमाहात्म्य` या पुस्तकातही सुरुवातीला प्रबोधनकारांनी ही परिस्थिती सांगितलीय, `मी कट्टा दैववादी (फेटॅलिस्ट) नव्हे आणि कच्चा प्रयत्नवादीही नव्हे. मला ज्योतिषशास्त्र अवगत नाही आणि त्यात डोके खुपसण्याचा मी कधी यत्नही केला नाही. पण ज्योतिषशास्त्रात प्रवीण आणि स्वाध्यायशील असे माझे अनेक स्नेही आहेत आणि ते आपलेपणाच्या शुद्ध कळवळ्याने माझ्या कुंडलीचा अभ्यास करून, माझ्या चळवळीच्या भरती ओहोटीचे ठोकताळे अजमावीत असतात. कधी एखाद्या संकटाची आगामी सूचना देतात, तर कधी देत नाहीत, नुसते आखाडेच अजमावतात.`

या वेगवेगळ्या ज्योतिषांचे आडाखे वेगवेगळे असले तरी एका गोष्टीवर सगळ्यांचं एकमत होतं. प्रबोधनकार सांगतात, `सगळ्याचे मात्र एकमत की, शनीच्या साडेसातीमुळे मी पावणे आठीच्या भेंडोळयात अडकलो! दररोज सकाळ-संध्याकाळ नवग्रहांचे हे घाऊक अडत्ये खरडलेल्या आकड्यांची बाडे घेऊन माझ्या कानाशी घुंगुरट्याप्रमाणे कान पोखरणीला हजर असत. साडेसातीचा फेरा अपघातातल्या मोटारीप्रमाणे उलथून पाडायला प्रत्येकाचा उपाय निरनिराळा. कोणी म्हणे, मारुतीच्या तेलशेंदूरात बुचकाळी मारा, दुसरा म्हणे, अमुक स्तोत्राची दररोज इतकी पारायणे करा. मला कोणतेच पसंत पडेना. माझा तो पिंडच नव्हे, हो हो म्हणून मी वेळ मारून नेत असे. दिवसगत जात होते. मी मात्र ठिकच्या ठिकाणी. वैतागून गेलो या ज्योतिषांच्या मार्‍यापुढे.` अशाही अडचणीच्या काळात प्रबोधनकारांची विनोदबुद्धी मात्र तल्लख होतीच. ज्योतिषांचा वैताग विनोदाने परतवण्याची उदाहरणंच आहेत. प्रबोधनकार सांगतात, `पटकन एके दिवशी कुणीतरी यायचा आणि `केशवराव टाळी द्या. एवढा मार्च संपू द्या. काय चमत्कार होतो पहा. भाकित चुकले तर पुन्हा पंचांग हातात धरणार नाही.` त्यावर मी वैतागून म्हणायचा, `पंचांग तुमच्या हातात राहो अगर न राहो, पण मार्च संपल्यावर मी मात्र एप्रिल फूल होणार हे निश्चित.`
आणखी एक प्रसंग तर यापेक्षाही भारी आहे. स्वतःवर हसण्याची सहज हिंमत बाळगणारे प्रबोधनकार लिहितात, `मुंबईला गिरगावात करंदीकर नावाचे हस्तरेषा परीक्षक होते. तेही एक दिवस आपल्या साहित्यासह भेटीला आले. त्यांनी माझ्या दोन्ही हातांना शाई लावून त्यांचे ठसे घेतले. `लवकरच तुम्हाला परदेशगमनाचा सुयोग आहे; हजारांत असा हात आढळायचा नाही. तुम्ही शनिमहात्म्याचे पारायण करा: सहा महिन्यांत तुम्ही प्रकाशाच्या मार्गात पाऊल ठेवाल.` असा त्यांनी दिलासा दिला. मी त्यांना म्हटले, करंदीकर, प्रकाश आणि अंधार यांनाही मर्यादा आहेत. अंधार संपल्यावर प्रकाशच येणार. पण आपण परदेशगमनाचा वर्तविलेला योग मला फारसा खरा वाटत नाही. सांगण्यात तुमची काही चूक तर झाली नाही ना? परदेशगमन का परलोकगमन? आम्ही दोघेही पोटभर हसलो.`

फलज्योतिषातली आकडेमोड चुकू शकते, पण तळहातावरच्या रेषांमधून भविष्य सांगणारा पामिस्ट्रीचा प्रकार अधिक विश्वसनीय आहे, असं त्यांचं त्या काळात मत बनलेलं होतं. ते लिहितात, `विश्वविधात्याने आमच्या तळहातावर आमची कुंडली आधीच खोदून ठेवलेली असते. कागदी तपशिलात चुकले, पण ही तळहाती कुंडली कधीच चुकायची नाही. यामुळे ज्योतिषशास्त्राच्या जोडीनेच हस्तरेषाशास्त्राचीही बरीच प्रगती झालेली आहे.`

करंदीकरांसारख्याच आणखी एका पामिस्टाने त्यांना बरंच प्रभावित केलं होतं, असंही दिसतं, `गेल्या फेब्रुवारी महिन्यात अवचित एके दिवशी मला अगदीच अपरिचित व कधीही न भेटलेले असे ठाण्याचे श्री. वसंत जयवंत चित्रे नावाचे एक तरुण पामिस्ट (हस्तरेषापरीक्षक) भेटले. त्यांनी माझा हात पाहून आयुष्यातील ठळक ठळक प्रसंग तर मुदतशीर सांगितलेच, पण विशेष आश्चर्याची गोष्ट की, माझे वय, जन्मस्थिती, जन्मवार, सायन व निरयन कुंडल्यातील ग्रहस्थाने, राशी, वगैरे तपशील बिनचूक फटाफट अवघ्या नऊ दहा मिनिटांत सांगितला. ज्या कित्येक गोष्टी फक्त माझ्या मलाच माहीत, त्यासुद्धा त्यांनी सूचनांच्या रूपाने दर्शविल्यामुळे मी या तरुणाच्या हस्तरेषापरीक्षण प्राविण्याने अगदी चकित झालो.`

प्रबोधनकारांनी शनिमाहात्म्य १९२८च्या सप्टेंबरात प्रकाशित केलं. त्यातला हा संदर्भ आहे. म्हणजे हा प्रसंग १९२८च्या फेब्रुवारीतला असावा. प्रबोधनकार पुण्याहून मुंबईला आले ते १९२७च्या नोव्हेंबरात. याचाच अर्थ साधारण सहा–आठ महिने तरी ते या ज्योतिषांच्या मगरमिठीत अडकलेले होते. पण त्या काळातही त्यांचा चिकित्सक स्वभाव शांत नव्हताच. या काळातल्या अनुभवाचं सार ते असं सांगतात – `माणूस संकटात आला म्हणजे ग्रहदशेच्या फेर्‍यांपेक्षा या ज्योतिषी लोकांच्या फेर्‍यांत किती गाढव बनतो आणि वास्तविक कर्तव्याची वाट चुकतो, याचा मला या काळात भरपूर अनुभव आला.`

प्रबोधनकारांना शनीची साडेसाती दूर करण्यासाठी अनेक उपाय सांगितले जात ह होतेच. मारुतीला तेल घालण्यापासून तात्याजी महिपतीने लिहिलेलं शनिमाहात्म्य या पुस्तकाचं पारायण करण्यापर्यंत.अचानक आलेल्या संकटांमुळे भांबावलेल्या माणसाला संकटांची पूर्वकल्पना देणारा एखादा आधार हवा असतो, तेवढ्यापुरते ते या ज्योतिषात अडकले असावेत, असं दिसतं. पण गिरगावच्या करंदीकर ज्योतिषांनी शनिमहात्म्याच्या पारायणाचा फारच आग्रह केला. त्यामुळे त्यांनी शनिमाहात्म्य पुन्हा एकदा हातात घेतलं. ते त्यांनी लहानपणी विद्यार्थीदशेत अनेक वेळा वाचलं होतंच. पण आता त्यांनी याचा रीतसर अभ्यासच करायचा ठरवलं, `एखाद्या कल्पित कादंबरीपेक्षा मला त्याचे केव्हाही महत्त्व वाटले नाही. तथापि त्या कादंबरीचा चिकित्सक अभ्यास करावा, असे यावेळी मी ठरविले. ते चोपडे वाचून कोणाच्या दैवाच्या उलट्या बसलेल्या कवट्या सुलट्या होतात, यावर माझा विश्वास कधीच बसला नाही. तरीही सत्यशोधक भूमिकेवरून मी त्याचा अभ्यास चालविला.`

सत्यनारायणाची कथा असो किंवा व्यंकटेशस्तोत्र असो, प्रबोधनकारांनी तरुणपणीच त्याची चिकित्सा केली होती. त्यानंतर तर इतिहासाच्या आणि समाजाच्या चिकित्सेच्या मुळाशी धर्मचिकित्सा असते, हे कळल्यानंतर त्यांनी विविध प्रकारे धर्मचिकित्सेचा धडाका लावलेला दिसतो. त्यात ते `देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे` पर्यंत पोचलेले दिसतात. देव आणि माणसामधली मध्यस्थाची गरज आणि त्यांनी आपली पोटं भरण्यासाठी उभारलेली देवळं उद्ध्वस्त करायला हवीत, इथपर्यंत त्यांचा प्रवास झालेला होता. पण त्यांना शनिमाहात्म्य वाचताना काही चमकदार विचार त्यांच्या मनात आले. ते वाचकांपर्यंत पोचवले पाहिजेत, असं त्यांना वाटलं.

शनिमाहात्म्याच्या प्रास्ताविकात त्यांनी ही निर्मितीप्रक्रिया मांडली आहे.- `मी शनिमाहात्म्यच हाती का घेतले? प्रश्न व्यक्तीच्या निवडीचा असला, तरी त्याला काही भरीव कारणेही असली पाहिजेत, ग्रंथकाराने किंवा वत्तäयाने आपल्या जवळ कसला तरी नवविचार असल्याशिवाय लेखणी उचलू नये आणि तोड उघडू नये, असे मत आहे. शनिमाहात्म्याची पारायणे करणारे लक्षावधी लोक या महाराष्ट्रात आहेत. तितकेच कदाचित टीकाकारही (निंदक) असतील. या निंदक वंदकांच्या विचारात क्रांती घडवून आणण्याजोगा काहीतरी नवविचार माझ्याजवळ असल्याशिवाय मी या लेखनास प्रवृत्त झालो नाही खास. मी शनिमाहात्म्याचा आंधळा वंदक नके आणि आंधळा निंदकही नव्हे. मात्र प्रस्तुत ग्रंथातील विचारसरणीला माझी सध्याची परिस्थिती मूळ कारण झालेली आहे आणि तिच्या कठोर घर्षणातील एका चमकदार ठिणगीने शनिमाहात्म्याविषयी नवविचाराचा प्रफुल्ल दीप माझ्या मनोमंदिरात उजळला. ही गोष्ट प्रथमच सांगून टाकलेली बरी. या दिव्याच्या उजेडाने मला जे जे दिसले व अनुभवाला पटले ते ते प्रिय वाचकांच्या विचारक्रांतीसाठी नमूद करीत आहे.`

प्रबोधनकारांना शनिमाहात्म्य ही एक कादंबरीच वाटत होती, असं ते चाळीस वर्षांनी आत्मचरित्र लिहिताना सांगतात. `शनिग्रह उज्जनीच्या विक्रम राज्याच्याच बोकांडी बसायला का आला? विक्रम म्हणजे पराक्रम आणि तो उज्जनीचा म्हणे उच्च जनीचा. लोकहितवादी लोकमान्य अशा श्रेष्ठ दर्जाच्या जनसेवकांवरच संकटपरंपरेची कुर्‍हाड त्यांचे सत्त्व पहाण्यासाठी पडत असते, या एकाच सत्य तत्त्वावर तात्याजी महिपतीने शनिमहात्म्य या कादंबरीची उभारणी केली आहे. यापेक्षा त्यात आणखी काही गूढशक्ती असेल किंवा असावी असा तेव्हा आणि आजही माझा विश्वांस नाही.`

हा सगळा शनिमाहात्म्याकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन होता. ज्यांचा अशा पोथ्यांवर विश्वास असतो, ते त्याकडे चिकित्सेने बघत नाहीत. त्यातून नवा विचार मांडणं त्यांना शक्यच नसतं. आणि जे शनिमाहात्म्याला भंपक मानतात ते त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात. त्याची चिकित्सा करण्याची त्यांना गरजच वाटत नाही. पण मधल्या काळात ज्योतिषांच्या गराड्यात आलेल्या अनुभवाने प्रबोधनकारांना यातला मध्यममार्ग दिसला. शनिमाहात्म्यासारख्या पोकळ पोथीच्या आधारे प्रयत्नवादी विचार मांडला तर? अशी भूमिका घेऊन ते सगळी संकटं, आजारपणं आणि त्यातून आलेली निराशा झटकून पुस्तक लिहायला बसले. पण ते करताना त्यांनी सगळ्यात आधी ज्योतिषांना घरात प्रवेश बंद करून टाकला, `तथापि त्या पुस्तकाच्या अध्ययनाने मनात आलेले विचार पुस्तक लिहून प्रसिद्ध करावे असा बेत केला आणि त्याप्रमाणे रोज भेट द्यायला येणार्‍या अर्धा डझन ज्योतिर्विदांना उंबरठा-बंदीचा हुकूम सोडून ` शनिमहात्म्य` अथवा `ग्रहदशेच्या फेर्‍याचा उलगडा’ या पुस्तकाचे लेखनकार्य जिद्दीने हाती घेतले.`

Previous Post

केजरीवाल अजूनही ‘अण्णा’च आहेत?

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.